Top Post Ad

शिवसेना एकनाथ शिंदेंच्या हाती.... आप क्रोनॉलॉजी को समझिए

 शिवसेना एकनाथ शिंदेंच्या हाती.... आप क्रोनॉलॉजी को समझिए

 केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येणे त्याच्या एक दिवस आधी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होणे आणि त्याच दिवशी उध्दव ठाकरे यांना जमिन दाखविण्याचा इशारा देणारे केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत येणे आणि उध्दव ठाकरेंच्या ताब्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय होणे या सगळ्या गोष्टींचा नीट तर्क लावण्याचा प्रयत्न केला असता आप क्रोनॉलॉजी को समझिए असे अमित शाह यांच्याच भाषेत  म्हणावे लागेल. अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

उध्दव ठाकरे यांनी भाजपाबरोबरची २५ वर्षापासूनची युतीतून बाहेर पडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. त्यानंतर कोरोना काळ आल्याने राजकिय क्षेत्रात घडामोडींना फारसा वेग आला नाही. मात्र कोरोना काळातील नियमात केंद्र सरकारने शिथिलता आणल्यानंतर या घडामोडींना वेग आल्याचे दिसून येते. नेमक्या त्याच कालावधीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत पक्षाच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर झालेल्या मुंबईतील आमदार-खासदारांच्या बैठकीत आगामी निवडणूकांमध्ये हिदूत्वाशी काडीमोड घेणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जमिन दाखविण्याचा इशारा दिला होता अशी माहिती भाजपामधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

त्यानंतरच्या साधारणतः महिना दोन महिन्यातच राज्यातील राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहिर करण्यात आला. आधी राज्यसभेच्या निवडणूकीत याची एक झलक भाजपाने दाखवून दिली. त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या ७ जागांचा अंतिम निकाल हाती येईपर्यंत एकनाथ शिंदे हे १६ आमदारांना घेवून रात्रीत सूरत गाठले. त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुतच आहे.

मात्र खरी गंमत सुरु झाली ती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तास्थापनेसाठी ३० जून रोजी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सादर केलेली कागदपत्रे आणि तत्पूर्वी राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिल्याचा पत्रव्यवहार अद्याप पर्यंत उघडकीस आला नाही. याशिवाय ही कागदपत्रे मिळावी याकरीता वेगवेगळ्या दोन आरटीआय कार्यकर्त्यांनी राजभवन आणि विधिमंडळाकडे माहिती अधिकार कायद्याखाली सत्ता स्थापनेची कागदपत्रे मागितली. परंतु या दोन्ही ठिकाणाच्या प्रशासनाकडे कागदपत्रे नसल्याचे उत्तर देण्यात आले. नेमक्याच त्याच कालावधीत सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून दावे-प्रतिदावे करत त्यावरील सुनावणीस सुरुवात झाली होती. मात्र त्या काळात या दोन्ही संस्थांकडून कोणताही ठोस निर्णय दिला नाही. त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळाचा दोन महिने झाले तरी विस्तार झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकारला तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यामध्ये शिंदे गटाचे आणि भाजपाच्या प्रत्येकी ९ आमदारांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे २० जणांचे मंत्रिमंडळ झाले. यानंतर जवळपास एक ते दोन महिना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत राहण्याचे काम सुरु केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी दौरा झाला. अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर पुन्हा काही दिवसांनंतर मुंबईतील विविध विकासासाठीच्या योजनांचा शुमारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात मुंबईत पार पडला. हा दौरा होताच राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केल्याची माहिती राजभवनाकडून जारी करण्यात आली. त्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना पुढील १५ दिवस पदमुक्त केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा दौरा झाल्यानंतर एका दिवसाच्या अंतराने राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याची माहिती पुढे आली.

विशेष म्हणजे ज्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिला गेला त्यानंतर लगेच संध्याकाळी केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्य बाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात येत असल्याचा निकाल जाहिर केला.

या वादंगात राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही आगमन झाले. अमित शाह हे नागपूर, कोल्हापूर आणि मुंबईतील काही कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. दरम्यान, नागपूर येथील एका प्रसारमाध्यमाच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले, नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या निकालाच्या माध्यमातून दूध का दूध पानी का पानी किया असे सूचक वक्तव्य केले.

विशेष म्हणजे निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या एक ते दोन दिवस आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकार परिषदेत आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीत या निकालाबाबत काही सूचक वक्तव्य केले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या हातातील शिवसेना निसटणार यावर शिक्कामोर्तब झाले.

या सर्व घटनाक्रमांचा साखळ्या जोडल्या तर अमित शाह यांच्या भाषेतच सांगायचे तर आप क्रोनोलॉजी को समझिए असे सांगत या नेत्याने अधिक बोलण्याचे टाळले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com