स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीमाई फुले


 महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीमाई फुले यांची आज म्हणजे ३ जानेवारी २०२३ रोजी १९२ वि जयंती. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्यच आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी साताऱ्याजवळील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडूजी नेवसे असे होते. त्यांचे वडील गावचे पाटील होते. ज्या काळात स्त्रियांना घराच्या बाहेर पडायचे बंधन होते, त्याकाळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. असे असले तरी सावित्रीबाई मात्र निडर स्वभावाच्या होत्या. त्या लहान असतांना एका दुबळ्या मुलाचे फुले पळवणाऱ्या धटिंगणाला त्यांनी अद्दल  घडवली होती तसेच त्यांच्या घरासमोरील झाडावर असणाऱ्या  घरट्यातील पक्षांची अंडी खाणाऱ्या नागाला त्यांनी ठेचून मारले होते. 

वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा जोतीराव फुले यांच्याशी झाला. जोतीराव तेंव्हा तेरा वर्षाचे होते. त्याकाळी बालविवाहाची परंपरा होती, अगदी पाळण्यात देखील विवाह लावले जायचे. महात्मा जोतीराव फुले म्हणजे महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक. जोतीरावांना मातृप्रेम लाभले नाही. त्यांच्या मावस भगिनी सगुणा यांनी त्यांचा सांभाळ केला. सगुणा  इंग्रज अधिकाऱ्याकडे दाई म्हणून काम करायच्या त्यामुळे त्यांना इंग्रजी कळायचे. आपल्या  जोतीरावने देखील इंग्रजी फाडफाड बोलले  पाहिजे असे त्यांना वाटायचे. त्यांनी जोतीरावांना शिकण्यास प्रेरित केले. जोतीरावही शिकले नंतर जोतिरावांनी  सावित्रीबाई यांनाही  शिकवले.

 मुलींच्या शिक्षणाचे महत्व जाणून मुलींसाठी शाळा काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ते नेहमी म्हणत एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते म्हणून १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. या शाळेत सावित्रीबाई फुले मुख्याध्यापक म्हणून काम पाहू लागल्या. या शाळेत सुरवातीला दोन मुली होत्या वर्षअखेर या शाळेतील मुलींची संख्या ४० ते ४५  पर्यंत पोहचली. या शाळेमुळे शूद्र समजल्या जाणाऱ्या स्त्री वर्गास ज्ञानाची कवाडे खुली झाली. पण हे चांगले काम त्याकाळातील सनातनी वर्गास रुचले नाही. मुली शाळेसाठी घराबाहेर पडू लागल्याने धर्म बुडाला अशी आरोळी ठोकत या सनातनी लोकांनी सावित्रीबाई व जोतीरावांच्या या महान कार्यास विरोध केला. 

सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर शेण गोळे फेकले. काहींनी तर अंगावर हात टाकण्याचाही प्रयत्न केला पण फुले दांपत्य डगमगले नाही. घेतलेला वसा त्यांनी सोडला नाही. कितीही विरोध झाला तरी ध्येयापासून ते विचलित झाले नाही. जिद्दी व ध्येयवादी फुले दांपत्यांनी ज्ञानदानाचे आपले पवित्र कार्य चालूच ठेवले. जोतिरावांनी काढलेल्या शाळेत फुले दांपत्य व अन्य  शिक्षक जीव ओतून शिकवत. विद्यार्थ्यांशी ते एकरूप होत त्यामुळे त्यांच्या शाळेची प्रगती लक्षणीय होती. त्यांच्या शाळेविषयी पुणे ऑब्जर्व्हर या दैनिकामध्ये २१ मे १८५२ मध्ये लिहिले होते, जोतीराव फुलेंच्या शाळेतील मुलींची संख्या सरकारी शाळेतील मुलांच्या संख्येपेक्षा दहा पटीने जास्त आहे कारण या शाळेत मुलींना शिकवण्याची जी व्यवस्था आहे ती मुलांच्या शासकीय शाळेपेक्षा चांगली आहे. १८६३ मध्ये फुले दांपत्यांनी बालहत्या प्रतिबंधकगृह सुरू केले. सावित्रीबाई त्याच्या प्रमुख होत्या. 

१८८५ पर्यंत ३५ विधवा ब्राह्मण स्त्रिया त्यांच्याकडे आल्या. त्यांची बाळंतपणे सावित्रीबाईंनी केली.  १८७४ साली काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवा त्यांच्या घरात आल्या. या काशीबाईच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतले त्या मुलाचे नाव यशवंत ठेवले. यशवंतला शिकवून त्यांनी डॉक्टर बनवले.  सण १८७७ साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. या दुष्काळात फुले दांपत्यांनी लोकांना खूप मदत केली. त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी जेवणाखाण्याची सोय केली. सावित्रीबाईंनी केशवपन पद्धत बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करुन  नाभिकांचा संप घडवून आणला. पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी समर्थपणे वाहिली. सावित्रीबाई फुले या मोठ्या  साहित्यिकही होत्या. काव्यफुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. १८९६-९७ साली पुण्यात प्लेगने धुमाकूळ घातला होता. प्लेग या जीवघेण्या आजाराने अनेकांचा जीव घेतला. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांची सेवा करु लागल्या. त्यांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेगची लागण झाली त्यातून १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई फुले यांचे कार्य समस्त मानवजातीला भूषणावह आहे म्हणूनच जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन! 

  • श्याम बसप्पा ठाणेदार
  • दौंड जिल्हा पुणे 
  • ९९२२५४६२९५ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1