Top Post Ad

*विद्रोही संत.... संत तुकाराम महाराज*


 महाराष्ट्र हा संताची भुमी असलेले राज्य आहे. या भुमित संतानी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या सामाजिक जागृती साठी खर्च केले आहे. प्रत्येक संताचा जागृतीचा विषय साधारणपणे विषमता, अंधविश्वास, धर्माच्या नावावर होणारी समाजाची लुट हेच होते. त्यापैकी एक संतश्रेष्ठ म्हणजे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज यांनी आपल्या लेखनीमधुन व्यवस्थेवर वार करून समाजामध्ये प्रबोधन केले. आपले आयुष्य हे समाजातील जातीभेद, विषमता, अंधश्रद्धा, पाखंड दुर होण्यासाठी खर्च केले. प्रस्थापित व्यवस्थेच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन प्रबोधन करणे म्हणजे विद्रोहच होता. संत तुकाराम महाराज किती विद्रोही होते हे दोनच उदाहरणावरून लक्षात येते. 

पहिले उदाहरण म्हणजे संत तुकाराम महाराज यांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून संत तुकाराम महाराजांचे अभंग नष्ट करण्याचे येथील व्यवस्थेच्या धर्मांध लोकांनी केले. दूसरे उदाहरण म्हणजे ज्यांचे पोट अंधविश्वास व पाखंडावर होते त्यांनी तुकाराम महाराज यांची हत्या केली आणि काल्पनीक वैकुंठ गमनात बहुजन समाजाला गुंतवून ठेवले. ज्या तुकाराम महाराज यांनी आयुष्यभर अंधविश्वास व पाखंड यावर प्रहार केले त्याच तुकाराम महाराजांना हे काल्पनिक वैकुंठात विमानाने पाठवतात. यावरून हेच सिद्ध होते तुकाराम महाराज व त्यांचे अंभग विषमता, अंधश्रद्धा, पाखंडी व्यवस्थेला झुगारून समानता, विज्ञानवाद व कर्मवादाला महत्व देणारे होते. यामुळे धर्माला ज्या लोकांनी धंदा बनवला अशा लोकांसाठी संत तुकाराम महाराज हे घातकच होते म्हणून त्यांच्या गाथा व त्यांना ही संपविण्याचा प्रयत्न येथील धर्मांध लोकांनी केला. संत तुकाराम महाराज यांनी सामाजिक प्रबोधन केले आणि छत्रपती शिवरायांचे आदर्श समतावादी स्वराज्य उभे राहले एवढी ताकत संत तुकाराम महाराज यांच्या लेखनीमध्ये व अभंगामध्ये आहे.

*जाती विजातीची व्हावयास भेटी | संकल्प तो वाहो नये*
संत तुकाराम महाराज यांना असे वाटते की ज्या काही जाती आहेत त्यांनी एकत्र येऊन नांदावे. प्रत्येक जातीने दुसऱ्या जातीला भेटावे म्हणजे आपोआप भेदभाव कमी होऊन एक आदर्श समाज निर्माण होऊ शकतो. परंतु काही लोकांनी जाणीव पुर्वक जाती निर्माण केल्या, जाती निर्माण करून त्या जिवंत ठेऊन एका जातीला दुसऱ्या जातीपासुन वेगळे केले आणि या जाती एकत्र कधीच येणार नाही याची व्यवस्था केली. अशा लोकांना हा संदेश तर धर्म द्रोहीच वाटणार परंतु तुकाराम महाराज यांच्या गाथा बघितल्या तर अनेक ठिकाणी विषमता दुर होऊन समता प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी प्रबोधन केले आहे. धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवून समाजाची तर्कीक व आर्थिक लुट करण्याणे धंदे सुरू झाले आहेत. अनेक भोंदु लोक स्वतः ला देवाचा दूत समजून अज्ञानी लोकांना भूलथापांना भुलवून, काल्पनिक शक्तीची, पाप पुण्याच्या गोष्टी सांगुन त्यांना धार्मिक बनवून लुटण्याचे काम करतात. 

म्हणून तुकाराम महाराज म्हणतात..
*दंभे करी सोंग मानावया जग।*   *मुखे बोले त्याग मनी नाही।*
दांभिक लोक धर्माच्या नावाखाली  वेगवेगळे सोंग करून लोकांना धर्माचे महत्त्व सांगुन लोभ माया करू नये. लोभ माया याचा त्याग करायला पाहिजे असे बोलतात परंतु मुळात असे सांगणारे लोक धनप्राप्ती करून जनतेला भुलवतात. असे भुलवणारे अनेक भोंदू निर्माण झालेले आहेत. आणि या भोंदुचे चलेचपाटे भक्तही असतात. जे की कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार न करता भोंदु लोकांवर विश्वास ठेवतात. यामुळे समाजामध्ये अंधश्रद्धा वाढून सामाजिक हानी होते व अंधश्रद्धेवर पोट भरणाऱ्या लोकांचा फायदा होतो. भोंदु लोक  धर्माचा प्रसार मुळीच करत नाही. हे जर बघायचे तर दान देणे बंद केले तर धंदा बंद होतो म्हणून तुकाराम महाराज अशा लोकांचा कठोर शब्दांत समाचार घेतात..

*तेवी अभक्तास आवडे पाखांड। न लगे गोड त्या परमार्थ।* एखाद्या गोष्टीची उपासना करणे ही गोष्ट वेगळी असते आणि पाखंड ही गोष्ट वेगळी असते. म्हणुन तुकाराम महाराज पांखड, पाखंडी व त्यावर विश्वास ठेवण्याला भक्ती म्हणतात अशा लोकांना शाब्दिक चपराक देतात. पाखंडा बाजुला करून परमार्थ केला जातो परंतु पाखंड मधुन परमार्थ साध्य होत नाही. परमार्थ किंवा सेवा करताना कोणत्याही प्रकारचा मोबदला कुणाला देण्याची गरज नाही. धर्म वेगळा आणि धंदा वेगळा परंतु धर्मा मध्ये धंदा शोधने हे चुकिचेच आहे. आणि धर्माच्या आडून ज्यांना धंदा करायचा आहे त्यांना तर तुकाराम महाराज हे धर्म विरोधी वाटतात. कारण संत तुकाराम महाराज स्पष्ट अशा थोतांडाला विरोध करतात.
*पुजेलागी द्रव्य मागे। काय सांगे शिष्याते।*
*तुका म्हणे कैचे ब्रम्ह। अवघा भ्रम विषयाचा।*

पुजा अर्चा करण्यासाठी द्रव्याची गरजच नाही. परंतु वेगवेगळ्या पुजा व वेगवेगळ्या पुजेचे वेगवेगळे खर्च सांगुन समाजाची लुट होती. आणि अशा प्रकारच्या लुट थांबवण्यासाठी संत तुकाराम महाराज यांनी व्यवस्थेवर घाव घातले. पुजा आणि पैसा याचा काहीही संबध नाही म्हणून हा सर्व भ्रम वाटतो. आणि धर्माच्या नावाखाली धंदा करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्याने समाजात अंधविश्वास जास्त पसरला गेला. त्यामुळे लोक अज्ञानी व मानसिक गुलाम होऊन एक काल्पनिक भिती निर्माण होते. आणि ही भीती माणसाला सत्य असत्या मधला फरक करू देत नाहीत. समाजामध्ये अशा प्रकारची लुट करणाऱ्या आणि धर्माच्या नावाखाली घरोघरी जाऊन अर्थाजन करणाऱ्या भोंदुविषयी संत तुकाराम म्हणतात...
*अंगी कवडे घाली गळा। परडी कळहीन हाती।*
*गळा गांठा हिंडे दारी। मनुष्य परी कुतरी ती।*
*माथा सेंदुर दात खाती। जेंगट हाती सटवीचे।*

संत तुकाराम महाराज यांची भाषा स्पष्ट आणि प्रखर असल्याने व वास्तविक विज्ञानवादी विचारांचा वारसा देशाला दिल्यानेच तुकाराम महाराज यांच्या गाथा बुडविल्या गेल्या. संत तुकाराम महाराज यांच्या मुळ गाथेवर जर प्रबोधन झाले तर देशातील भोंदु लोकांचे प्रमाण कमी होईल. लोकांची आर्थिक व माणसिक लुट कमी होईल. आणि भारतीय समाज विज्ञानवादाकडे वाटचाल करेल. परंतु तुकाराम महाराज यांच्या गाथा आजही लोकांना बोचणाऱ्या आहेत. लोकांच्या श्रद्धेचा व अज्ञानाचा फायदा घेऊन करोडो रुपयाची माया जमा करण्याऱ्या भोंदुची संख्या आजही वाढत आहे. आणि धर्मांध लोक भोंदु लोकांना समर्थन देऊन आपले बौद्धिक अपंगत्व दाखवून देत आहेत. देशातील भोंदूगिरी, अंधविश्वास, पाखंड व विषमता दुर करायची असेल तर संत तुकाराम महाराज यांच्या मुळ गाथा लोकांच्या मनावर बिंबवने आवश्यक आहे. संत गाथेचे अभ्यासक, प्रबोधनकार, सोशलमिडीया यांनी जर जबाबदारी घेऊन प्रामाणिक काम केले तर संत तुकाराम महाराज घराघरात पोहचवण्याचे काम अगदी सहज सोपे करून भोंदूगिरी ला अंधविश्वासाला आळा घालु शकतो. संत तुकाराम महाराज जयंती दिनी संत तुकाराम महाराज यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प करूया. खऱ्या अर्थाने हेच तुकाराम महाराज यांना वंदन असेल.
संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्ताने सर्वांना मंगलमय सदिच्छा


  • *विनोद पंजाबराव सदावर्ते*
  • *समाज एकता अभियान*
  • *रा. आरेगांव ता. मेहकर*
  • *मोबा: 9130979300*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com