Top Post Ad

महाराष्ट्रातील राजकारणातला कलगीतुरा


 शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडी या नव्या युतीने राज्याच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण तयार झाले. आपण वंचितच्या युतीबाबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे स्पष्टीकरण युतीची घोषणा करताना उध्दव ठाकरे यांनी  दिले होते. भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेला वंचितसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष सोबत हवे आहेत. मात्र आमची युती शिवसेनेसोबत आहे, महाविकास आघाडीचे आम्हाला काही देणेघेणे नाही, अशी भुमिका आंबेडकर यांनी घेतली. तर वंचितबाबत प्रतिक्रिया देताना, या भानगडीत पडत नाही असे शरद पवार यांनी म्हटले.  पुन्हा प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपाचेच आहेत असे खळबळजनक वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नाराजी पसरली. आमची युती शिवसेनेशी आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्याशी मला काही घेणेदेणे नाही, असे अॅड. आंबेडकर यांनीही स्पष्ट केले.  जवळपास अडीच वर्षापूर्वी अजित पवार यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे औट घटकेचे सरकार स्थापन केले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर आरोप करत शरद पवार हेच भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप केला.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार-देवेंद्र फडणवीस सरकार स्थापनेमागे शरद पवार यांना खेळी होती असे वक्तव्य करत प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या शरद पवारांवरील आरोपाला अप्रत्यक्ष पुष्टीच दिली. त्यामळे प्रकाश आंबेडकर आणि जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपानुसार शरद पवार हेच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले. त्यामुळे आघाडीच्या मुखियावरच असे आरोप होत असल्याने आता  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासोबत आघाडीचे जुळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या काळात शिवसेना याबाबत काय भुमिका घेणार यावर आघाडीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. मात्र आंबेडकरांच्या  आरोपनंतर  खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत यायचे असेल तर मविआच्या नेत्यांवर टीका करू नका असा सल्ला दिला. भविष्यात प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवार यांच्याशी काही मतभेद असू शकतात. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चाही केली आहे. भविष्यात आम्ही सर्व एकत्र बसून हे मतभेद दूर करू, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, हा सल्ला जर उद्धव ठाकरेंनी दिला असता तर मी मानला असता, इतिहासातील काही घटनांवरून मी ते विधान केलं होतं. त्याचा आताच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. कोणी त्याला चुकीच्या पद्धतीने घेत असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही, असे सांगत संजय राऊत यांच्या सल्ल्याला उडवून लावले. भाजपाला तुम्ही कमी लेखू नका. भाजपा कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही थराला जाऊ शकते. भांडण लावणे, मतभेद निर्माण करणे हा त्यांचा फंडा आहे. जेव्हा आपण निवडणूक जिंकत नाही, असं भाजपाला वाटतं तेव्हा ते भांडणं लावण्याचं काम करतात, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर केली.

प्रकाश आंबेडकरांना मी व्यक्तीगत काहीही बोललो नाही. संजय राऊत व्यक्तीगत बोलत नाही. मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून बोलतो आहे. महाविकास आघाडी टीकली पाहिजे आणि महाविकास आघाडीला तडा जाऊ नये म्हणून मी भूमिका मांडली होती. कुणाला ऐकायचं नसेल तर ऐकू नये. शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. भाजपा विरोधात आम्हाला आघाडी उभी करायची असेल तर शरद पवार आमचे नेते आहेत एवढंच मी म्हणतोय. आम्हाला त्यात प्रकाश आंबेडकर हवे आहेत, ममता बॅनर्जी हव्या आहेत, मायावती हव्या आहेत. आमच्या एकीला कुठेही तडा जाऊ नये असंच मी बोललो. उध्दव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचं नेतृत्त्व होतं म्हणून आम्ही सत्तेवर आलो, राहिलो. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आगामी निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी आघाडीची चर्चा झालेली आहे आणि पुढील निवडणुकीत आम्ही एकत्र सामोरे जाऊ, असे आमचे मत आहे. वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही असे सांगत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये स्थान नसल्याचे एकप्रकारे सूचित केले. महाविकास आघाडीमधील तीन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये एकत्र असण्याबाबत स्पष्टता आहे. पुढचे निर्णय कसे घ्यायचे याबाबत आमचा एकमेकांशी संवाद सुरू असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. असा हा महाराष्ट्रातील राजकारणात कलगीतुरा सुरु असताना राज्याच्या विकासाबाबत किंवा सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत कुणाला किती आस्था आहे हे आता दिसून येते. प्रत्येकजण आपला पक्ष आणि आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यातच सध्या धन्यता मानत आहे हे तेवढेच खरे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com