Top Post Ad

महाराष्ट्राचं दैवत - राजमाता जिजाऊ


 १२ जानेवारी - राजमाता जिजाऊ जयंती  

राजमाता जिजाऊंचा इतिहास हा नवयुग निर्मितीचा  जणू सुवर्णकाळच होय.शिवरायांसारखा आदर्श व चारित्र्यवान राजा घडविला,तो जिजामातांनी.*त्या* शिवबाच्या स्फूर्तीस्थान व मार्गदर्शक होत्या.महत्वाचे म्हणजे त्या हिंदवी स्वराज्याच्या प्रणेत्या होत्या. स्वतंत्र मराठी साम्राज्य स्थापनेचं दिव्यस्वप्न त्यांनी शिवरायांपुढे ठेवलं.जिजामातेचं पुत्रप्रेम अजोड होतं तर,शिवबाची मातृभक्ती अपरंपार होती.स्वराज्य स्थापनेची प्रेरणा शिवछत्रपतींना आपल्या मातेकडूनच मिळाली.असं पराक्रमी व कर्तुत्ववान मातेच मातृछत्र शिवबांना लाभलं,हे त्यांचं भाग्यच म्हणावं.अशा महान मातेची आज जयंती दिन असून, त्यांच्या कार्यकर्तुत्वावर दृष्टिक्षेप टाकणारा हा लेख....

जिजामाता ह्या केवळ शिवबाच्या माता नव्हत्या तर,त्या स्वराज्य माताही होत्या.त्याबरोबरच त्या महाराष्ट्राच्या दैवत होत्या.जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडाराजा येथील  लहुजीराव जाधव यांच्या राजघराण्यात झाला अन् जणू हिंदवी स्वराज्याची जननी उदयास आली. जिजामाताच्या आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई.जिजाऊंचा विवाह साताऱ्याच्या भोसले राजघराण्याच्या मालोजीराव भोसले यांचे सुपुत्र शहाजी राजे यांच्याशी झाला.राजे शिवाजी व राजे संभाजी हे त्यांचे द्वय सूपुत्र.

 जिजाऊ ह्या राजमाता असूनही त्यांना आपल्या जीवनकाळात विविध समस्यांना सामोरे जावे लागले.त्यांचं सांसारिक जीवन अत्यंत धावपळीत,ताणतणावात व कष्टात गेलं.दुर्दैवाने त्यात भर पडली ती भोसले-जाधव राजघराण्यातील वैमनस्याची.त्यामुळे *त्या* माहेरच्या मायेला कायमच्या मुकल्या.दुसरीकडे राजे शहाजी हे आदिलशहांच्या राज्यात सरदार म्हणून होते.त्यामुळे शिवबांची  जडणघडण अन् त्यांना मराठी साम्राज्याचा राजा बनविण्याची संपूर्ण जबाबदारी जिजामाताच्या खांद्यांवर आली होती.अशा कठीण,अस्थिर व संकटमय परिस्थितीत जिजाऊंनी मोठ्या धैर्याने अन्
आत्मविश्वासाने आपले जीवन मार्गक्रमित केलं. समोर आलेल्या समस्यांना समर्थपणे सामोरे गेले.पण त्या यत्किंचितही डगमगल्या नाहीत. त्यांचं रयतेशी वागणं अत्यंत संयमशील व स्नेहाच होतं.त्या खऱ्या अर्थाने *न्यायदेवता* होत्या.राजे शहाजी हे आदिलशहाकडे सरदार होते.तरीदेखील त्यांना *त्या* देवासमान मानत असत.जिजाऊ ह्या वीरपत्नी व वीरमाता म्हणून सर्वांना आदर्शवत होत्या अन् आजही आहेत.या पार्श्वभूमीवर जिजामाता ह्या शिवछत्रपतीं साठी *परमधाम* होत्या.

स्वराज्याची स्थापना करण्याचा जिजाऊंना मोठा ध्यास होता.जिजाऊ शिवबाला म्हणाल्या,"तुमचे वडील स्वपराक्रमाने वजीर झाले,बडे सरदार झाले.पण राजे झाले नाहीत.म्हणून तुम्ही राजे व्हा.महाराष्ट्राचे राजे व्हा.डोळे मिटण्यापूर्वी मला तुमचा राज्याभिषेक पाहू द्या.हे सारे याचि देही याचि डोळा बघू द्या".इतकेच नव्हे तर,निजामांच्या - मोगलांच्या जुलूमी राजवटीचा अंत व्हावा,यासाठी जिजाऊ ह्या नेहमी मां जगदंबेला साकडे घालत असत.जिजाऊंच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेम आणि निस्सिम देशभक्तीचे हे खरे द्योतक आहे.

राजमाता जिजाबाईंनी शिवबासह त्यांचे निष्ठावान मावळे तान्हाजी मालुसरे,सूर्याजी मालुसरे,येसाजी कंक,सूर्याजी काकडे,दाजी जेधे,त्रिंबक सोनदेव, जिवा,संताजी- धनाजी,बाजीप्रभू देशपांडे आदींना स्वराज्याचे महत्व व उपयुक्तता याची कल्पना देऊन त्यांच्यात दुर्दम्य राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण केली.निजामा़ंच्या मनात
 कपट होतं,हे जिजाऊ चांगल्याप्रकारे जाणत होत्या.भोसले-जाधव यांच्या वैमनस्याचा निजामांनी भरपूर गैरफायदा घेतला.हे सर्व जिजाबाईंना माहित होतं.जिजाऊ आजारी असताना शहाजी राजे भेटावयास आले असता,त्या म्हणाल्या,"महाराज आता तरी विचार करा,सुलतानाची नोकरी म्हणजे मृत्युचा साफळा.स्वतंत्र राजा म्हणून जगण्याचं आव्हान आपण का स्वीकारत नाही ? आपण स्वतःच का बादशाह होत नाही?" यावरून जिजाऊंच्या क्षत्रिय बाण्याचे प्रत्यय या कणखर भूमिकेतून दिसून येते.

जिजाऊंनी स्वराज्याची हाक दिली.त्या वाघिणीसारख्या चवताळल्या अन् म्हणाल्या,"गुलामगिरीसारखं दुसरं मोठं दुर्दैव नाही.आणि ते सहन करण्याएवढं मोठं पाप नाही.३०० वर्षाच्या या  दुर्दैवाला स्वराज्याशिवाय दुसरा पर्याय नाही.या भ्रष्ट झालेल्या भूमीवर स्वराज्याचे पीक काढायचं असेल तर,त्याआधी निजामांच्या घरांवर नांगर फिरविण्यास सिद्ध व्हा".जिजाऊंचे हे आवेशपूर्ण प्रखर विचार ऐकून मावळ्यांच्या रुपातली ही चिमुकली मुलं पुढे शूरवीर सरदार बनली.बघता बघता,शिव छत्रपतींच्या नेतृत्वाखाली या शूरवीर सरदारांनी व सैनिकांनी अखेर जिजाऊंच्या स्वप्नातल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

दरम्यान रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.गुलाल उधळत,ढोल -ताशे वाजवत अन्  तुतारीच्या गगनभेदी निनादात रायगडाचं सारं वातावरण ढवळून निघालं होतं.देशा-विदेशातले राजे,महाराजे,सरदार यांनी या सोहळ्यास आवर्जून हजेरी लावली होती.काशीच्या गागाभट्टांकडे राज्याभिषेकचे पौरोहित्य सोपविण्यात आले होते.ब्राह्मणांना दागदागिने, जडजवाहिरे,किमती कपडे,सोने-नाणे भेट म्हणून देण्यात आले.राज्याभिषेक संपन्न झाल्याचे घोषित केल्यावर महाराज सिंहासनावर आरूढ झाले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी ब्राम्हणांचे चरणस्पर्श करून  त्यांचे आशिर्वाद घेतले.त्यानंतर शिवरायांनी मातोश्री राजमाता जिजाबाई यांचे आशिर्वाद घेतले.उपस्थित पाहुण्यांनी शिवाजी महाराजांचं अभिनंदन केलं.जिजाऊंचे आशिर्वाद घेण्यासाठी शिवबा राजमातेच्या आसनाजवळ आले.त्यांनी जिजाऊंचे चरण स्पर्श करून आशिर्वाद घेतले.त्यावेळी मातोश्रीला
आकाश ठेंगणे वाटू लागलं होतं.त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.त्या तृप्त झाल्या,धन्य झाल्या.त्यांनी शिवबाची दृष्ट काढून आशिर्वाद देत,  म्हणाल्या,"शिवबा तुम्ही राजे झालात,छत्रपती झालात.मराठी साम्राज्याचे राजे झालात.रयतेचे राजा झालात.वास्तविक पहाता,जिजाऊ माँसाहेबा़ंनी  *सोनियाचा दिवस* पाहिला.त्या धन्य झाल्या,त्या तृप्त झाल्या.जणू त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं.त्यांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालं.त्यासाठी सारा महाराष्ट्र जिजाऊंचा ऋणाईत झाला.

जय मां जिजाऊ,
जय शिवछत्रपती!
छत्रपती संभाजी महाराज की जय हो!
जय महाराष्ट्र!

रणवीरसिंह राजपूत .... ९९२०६७४२१९
गवर्नमेंट मीडिया, महाराष्ट्र शासन (निवृत्त प्रसिद्धी अधिकारी,मंत्रालय)
.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com