अदानी, ऑलिगारकी आणि आपला (पोकळ) राष्ट्रवाद


 हिंडेनबर्ग रिसर्च नामक न्यू यॉर्क स्थित एका छोट्याशा कंपनीने अदानी ग्रुपचा दोन वर्षे सखोल अभ्यास करून शेयर्सच्या किमतीत फेरफार करणे, अकाउंटिंग मध्ये घपला करणे ई आरोप त्यांच्या 100+ पानी रिपोर्ट मध्ये लावले आहेत. परिणामतः गौतम अदानी जगातील #3 स्थानावरून #20 च्या खाली गेले आहेत. एकीकडे अदानी ह्यांनी हिंडेंबर्गला कोर्टात खेचण्याची धमकी देत ह्या रिपोर्टला 'भारतावर हल्ला' म्हटलं आहे तर दुसरीकडे हिंडेंबर्ग त्यांच्या रिपोर्टच्या सत्यतेबद्दल ठाम आहेत.तर ह्या अत्यंत रोचक अशा घटनांचे अनेक पैलू आपण एक एक करून बघूया:

1. हिंडेंबर्ग कोण आहे?-  हिंडेंबर्ग ही एक short selling कंपनी आहे. तर शॉर्ट सेलिंग म्हणजे नेमकं काय? सामान्यतः आपण जेव्हा एखाद्या कंपनीचे शेयर्स विकत घेतो तेव्हा आपली अपेक्षा असते की त्याची किंमत येणाऱ्या काळात वाढेल म्हणजे आपण ते विकून नफा कमवू. ह्यालाच लॉंग पोजिशन घेणे म्हणतात. शॉर्ट सेलिंग ह्याच्या अगदी विरुद्ध दिशेने जातं म्हणजेच एखाद्या कंपनीच्या शेयर्सची किंमत खाली पडली की शॉर्ट सेलर गुंतवणूकदारांना नफा होतो.  हिंडेंबर्ग सारख्या अनेक कंपन्या ह्या शॉर्ट सेलिंग करून नफा कमावतात. ह्यात काहीही अवैध अथवा बेकायदेशीर नाही. 

2. ह्या रिसर्च मागे हिंडेंबर्ग चा काय फायदा? -  हिंडेंबर्गचा दोन वर्षे रिसर्च करून तो रिसर्च पब्लिकला जाहीर करणे ह्या मागे एकच उद्देश आहे - नफा. अदानीच्या कंपन्यांमधील त्रुटी शोधून काढणे मग ते जाहीर करून मार्केटमध्ये घबराट पसरून अदानीच्या शेयर्सची किंमत पडल्यामुळे पैसे कमावणे हा एकच उद्देश आहे. 

3. अदानीलाच टार्गेट का केलं जात आहे? - हिंडेंबर्ग आणि अदानी उद्योग समूह ह्यांच्यात काही वैयक्तिक वैर नाहीये. अदानी प्रमाणेच हिंडेंबर्ग अशा कंपन्यांच्या शोधात असतात जिथे त्यांना काहीतरी अवैध, बेकायदेशीर सापडू शकतं. ह्या आधी त्यांनी निकोला नावाची इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या एका अमेरिकन कंपनीचा पर्दाफाश केला होता. 34 अब्ज डॉलर valuation असलेली ती कंपनी 1.5 अब्ज डॉलर वर येऊन पोचली आहे. हिंडेंबर्ग ने केलेल्या रिसर्चमुळे निकोला चा प्रमुख गजाआड गेला होता. ह्या प्रकरणात हिंडेंबर्गने निकोलाला शॉर्ट करून भरपूर पैसे कमावले हे सांगायची गरज नाही. त्यामुळे अदानी ला टार्गेट केलं जात आहे हे म्हणणे साफ चुकीचे आहे. हा हिंडेंबर्ग चा धंदा आहे आणि त्यात राष्ट्रप्रेम अथवा राष्ट्रद्वेष वगैरे सारख्या क्षुल्लक बाबींचा संबंध नाही.

4. अदानींचा बचाव- अदानी ह्यांनी हा रिसर्च म्हणजे भारत आणि भारतीय कंपन्यांवर अमेरिकेचा हल्ला आहे असं म्हटलं आहे. मुळात ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हिंडेंबर्ग ने त्यांचा रिसर्च हा बाकीच्या अनेक अब्जावधी डॉलर्स चा धंदा करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर केंद्रित केला नाही. त्यांना अदानी कंपनीज मध्ये गौडबंगाल सापडलं आणि त्यांनी ते जाहीर करून पैसे कमावले. हिंडेंबर्ग जर खरंच भारत विरोधी कंपनी असती तर असाच रिसर्च त्यांनी बाकीच्या भारतीय कंपन्यांवर पण केला असता, त्यांना शॉर्ट केलं असतं आणि पैसे कमावले असते. 

5. भारतीय ऑलिगारकी- ऑलिगारकी ही अशी व्यवस्था असते ज्यात काही निवडक पावरफुल लोक सरकारला मुठीत ठेऊन देशाचा अर्थकारण चालवत असतात. हा शब्द मूळचा रशियन आहे आणि ऑलिगारकी चे सगळ्यातबज्वलंत उदाहरण रशिया हा देशच आहे. तसं पाहता आपल्याकडे पण एकप्रकारे ऑलिगारकी ही अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून चालत आली आहे. अगदी स्वातंत्र्यानंतर Bombay Club च्या स्थापनेपासून ते इंदिरा गांधी च्या काळापर्यंत देशातले सगळे मोठे धंदे हे एकतर केंद्रशासित असत किंवा निवडक मोठ्या उद्योग समूहाच्या ताब्यात. आज अर्थव्यवस्था खुली करून जवळपास 32 वर्ष होऊन देखील ह्या भारतीय ऑलिगारकीचे वेगळे रूप आजही आपल्याला दिसते. अदानी समूह हा ह्या ऑलिगारकीच्या अनेक लाभार्थी पैकी एक आहे असं म्हणायला वाव आहे. सध्याचे राज्यकर्ते आणि अदानी ह्यांची असलेली जवळीक सर्वश्रुत आहे. ह्या जवळीकीचा फायदा अदानी समूहाला झाला असं अनेक जाणकार म्हणतात. म्हणूनच की काय केवळ एका दशकात अदानी समूह हा भारतातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. LIC ने अदानी मध्ये हजारो कोटी गुंतवले तेव्हा त्यामागे कुठलेशे financial model नव्हते हे सरळ आहे. त्यांनी ती गुंतवणूक केली तीच मुळी LIC ही सरकारी कंपनी असल्यामुळे. ह्या ऑलिगारकीचा फायदा म्हणून सरकार मार्फत LIC वर दबाव आला असेल का अभ्यासाचा विषय असू शकतो. 

5. राष्ट्रवादाचा अँगल-  जेव्हा कधीही एखादी बाहेरच्या देशातील कंपनी अथवा न्यूज चॅनेल आपल्या सिस्टम मधील किंवा आपल्या कंपन्यांमधील त्रुटी शोधून काढते तेव्हा आपला राष्ट्रवाद उफाळून येतो. तो उफाळून येतो कारण जे ह्यात अडकलेले असतात त्यांचा सगळ्यात सोप्पा बचाव हा आपण (म्हणजे भारत) विरुद्ध ते (म्हणजे बाहेरच्या देशातले) असा दाखवणे हाच असतो. मूळ विषयापासून पब्लिकचे लक्ष हटवण्यासाठी देशप्रेम/राष्ट्रवाद सारखा दुसरा उपाय नाही. ह्यात भरकटुन सामान्य माणूस समोर आलेल्या त्रुटींचा नीट अभ्यास न करता हा आपल्या देशावर अथवा आपल्या देशातील कंपन्यांवर हल्ला आहे असं ठाम मत बनवून बसतो. आणि हेच नेमके अडकलेल्या लोकांना हवं असतं. हिंडेंबर्ग च्या बाबतीत पण नेमकं हेच घडलं. रिसर्च मध्ये मांडलेल्या मुद्द्यांचा अभ्यास न करता आज अनेक शिकलेले लोक ह्याला भारत वि अमेरिका असा रंग देत आहेत.

मुळात जे मुद्दे हिंडेंबर्ग ने मांडले आहेत ते केवळ अदानी मध्ये पैसे गुंतवणाऱ्या सामान्य लोकांसाठीच नव्हे तर देशासाठी पण घातक आहेत. एका छोट्याश्या एक्स्पोर्ट करणाऱ्या कंपनीचा मालक 2014 नंतर जगातील नंबर तीन श्रीमंत माणूस बनतो कसा ह्याचे काही उत्तरं ह्या रिसर्च मध्ये सापडतात. पण ते काहीही न वाचता ह्या घटनेला केवळ स्वतःच्या पोकळ राष्ट्रवादाच्या नजरेतुन बघणे म्हणजे भविष्यात पण असे अनेक अदानी आपल्याकडे निर्माण होतील ह्याची शाश्वती बाळगणे होय. 

खरंतर जे काम हिंडेंबर्ग ने केलं ते आपल्या देशातील regulating bodies अथवा watchdogs ने करायला हवं होतं. पण आंधळा दळतोय आणि कुत्रा खातोय अशी परिस्थिती असल्यामुळे हे होणे सध्यातरी शक्य वाटत नाहीये.

शैलेंद्र वैद्य,.....न्यू जर्सी,युएसए.. ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1