महाराष्ट्र ही संतांची पवित्र भूमी आहे.या पवित्र भूमीला आमच्या अनेक वारकरी संतांनी खरे अध्यात्म सांगून परिपूर्ण व सुपीक बनविण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे.त्यासाठी आपल्या संपूर्ण आयुष्याचा होम केला आहे.संत ज्ञानेश्वर,संत नामदेव,संत तुकाराम, संत एकनाथ,सावता महाराज, गोरोबा काका,सेना महाराज,जगनाडे महाराज तर आधुनिक काळामधे वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत अनेक संतांनी महाराष्ट्राच्या जनतेला भक्तीचा खरा मार्ग सांगितलेला आहे.परंतु या महान संतभूमीला कलंकित करण्याचे काम पंडित प्रदीप मिश्रा नावाचा एक महाराज करीत आहे.मागील काही दिवसांपासून आपल्या प्रवचनाने या पंडित मिश्रा नामक व्यक्तीने संपूर्ण भारतात धुडगूस घातलेला आहे.अनेक अवैज्ञानिक गोष्टी सांगून हा महाराज आमच्या खऱ्या संत परंपरेचा जाहीर अपमान करीत आहे.*हर समस्या का हल, एक लोटा जल* अशा प्रकारच्या घोषवाक्यातून लोकांना फसवित आहे.भगवान शंकराच्या पिंडीवर एक लोटा पाणी टाकायचं आणि बेलपत्र वाहायचं,मग तुमच्या जीवनातली कोणतीही समस्या एका क्षणात दूर होऊ शकते अशा प्रकारची भंपक आणि खोटारडी वक्तव्ये हा तथाकथित महाराज दररोज आपल्या प्रवचनातून रात्रंदिवस करीत आहे.
आलिशान गाड्यांमधून फिरणारा आणि अत्याधुनिक मंडपामधून प्रवचन करणारा हा महाराज पिंडीवर बेलपत्र वाहल्यामुळे कोमात गेलेले रुग्ण आपोआप बरे होतात, किडनीमधे असलेले स्टोन आपोआप बारीक होवून बाहेर पडतात,गरोदर महिलेला येत असलेल्या फिट किंवा मिरगीचे चक्कर येणे बंद होतात आणि त्याहीपेक्षा खतरनाक म्हणजे बेल पत्राला सहद लावून ते शंकराच्या पिंडीवर जर चिकटवले तर परीक्षेमधे चांगल्या मार्काने पास होते अशा प्रकारे अवैज्ञानिक,अवैद्यकीय आणि भारतीय संविधानाचा अपमान करणारे वक्तव्य दररोज जाहीरपणे करतो आहे आणि आम्ही सुद्धा ते चुपचाप सहन करतो आहे.रात्रंदिवस अभ्यास करून व प्रचंड पैसा खर्च करुन डाॕक्टर बनलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचा हा जाहीर अपमान असून त्यांच्या बुध्दीमत्तेला आणि शिक्षणाला नाकारण्याचा हा घृणास्पद प्रयत्न आहे.तरीसुद्धा केवळ धार्मिकतेच्या नावावर आम्ही गप्प राहणार असू, तर आमच्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही चुकीच्या मार्गाने नेत असून त्यांना अज्ञान व अंधश्रध्देच्या खाईत ढकलत आहोत व त्यासाठी आम्हीच जबाबदार राहणार आहोत.
देशातील असंख्य महिला या मिश्रा महाराजाच्या मागे लागल्या असून सूर्योदयापूर्वी उठून एक लोटा पाणी व बेलपत्रे घेऊन शंकराच्या मंदिरासमोर महिलांच्या रांगा लागत आहे आणि शंकराच्या पिंडीवर पाणी आणि बेलपत्र ठेवून आपल्या अडचणी, समस्या दूर करण्यासाठी या महिला विनवणी करीत आहे.आता या महाराजांचा मोर्चा महाराष्ट्राकडे वळला आहे.आमच्या ज्या खऱ्या संतांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाला अंधश्रद्धा आणि अज्ञानातून दूर काढण्यासाठी खर्ची घातले,प्रचंड विरोध पत्करला,प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, आज त्या महान संतांच्या लोकहिताच्या परिवर्तनवादी विचारांना पायदळी तुडविण्याचे काम प्रदीप मिश्रा नावाचा हा माणूस करतो आहे.एका प्रवचनाचे लाखो रुपये घेणारा आणि लोकांना अध्यात्माचे खोटे डोज पाजणारा हा तथाकथित ढोंगी महाराज येणाऱ्या काळामधे सर्वसामान्य लोकांना ठगविणारा महापाखंडी ठरणार आहे हे लिहून घ्यावे.आसाराम बापूच्या विरोधातही आम्ही सुरुवातीच्या काळात हेच सांगत होतो.पण लोक आमचे ऐकत नव्हते.आम्हाला विरोध करीत होते.नंतर आसाराम बलात्काराच्या आरोपात तुरुंगात गेला.
त्यामुळे अध्यात्माच्या नावाखाली गोरगरीब लोकांची लूट करणारा आणि विज्ञानाचे सगळे फायदे घेऊन अवैज्ञानिक गोष्टीँचे समर्थन करणारा व सर्वसामान्य लोकांना सुद्धा अवैज्ञानिक गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणारा हा प्रदीप मिश्रा महाराज आमच्या हिंदू धर्माचा आणि भारतीय संस्कृतीचा खरा शत्रू असून भारतवासीयांनी अशा ढोंगी बुवा,बापू,महाराजांपासून सावध राहावे.ज्या गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य अशा ढोंगी, नाटकी आणि बुवाबाजी करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध लढण्यात खर्ची घातले,त्याच तुकोबा-तुकडोजी-गाडगेबाबांच्या भूमीत हा मिश्रा महाराज लोकांना फसविण्याचे व त्यांचे मेंदू गुलाम करण्याचे कारस्थान करीत आहे.हा आमच्या संत नामदेव, तुकाराम,गाडगेबाबा,तुकडोजी महाराजांच्या महान वारकरी परंपरेचा घोर अपमान आहे.म्हणून या मिश्रा महाराजाचा ताबडतोब बंदोबस्त करणे व भारतीय संविधानानुसार अवैज्ञानिक गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करणे कायद्यानुसार गुन्हा असताना हा जाहीरपणे जर अशा गोष्टींचे समर्थन करीत असेल तर त्याला ताबडतोब पायबंद घातला पाहिजे.सरकारनेच त्याचे कार्यक्रम बंद करायला पाहिजे.अन्यथा लोकांना पेटून उठावे लागेल व अशा लोकांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल.कारण महाराष्ट्राच्या अस्सल संत परंपरेला डाग लावण्याचा व पवित्र वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचा हा घृणास्पद प्रयत्न आहे.खऱ्या संत परंपरेला मानणाऱ्या सर्वांनी यावर गांभीर्याने विचार करावा.
- प्रेमकुमार बोके .... ९५२७९१२७०६
- अंजनगाव सुर्जी ... १६ जानेवारी २०२३
0 टिप्पण्या