Top Post Ad

सत्ता आणि पैशाच्या बळावर आपण प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकतो


   शिवसेनेने हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली, कारण त्याने काँग्रेस व राष्ट्रवादीशी दोस्ती करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, असा भाजपाचा युक्तिवाद असतो. परंतु शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हा काँग्रेसचे पुढे उपमुख्यमंत्री राहिलेले रामराव आदिक उपस्थित होते. त्यापूर्वी 13 ऑगस्ट 1960 रोजी दादरच्या बालमोहन हायस्कूलमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्तेच 'मार्मिक'चे प्रकाशन झाले होते. तेथे हिंदुत्वाचा कोणताही विषय नव्हता. शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी झाली होती. 1967 मध्ये शिवसेनेने ठाणे महानगरपालिकेत 40 पैकी 17 जागा मिळवल्या, त्या मराठी माणसाचा अजेंडा मतदारांपुढे ठेवून, त्याचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नव्हता. ठाण्याचे उदाहरण यासाठी दिले की, एकनाथ शिंदे यांच्या पूर्वीही ठाणे अस्तित्वात होते आणि त्यावर बाळासाहेबांचाच प्रभाव होता हे लक्षात यावे! 

1968 साली शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि त्यावेळी 121 पैकी 42 जागा मिळवल्या. मात्र तेव्हाच शिवसेनेने प्रजासमाजवादी पक्षाशी (प्रसप) युती केली होती. प्रसप हा पक्ष 1952 मध्ये स्थापन झाला होता. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष आणि जे बी कृपलानी यांचा किसान मजदूर प्रजा पक्ष यांचे विलीनीकरण होऊन प्रसपची स्थापना झाली होती. प्रसपचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नव्हता 1973 मध्ये शिवसेनेने भारतीय  रिपब्लिकन पक्षाशी (रा सू गवई गट) युती करून मुंबई पालिकेच्या 39 जागा मिळवल्या. रिपब्लिकन पक्षाचा हिंदुत्वाशी सुतराम संबंध नव्हता! 

1974 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत मध्य मुंबईतून रामराव  आदिक काँग्रेस उमेदवार म्हणून उभे होते. त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार रोझा देशपांडे यांनी आदिकांचा पराभव केला, परंतु तरीही 1977 साली बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मुरली देवरा यांनाच महापौरपदासाठी पाठिंबा दिला. तेव्हा 'हिंदुत्व संपले, संपले' अशी उपरण्यातील उपरण्यातही कोणी बोंबा मारली नव्हती. तसेच जनता पक्षात संघटना काँग्रेस, समाजवादी यांच्याप्रमाणेच जनसंघदेखील विलीन झाला होता, तेव्हा जनसंघाने आपले हिंदुत्व जानव्यासकट खुंटीला बांधले होते का?

 1977 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला. तसेच 1978 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसला समर्थन दिले. तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीत, म्हणजे 1977 मधल्या, शिवसेनेने भागच घेतला नाही. तर 1978 मध्ये शिवसेनेने उमेदवार उभे केले, पण त्यापैकी कोणीही विजयी झाले नाही. काँग्रेसने कधीही हिंदुत्वाचा प्रचार केला नव्हता. तरीसुद्धा काँग्रेसची शिवसेनेची तेव्हापासून दोस्ती होती. 1980 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने जाणीवपूर्वक आपले उमेदवार उभे केले नाहीत आणि काँग्रेसचा प्रचार केला. त्या बदल्यात शिवसेनेला महाराष्ट्र विधान परिषदेवर तीन जागा मिळाल्या. 

1982 मध्ये गिरणी संप झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने तो व्यवस्थित पद्धतीने हाताळला नाही. अशावेळी काँग्रेसला समर्थन करणे तोट्याचे ठरेल, विशेषता गिरणगावात, हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने काँग्रेसशी संबंध तोडले. या मुद्द्याचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नव्हता! एकेकाळी शिवसेनेने मुस्लिम लीगचा पाठिंबा घेतला आणि नंतर सुधीर जोशी मुंबईचे महापौर झाले होते. 1979 मध्ये शिवसेना व मुस्लिम लीगचे नेते एकाच व्यासपीठावर दिसले होते. मुस्लिम लीगला हिंदुत्वाचे काहीच देणेघेणे नव्हते. शिवसेना आणि मुस्लिम लीगची संयुक्त सभा मुंबईच्या नागपाड्यातील मस्तान तलाव पटांगणात झाली होती, तेव्हा शिवसेना जिंदाबाद,  मुस्लिम लीग जिंदाबाद, बाळासाहेब जिंदाबाद अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या. मस्तान तलाव पटांगणातील व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लिम लीगचे जी एम बनातवाला हे उपस्थित होते. तसेच वामनराव महाडिक, मनोहर जोशी, सतीश प्रधान, दत्ताजी साळवी, जिलानी, झैदी, साबीर शेख, छगन भुजबळ, दत्ता नलावडेही हजर होते. शिवसेनेने मुस्लिम लीगशी दोस्ती केली, त्याचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता. 

शिवसेना आणि मुस्लिम लीग आपल्या न्याय्य हक्कांसाठी एक साथ लढा उभारतील, आमची ही दोस्ती कोणत्याही राजकीय हेतूने व देवाणघेवाणीतून झाली नाही, असे बाळासाहेब म्हणाले होते. त्यावेळी या मंडळींना कोणीही 'देशद्रोही' संबोधण्याची हिम्मत केली नव्हती. शिवसेनेत चाळीसेक वर्षांपूर्वी आल्यानंतर, एकनाथजींनी देखील बाळासाहेबांना त्याबद्दल कधी प्रतिप्रश्न करण्याचे धाडस केले  केल्याचे ऐकिवात नाही. बिल्डर्स आणि ठेकेदारांच्या गर्दीतून वाट काढत काढत 'हिंदुत्व, हिंदुत्व' असा जप करण्यासाठी काही जणांना सवडही मिळत नसावी! 1967 साली मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष स का पाटील यांनी माजी सनदी अधिकारी  स गो बर्वे यांना लोकसभेची उमेदवारी दिली, त्यावेळी शिवसेनेने आपला 'महाराष्ट्रद्रोही' सदोबा पाटलांना असलेला विरोध बाजूला ठेवून, बर्वेंना समर्थन दिले होते. 1977 मध्ये शिवसेना व दलित पॅंथर यांची अल्पकाळ युती झाली होती. नामदेव ढसाळ यांना बाळासाहेबांनी जवळ केले होते.  नामदेवचा 'सामना' मधील कॉलम अत्यंत लोकप्रिय होता. आपले हिंदुत्व शेंडी आणि जानव्याचे नाही हे शिवसेनेने केव्हाच दाखवून दिले होते. 

आजही अर्जुन डांगळे यांच्यासारखे नामवंत साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेबरोबरच आहेत. हिंदुत्ववादी सत्ताधाऱ्यांच्या कळपात लाचारी करून मंत्रीपदे मिळवून कवितांची फॅक्टरी काढणारे नेते असले, तरी डांगळेंसारखे तत्त्वांना धरून चालणारे नेते अजून सक्रिय आहेत, हे आपले सुदैव. असो. 1975 मध्ये इंदिरा गांधींच्या आणीबाणीस शिवसेनेने पाठिंबा दिला होता. 1980 मध्ये बाळासाहेबांनी आपले मित्र असलेल्या अंतुले यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. एवढेच नव्हे, तर श्रीवर्धनमध्ये त्यांचा प्रचारही केला होता. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री वसंतरावराव नाईक यांच्याशी बाळासाहेबांची दोस्ती होती. 1985 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा यांचे संबंध वाईट होते. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचा डावअसल्याचा आरोप दादांनी केला आणि त्यानंतर मराठी माणसांनी शिवसेनेच्या हातात मुंबई महानगरपालिकेची सत्ता दिली! म्हणजे ही सत्ता मिळण्यास तेव्हा काँग्रेसची मदतच झाली होती.

 नंतरच्या काळात शिवसेनेचे नेते म्हणून प्रकाशझोतात आलेले  जयप्रकाश मुंदडा (युतीचे सहकारमंत्री) मूळचे काँग्रेस एसचे, म्हणजेच शरद पवार गटाचे. 1982 मध्ये शरद पवार व जॉर्ज फर्नांडिस हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उपस्थित होते. त्यांचा हिंदुत्वाशी दुरूनही संबंध नव्हता. त्या सभेस मी उपस्थित होतो . 2007 मध्ये प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने साथ दिली होती आणि 2012 मध्ये प्रणव मुखर्जींनाही असाच पाठिंबा देण्यात आला. विशेष म्हणजे, शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने तेव्हा प्रणवबाबूंना नाही, तर पी ए संगमा यांना पाठिंबा दिला होता! 2008 मध्ये बाळासाहेब हयात असताना राष्ट्रवादी व शिवसेना यांची युती होणार, अशी चर्चा होती. म्हणूनच काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर केवळ विशिष्ट परिस्थितीमध्ये शिवसेनेने सरकार स्थापन केले, म्हणजे हिंदुत्वाशी तडजोड केली किंवा बाळासाहेबांच्या विचारापासून ती दूर गेली, असे मुळीच म्हणता येणार नाही. 

एकनाथ शिंदे गटाला किंवा भाजपला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना कुठल्याही मार्गाने सत्ता मिळवायची होती. आज बाळासाहेब हयात असते, तर त्यांनी महाशक्तीच्या दादागिरीला अजिबात जुमानले नसते. उलट लत्ताप्रहार करून ते बाहेरच पडले असते. शिवाय नाटकीपणे अहोरात्र बाळासाहेबांचा जप करणाऱ्यांना, उद्धव आणि आदित्यला सांभाळा, हे बाळासाहेबांचे  कळकळीचे आवाहन मात्र सोयीस्करपणे आठवत नाही.. परंतु त्या आवाहनाची आठवण आजदेखील लाखो शिवसैनिक तसेच शिवसेनाप्रेमींना आहेच आहे. हिंदुत्ववादाची झूल पांघरून एकनाथ शिंदे यांनी आपला डाव साधला असला, तरी सर्वसामान्य जनता आणि सामान्य शिवसैनिक त्यांचा डाव आणि लबाडी पुरती ओळखून आहेत. दोन गुजराथ्यांच्या तालावर आणि नागपुरी बँडवर 'आवो मारी साथ' करत त्यांनी कितीही फेर धरला, तरी या अट्टल बदमाषीला सामान्य जनता बिलकुल भुलणार नाही! निवडणुकीत ते समृद्ध गटवाल्यांना चांगलीच अद्दल घडवतील. सत्ता आणि पैशाच्या बळावर आपण प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकतो, असे यांना वाटत असणार. परंतु शिवराय असोत किंवा बाळासाहेब असोत, त्यांच्या पुतळ्या वा स्मारकासमोरही उभे राहण्याची या मंडळींची लायकी नाही. इतिहासकाळात शिवरायांनी गद्दारांची गय केली नव्हती. महाशक्तीच्या 40- 50 गुलामांनी हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे!-

हेमंत देसाई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com