Top Post Ad

तर देशाचा प्रधानमंत्री ओबीसी ठरवतील


 ओबीसी हा जात समूह कधीच एकत्र येत नाही. सुमारे 54 टक्के लोकसंख्या असलेला हा वर्ग जर एकत्र आला तर या देशाचा प्रधानमंत्री ठरवू शकतो; आरक्षणाचे विरोधक कोण, आणि समर्थक कोण याची जाणीव ठेवून ओबीसींनी राजकीय भूमिका घ्यायला हवी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मा. मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. 

ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने सावित्री माई फुले यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन टाऊन हॉल येथे करण्यात आले होते.  त्यावेळी डॉ. आव्हाड बोलत होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे, मा. महापौर नरेश म्हस्के, मा. खा. आनंद परांजपे, मा. नगरसेवक संदीप लेले, मा. नगरसेविका मृणाल पेंडसे, कविता पाटील, नंदा पाटील, नम्रता कोळी, कमल चौधरी, प्रतिभा मढवी, दिपा गावंड, ॠता आव्हाड, प्रा. प्रकाश भांगरथ, भालचंद्र ठाकरे, राजाभाऊ चव्हाण, रमाकांत पाटील, रुपेश हाटे, दीपक धरी, जयंवत बैले, मंगेश आवळे, दत्ता चव्हाण, अमर आठवले, नितीन लांडगे, संदीप खांबे, रमेश आंब्रे, अनिता हिलाल, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास म्हापदी तर सूत्रसंचालन पाटणकर यांनी केले.

 यावेळी  पत्रकार रुपाली बिडवे, कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक पटकावणारी वैशाली तांडेल, श्री व. सौ. घाडगे दाम्पत्य, विक्रीकर सहआयुक्त तनुजा मस्करे, वनाधिकारी गिरीजा देसाई, सरकारी वकील रेखा हिवराळे यांचा ‘सावित्रीच्या लेकी’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सावित्रीमाई आणि जोतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारे उघडली त्याचा सर्वाधिक फायदा विशिष्ठ जातीच्या महिलांनीच घेतला. पण, सावित्रीमाईंना याच वर्गाने विरोध केला होता, हे विसरता कामा नये. सत्यशोधक समाज फुलेंनी स्थापन केला. पण, या दाम्पत्याने जी बिजे रोवली त्याचे आज वटवृक्ष झाले आहेत. आता कोणीतरी म्हणाले की फुलेंनी भिक मागून शाळा सुरु केल्या. पण, त्यांना हे माहित नाही का, की टाटांपेक्षा फुलेंचे वार्षिक उत्पन्न अधिक होते. ते प्रचंड श्रीमंत होते. मागासवर्गीयांच्या आरक्षणाची भाषा सर्वात आधी कोणी केली असेल तर ती महात्मा फुलेंनी!

देशामध्ये आपली संख्या 54 टक्के आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात आपण एक झालो तर या देशाचा पंतप्रधान आपण ठरवू. पण, आपण एकत्र होतच नाही. आपणाला मनुवादाचा स्पर्श व्हायला लागला आहे. आपणही नको त्यांच्या मागे लागलो आहे.ज्यांनी सावित्रीमाई- जोतिबांना, बाबासाहेब, शाहू यांना सन्मान दिला नाही. ते आपल्याला काय सन्मान देणार? म्हणून आरक्षण गरजेचे आहे. आरक्षणामुळेच आपला समाज पुढे जाईल. खाईत पडलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी आधार आरक्षण आहे. पण, तेच आता काढून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. जर आरक्षण टिकवू शकलो नाही; तर, पुढचा काळ कठीण आहे. या काळापासून वाचण्यासाठी आपणाला संविधान वाचविण्याची शपथ घ्यावी लागेल. संविधान आहे म्हणून आपण आहोत, हे ध्यानात ठेवा, असेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले. 

दरम्यान, यावेळी आ. निरंजन डावखरे यांनी, ठाणे शहरात फुले दाम्पत्याचे स्मारक उभे राहिले पाहिजे, यासाठी माझा आग्रह आहे. शासन-प्रशासनाच्या दरबारी त्यासाठी संघर्ष करण्याचा आपली तयारी आहे. निधीची तरतूद तर केली आहेच; लवकरच हे स्मारक उभे राहिल, अशी ग्वाही दिली. तर, नरेश म्हस्के यांनी, ठाणे शहरात स्मारक उभे करण्यासाठी आम्ही अनुकूल असून हे स्मारक लवकरच उभे राहिल, असा आशावाद व्यक्त करुन भिडेवाडा स्मारकाचा प्रश्नही लवकरच निकाली निघेल, असे आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com