Top Post Ad

पण आंबेडकरवादाचा अभ्यास का नाही


 आंबेडकरवादाबद्दलच्या कल्पना भरपूर आहेत, पण आंबेडकरवादाचा अभ्यास का नाही? ‘वाद’ म्हणजे काय इथपासून सुरुवात केली, गुणदोष पाहिले तरी आंबेडकरवादाचे वैचारिक साधन आज हवे आहे. ते सहज दिसत का नाही? आंबेडकरवाद काय आहे? या शब्दाचे उत्पत्तिस्थान नेमके कुठे आहे? आंबेडकरवाद हा केवळ शब्दांचा खेळ आहे की यामध्ये एखाद्या युगाचे सखोल प्रयोजन आहे? आंबेडकरवाद हे नुसते आक्रमक निळय़ा रंगात उमटलेले चित्र आहे की आंबेडकरवाद हे सर्जनशील गांभीर्याचा उद्गार आहे? आंबेडकरवाद हे व्यवस्थेवर केलेले आरोप आहेत की आपली गाऱ्हाणी मांडण्याची एक पद्धत आहे? आंबेडकरवाद एका लपलेल्या विश्वाचे अमूर्तचित्र आहे की ते असलेल्या जगाचा एक कॅनव्हास आहे?  आंबेडकरवाद हा मार्ग आहे की वळणावर थांबण्यासाठीचा एक फलक आहे? की आंबेडकरवाद ही दरी आहे की वाहात राहणारी एक प्रवाही नदी?

आंबेडकरवाद जातीविरोधी आहे की सवर्णविरोधी आहे? आंबेडकरवाद व्यक्तिकेंद्रित आहे की व्यवस्थेचा विरंगुळा? आंबेडकरवाद राजकारण आहे का देशाचे राज्यपत्र? आंबेडकरवाद रोजीरोटी आहे की सन्मानाची लढाई? आंबेडकरवाद ही संस्कृती आहे की संसाराला बांधलेली एक किल्ली? आंबेडकरवाद हे अर्थशास्त्रीय लेखन आहे की समाजशास्त्राची एक फाइल आहे? आंबेडकरवाद हा मंत्रालयातल्या शासकीय भिंतीवरच्या एका फोटोत रमलेला आशावाद आहे की सरकारी योजनेत आहे आंबेडकरवाद शिक्षित लोकांनी केलेली एक टिप्पणी आहे की रोजंदाराच्या भुकेला दिलेली हाक आहे? आंबेडकरवाद बुद्धांच्या धम्मात आहे की समाजाच्या आचरणात आहे?आंबेडकरवाद लोकशाही आहे की अराजक साम्यवादी विश्वाचा लढा आहे? आंबेडकरवाद भांडवलशाहीची पुनरुक्ती आहे की उदार प्रणालीची तटस्थता आहे?

आधुनिकता आहे की रीतिमान्य प्रखरता आहे? आंबेडकरवाद विचार आहे की अ‍ॅक्शनचा मॅनिफेस्टो? आंबेडकरवादाची लढाई ही अनेक असमानतांच्या विरोधातली आहे की विषयमर्यादेत, वेळोवेळी केलेली आव्हाने आहेत? आंबेडकरवाद हा अंधारात जखडलेल्या इसमाला दिसलेला प्रकाश आहे की दिवसाशी प्रेम करण्यास भाग पाडणारी परिस्थिती आहे? हे आणि असे अनेक प्रश्न आपल्यापुढे आहेत. प्रश्नांच्या या डोंगरातून मार्ग काढीत आपल्याला आंबेडकरवादाची एक सोपी आणि सहज समजण्यासारखी व्याख्या तयार करावी लागेल. जर आंबेडकरवाद समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा गुंते सुरळीत करावे लागतील. हे प्रश्न काय आणि कोणी निर्माण केले याच्या भानगडीत न पडता आपण विषयामध्ये पद्धतशीर हात घालू. पण ते समजण्याआधी आपल्याला ‘वादा’चे रहस्य आणि त्यावर केलेले अभ्यास याचे एक थोडक्यात अवलोकन करावे लागेल.

‘वाद’ कशाला म्हणायचे?.... वाद म्हणजे नेमका काय आहे? 

वादाला इंग्रजीत ‘इझम’ असे म्हणतात. वादाला किंवा इझमला कधी कधी नकारात्मक दृष्टीने पाहिले गेले आहे. वाद म्हणजे एका शिकवणीतून तयार होणारा दृष्टिकोन. वाद डॉक्ट्रिनल (सिद्धान्तनिष्ठ) असू शकतात, म्हणजे तत्त्वांच्या प्रणालीतले ते एक मत असू शकते. वाद एकदा वैचारिक प्रवाहातून गेल्यावर, उपदेशात्मक होतात. वाद ही परिस्थिती आहे. अन्य अवस्थेतून स्वत:चे मोजमाप करण्याची एक क्रिया आहे. वाद ही साम्य शोधण्याच्या प्रक्रियेतली एक धडपड आहे. वादातून विषय तयार होतात. त्यातून विवादाला स्थान मिळते. आणि वादविवादाच्या संगमाने – त्या घर्षणाने तयार झालेल्या ऊर्जेमुळे –  लोकशाहीचा अनुभव मिळतो.

वाद हे अनेक ज्ञानशास्त्रांत आपले गट निर्माण केलेले आढळतात. वादाचे प्रमुख मानकरी धर्म आहेत. त्यातल्या त्यात अनेक धर्माचे संस्थापक वादाचे कर्ते ठरवले जातात. त्या त्या वादाला अभिप्रेत त्यांचे अनुयायी त्यांच्या पैगंबराचे/ संस्थापकाचे चाहते व रक्षक ठरतात. एकदा एखादा विचार किंवा व्यक्ती वादाच्या रहस्ययुगात गेले की, त्याची संचेतना ही युगानुयुगे चालत राहते. म्हणूनच हजारो वर्षांच्या आधी निर्माण झालेली अवस्था जेव्हा वाद म्हणून उरते, तेव्हा त्याचे पुरस्कारकर्ते व धिक्कारकर्ते यांनी त्या व्यक्तीचे व त्यांनी केलेल्या ठरावीक कामाचे आकलन सद्य:परिस्थितीत केलेले आढळते. वादाचे समर्थक व विरोधक वैर घेताना आढळतात.

व्यक्तीसंबंधित वाद हे त्यांच्या कार्याची विटंबनादेखील ठरू शकते. हे विटंबन, त्या वादाचे विरोधक व अनुयायी दोघेही आपल्यापरीने करतात. व्यक्तिवाद हा त्या व्यक्तीपुरता सीमित राहत नाही तर तो त्यांच्या अनुयायांच्या अहंकाराचा एक देहाभिमान ठरतो. मग विचारांचे आपल्या परीने अर्थ लावण्यात आणि व्याख्या मांडण्यात अनेक रंगीबेरंगी प्रतिसाद निर्माण होतात. त्यातून अनेक गटांचे निर्माण होते. ते गट सामाजिक व राजकीय पटलावर आपल्या आचरणाचे चित्र समाजापुढे रेखाटतात. कधी कधी स्वत:च्या ‘मी’पणात अडकलेले अनुयायी हे फक्त त्यांच्या पैगंबराचे नाव घेतात, पण प्रत्यक्षात आपल्याच मानसिकतेचा पुरस्कार त्यांच्या नावाआडून करतात.

प्रभाव आहे, अभ्यास नाही?* आंबेडकरवाद समजून घ्यायचा असेल तर आपल्याला भारताच्या प्राचीन काळाकडेही नीट पाहावे लागेल. दोन प्रमुख प्रवाह भारताच्या इतिहासाचे केंद्र आहेत : *ब्राह्मणवाद व बुद्धवाद* बुद्धवाद हा बुद्धांपुरता सीमित नव्हता, तर त्यांच्या विचारांचा पुरस्कार अनेक पंथ, संत, धर्म यांच्यात आढळतो. बुद्धांच्या शिकवणीचे प्रभाव मध्ययुगीन उत्तर, दक्षिण व पूर्व भारतात बहुसंख्येने आढळतात. त्या प्रभावांची शक्ती कमीअधिक प्रमाणात टिकलेली दिसते.  त्याच शक्तीचे एक अंग आधुनिक स्वरूपात, सुटाबुटांत आपल्याला डॉ. बी. आर. आंबेडकरांच्या रूपाने लाभले. डॉ. आंबेडकरांनी जीवनाच्या अनेक पैलूंवर भाष्य केले आहे. पण त्यांच्या लढय़ाचे एक स्वरूप किंवा एक मत असे नाही. त्यांचे प्रहार अन्यायाच्या विरोधात होते. जिथे अन्याय, अत्याचार दिसला तिथे आंबेडकरांनी शास्त्रीय पद्धतीने त्या विषयावर टिप्पणी देऊन, त्यावर मार्ग काढला. *डॉ. आंबेडकरांची ऊर्जा ही त्यांच्यापर्यंतच सीमित नव्हती. त्यांनी ती अनेक लोकांमध्ये रुजवली. त्याचाच परिणाम म्हणजे गोरगरिबांच्या चळवळी आजही सबंध भारतभरात आढळतात

आंबेडकरांनी व्यक्तिपूजेला व भावनिकतेला आपल्या परीने मांडले. त्यांना व्यक्तिपूजेबद्दल तिरस्कार होता. भावनेबद्दल त्यांनी लोककल्याणासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल हे बुद्धांच्या धम्माच्या पुरस्कारासाठी केला पाहिजे या दृष्टीने समजावून सांगितले. अनेक विधानांतून असे दिसून येते की, डॉ. आंबेडकरांनी पुराव्यासोबतच तर्कशुद्धीने आपली बाजू मांडली. आंबेडकर विचार जर आंबेडकरवादात आणायचा असेल तर आंबेडकरांच्या शास्त्रीय पद्धतींना सामोरे जावे लागेल. शास्त्रीय अभ्यासाचे तंत्र त्यांच्यावर लावावे लागेल आणि त्यामधून आंबेडकर विचारविश्वाला स्वत:ची प्रचीती द्यावी लागेल. हा झाला अकादमिक दृष्टिकोन. पण लोककेंद्रित वादाला लोकांचा होकार व मान्यता कामी येऊ शकते.

आंबेडकरांवर अकादमिक प्रबंध, साहित्य, स्तुतिसुमने हजारोंच्या संख्येने आहेत. पण जर आंबेडकरवाद हयातीत आणायचा असेलच, तर मग आंबेडकरांच्या लेखणीचे, त्यांच्या शब्दांचे आजच्या वर्तमान परिस्थितीत आकलन केले पाहिजे. आंबेडकरांना दुर्दैवाने दोन टोके लाभली. एक प्रेम करणारे आणि दुसरी तिरस्कार करणारे. त्यामुळे त्यांच्यावर हवे तसे सखोल भाष्य झालेले नाही. त्यानंतरच्या काळात असे दिसते की, *बाबासाहेबांवर आता जागतिक विचारांचे बारकाईने लक्ष आहे. अनेक विचारवंत त्यांच्या विचारसरणीचा पुरस्कार आपल्या परीने करताना दिसतात*. आंबेडकरांची थिअरी – आंबेडकरी सिद्धान्तन- जगातील मागास समाजाला उपयुक्त ठरू शकेल का या विषयावर मागील दशकापासून अनेक देशांत- खंडांत मीच संशोधन करीत आहे.

हे आधीच व्हायला हवे होते, पण जसे मार्क्‍स आणि गांधींसोबत झाले तसे आंबेडकरांसोबत नाही झाले. त्यांच्यावर सैद्धांतिक अन्याय भरपूर झाला. त्यांच्या विचारांचा पुरस्कार करणारे भारतभूमीत मोजकेच झाले. बाकी सवर्ण ब्राह्मणवादाने ग्रस्त लेखक/विचारकांनी मार्क्‍सचा किंवा गांधींचा घोष करत अनेक ग्रंथ लिहिले. मग अगदी हल्लीच्या काळात जेव्हा आम्ही आंबेडकरांना पुढे केलं तर त्यांच्यावर परत अन्याय करण्यात आला. अनेक पिढय़ांच्या मेहनतीने आज जर आंबेडकर मुख्य प्रवाहात आहेत तर त्यांना कोणाच्या तरी बरोबरीने बसविले जाते. हास्यास्पद गोष्ट ही की, आंबेडकरांवर लिहिण्याचे झाले तर त्यांना गांधी किंवा मार्क्‍सच्या रांगेत बसवितात. मार्क्‍स आणि गांधी हे जगविख्यात विचारक का ठरू शकले? याचे कारण हे की, त्यांच्यावर अगोदरपासून अभ्यास सुरू होता. गांधींच्या तर हयातीतच त्यांचे चरित्र लिहिले होते. याचा फायदा असा झाला की नंतरची पिढी त्यांच्यावर समीक्षक रीतीने लिखाण करू शकली. आंबेडकरांना आता त्या समीक्षकांच्या चष्म्यातून जावे लागेल. इथून निघालेला प्रभाव कदाचित आपल्याला आंबेडकरवादावर पुढले लिखाण करण्यास प्रवृत्त करेल. पण आजची परिस्थिती पाहिली तर आपल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्नांना पुढे जाण्यासाठी एका सहृदयी विचाराची त्वरित गरज आहे. म्हणून आंबेडकरवाद काय असू शकतो याचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो आहे.

सुरज मिलिंद एंगडे
(लेखक हार्वर्ड विद्यापीठात संशोधक आहेत व ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये डॉक्टरेट पदवीचे अभ्यासक आहेत)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com