Top Post Ad

धारावीचं बदलतं रुपडं... किती वास्तव


 प्रज्ञा प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेतर्फे धारावी मुकुंदराव आंबेडकर नगरात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रबोधन सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यासाठी मला ही एक वक्ता म्हणून बोलण्यास बोलवले होते. धारावीला जाण्याचा वेगळाच उद्देश व आनंदही होता. धारावी हा मुंबईचा अतिशय बकाल भाग या ठिकाणी भारतातील बाराबलुतेदार कारागीर ८x८ च्या खोल्यांमध्ये राहून व्यवसाय करतात. या ठिकाणी तयार होणारा माल हा जगभर जातो. चमड़ा उद्योगापासून सर्वच उद्योग येथे आहेत. धारावीत फिरायला मिळण्यासाठीच मी नाशिकहून आलो होतो. कार्यक्रमाला वेळ आहे म्हणून मी सुबोध शाक्यरत्न व प्रमोद पाटील तसेच धारावीत वास्तव्य करणारे सुरेश शिंदे माझ्या बरोबर होते. धारावी भाग हा स्थानिक माहिती असलेल्या माणसांकडून समजून घेतला पाहिजे. आज मोठा बदल जरी झालेला असला तरी मुख्य रस्ते मोठे झालेले आहेत. आतील धारावी जशी आहे तशीच आहे नव्हेतर उलट रस्त्यावरच लोकांनी अतिक्रमण करुन रस्तेच ठेवलेले नाहीत असे शाक्यरत्न सांगत होते. शाक्यरत्न यांचे बालपणापासून येथेच वास्तव्य असल्यामुळे, ही संपूर्ण खाडीत झोपड्या टाकून लोकांची वस्ती होती असे सांगितले तर पुढे माटुंगा लेबर कॅम्पचा भाग होता अशी माहिती दिली.

 शाक्यरत्न यांच्या माहितीमुळे मला मुळ धारावी शोधता आली. त्यातील कोळीवाडा, मच्छी मार्केट पासून साऊथ इंडियन लोकांची वस्ती तसेच मुस्लिम, तमिळ, कर्नाटक या भाषिक नागरिकांच्या वस्त्या ही बघितल्या लोक कामधंद्यात व्यस्त दिसले. जवळजवळ दोन तास आम्ही धारावी फिरत होतो. एका ठिकाणी भारतीय महिला फेडरेशन एस. एफ. आय. असा बोर्ड दिसला उत्सुकतेपोटी ऑफिसकडे वळलो तर कॉ. राजु कोरडे हे नुकतेच माटुंगा स्टेशनला पोहोचले होते. मी बाहेरच उभा असतांना एक मुस्लिम महिला ऑफिसला कोणी नाही का? असा प्रश्न करुन विचारत होती म्हणजे महिला कामासाठी येत असाव्यात असे दिसले. कॉ. प्रमोद पाटील यांनी राजु कोरडे यांच्याशी संपर्क केला होताच ऑफिसला ओळखीचं कोणी नसल्यामुळे आम्ही माघारी फिरलो. शिवसेनेच्या जास्त शाखा दिसत होत्या तर मधेच एकनाथ गायकवाड तथा वर्षा गायकवाड यांचे कार्यकर्त्यांची कार्यालय जाहिरात दिसत होत्या. धारावीत आतमध्ये अठरा पगड जाती धर्मातील लोक राहत आहेत. अगदी मंदिरे, मस्जिद, बुध्द विहारं आहेत.

धारावीशी माझा जास्त संबंध आला नाही. मुंबईत जरी राहत असलो तरी सायन, माटुंगा स्टेशन पलिकडे जास्त वस्ती माहिती नाही. माटुंगा लेबर कॅम्पला दोन तीन वेळा गेलो असेल आता तेथेही कोणी नाही. जेष्ठ साहित्यिक बाबुराव बागूल तथा आबा यांचे जीवन याच माटुंगा लेबर कॅम्पमध्ये गेले. त्यांचे साहित्य ज्यांनी वाचले असेल त्यांना त्यांचे कथेतील पात्र तसेच वर्णन है धारावी, माटुंगा लेबर कॅम्पातील वस्तीचेच होते. आबा बोलतांना हे मला सांगायचे एकदा स्वतः ते माझ्या बरोबर आले, त्यांचे लिखाण करण्याचे ठिकाणापासून पानाचा ठेला या सर्वच गोष्टी त्यांनी दाखवल्या होत्या नंतर एक दोन वेळा काही नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त नंदा बरोबर या भागात फिरलो होतो. त्यावेळी नंदाने तिचे कुटुंब व बालपणाविषयी सांगत होती. आबांचे लिखाण व वास्तव्य ज्या घरात होते, त्या घरात आज एक मुस्लिम कुटुंब राहतं. त्यावेळी नंदाचा चेहरा बराच पडला होता. आबांच्या आठवणी तिला दाटून आल्या होत्या. कौटुंबिक आर्थिक अडचणीमुळे आबांना हे घर विकावं लागलं याने ती हैराण होती. तिची घालमेल माझ्या लक्षात आली होती म्हणून मी विषयांतर करत होतो, जड अंतकरणाने आम्ही माटुंगा लेबर कॅम्प सोडले होत. आबांच्या घरात नंदा एक संवेदनशील आहे, तिची आबांवरची आस्था ही वेगळीच आहे. आबांचे मोठेपणाची जाणीव त्या घरात तिलाच आहे, त्यांच्या मोठेपणाचा तिला गर्व आहे. पण त्या मोठेपणाचा कुठे ही गैरफायदा घ्यायचा नाही हे फक्त नी फक्त तिनेच पाळले आहे. हे सर्व आज मला आठवत होते. 

तर एकदा १९९९ मध्ये धारावीत पहिले विद्रोही साहित्य सम्मेलन भरले होते. आबा त्याचे अध्यक्ष होते, त्यावेळी मी शहाड येथे राहत होतो. आबा त्यावेळीस आमच्याकडेच मुक्कामास होते. किशोर ढमाले, सुबोध मोरे इत्यादी तेथे येवूनच आबांचे भाषण लिहून घेत होते." तेथूनच आम्ही धारावीत संम्मेलनासाठी आलो होतो. संम्मेलनाला चांगला प्रतिसाद होता. खरंतर हा मुंबईतला बकाल लोकांचा विभाग म्हणता येईल. ४०-५० वर्षापूर्वी हा भाग किती बकाल असेल. हे अण्णाभाऊ साठे आणि बाबुराव बागूल यांना वाचल्यावर कळतं. आज ऐवढं भीषण वास्तव आहे. तर ५०-६० वर्षापूर्वी ही येथे काय अवस्था असेल याची आताच्या पिढीला कल्पना करता येत नाही. धारावी फिरताना मला आबांच्या कथानक आठवत होते, तर त्यातील वास्तववादी चित्रण कथेत कसे घेता येते याने मी हैराण होत होतो. आबांची भाषा, सहजपणे सांगण्याची हातोटी है आज मला इतर साहित्य वाचतांना जाणवतं नाही. धारावीवर हिंदी चित्रपटात अनेकदा भाष्य केलेले दिसते, रजनीकांत यांचा अभिनय असलेला चित्रपट 'काला' मी आर्वजून नंदाबरोबर जाऊन थिएटरमध्ये बघितला होता. ते धारावीचे चित्रण माझ्या डोक्यात फिट होते. 

आज गल्लीगल्लीत फिरतांना मला ते चित्रण वास्तवातील दिसले. साऊथ मधील कलावंताना धारावीचे वास्तव कळावे व चित्रपटातून एक संदेश द्यावा ही सुचते. आंबेडकरवादी प्रतिके वापरून एक वेगळ्या विचारांची पेरणी त्या चित्रपटातून डोळ्यासमोर सरकताना दिसते अगदी लेनीनपासून बुध्द विहारापर्यंतचा संवाद त्यात आहे, प्रचंड अशी हाणामारी आहे. तर हा लुम्पीन लोकांचा किल्ला उध्वस्त करण्यासाठी जात, धर्म, पैसा, सत्ता यांचा कसा उपयोग केला जातो परंतु हा किल्ला उध्वस्त करता येत नाही असे ते चित्रपटाचे कथानक डोळ्या समोरुन जात होते. तर चित्रपटात कुठेही जयभीम शब्द न उच्चारता चित्रपटाचे नाव जयभीम ठेवलं जात हे साऊथ मधील निर्मात्यांना डायरेक्टर्सना जमतं, पण भारतातील सर्वात मोठी हिंदी फिल्मसिटी मुंबईला ते जमु नये हे कशाचे धोतक आहे हिंदी चित्रपट सृष्टीत डावे,

 क्रांतिकारी अनेक लेखक, कवी, डायरेक्टर आहेत, त्यांना धारावी हे ठिकाण दिसू नये याचं कोड पडत. धारावी पायाखाली घालतांना अशा अनेक गोष्टी डोक्यात घोळत होत्या तर प्रमोद पाटील, सुबोध शाक्यरत्न यांचे कडून भी धारावी समजून घेत होतो. आठ वाजता आम्ही सभेच्या मंडपात आलो नंदेश उमप आणि त्यांच्या टिमची गाणी सुरु होती. प्रमुख पाहुणे आल्यावर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. माझ्या सहित सर्व प्रमुख वक्त्यांना व पाहुण्यांना स्टेजवर बोलवण्यात आले. 

सुत्रसंचालन करुन गौतमी जाधव या भगिनीने सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. आमदार प्रसाद लाड यांना लवकर जाण्याचे असल्यामुळे त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्या शुभेच्छा दिल्या आणि निघाले. नंतरच्याही सर्व वक्त्यांनी अगदी ठराविक वेळेतच आपले प्रबोधनात्मक विचार मांडले. मी ही  बाबुराव बागुल, आण्णाभाऊ साठे यांचा संदर्भ देवून या विभागातील जनतेविषयी सांगितले तर  प्रमोद पाटील,  दिनेश डेंगळे, मेघा लोखंडे यांनी ही मनोगत व्यक्त करुन कार्यक्रमाचा शेवट झाला. संयोजकांनी या दिवसांचे महत्व जाणून लोकांना प्रबोधनाचा जो कार्यक्रम दिला त्या बाबतीत त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. कारण आता संविधानाची पुजा करा असा प्रतिक्रांतीवाद्यांकडून आदेश दिला जात आहे. राज्यघटनेची प्रत देव्हाऱ्यात ठेवा असाही संदेश दिला जात आहे, म्हणजे डॉ. आंबेडकर व घटना यांना देवत्व देवून नेहमी प्रमाणे प्रतिक्रांतीवादी यशस्वी होतील की काय? असा प्रश्न पडतो, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला राज्यघटनेची पुजा करुन सत्यनारायणाची पुजा ठेवली जात आहे. म्हणजे लोकांना घटनेतील विचारांना आत्मसात न करण्याचा एक प्रकारे हा सल्लाच आहे. राज्यघटनेची पुजा करा परंतु तिचे विचार आत्मसात करु नका असाच याचा अर्थ होतो. लोकांना प्रतिकामध्ये अडकविणे परंतु विचारांपासून दुर ठेवणे हे घडत असतांना प्रज्ञा प्रतिष्ठानच्या टिमने असा कार्यक्रम देणे आणि तो ही धारावी सारख्या ठिकाणी हे एक चळवळ जिवंत असल्याचे प्रतिक आहे असे मी समजतो पुन्हा धारावीकरांनी येऊ घातलेल्या क्रांतीचे शिलेदार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत भी धारावी सोडली.

  • अॅड. नाना अहिरे
  • मो. नं. ९८२०८५५१०१


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com