Top Post Ad

कामगारांविना गाडा 'मराठी'चा ना चाले...

 


शिक्षित-उच्चशिक्षित पांढरपेशा मध्यमवर्गीयांनो,

आजच्या 'मराठी-दिना'निमित्ताने एक गोष्ट आपण पक्की ध्यानात घेऊया की, आज जी काही मराठी भाषा, 'जिवंत' आहे (वेड्यावाकड्या अशुद्ध स्वरुपात अथवा निव्वळ बोली-भाषेच्या स्वरुपात का होईना), त्याचं मोठं श्रेय अल्पशिक्षित कामगारवर्गाकडेच जातं! उदाहरणार्थ, समाजातला बहुजन कामगार, एखादी निर्जीव गोष्ट अथवा वस्तू मिळाली, याला सर्रास चुकीची किंवा अशुद्ध मराठी भाषा वापरताना वस्तू भेटली, असं म्हणतात तेव्हा, ऐकताना कानाला जरुर त्रास होतो. ही किंवा अशा गोष्टी, आजच्या 'मराठी-दिना'च्या औचित्याने सुधारण्याचा निश्चय, समस्त कामगारवर्गाने जरुर करावाच. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, भेटणे या क्रियेत नजरभेट किंवा गळाभेट अध्याहृत असते; म्हणूनच ती दोन किंवा अधिक माणसांच्याच बाबतीत घडणारी क्रिया होय व त्यामुळेच 'भेटणं', ही क्रिया निर्जीव वस्तुंच्या बाबतीत होऊ शकत नाही.

असं असलं तरी, चुकीच्या पद्धतीने उच्चारण करतानाही कामगार, जो चुकीचा शब्दप्रयोग वापरतो, तो 'म' मराठीतलाच असतो. आपण उच्चशिक्षित लोक, सर्रास प्रत्येक दोनचार शब्दागणिक जे (सुंदर, अर्थवाही मराठी शब्दांऐवजी) इंग्रजी शब्द वापरत असतो... ते कितपत योग्य आहे? व्हॉट्सॲप 'मेसेज', याला आपण व्हॉट्सॲप 'संदेश किंवा निरोप' असे मराठी शब्द वापरु नाही शकत का? कधि तरी थबकून विचार करा आणि पहा, आपण बोलता बोलता किती टक्के इंग्रजी शब्द उगीचच आपापसात बोलताना घुसडतो ते! अशानं एकवेळ अशी येईल की, पुढच्या पिढ्यांना त्या मूळ मराठी शब्दांचाच कायमचा विसर पडेल. सकळ मराठीची कास न धरता, अशा मराठी भाषेच्या भेळ-भेसळीच्या परिस्थितीतही, आम्ही सुशिक्षित आणि सुखवस्तू मध्यमवर्ग... 'मराठी-दिना'निमित्ताने, मराठी-भाषा कौतुकाच्या संदेशांचे रतीब व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर घालणार असू; तर मग, कमालच झाली, वारे व्वा मराठी जनहो!

मराठी भाषेत जो मायेचा ओलावा आहे, ममत्व आहे, मोठ्यांप्रति आदर आहे... ते सारं इंग्रजीत कितपत आढळेल? भाषा आणि मानवी-संस्कृति, या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या अभिन्न असतातच. मराठी जनमानसात जे निसर्ग-पर्यावरण जपण्याचं बाळकडू शिवबा-संतांकडून, मराठी सणावारातून परंपरेनं आलंय, ते ही मूळ मराठी भाषेतूनच उद्गम पावलंय. इंग्रजीतल्या 'माॅम, पाॅप'चे पाॅपकाॅर्न कितीही टणाटण फुटू द्या; पण, त्यांना 'आई' शब्दाचं आर्त किंवा भिजलेपण कधि येऊ शकेल? पौर्वात्य-संस्कृति म्हणून जो काही भारतीय-संस्कृतिचा गौरव होतो ना, तो खरंतरं प्रकर्षानं मराठी-संस्कृतिशीच नातं सांगणारा असतो, हे विशेष. 

सध्या, जातधर्मविद्वेषाने ग्रस्त आपल्या देशात आणि युद्धग्रस्त अवतीभवतीच्या जगभरात (नुकतीचं रशिया-युक्रेन महासंहारक युद्धानं वर्षाची सीमा ओलांडलीय) क्षुद्र स्वार्थापलिकडे... तसेच हिंसक, हिणकस राजकारणापलिकडे जाऊन मायेची रुजवात करण्याची, ममत्वाचा चौफेर शिडकावा करण्याची फार मोठी गरज आहे आणि ती करण्याची अंगभूत ताकद, केवळ मराठी भाषा आणि संस्कृती स्वतःत राखून आहे, तो मायमराठीचा प्रेमाने रसरसलेला जणू मूळ गुणधर्मच होय!

"जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो। भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचे।।" असं विश्वधर्माचं उत्तुंग 'पसायदान' मागणारे संत ज्ञानेश्वर काय किंवा "खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे", असा धर्माचा मूलभूत मंत्र, जगाच्या कल्याणाचा उद्घोष करत सांगणारे, ममत्वाचे मूर्तिमंत प्रतिक असलेले साने गुरुजी काय... या मायमराठीनेच त्यांना प्रसवलं आणि या जगाला महन्मंगल दान म्हणून दिलं!

मित्रहो, तुम्हाला खरंच मराठी जगवायचीय, मराठी भाषा शिंपल्यातल्या मोत्यासारखी हळूवार जपायचीय का?
तर मग, लक्षात घ्या... मराठी भाषा संपली की, माणुसकीसुद्धा आपल्यातून झपाट्याने काढता पाय घेईल. आजच आणि याअगोदरच, कुंठीत झालेले प्रेमाचे झरे, आपल्यातून कायमचे आटून जातील, पुढील पिढ्या त्यांच्या आचमनावाचून तृषार्त रहातील आणि निव्वळ भोगी, विलासी आणि संवेदनशून्य बनतील... हा भविष्यातला मोठा धोका आहे.

तेव्हा जर, या 'मराठी-दिना'निमित्ताने तुमच्या मराठी-प्रेमाला आलेला उमाळा अंतर्यामी खरा असेल... तर, तुम्ही मराठी माणूस म्हणून शक्यतेची प्रत्यंचा पूर्ण ताणून मराठीतूनच परिपूर्ण बोलण्याचा, संभाषण करण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण संभाषण मराठीतूनच (शक्य तेवढे इंग्रजी प्रतिशब्द वापरण्याचा मोह टाळून) करण्याचा हा तुमचा प्रयास... सुरुवातीला काहीसा अवघड, अडचणीचा जरुर वाटेल; पण, लवकरच तो प्रयत्न, तुमच्या हाडामांसी भिनेल आणि पहाता पहाता, तुमच्या व्यक्तिमत्वाचाच एक अभिमानास्पद भाग बनेल.

यासोबतच, एक आनुषंगिक व अतिशय महत्त्वपूर्ण सूचना ही की, प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे जो बहुजन मराठी-कामगारवर्ग, मराठीची पालखी आपल्या खांद्यावर आजवर वाहून नेत आलाय... त्याला, तुम्ही काॅर्पोरेटीय-व्यवस्थापक म्हणून, राजकारणी म्हणून किंवा सरकारी अधिकारी म्हणून काम करत असताना... 'आऊटसोर्सिग किंवा कंत्राटी-कामगार पद्धती'तल्या गुलामगिरीतून उध्वस्त होण्यापासून व त्या चरकात पिळला जाण्यापासून वाचवणं शक्य होतंय का, ते आवर्जून पहा... त्यासाठी, अगदी ठरवून तळमळून मनापासून प्रयत्न करा. 'व्यवस्थे'त काम करताना, उघडपणे तसं काही करणं अगदीच अशक्य असेल; तर, निदान शिवछत्रपतींनी शिकवला, त्या 'गनिमीकाव्या'च्या आधाराने समस्त कामगारवर्गाला ताकद देण्यासाठी आपली बुद्धी आणि शक्ति वापरा! किमानपक्षी, कारकीर्दीतील बढतीच्या, पगारभत्तेवाढीच्या अनैतिक मोहापायी किंवा सत्तेच्या उघड्यानागड्या नृशंस बाजारातील राजकारणात उच्चपदं मिळवण्याच्या पातकी हव्यासापोटी... आपल्याच मराठी-रक्ताघामाची 'भांडवली' भरबाजारात 'जास्तीतजास्त स्वस्तात बोली' लावण्यासाठी आणि त्यांना 'कंत्राटी-गुलामगिरी'त ढकलून त्यांचं नोकरीतलं जगणं दहशत-दडपशाहीने अस्थिर करण्यासाठी... हिरिरीने पुढाकार घेण्याचं महापातक करणं, तरी तत्काळ थांबवा!

...आणि, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मराठी कामगार-कर्मचारीवर्गाच्या म्हणजेच, पर्यायाने मराठी-भाषेच्या अस्तित्वाच्या गळ्याला नख लावणार्‍या... या रक्तपिपासू-शोषक 'कंत्राटी-कामगार प्रथे'ला नष्ट करण्याचं 'अभिवचन', येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांकडून अथवा राजकीय पक्षांकडून घेऊनच मगच, त्यांना मतदान करा आणि या 'कंत्राटी-कामगार पद्धती'तल्या 'गुलामगिरीला व नव-अस्पृश्यते'ला कायमची मूठमाती देण्याचा मनोमन निर्धार करा!जाता जाता, बायबलमधला एक जाज्वल्य संदेश उद्धृत करुन आजच्या 'मराठी-दिना'च्या संदेशाची इतिश्री करुया... "तुम्ही जग जिंकलंत; पण, जिंकताना आपला आत्मा गमावलात, तर त्याचा काय उपयोग ?"

 || जय महाराष्ट्र, जय हिंद ||

(संयुक्त-महाराष्ट्रानंतर आता, 'स्वायत्त-महाराष्ट्र'... राष्ट्रांतर्गत राष्ट्र, 'स्वायत्त-महाराष्ट्र'... 'शिवछत्रपती-राष्ट्र'!)

...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

ता. क. : ज्यांच्या जन्मदिवसाप्रित्यर्थ हा मराठी-दिन साजरा केला जातो... त्या महाकवी कुसुमाग्रजांनी संयुक्त-महाराष्ट्र चळवळीला फार मोठं योगदान दिलं होतं... आणि, आता त्या संयुक्त-महाराष्ट्रालाच, 'राष्ट्रांतर्गत राष्ट्र, स्वायत्त-महाराष्ट्र' करण्याची पुढची मोठी जबाबदारी, तुमचीआमची सर्वांचीच आहे, हे विसरुन चालणार नाही!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com