विपश्यना हा शब्द आज देशाच्या अनेक शब्द कोषांतून गायब झालेला आहे. भगवान बुद्धांची ही साधना तिच्या मूळ भूमीतून जवळजवळ 2500 वर्षांपूर्वी नाहिशी झाली. शेजारील देशातील थोड्याशा लोकांनी तिचे मूळ स्वरुपात जतन केले. माझ्या मते या देशातून बौद्ध धम्माच्या ऱ्हासाच्या अनेक कारणांपैकी विपश्यना साधनेचे लुप्त होणे हेही एक कारण आहे.
संवेदना हा भगवान बुद्धांचा मूलभूत शोध होय याच संवेदनेचे विपश्यनेमध्ये जागरूकतेने अभ्यास करण्याचे शिकविण्यात येते. हाच शब्द त्रिपिटकात प्रत्तेय तसेच संधिसहित जवळजवळ दहा हजार वेळा आलेला आहे. गुरुजी शिकवित असलेली विपश्यना, साधनेत येणारे संबंधित व समानार्थी शब्द उदा.`सत्तिपठ्ठाण' सहाशे बावीस वेळा, `समथ' सुमारे नऊशे वेळा तसेच `कायनुपश्यना', `वेदनानुपश्यना', `चित्तानुपश्यना', `धम्मानुपश्यना' हे शब्द त्रिपिटकात निदान आठशेवेळा तरी आलेले आहेत. `पश्यना' याचा अर्थ पाहणे. `विपश्यना' या शब्दाचा अर्थ विशेष प्रकार पाहणे. जे आपल्या डोळ्यांनी पाहता येत नाही ते मनचक्षुंनी अनुभवायचे आहे. जसे आपण एखाद्यास म्हणतो, ही मिठाई स्वादिष्ट आहे. खाऊन तर बघ किंवा एखाद्यास म्हणतो, हे कापड किती मुलायम आहे, जरा हात लावून तर बघ. खाऊन तो काय बघणार किंवा हात लावून तो काय करणार? पण मिठाई चाखल्याने त्याला जो अनुभव येईल, कापडास हात लावण्याने त्याच्या मुलायमतेचा जो स्पर्श अनुभवेल ते स्पर्श अनुभव, स्पर्श दर्शन महत्त्वाचे आहे. विपश्यना म्हणजे मनाने होणाऱया वेदनेचा अनुभव करणे, दर्शन करणे!
विपश्यनेची विस्तृत माहिती `मज्झिमनिकाय', `दिघनिकाय', `संयुत्तनिकाय', `खुद्दकनिकाय', `अङ्गत्तरनिकाय', `विनयपिटक', `अभिधम्मपिटक' या सर्व त्रिपिटकाच्या ग्रंथात दिलेली आहे. आज त्रिपिटकात `विपश्यना' हा शब्द नाही म्हणण्यापर्यंत सूज्ञांची मजल गेलेली आहे. ज्या साधनेद्वारे निर्वाणाचा साक्षात्कार होतो, मुक्तीचा मार्ग मिळतो, ती साधना बुद्धाची नाही म्हणण्यापर्यंत काहीची मजल गेलेली आहे. ज्या समाज घटकास अस्पृश्य, अंत्यज वगैरे विशेषणे लावून या विद्येपासून फार दूर ठेवण्यात आले होते; त्या समाजास तथागतांनी करुणेने जवळ करून अत्यंत उच्चपदावर नेऊन समाजात समतेचा झेंडा फडकाविला. उपालीसारख्या अंत्यजास संघायनात आचार्य म्हणून बसविण्यात आले. संपूर्ण विनयपिटकाची संहिता त्यांच्या अधिपत्याखाली बनविण्यात आली.
`विपश्यना' ज्या `सतिपठ्ठाण सूत्ता'त सांगितली आहे त्या `सतिपठ्ठणा'चे वाचन व स्पष्टीकरण नऊ दिवसाच्या `सतिपठ्ठाण शिबिरा'त गोयंका गुरुजी करतात. त्यात भाग घेऊ इच्छिणारे साधक हे जुने, नियमित अभ्यास करणारे असणे आवश्यक असते. जिवंतपणी मुक्तीचा मार्ग दाखविणारी ही साधना, शील, समाधी, प्रज्ञेत स्थापित करणारी साधना, धम्माचरण करावयास शिकवणारी ही मंगलदायी साधना, सर्वांनी स्वीकारू या, सर्वजण कुशल मार्गाला लागूया. भारत बौद्धमय करण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता तन-मन-धनाने सहभागी होवू या. सर्वांचे कल्याण होवो, मंगल होवो.
एन.वाय.लोखंडे
0 टिप्पण्या