Top Post Ad

पद्मश्री अशा हिऱ्यांना शोधून दिले जाऊ लागलेत म्हणून सरकारचे विशेष अभिनंदन......


  केपु. कर्नाटकातल्या अद्यानाडकाजवळचं एक छोटं गाव. एक माणूस तिथं सुपारी आणि नारळाच्या बागेत मजुरी करत होता. स्वतःचं ना घर ना जमीन. पण त्याचं समर्पण आणि प्रामाणिकपणा बघून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी 1978 मध्ये त्याला 2 एकर जमीन बक्षीस म्हणून दिली. जमीन एका टेकडीच्या माथ्यावर होती. पूर्ण नापीक आणि ओसाड. पाण्याचा मागमूसही नाही. आपल्यासारखा कोणी असता, तर जमिनीचा नाद सोडून दिला असता.  पण त्या माणसानं ह्या जमिनीवर सुपारीच्या बागेचं स्वप्नं बघितलं; आणि सुरू झाला एक शोध - संघर्ष अंगावर घेणार्‍या साहसांचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तरांच्या प्रवासाचा आणि जगण्याचा...

मग टेकडीच्या पायथ्याला कुटुंबासाठी झोपडी बांधायला सुरुवात केली. टेकडी सपाट करून घेतली. त्यासाठी भिंत बांधली. पाण्याचा प्रश्न होताच. विहीर खोदण्यासाठी पैसे नव्हते. मग ती स्वतःच खोदायचं ठरवलं आणि लागले कामाला. टेकडीच्या पायथ्याला असल्यानं पाणी साठवण्याच्या प्राचीन पद्धतीप्रमाणं आडवा अरुंद बोगदा खोदायला सुरुवात केली. 

भटांच्या शेतात मजुरी करायची, आणि घरी आलं की चार पाच वातींचे दिवे घेऊन बोगदा खोदायला निघायचं. कधीकधी हे काम रात्री 9 पर्यंत चालायचं. एक बोगदा 20 मीटर पर्यंत खोदल्यावर कोसळला. मग दुसरा तिसरा करत चार बोगदे कोसळले, पण नाईकांची जिद्द थोडीसुद्धा कोसळली नव्हती. शेवटी पाचवा बोगदा खोदायला सुरुवात केली. टेकडी आणि पाणी दोघांनीही ह्यांच्यापुढं हार मानली, आणि 35 मीटर खोदल्यावर एक पाण्याचा झरा लागला. सुपारीच्या खोडाचा पाईप सारखा वापर करून ते पाणी घरापर्यंत आणलं. पाणी साठवायला तिथं मोठा हौद तयार केला.

काही वर्षांपूर्वी बघितलेल्या एका वेड्या स्वप्नाच्या शोधात सुरू झालेला प्रवास एकट्यानं केला. लिहिताना किंवा वाचताना जरी हे सगळं एवढं सहज वाटत असलं, तरी नाईक यांनी ऑलम्पिकच्या स्विमिंग पुलापेक्षा दीड पट मोठा बोगदा खोदला होता. सतत आठ वर्षं आणि सुमारे 23000 तास काम करून... पाण्याची किंमत कळायला प्रत्येकाच्या वाट्याला एवढा संघर्ष का यावा?, असं वाटतं कधीतरी. नाईकांच्या शेतात एक थेंब पाण्याचा अपव्यय होत नाही. पुनर्वापर केला जातो.

आज नाईक यांच्या शेतात 300 पेक्षा जास्त सुपारीची, 75 नारळाची झाडे, 150 काजूची झाडे, 200 केळीची आणि मिरचीची झाडं आहेत. संपूर्ण सेंद्रिय शेती आहे, आणि ऊर्जेचा वापर शून्य.  आज वयाची सत्तरी ओलांडली तरी नाईक शेतातली सगळी कामं आणि कष्ट स्वतः करतात. काल त्यांना कृषी विषयातला पद्मश्री जाहीर झालाय. शिक्षण, तंत्रज्ञान, जमीन आणि साधनसंपत्ती यांपैकी काहीही नसताना निखळ मेहनतीच्या जोरावर प्रत्येक अडथळ्यांवर मात करून अशक्य गोष्टी वास्तवात बदलता येतात, त्यांनी सिध्द केलंय. औद्योगिक महासत्ता होण्याच्या आपण कदाचित जवळ असू; पण कृषिप्रधान देश कृषी महासत्ता होण्यासाठी आपल्या सगळ्यांना नाईकांएवढे नाहीत, पण थोडेतरी प्रयत्न करावे लागणार आहेत...   

- अमायी महालिंगा नाईक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com