Top Post Ad

22 प्रतिज्ञामागे दडलेले मानसशास्त्र व धर्मशास्त्र

 


 बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या 1954 ला ब्रह्मदेशाच्या बुद्धिस्ट शासन कौन्सिल समोर केलेल्या भाषणात म्हणतात, `ख्रिस्ती धर्मातील बाप्तिस्मासारखा एखादा धर्मांतराचा संस्कार विधी रुजू करावा लागेल. खरे पाहिले असता बौद्ध धर्मामध्ये भगवान बुद्धाच्या धर्माचा साधारण उपासक करून घेण्याकरिता कसल्याही प्रकारच्या धर्मांतर विधी नाही. आणि हेच एक मुख्य कारण आहे की, ज्यामुळे बौद्ध धर्मांतरित लोक एकाच वेळेस एकापेक्षा अधिक धर्माचे आचरण करीत असत. या संस्कार विधीमध्ये फक्त पंचशीलेचा उद्घोष करणे पुरेसे होणार नाही. तर धर्मांतरीत होणाऱया कोणत्याही मनुष्याला तो हिंदू धर्मापासून मुक्त होत आहे व त्याचा नवीन जन्म होत आहे. अशा प्रकारची त्यास अनुभूती होईल, या करिता त्या विधीत अनेक नवीन बाबी जोडाव्या लागतील.' 

बाबासाहेबांनी हा बौद्ध धर्मामध्ये दीक्षित होण्याचा संस्कार विधी 22 प्रतिज्ञांद्वारे निर्माण केला आहे, त्या दिशेने त्यांनी 1956च्या विजयादशमी दिनी दीक्षाभूमी नागपूरला व 16 ऑक्टोबर 1956 ला चंद्रपूरला लाखो लोकांना या 22 प्रतिज्ञाचा संस्कार विधीद्वारे लोकांकडून 22 प्रतिज्ञा वदवून घेऊन त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. अशा प्रकारे बौद्ध झालेल्या धर्मांतरित बौद्धांना दुसऱ्यांना या 22 प्रतिज्ञांच्या संस्कार विधीद्वारे दीक्षा देण्याचा अधिकार आपल्या 15 ऑक्टोबर 1956 च्या नागपूरच्या भाषणात दिला आहे.  

धम्मदिक्षेच्या वेळेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा या केवळ औपचारिकरित्या दिल्या जाणाऱ्या प्रतिज्ञा नाहीत, तर त्यामागे फार मोठे मानसशास्त्र व धर्मशास्त्र दडलेले आहे. मानसशास्त्राचा विचार करताना हा विधी मुला-मुलींकरिता 5 ते 10 या वयोगटामध्ये करावयाचा आहे. हा वयोगट असा आहे की, याच वयोगटामध्ये झालेले संस्कार हे माणसाच्या मनावर आयुष्यभर राहतात. जसे ख्रिश्चनांच्या मुला-मुलींकरिता पेला गेलेला `बाप्तिस्मा' हा विधी, मुस्लिमांचा मुलाकरिता केलेला सुंता हा विधी व ब्राह्मणांचा मुलांकरिता केलेला `मूंज' हा विधी. हे विधी मुलांना आयुष्यभर आठवणीच्या स्वरुपात लक्षात राहतात. तशाच प्रकारे हा 22 प्रतिज्ञेचा विधीसुद्धा बौद्ध झालेल्या धर्मांतरित मुलामुलींना आयुष्यभर आठवणीत राहावा, अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती.  

दुसरे मानसशास्त्रीय कारण असे की, मुलांचे आईवडील हे हिंदू धर्मामधून बौद्ध झालेले आहेत. आई-वडिलांवर हिंदू धर्माचे संस्कार आहेत. त्यामुळे ते संस्कार 5 ते 10 वयोगटापर्यंतच्या मुला-मुलींवर घरच्या वातावरणामुळे होणे स्वाभाविक आहे. हे मनावर झालेले संस्कार जर पुसले गेले नाहीत, तर त्या मनावर बौद्ध धम्माचे संस्कार होऊ शकणार नाही. शाळेमध्ये आधीच्या वर्गशिक्षकाने फळ्यावर काही लिहिलेले असते. दुसरा वर्गशिक्षक जेव्हा वर्गात येतो व जेव्हा त्याला मुलांना शिकविण्याकरिता फळ्यावर लिहावयाचे असते, तेव्हा फळ्यावर पहिल्या शिक्षकाने लिहून ठेवलेले पुसावेच लागते. जर त्याने ते पुसले नाही व त्यावरच लिहिण्याचा प्रयत्न केला तर मुलांमध्ये फार गोंधळ निर्माण होईल व शिक्षकाला जे फळ्यावर लिहून मुलांना शिकवायचे आहे तेसुद्धा शिकविता येणार नाही. म्हणून शिक्षकाला फळ्यावर लिहिलेले पुसून काढणे अत्यावश्यक आहे. 22 प्रतिज्ञा या हिंदूधर्माचे आधीचे संस्कार पुसून काढण्याची एक मानसशास्त्रीय अशी पद्धत आहे.  

22 प्रतिज्ञामध्ये पहिल्या 3 प्रतिज्ञा अशा आहेत 1) मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 2) मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 3) मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.  

समता सैनिक दलाने `बुद्ध आणि त्यांचा धम्म' 1993 ला प्रकाशित केला व त्याची किंमत 25 रुपये ठेवली होती. 2000 साली प्रकाशित केलेल्या ग्रंथाची किंमत 50 रुपये ठेवली आहे. त्या आवृत्तीवरूनच हे विवेचन करीत आहे.  

या तीन प्रतिज्ञा, देव या संकल्पनेद्वारे जे संस्कार मनावर झाले आहेत, ते संस्कार पुसण्याकरिता या ग्रंथामध्ये पान 147, 148, 151 व 233 यावर सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. ईश्वर किंवा देव ही भौतिकपेक्षा वेगळी शक्ती आहे, असे मानल्यास अशा शक्तीवर श्रद्धा ठेवणे म्हणजे अधम्म होय, असे पान 147 मध्ये म्हटलेले आहे. प्रत्येक गोष्टीला कार्यकारणभावाचा सिद्धांत लागू पडतो. या सिद्धांतानुसार देवाचे अस्तित्त्व सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून त्यावर श्रद्धा ठेवू नये. पान 148 मध्ये ब्रह्माने म्हणजेच ईश्वराने जगाची निर्मिती केली असे हिंदू धर्म मानतो. ब्रह्माने जगाची निर्मिती केली हे कोणीही सिद्ध करू शकले नाही. जग हे उत्क्रांत झाले आहे. पान 151 वर म्हटले आहे, `काय ईश्वराने शून्यातून, अभावातून जगाची रचना केली. अथवा भावातून जगाची रचना केली. शून्यातून जगाची निर्मिती शक्य नाही. जर भावातून (काही पदार्थापासून) त्याने जगाची निर्मिती केली असेल तर ईश्वर हा जगाचा निर्माता होऊ शकत नाही. कारण पदार्थ हे निर्मितीस कारण आहे. ईश्वर नव्हे. पान 233 मध्ये ईश्वराची प्रार्थना करणे व्यर्थ आहे, असे म्हटलेले आहे. नदी दुथडी भरून वाहत असताना माणसाला दुसऱया पैलतीरावर जावयाचे असल्यास त्याने ईश्वराची प्रार्थना करून त्या पैलतीराला ऐलतीराकडे आणण्याची ईश्वराला प्रार्थना केली तर तो पैलतीर ऐलतीराकडे येईल काय? तेव्हा ईश्वराची प्रार्थना करणे व्यर्थ आहे.  

4 थी प्रतिज्ञा - देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.' जेव्हा तथागत बुद्धाने ईश्वराचेच म्हणजे देवाचेच अस्तित्त्व नाकारले आहे, तर जी गोष्ट अस्तित्त्वातच नाही ती गोष्ट अवतार कसा घेणार? एक देवच अस्तित्त्वात नाही तर अवताराच्या स्वरुपात दुसरा देव कसा जन्म घेणार? म्हणून देवाने अवतार घेतला असे बुद्ध मानीत नाही व त्यावर विश्वास ठेवू नका अशी ही 4 थी प्रतिज्ञा आहे.  

5 वी प्रतिज्ञा - `बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा व खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो.' देवाचे अस्तित्त्व बुद्धाने नाकारले आहे, म्हणजेच विष्णूचे अस्तित्त्व बुद्धाने नाकारलेले आहे. देव अवतार घेतो हेसुद्धा खोटे आहे. हे आपण 4 थ्या प्रतिज्ञेच्या विश्लेषणामध्ये पाहिलेले आहे. विष्णू म्हणजेच देव हा अस्तित्त्वात नाही. मग जे अस्तित्त्वात नाही त्याला बुद्धाचा अवतार समजण्यामागे कोणते कारण असू शकते तर बुद्ध हे ऐतिहासिक पुरुष आहेत. त्यांनी लोकांना दुःख मुक्त करण्याचा स्वतंत्र असा मार्ग दाखविला. तो मार्ग विज्ञानवादी आहे. बुद्धाला विष्णूचा अवतार समजल्यामुळे बुद्धाचा धम्म हा स्वतंत्र धम्म राहत नाही, तर तो हिंदूचाच एक भाग ठरतो व हाच तो खोटा आणि खोडसाळ प्रचार होय.' 

6 वी प्रतिज्ञा - `मी श्राद्धपक्ष करणार नाही. पिंडदान करणार नाही'  ही आहे. श्राद्धपक्ष व पिंडदान हा ब्राह्मणी धर्मात मृत्यूनंतर करण्यात येणारा विधी आहे. हा विधी फक्त ब्राह्मण पुरोहितच करतो. मृत्यूनंतरची मान्यता हिंदू धर्मात आहे. ती मान्यता बौद्ध धर्मात नाही. बौद्ध धर्मात आत्मा मानला जात नाही. हा विधी केल्याने प्रज्ञा प्राप्त होत नाही. त्यामुळे बौद्ध धर्मामध्ये हा विधी पाळला जात नाही.  

7 वी प्रतिज्ञा - `मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही'. ही आहे. बौद्ध धर्माविरुद्ध म्हणजे देवावर विश्वास, आत्म्यावर विश्वास, यज्ञावर विश्वास, काल्पनिक गोष्टींवर विश्वास, आचरणात न आणता केवळ धम्मग्रंथाचे पठन, धम्मग्रंथावर आंधळा विश्वास, याबद्दल सविस्तर विवेचन पान 147 ते 167 मध्ये करण्यात आले आहे. 

8 वी प्रतिज्ञा - `मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.' ही आहे. बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर हिंदूचे जुने संस्कार दीक्षा घेतल्याबरोबर नाहिसे होत नाही. ते संस्कार ब्राह्मण पुरोहित करीत असतो. तेव्हा हे हिंदू धर्माचे संस्कार बौद्धांवर होऊ नयेत म्हणून ही प्रतिज्ञा देण्यात आली. 

9 वी प्रतिज्ञा - `मी सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मानतो'. ही आहे. बौद्ध धर्म हा मनुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भेद मानीत नाही. पान 179 मध्ये धम्म माणसामाणसामधील भेदभाव नष्ट करीत असेल तरच धम्म सद्धम्म होय, याचे विवेचन करण्यात आले आहे. पान 182 मध्ये माणूस जन्माने नव्हे, कर्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ होतो. याचे विवेचन करण्यात आले आहे. पान 183 मध्ये धम्म माणसामाणसात समता वाढविण्याची शिकवण देतो, तेव्हाच धम्म सद्धम्म होतो याचे विवेचन करण्यात आले आहे. 

10 प्रतिज्ञा - `मी समता स्थापण्याचा प्रयत्न करीन.' या प्रतिज्ञेमुळे बुद्धाने चातुर्वर्ण्यव्यवस्था नाकारली असून समतामूलक समाज व्यवस्था निर्माण करण्याकरिता बुद्ध हे कटीबद्ध आहेत. जाती-जातीमधील उच्चनीचता ही बुद्धाला मान्य नाही. तसेच वर्णावर्णामधील उच्च-नीचता बुद्धाला मान्य नाही. बुद्धाने प्रत्येक उपासकाने सम्यक मार्गाने ज्ञानार्जान करावे, असा उपदेश पान 320 मध्ये दिला आहे. या समता स्थापन करण्याच्या प्रतिज्ञेला फार मोठा अर्थ आहे. सामाजिक व आर्थिक क्षेत्रामध्ये समता स्थापन करण्याचा प्रयत्न जर रिपब्लिकन व बहुजन समाज पक्षाने केला तर त्यांची भरभराटच होईल. 

11 वी प्रतिज्ञा - `मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचे अवलंबन करीन.' भगवान बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झाले ते ज्ञान म्हणजे जगात दुःख आहे, त्याला कारण आहे, त्याचे निवारण होऊ शकते व ते दुःख दूर करयाचा मार्ग भ. बुद्धाला सापडला. त्या मार्गाला अष्टांग मार्ग म्हणतात. या अष्टांग मार्गाचे विवेचन पान 80, 81, 82 मध्ये आलेले आहे. सम्यक दृष्टी हे पहिले अंग. सम्यक दृष्टीचे अंतिम ध्येय अज्ञानाचा नाश हे आहे. कर्मकांडाची व्यर्थता समजणे म्हणजे सम्यक दृष्ये, मिथ्या विश्वासापासून मुक्ती, म्हणजे सम्यक दृष्टी. 

दुसरे अंग म्हणजे सम्यक संकल्प - प्रत्येक माणसाचे जीवित ध्येय असते. सम्यक संकल्प याचा अर्थ आमचे ध्येय, आमचे कर्म, आमच्या अपेक्षा, आमच्या आकांक्षा या श्रेष्ठ आणि कल्याणकारी असाव्या. 

तिसरे अंग म्हणजे सम्यक वाणी. याचा अर्थ मनुष्याने 1) सत्यच कथन करावे, 2) असत्य कथन न करणे, 3) दुसऱ्याप्रती अभद्र कथन न करणे, 4) दुसऱ्याची निंदा न करणे, 5) दुसऱ्याप्रती अपशब्द, कटु वचन कथन न करणे, 6) दुसऱ्याप्रती विनम्र कथन करावे पण अभद्र कथन करू नये, 7) निरर्थक, व्यर्थ, मुर्खतापूर्ण कथन न करणे. 

चौथे अंग म्हणजे सम्यक कर्मान्त - यामध्ये योग्य आचरण असणे अभिप्रेत आहे. आपले प्रत्येक कर्म दुसऱयाच्या भावना आणि अधिकारांचा आदर करूनच केले गेले पाहिजे. 

पाचवे अंग म्हणजे सम्यक आजीविका - आपल्याला आजीविका अर्जित करण्याचे अनेक मार्ग आहेत. काही हीन आहेत, तर काही श्रेष्ठ आहेत. हीन मार्ग इतरांवर अन्याय करतात, तर श्रेष्ठ मार्ग इतरांवर अन्याय करीत नाही. म्हणून आपण आजीविकेचा श्रेष्ठच मार्ग निवडला पाहिजे.  

सहावे अंग म्हणजे सम्यक व्यायाम - सम्यक व्यायाम म्हणजे चित्तामध्ये नेहमी योग्य प्रवृत्ती निर्माण होईल असा प्रयत्न करणे. 

सातवे अंग म्हणजे सम्यक स्मृती - चित्ताची जागरुकता म्हणजे सम्यक स्मृती होय. 

आठवे अंग म्हणजे सम्यक समाधी  माणसाला या सात अंगाने पूर्णत्वाकडे जाताना लोभ, द्वेष, आलस्य, विचिकित्सा आणि अनिश्चिय या बाधा येतात. या बाधा म्हणजे जणू पायातील श्रृंखलाच. याच्यावर विजय प्राप्तीचा मार्ग म्हणजे समाधी. या समाधीमुळे अस्थायी ध्यानावस्था प्राप्त होणे. चित्ताचे स्थायी परिवर्तन म्हणजे सम्यक समाधी. 

12 वी प्रतिज्ञा `मी भगवंताने सांगितलेल्या दहा पारमीता पाळीन.' या पारमीता म्हणजे सद्गुण पथ. याचे विवेचन पान 82, 83 मध्ये आहे.  

1ली पारमिता म्हणजे शील - शील म्हणजे कुशल कर्म करण्याची प्रेरणा. 

2 री पारमीता म्हणजे दान - धनाचे, देहाचे किंवा दुसऱ्याच्या कल्याणाकरिता प्राणाचाही त्याग करणे. 

3 री नैष्कर्म्य पारमिता - सांसारिक कामवासनांचा त्याग म्हणजे नैष्कर्म पारमीता.  

4थी  पारमीता म्हणजे वीर्य - वीर्य म्हणजे सम्यक श्रम, आपल्या सर्व सामर्थ्यानिशी आपले नियोजित कर्म करणे. 

5 वी पारमीता शांती  - शांती म्हणजे क्षमाशीलता. घृणाला घृणेने प्रत्युत्तर न देणे. घृणेवर क्षमाशीलतेने विजय संपादित म्हणजे शांती. 

6 वी पारमीता सत्य - मिथ्याकथन न करणे, नेहमी सत्य कथन करणे. 

7वी पारमीता अधिष्ठान - अधिष्ठान म्हणजे आपल्या उद्देश्याकरिता दृढ संकल्प. 

8 वी पारमीता प्रज्ञा - प्रज्ञा म्हणजे सूज्ञ विवेक. या पारमीताच्या आधारे प्रत्येक गोष्ट तपासता येते. दान पारमीता तपासता येते. कर्म तपासता येते. प्रज्ञा पारमीता म्हणजे सूज्ञता.  

9 वी पारमीता मैत्री - सर्व प्राणीमात्रावर भातृत्वाचा विस्तार म्हणजे मैत्री पारमीता. 

10 वी पारमीता उपेक्षा - उपेक्षा म्हणजे अनासक्ती, अनासक्ती ही उदासीनतेपेक्षा भिन्न आहे. ही चित्ताची अशी अवस्था आहे की ज्यात प्रिय अप्रिय असे काहीही नसते.  

13 वी प्रतिज्ञा `मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.' ब्राह्मणीधर्मामध्ये यज्ञामध्ये प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा होती. अशा प्रकारच्या यज्ञाला भगवान बुद्धाचा विरोध होता. म्हणून प्राणीहिंसा न करण्याचे शील भगवान  बुद्धाने लोकांना दिले आहे असे पान 160 मध्ये नमूद केले आहे.  

14 वी प्रतिज्ञा, मी चोरी करणार नाही' - प्रामाणिकपणे जीवन जगण्याकरिता चोरी न करणे हे पान 225 मध्ये सांगितले आहे.  

15 वी प्रतिज्ञा `मी खोटे बोलणार नाही.' - माणूस स्वतच्या स्वार्थाकरिता किंवा कोणाच्या तरी स्वार्थाकरिता खोटे बोलतो. तो लोकांशी खोटे बोलून चुगली करतो. त्यामुळे समाजात कलह निर्माण होतो. म्हणून खोटे बोलू नये असे पान 225 मध्ये म्हटले आहे.  

16 वी प्रतिज्ञा `मी व्यभिचार करणार नाही' - आपल्या पत्नीशिवाय इतर स्त्रियांशी केल्या जाणाऱया लैंगिक व्यवहाराला व्यभिचार म्हणतात. कामुकता दुःखाचे निमित्त आहे. कामुकता भयाचे निमित्त आहे. जो कामवासनेपासून विरक्त आहे, तो दुःखापासून मुक्त आहे. भयापासून मुक्त आहे, असे पान 208 मध्ये म्हटले आहे.  

17 वी प्रतिज्ञा - `मी दारू पिणार नाही' - दारू पिण्यामुळे माणसाच्या हातून पापकर्म घडते. या बुद्धीभ्रष्ट करणाऱ्या व्यसनापासून, या मूर्खाच्या सानिध्यापासूनच दूरच राहावे असे पान 229 मध्ये म्हटले आहे. 

18 वी प्रतिज्ञा `ज्ञान, शील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन.' ज्ञान म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे सूज्ञ विवेक. जगातील सर्व गोष्टी या अनित्य आहे. यामध्ये मनाचासुद्धा अंतर्भाव आहे. या अनित्याचे ज्ञान म्हणजे प्रज्ञा (पान 143). जगामध्ये दुःख आहे, याचे ज्ञान म्हणजे प्रज्ञा. माणसामध्ये आत्मा नाही, याचे ज्ञान म्हणजे प्रज्ञा. थोडक्यात अनित्य, दुःख, अनात्म याचे सम्यक ज्ञान म्हणजे प्रज्ञा. 

शीलाशिवाय प्रज्ञेला काही अर्थ नाही, असे पान 175 मध्ये म्हटले आहे. करुणा का आवश्यक आहे, याचे विवेचन पान 176 मध्ये केले आहे. जे दरिद्री आहेत, जे असहाय आहेत, जे असुरक्षित आहे, त्यांचे दुःख दूर करणे हे करुणा असेल तरच शक्य होऊ शकते. (पान 178) 

19 वी प्रतिज्ञा `मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बौद्ध धर्माचा स्वीकार करतो.' जो धर्म एकाच्या सुखासाठी दुसऱयाला असमान व नीच मानून दुसऱ्याचे जीवन दुःखी करतो. कायम तुम्ही अशा धर्माचा आदर करणार? (पान 184) म्हणून तो हिंदू धर्म त्याग करून सर्वांना समान मानणारा व सर्वांना सुखी करणारा बौद्ध धम्म मी स्वीकारीत आहे, अशी प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिली आहे.  

20 वी प्रतिज्ञा `तोच सतधम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.' सद्धम्म म्हणजे अपवित्रतेपासून चित्ताची शुद्धता (पान 167) इहलोकी धम्मराज्य स्थापणे सद्धम्माचे कार्य (पान 168) 

21 वी प्रतिज्ञा `माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो'. आधी मी हिंदू होतो. माझे हिंदू तत्त्वज्ञान हे सतचिद् आनंद हे होते. म्हणजे आत्माने, ब्रह्मात्मात विलीन होऊन आनंद उपभोगणे असे ते तत्त्वज्ञान होते. आता मी अनित्य दुःख आणि अनात्म हे हिंदू धर्माच्या विरोधी तत्त्वज्ञान स्वीकारले आहे, म्हणून माझा नवा जन्म होत आहे, असा या प्रतिज्ञेचा अर्थ आहे.  

22 वी प्रतिज्ञा `इतपर बुद्धाच्या शिकवणी प्रमाणे वागेन, अशी मी प्रतिज्ञा करतो'. या प्रतिज्ञेचा अर्थ `या 21 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दीक्षा देताना दिल्या आहेत. त्याप्रमाणे मी वागेन अशी ही प्रतिज्ञा आहे.  

बाबासाहेब आपल्या `बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथातील भिक्खू आणि उपासक या प्रकरणात म्हणतात, `ज्यांना फक्त धम्मात प्रवेश हवा होता, पण संघात प्रवेश नको होता, संघाचे सदस्यत्व नको होते त्यांच्याकरिता धम्मदीक्षा नावाचा स्वतंत्र संस्कार नव्हता. ही एक गंभीर उणीव होती. भारतात अंतिमत बौद्ध धम्माच्या ऱ्हासाची जी अनेक कारणे आहेत, त्यापैकी हे एक कारण होय. 

धम्मदीक्षा संस्काराअभावी उपासक गृहस्थ धम्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शके, याहीपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे तो एकाचवेळी एकापेक्षा अधिक धर्माचे आचरण करीत असे (पान 257)' 

डॉ. बाबासाहेबांच्या 6 डिसेंबर 1956 ला झालेल्या  निधनानंतर बौद्ध धर्म वाढविण्याची जबाबदारी आंबेडकरी समाजावर येऊन पडली. ती जबाबदारी सुरुवातीला चांगल्याप्रकारे पार पाडली. 1961 पर्यंत धम्मदीक्षेला  फार मोठी चालना मिळाली होती. हे कार्य त्यांनी बौद्धांना सवलती नसतानाही करवून दाखविले. 1961 ला जी बौद्धांची लोकसंख्या होती, त्यामध्ये 1971 ला झालेल्या बौद्धांच्या लोकसंख्येमध्ये अत्यल्प वाढ झालेली आहे. फक्त महारांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. केंद्र सरकारने बौद्धांची वाढ होऊ नये म्हणून बौद्धांना नोकऱ्यांमधील आरक्षण दिले नाही. आता 1991 पासून बौद्धांना नोकऱ्यांमधील आरक्षण मिळत आहे. तरीपण धर्मांतर मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून बऱ्याच राज्य सरकारांनी आपल्या राज्यांत धर्मांतर विरोधी कायदे केले आहे. राजकारणात धर्म आणल्यामुळे सत्ता प्राप्त होते हा अनुभव इथल्या व्यवस्थेला आल्यामुळे या सत्ताधारी व्यवस्थेने फार मोठ्या प्रमाणात देशापातळीवर धार्मिक उन्माद घडवून आणण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. बौद्धांचे हिंदूकरण करणे हा त्या कार्यक्रमाचाच एक भाग आहे.  

धर्मांतर ही क्रांती आहे. ती थोपविण्याकरिता ब्राह्मणवाद सक्रिय झाला आहे. भगवान  बुद्धाने आपला उत्तराधिकारी नेमला नाही. माझा धम्म, हाच माझा उत्तराधिकारी आहे, असे भगवान  बुद्धाने सांगितले आहे. बाबासाहेबांना तुमचा धार्मिक उत्तराधिकारी कोण? असा प्रश्न कोणी विचारलेला नाही. परंतु त्यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा व त्या 22 प्रतिज्ञा म्हणजेच `बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ सार रुपात आहे, असे आपण पाहिलेले आहे. तेव्हा जो माझ्या दिलेल्या 22 प्रतिज्ञांनुसार आपले कुटुंब बौद्धमय करतो, तो मला पाहतो असे बाबासाहेबांना सुचवायचे आहे.  तेव्हा प्रत्येक कुटुंबातील 5 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलामुलींचा धम्मदीक्षा विधी या 22 प्रतिज्ञांच्या संस्कार विधीनुसार झाला पाहिजे, तेव्हाच आपण या प्रतिक्रांतीला तोंड देऊ शकतो. प्रत्येक कुटुंब बौद्धमय झाले तर भारत बौद्धमय होऊ शकते. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com