Top Post Ad

सांस्कृतिक मुक्तीची गोधडी ....


 विलक्षण प्रत्ययकारी ज्वलंत विद्रोही मराठी नाटक!  भारतीयांची सदसदबुध्दी जागृत करणारे क्रांतिकारी नाटक! या अभिनव अदभूत नाट्यप्रयोगाची पुढीलप्रमाणे  वेगवेगळी एकूण ३१ अकल्पित अचंबित वैशिष्ट्ये आहेत.

(१)  थिएटर ऑफ रेलेवन्स 

ही नाट्य संस्था गेली ३० वर्षापासून वेगवेगळे विद्रोही सृजनशील नाट्यप्रयोग करते. ज्यायोगे भारतखंडात लाखो प्रेक्षकांची सदसदबुध्दी जागरूक होते.  मनोरंजनाची पारंपारिक आवड बदलून,  प्रेक्षकांमध्ये वैचारिक अभिरूची निर्माण होते. कोणतीही सत्ता, कार्पोरेट, राजकीय पक्षांच्या आश्रयाविना, भारतभर रंग आंदोलनास, ही सृजक रंगसंस्था उत्प्रेरीत करते

(२) दिग्दर्शक मंजुल भारद्वाज

 हे नाट्यसिध्दांतचे सृजक आणि चिंतनशील  आंदोलक आहेत. जे राष्ट्रीय आव्हांनाना रंगकलेद्वारे प्रतिरोध करतात. जागतिक किर्तीचे रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी अनेक देशामध्ये भारतीय संविधानी आधारीत कित्येक विद्रोही विवेकी नाट्यप्रयोग सादर केले आहेत.

(३) लोकशास्त्र सावित्री

 थिएटर रेलेवन्स ची  लोकशास्त्र सावित्री ही दुसरी क्रांतीकारी नाट्यप्रस्तूती  आहे. अर्थातच  भारतातील आद्य लोकशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची, कर्मकांडी ठोकरी आणि शैक्षणिक विचारी शिकवण, लोकशास्त्र सावित्री भारतीय  प्रेक्षकांना देते. लोकशास्त्र सावित्री लहानथोर  प्रेक्षकांची  विचारशक्ती ह्रदयस्थ  जागृत करते. 

(४) गोधडी

 गोधडी हे अभिनव मराठी भाषिक अनन्य  नाटक आहे.  ज्यामध्ये भारतीय संविधानी चौकट आहे. संविधानावर आधारित  भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क ,  ही नूतन नाट्यकलाकृती अभिनवपणे सादर करते. वर्चस्ववादी शोषणचक्राच्या विकृतीस धूतकारते. अहिंसेची आणि मानवी संवेदनांची संस्कृती अलवारपणे उलगडते. 

(५)  गोधडी म्हणजे  काय ?

भारतीय संस्कृतीचा सम्यक शोध म्हणजेच गोधडी होय. गोधडी म्हणजे संस्कृती,  काळ, माती आणि  निसर्गा सोबत  भारतातील विविध सण उत्सव, प्रथा,  चालीरिती परंपरा यांचा  गूढरम्य शोध  होय. मानवी विवेकाची सुंदरम गुंफण गोधडी विणते. खंडप्राय भारत देशाची विविधता हे नाटक स्पंदित करते. 

 (६) धर्मभेद वर्णभेद  वर्गभेदांना मूठमाती !

होय. गोधडी ही ज्वलंत नाट्यकृती  माणसांचे पाखंड आणि विकृतीला समुळपणे नष्ट करते.  मूळ लोकहितायी संस्कृतीचा शोध घेते. 

वर्णभेद वर्गभेद  जातपात धर्मभेद हिंचाचार  अशा कैक मनोविकारांना  ठोकर  मारते.  सामूहिक अत्याचार आणि जातीय  दंगल अशा विकारी प्रवृत्तींना   धुतकारते. अंती प्रेक्षकांची विवेकबुध्दी जागृत  करते

(७) रंगकर्मी विशेषण ???

थिएटर रेलेवन्स चे कलावैशिष्ट्य म्हणजे,  मंच कलाकारांना कलाकार हे व्यावसायिक विशेषण न वापरता, त्याऐवजी रंगकर्मी  हे आगळेवेगळे विशेषण अभिमानाने  वापरतात. ज्यायोगे नाट्य कलाकारांचा मानसन्मान सर्वत्र दृग्गोचर होतो. 

(८) गोधडी मध्ये एकूण  १२ स्री पात्री रंगकर्मीनी आहेत

होय.  गोधडी  मध्ये  एकूण १२ स्री रंगकर्मिनी आहेत.  वयोगट ५ वर्षे ते ५० वर्षे असून, त्या भारतीय नारीजगताचे विविधांगी  भावविश्व प्रगट करतात.  पारंपारिकता आणि आधुनिकतेची शाब्दिक लढाई लढतात.  अंधश्रध्दा विरूध्द विज्ञानाची  जागरणे जागवितात.  स्मितहास्यी   ते रणचंडिका पर्यतचा विद्रोह देखिल उत्कटपणे साकारतात.  सर्वच सानीथोरी रंगकर्मीनींनी तोलमोली अभिनयाचे रंग भरून,  अप्रतिम गोधडी साकारली आहे. यापैकी  संध्या बाविस्कर, तनिष्का लोंढे, प्रांजल गुडीले, आरोही बाविस्कर ही काही नामांकने आहेत.

(९) केवळ एकच पुरूषी पात्र.

होय.  नाट्यप्रयोगात केवळ एकच पुरूष रंगकर्मी  आहे. जो  तुषार म्हस्के नामक प्रगल्भ युवा अभिनेता आहे.  हा युवा रंगकर्मी अतिशय ताकदीने  वेगवेगळे पुरूषी अभिरूपे सादर करतो.  ज्यायोगे प्रेक्षकांना एका नवोदित सशक्त रंगकर्मीची क्षमता दिसते.  यामध्ये गरीब शेतकरी ते विखारी नेता पर्यतचे विविधांगी अभिनयी सामर्थ्य  तुषार म्हस्के मनस्वीपणे सादर करतो.

(१०) चार प्रमुख स्त्री भूमिका

होय.  नाटकाचा डोलारा चार प्रमुख स्त्री पात्रांनी कलात्मकतेने सावरला आहे. अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर आणि प्रियंका कांबळे या चार सशक्ती  रंगयुवतींनी  सध्दम्मी संवादी सोनेरी गोधडी गुंफली आहे. चौघांचीही प्रभावी संवादफेक,  आशयघनी  देहबोली, स्मितहास्यी चेहरे, शाब्दिक टणत्कार,  विलोभनीय भावमुद्रा , प्रत्ययकारी अभिनय, अचूक टायमिंग , तरल नृत्यप्रकार  हे सर्व अविष्कार पाहतांना प्रेक्षकांना मराठी नारीजगताची विलक्षण अनुभूती लाभते. 

मी या चारही युवा रंगकर्मीनींना व्यक्तिश:  ओळखतो. गेली  ४ वर्षे माझा आणि त्यांचा सम्यक सत्कर्मी परिचय आहे

(११) करमणूक शून्य आहे.

होय. या आगळ्या क्रांतीकारी नाटकात करमणूक शून्य आहे. कारण गोधडी हे  पूर्णतया विद्रोही नाटक आहे. परिणामी येथे  मनोरंजनास कोणताही  वाव नाही.  केवळ आणि केवळच प्रेक्षकांच्या विवेकबुध्दीला चेतवून सुसंकृत भारतीय नागरीक घडविणे, हेच एकमेव उदिष्ट्य , या  ऐतिहासिक ज्वलंत  नाट्यकलाकृतीचे आहे. 

(१२) मध्यंतर नाही.

होय. एकूण दोन तासांचे हे मनोवेधक मराठी नाटक आहे. एकूण १२० मिनिटांचे हे लोकहितायी संदेशी नाट्य, आजच्या चंगळी भोगी मौजी हौशी अशा आपल्याच उत्सवी समाजाच्या डोळ्यांमध्ये वास्तवाचे जळजळीत अंजन घालते.

(१३)  भारतीय संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्मरण गोधडी मध्ये आपणांस होते. कारण गोधडी मध्ये भारतीय संविधान हेच राष्ट्रीय  संचित आहे

आम्ही भारताचे नागरिक  म्हणजेच आम्ही भारत देशाचे मालक , असा अभिनव क्रांतिकारी संदेश हे नाट्य आपणांस देते. कारण यामध्ये  नागरिकांच्या मूलभूत हक्कांची चळवळ आहे. नितीमूल्यांचे सनदशीर आंदोलन आहे.‌ संविधानिक प्रतिरोधांचे  सांस्कृतिक मंथन  आहे. भारतीय प्रजासत्ताकाचे  चिंतन, मनन, जनजागरण देखिल आढळते. त्या अनुषंगाने गोधडी ही जात, प्रांत, वर्ण , धर्म , भेद यांच्यावर वैचारिक फटकारे मारते. 

(१४) देवाला रिटायर करा.

होय. गोधडीचा मौलिक संदेश हाच आहे, की २१ व्या शतकात डिजिटल इंडिया मध्ये आता तुम्ही देवालाच रिटायर्ड  करा. अर्थातच  तुम्ही काल्पनिक देवांचे अस्तित्वच विसरा. भंपक कर्मकांडाला  तुम्हीच ठोकर मारा. अघोरी अंधश्रध्दांना  तुम्ही कायमची मूठमाती द्या. पारंपारिकी जाचक जोखड तुम्हीच  झुगारून फेका. पर्यायाने तुम्ही विज्ञाननिष्ठ भारतीय व्हा. 

(१५) उत्सव  आणि प्रदूषण !

होय. गोधडी चे आगळे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याच सणांचा आणि उत्सवांचा देखिल विद्रोही पंचनामा गोधडी करते. ज्यायोगे उत्सवाद्वारे होणारे  वेगवेगळे प्रदूषण आपण थोपवू शकतो. पंचमहाभूतांचा आदर करून, पर्यावरणाचा होणारा विनाश आपण निच्छितच  थांबवू शकतो.

(१६) नारी अत्याचारण

गोधडी कलाकृती,  ही भारतीय नारींवर होणारया अत्याचारांवर जळजळीत प्रकाश टाकते. ज्यामध्ये  बालिका व स्त्रियांचे लैंगिक शोषण, बलात्कार, नारीहत्या, नारीभेद, घरगुती हिंसाचार, पुरूषी वर्चस्व ही भारतीयांची भयंकर कारनामे गोधडी उघड करते.  

(१७) मराठी भाषा, मराठी संस्कृतीची जपणूक

उल्लेखनीय म्हणजे मराठी भाषिक गोधडी ही जाणिवपूर्वक मराठी भाषेचा आदर करते. वेगवेगळे वाकप्रचार, म्हणी, शब्दप्रयोग यांच्याद्वारे मराठी संस्क‌ती अधोरेखित करते. अभिजात मराठी भाषेचे शब्दभांडार उधळते. बैलपोळा,  दिवाळी अशा सणांतून अस्सल महारठी मातीचा  शाब्दिक सुंगध प्रेक्षकांपर्यत दरवळते.

(१८) गीते लोकगिते आणि सामूहिक गायन.

होय.  गोधडीमध्ये कोणतेही पार्श्वसंगीत नाही. व्यावसायिक नाट्यसंगीत सुध्दा नाही. येथे केवळ पारंपारिक गीते आहेत. ठसकेबाज गावरानी लोकगीते आहेत. जी प्रत्यक्ष  रंगकर्मीच  वेगवेगळ्या प्रकारे गातात. परिणामी महाराष्ट्री लोकगीतांचा ऐतिहासिक माहोल निर्माण होतो.

(१९) नेपथ्य नाही.

होय. विद्रोही गोधडी करीता

कोणतेही नेपथ्य नाही. केवळ  काळ्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर सानथोर रंगकर्मीची ही  रंगीबेरंगी कलाकृती आहे. जी झगमगाट नसूनही  प्रेक्षकांना अस्वस्थ करते. नेपथ्यविना गोधडी हे देखिल सिध्द करते, की रंगकर्म हे फक्त एक माध्यम नव्हे, तर मानवतेची विलोभनीय सृजक दृष्टी होय.

(२०) संगीत नाही.

होय. येथे कोणत्याही व्यावसायिक संगीत  साधनांचा वापर नाही.

केवळ खंजिरी,  घुंगरूकाठी, लहान ढोलक   व काठ्या यांचाच कल्पकतेने उत्कृष्ट वापर आहे.  जे भारतीय मातीतील पारंपारिक संगीत  होय. प्रसंगानुरूप  या  पुरातन संगीती वाद्यांचा ठसकेबाज  वापर होतो. तात्पर्य, भावस्पर्शी तालवादन  आणि मधूर लयथापा म्हणजेच गोधडी  होय.

(२१) टिकिट देणगीमूल्य ३०० रूपये.

नाटकाचे तिकिट प्रत्येकी ३०० रूपये आहे. नवलपूर्ण म्हणजे यावर आसनक्रमांक नाही. प्रेक्षक आपल्या आवडीनुसार कोठेही आसनस्थ होऊ शकतात.

(२२) जाहिरात नाही.

गोधडी  हे तद्दन व्यावसायिक नाटक नाही. निर्भेळ विवेकी कलाकृती आहे. परिणामी याची व्यावसायिक स्तरावर जाहिरात होत नाही. केवळ सोशल मिडियाद्वारे  डिजिटल जाहिरात होते. रंगकर्मी आणि हितचिंतक  हे, सुजाण  प्रेक्षकांशी  संवाद साधून ,  प्रत्यक्ष तिकिटविक्री करतात.

(२३) संवाद! संवाद! संवाद!

गोधडी हे गल्लाभरू नाटक नाही. म्हणून प्रयोगापूर्वीच लेखक  दिग्दर्शक मंजुल भारद्वाज हे चक्क प्रेक्षकांशी संवाद साधतात. आपले सृजनशील विचार प्रेक्षकांसमोरच मांडतात. परिणामी प्रेक्षक आणि नाटक यामधील परकेपणा नाहीसा  होतो. भावभावनांची अदृश्य नाळ जोडली जाते

(२४) २०० दर्दी महाराष्ट्री प्रेक्षक

 शनिवार सकाळची वेळ असूनही सुमारे २०० पेक्षा अधिक संख्येने, मुंबईतील  मराठी स्त्री पुरूष प्रेक्षक आवर्जून उपस्थित होते. जे नि:संशय विवेकी भारतीय नागरिक होते. ज्यांना सामाजिक भानाची आंतरिक जाणिव देखिल  होती. 

(२५) संवाद आणि मनोगत.

 नाटक संपल्यानंतर, सर्व रंगकर्मी मंचाखाली प्रेक्षकासमोर येतात. मंजुल भारद्वाज सर पुन्हा प्रेक्षकांशी संवाद साधतात. नंतर काही प्रेक्षक आपले ह्रदयस्थ मनोगत व्यक्त करतात. जी समस्त विवेकी भारतीयांची प्रतिनिधिक बोचणी असते. समाजातील अनिष्ट रूढी परंपराविषयी ती सुस्पष्ट मौलिक  टोचणी असते.

(२६) संविधानी गोधडी आणि भीमराव आंबेडकर  यांची उपस्थिती

अदभूत नवल घडले. शनिवार च्या प्रयोगास राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचे प्रपुत्र आदरणीय भीमराव आंबेडकर,  हे आवर्जून उपस्थित होते. 

गोधडीचा संविधानी महिमा पहा. ज्या भारतीय संविधानावर आधारीत गोधडी हे विद्रोही नाटक रचले. त्याच नाटकाला संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सन्माननीय भीमराव आंबेडकर उपस्थित राहीले. नाटकानंतर कलासक्त भीमराव आंबेडकर साहेबांनी नाटक आयोजकांना आणि सर्व रंगकर्मींना   संविधानी  मार्गदर्शन करून , हार्दिक सदिच्छा दिल्या. तेव्हा  नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट घुमला.

(२७) फोटोसेशन चा अनमोल सांस्कृतिक ठेवा

होय.  नाट्य प्रयोगानंतर ऊपस्थित सर्व प्रेक्षकांना, रंगकर्मी सोबत फोटो  काढण्याचे मेत्ता आवाहन झाले.  फलस्वरूपी समस्त प्रेक्षकांनी मंचावर जाउन, रंगकर्मी सोबत मोबाईलने मनसोक्त फोटो काढले. जो प्रेक्षकांचा आणि गोधडीच्या भावविश्वांचा अनमोल ठेवा झाला. 

(२८) गोधडी च्या प्रयोगाचे आगळे धम्मनवल!

 होय. भारतीय बौध्द महासभेचे ट्रस्टी  राष्ट्रीय  कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय भीमराव आंबेडकर यांची उपस्थिती आणि भारतीय बौध्द महासभेचा बौध्दाचार्य म्हणून माझी उपस्थिती होय. आम्हा दोघांनाही एकमेकांना पाहून भेटून असिम धम्मानंद झाला. मी वंदनीय भीमराव आंबेडकर साहेबांना आदरपूर्वक नमोबुध्दाय जयभीम केले. 

प्रज्ञा शील करुणा समता ममता मैत्री अधिष्ठानी अशा महामंगल विज्ञाननिष्ठ बौध्दधम्माच्या  दोघांही जेष्ठ धम्मउपासकांची उपस्थिती आणि प्रज्ञा शिल करुणा समता मैत्री समतेचा संदेश देणारी गोधडी ! असा आगळाच  धम्मयोग गोधडी नाटकाद्वारे  घडला.

(२९)  माझ्या प्रियतम आईची, आठवणीची  गोधडी.

होय.  गोधडी नाटकाने माझ्या कालकथित  आईची स्मृती जागविली. माझी प्रेमळ आई सुभद्रा चांगदेव कासारे  ही उत्तमप्रकारे रंगीबेरंगी गोधड्या शिवत होती. मी १० वीची परिक्षा उत्तीर्ण झालो, म्हणून फक्त माझ्यासाठीच एक वेगळी गोधडी आईने शिवली.

 उतारवयात , निर्वाणापूर्वी, मी दिलेल्या सफेद लुगड्याची तिने शेजारणीकडून गोधडी शिवून, मलाच भेट दिली. म्हणाली, नंदू माझी आठवण म्हणून जपून ठेव. 

हेच मनोगत , मी संवाद म्हणून, नाट्यगृहात व्यक्त केले, तेव्हा माझ्या प्रियतम मातासिरीच्या आठवणीने नकळत डोळे पाणावले.

(३०) माझ्या आयुष्यातील सत्कर्मी सोनेरी दिवस!

होय. शनिवार १९ नोव्हेंबर २०२२ हा माझ्या आयुष्यातील स्वर्णिम दिवस होय.  कारण गोधडी नाटकाने  माझी विवेकबुध्दी तीक्ष्ण केली.  माझ्या सदसदबुध्दीला  विवेकाची तेज धार चढविली. माझे  सामाजिक भान ऊच्चतम पातळीवर नेले. एक सुसंस्कृत भारतीय नागरिक म्हणून, मला  विचारप्रवृत्त केले.  नि:संशय , गोधडी नाटकाने मला एक विलक्षण अनूभूती दिली, जिचे वर्णन करण्यास मराठी शब्दकोश अपूरा पडेल.

(३१)  पुरोगामी मुंबई! विद्रोही मुंबई!

होय. भारतखंडातील एकमेव  पुरोगामी महानगर म्हणजे अर्थातच मुंबई महाशहर होय. येथे जगातील १२ प्रमुख धर्मांचे लाखो देशी विदेशी  नागरिक बंधूभावनेने राहतात. मुंबई च्या पुरोगामीपणाचे ३००० वर्षे प्राचिन ऐतिहासिक संदर्भ  उपलब्ध आहेत.

 गोधडी  या विद्रोही नाटकास उपस्थित लहानथोर शेकडो सुजाण प्रेक्षकांनी  सिध्द केले की, आधूनिक प्रबोधिनी, कर्मकांड ठोकरी, विज्ञान पालिनी, संविधानी सुविचारी,  ज्वलंत विचारीनी अशी भारतखंडातील केवळ मुंबई महानगरीच होय. 

......- नागवंशी नंदकुमार कासारे   Nagvanshi Nandkumar Kasare


  • थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत
  • नाटक : गोधडी (मराठी नाटक)  
  • लेखन आणि दिग्दर्शन : मंजुल भारद्वाज
  • कलाकार : अश्विनी नांदेडकर,सायली पावसकर, कोमल खामकर, प्रियंका कांबळे, तुषार म्हस्के,संध्या बाविस्कर, तनिष्का लोंढे, प्रांजल गुडीले,आरोही बाविस्कर , श्रेया,प्रीति शिंदे नृपाली जोशी आणि अन्य कलाकार !   संपर्क-  96536 91401 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com