ठाण्यात शिवसेना आम्ही वाढवली, रुजवली आमच्याशिवाय शिवसेनेचे एक पानही हलणार नाही, ठाण्यात आत्ता एकही शिवसैनिक उरणार नाही, शाखेचे कुलूप लावायला शिवसैनिक सापडणार नाही अश्या वल्गना खोक्यांच्या व सत्तेच्या उबेखाली मिंदे गटाकडून सातत्त्याने होत आहेत. त्याचा पर्दाफाश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख यांनी केला
१९६६ साली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर १९६७ साली ठाण्याच्या नगरपरिषदेवर भगवा झेंडा फडकला. शिवसेनेचे वसंतराव मराठे ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. १९७४ साली थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे सतिश प्रधान प्रचंड मताधिक्याने निवडून आले. १९८२ साली ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाली. १९८६ साली झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रथम निवडणुकीत शिवसेनेला ठाणेकरांनी, नगरपालिकेत केलेल्या कामाच्या शिदोरीवर महानगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा विजयी केले. सतीश प्रधान ठाणे नगरीचे प्रथम महापौर झाले. त्यावेळी तुमचा राजकीय जन्म तरी झाला होता का ?
ठाणे जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, पालघर, शाहपूर, मुरबाड, भिवंडी या आदिवासी बाहूल पट्ट्यात व ठाणे शहरात शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा करिष्मा, सतीश प्रधान, शाबीर शेख, मो. दा. जोशी, गणेश नाईक, आनंद दिघे साहेब, या जिल्हाप्रमुखांनी ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एस टी ने खडतर प्रवास करून ठाणे जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात शिवसेना वाढविली.तेव्हा तुम्ही कुठे होतात?
१९८९ साली महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेत गद्दारी झाली. शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी गद्दारीचे प्रायश्चित म्हणून तत्कालीन ३० नगरसेवकांचे राजीनामे घेतले. झालेल्या गद्दारीवर एका निष्ठावंत स्वामिनिष्ठ, पक्ष निष्ठ शिष्याची प्रतिक्रिया यायला पाहिजे तशी आनंद दिघे साहेबांची आली. “गद्दारांना क्षमा नाही” त्यासाठी त्यांना २ वर्षाचा कारावासही भोगावा लागला. आणि त्यामुळेच शिवसेनेची कीर्ती, विश्वास फक्त ठाण्यात नाही तर महाराष्ट्र भर पसरला. तेव्हा तुम्ही कुठे होतात ?
२००२ साली तत्कालीन शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकला, शिवसेनेची १ हाती सत्ता ठाणे महानगरपालिकेत आली. सत्तेवर येण्यासाठी रघुनाथ मोरे साहेबांनी इतर पक्ष फोडले नाहीत कि घोडा बाजार केला नाही. त्यानंतर मात्र इतर पक्ष फोडा-फोडीचेच राजकारण सुरू झाले. ठाणे नगरपरिषद व नंतर ठाणे महानगर पालिकेच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या व तदनंतर मा. उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, देखरेखीखाली ठाणे शहराचा कायापालट केला म्हणूनच ठाणेकरांनी १९९३ पासून २०२२ पर्यंत शिवसेनेला सलग १५ महापौर दिले. त्यात तुमचा त्याग, परिश्रम किती ? तुमची भागीदारी किती ? व कशासाठी ? जनतेला आत्ता सर्व उलगडा झाला आहे.
२०१४ पर्यंत ठाणे जिल्ह्यात २४ विधानसभा मतदार संघ होते. त्यावेळी २४ पैकी १७ ते १८ आमदार निवडून येत होते. २०१४ साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले. १८ विधानसभा क्षेत्राचा ठाणे जिल्हा झाला व ६ विधानसभा क्षेत्राचा पालघर जिल्हा झाला. २०१४ साली पालघर जिल्ह्यात विधानसभेच्या ६ मतदार संघापैकी १ आमदार निवडून आला व ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा क्षेत्रापैकी ६ आमदार निवडून आले. तर भाजपचे ७ आमदार निवडून आले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यात १ आमदार व ठाणे जिल्ह्यात ५ आमदार निवडून आले. म्हणजे २४ पैकी ६. तर भारतीय जनता पक्षाचे ८ आमदार निवडून आले. मग कोणाच प्राबल्य वाढल ? मग शिवसेनेची प्रगती झाली कि अधोगती ? कोणाचे नेतृत्व होते ?
ठाणे लोकसभा मतदार संघ हा स्व. रामभाऊ म्हाळगी, स्व. प्राध्यापक राम कापसे यांच्याकडे होता. तो अत्यंत कौशल्याने आनंद दिघे साहेबांनी शिवसेनेकडे घेऊन स्व. प्रकाश परांजपे यांना खासदार केले. या दिग्गजांची पार्श्वभूमी असलेला हा ठाणे लोकसभा मतदार संघ २००९ साली शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची राजन विचारे यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी देण्याची तीव्र इच्छा असून सुद्धा तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ज्यांच्यावर भारतीय दंड संहिते मध्ये असलेल्या सर्व तऱ्हेच्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. अशाला उमेदवारी दिली. चारित्र्य संपन्न लोकप्रिय राजन विचारे यांच्या सारखा उमेदवार असताना सुद्धा त्यांना डावलून तुम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारास उमेदवारी दिली. व वल्गना केली कि, तो निवडून आला नाही तर आम्ही राजीनामा देऊ. त्या उमेदवाराचा ५२००० मतांनी पराभव झाला. कुठे दिला तुम्ही राजीनामा ? दिला असता तर आताची परिस्थितीच निर्माण झाली नसती. हि पक्षाची प्रगती कि अधोगती ? कोणाचे नेतृत्व होते ? ठाणे हा शिवसेनेचा बालेक्कीला निष्ठावंत शिवसैनिक घोषणा देतात “आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला” हा बालेकिल्ला तुम्ही फंदफितुरी करून २०१४ साली खिळखिळा केला कि नाही ? २०१४ ला भाजपा उमेदवार आमदार झाला कोणी केली फंदफितुरी ? कोणी केली कट कारस्थान? पक्षाची प्रगती झाली कि, अधोगती ?
तुम्ही तुमच्या प्रवृत्ती प्रमाणेच तुमच्या स्वार्थासाठी उद्धव साहेबांच्या वडिलांवर हक्क सांगितला. ठाण्यातील सर्व शाखांवर हक्क सांगितला आणि आत्ता तुम्ही आनंद आश्रम घायला निघालात नव्हे तर तुमच्या बेकायदेशीर पक्षाचा नामफलक प्रवेशद्वारावर लावला आहे. त्या आनंद आश्रमातून तत्कालीन सर्व जिल्हाप्रमुखांनी व आनंद दिघे साहेबांनी संघटना वाढविली, रुजविली त्या आश्रमातून असंख्य गोर गरिबांना न्याय दिला, नोकऱ्या दिल्या, उद्योग दिले, नाठाळांपासून संरक्षण दिले, घर दिली, छत दिले, उमेदवारी अर्ज दिले. निवडणुकीत ए बी फॉर्म दिले, नगरसेवक केले, आमदार केले, खासदार केले आणि त्यामुळेच पारशी समाजाच्या दानशुराने सामाजिक कार्यासाठी ती वास्तू आनंद दिघे साहेबांना बहाल केली. आणि आत्ता तुम्ही त्याच वास्तूतून शिवसेना संपविण्याचे विडे उचलत आहात. कट कारस्थाने करीत आहात. आनंद आश्रमाचा जुना ढाचा बदलून त्याचे पावित्र्य नष्ट करून तुम्ही आत्ता त्याचे कॉर्पोरेट ऑफिस केले आहे. दुसऱ्याच्या घरावर नेम प्लेट लावून जस त्या घरावर मालकी सांगता येत नाही तशी तुम्हाला आनंद आश्रमावर नाम फलक लावून मालकी सांगता येणार नाही. जनता तुम्हाला माफ करणार नाही. तो नामफलक तुमच्या हाताने उतरावा अन्यथा ठाणे जिल्ह्यातील जनता उघड्या डोळ्याने हे कपट कारस्थान पाहत बसणार नाही याची नोंद घ्या.
0 टिप्पण्या