Top Post Ad

स्वातंत्र्यता, समता आणि बंधुता शिकवणारा काव्यसंग्रह *प्रेम उठाव*

 


         कवी नवनाथ रणखांबे यांच्या या आधी प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहा विषयी थोडक्यात जाणून घेऊया. कवी नवनाथ रणखांबे यांचा  26 नोव्हेंबर, 2018 मध्ये  'जीवन संघर्ष' हा पहिला  काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. या काव्यसंग्रहावर मी, शाम बैसाणे, पुस्तक परीक्षण देखील लिहिले होते. त्यानंतर 'जीवन संघर्ष' या काव्यसंग्रहावर समीक्षा, पुस्तक परीक्षण, अभिप्राय यांचा जनू पाऊसच पडू लागला आणि बघता बघता या काव्यसंग्रहाने 231 वेळा पुस्तक परीक्षण, अभिप्राय आणि समीक्षा 72 दैनिकात, 45 साप्ताहिकात,  4 मासिकात , 49 वेबसाईटवर , 2 पाक्षिकात, 10 पुस्तकात  , 4 वर्तमानपत्रात  आदी.  विविध  मान्यवरांनी लिहिलेल्या  अनेक वर्तमानपत्रात अनेक वेळा प्रसिद्ध झाल्या आहेत.  

समीक्षा आणि पुस्तक परीक्षण याद्वारे थोर विचारवंत कवी लेखक यांच्या विचारांचा पूर आला की काय असे वाटू लागले होते. काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर गरुड झेपचे चित्र आहे. ज्या प्रकारे मुखपृष्ठावरील गरुड झेपेचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 'जीवन  संघर्ष'  या काव्यसंग्रहाने उंच गगन भरारी घेतली. काही कालावधीतच 'जीवन संघर्ष' या काव्यसंग्रहाची इंडिया टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड - राष्ट्रीय ऐतिहासिक विक्रम ( सन्मान नवी दिल्ली) , रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड - राष्ट्रीय ऐतिहासिक विक्रम, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड - राष्ट्रीय ऐतिहासिक विक्रम, ओएमजी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड - ऐतिहासिक राष्ट्रीय विक्रम ( सन्मान कल्याण), इ. विक्रमाची नोंद झाली. मराठी साहित्यात एक नवा विश्वविक्रम निर्माण झाला. पुस्तकावर प्रसिद्ध झालेल्या  परीक्षणांच्या या ऐतिहासिक रेकॉर्डची नोंद घेऊन वर्ल्ड ह्युमन राईड पीपल्स  कौन्सिल  कडून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2019 ( मुंबई ) येथे नवनाथ रणखांबे यांना प्रदान केला. 

अनेक पुरस्कार जीवन संघर्ष पुस्तकाला मिळाले. त्याच बरोबर राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार 2019 ( नवी दिल्ली) , राष्ट्रीय साहित्य रत्न पुरस्कार 2019 ( शिर्डी) , जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार 2022 (नागपूर) , राज्यस्तरीय सामाजिक कार्य पुरस्कार 2019 ( मुंबई),   राज्यस्तरीय बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2019 ( डोंबिवली), राज्यस्तरीय विद्रोही पुरस्कार  2022  ( कल्याण) आदी .  मानाच्या पुरस्काराने ते सन्मानित आहेत. डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड 2019 - राष्ट्रीय विक्रमात त्यांचा समावेश आहे. नवनाथ रणखांबे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय व विविध पुरस्काराने सन्मानित असून   विविध बुक ऑफ रेकॉर्ड धारक आहेत. 'जीवन संघर्ष'  या काव्यसंग्रहाने अशी गरुड झेप घेतली की 'जीवन संघर्ष'  हा काव्यसंग्रह साता समुद्रा पार जाऊन पोहोचला.

साहित्य क्षेत्रात 'जीवन संघर्ष'  या काव्यसंग्रहाने ऐतिहासिक  विश्व  विक्रम केला. मराठी साहित्यात या पुस्तकाने प्रसार माध्यमात आघाडी घेतली.  कवी नवनाथ रणखाबे यांना याच काव्यसंग्रहाने संघर्षकार ही नवी ओळख दिली.  आता कवी नवनाथ रणखांबे यांना साहित्यक्षेत्रात 'संघर्षकार' या नावाने   ओळखू लागले आहेत. कवी नवनाथ रणखांबे यांचे खूप खूप अभिनंदन!    

          झुंजार असे व्यक्तिमत्व असलेला   " फुले शाहू आंबेडकर ", चळवळीतला हा मोरख्या कवी  इथेच न थांबता कधी सुख- दुःखाची तर कधी गरीबीची झळ सोसत पुढे चालत राहीला. कारण कवीला हे माहित आहे थांबला तो संपला . म्हणून कवीच्या जीवनातील संघर्ष आजूनच तीव्र होत गेला. कवीला कविता लिहिण्याचा वाचण्याचा छंद होताच पण ह्याच संघर्षातून कवी पुढे  कविता, गजल, चारोळ्या, लेख, व्याख्याने अशा अनेक साहित्याद्वारे समाज प्रबोधन करत आहे.  कवी ईतभर पोटा करता आणि शिक्षणाकरता गावातून शहराकडे मुंबईत आला आणि इथेच आई-वडिलांच्या प्रेमा करता पारखा झाला.  हाच दुरावा कवीच्या हातातल्या लेखणीने भरून काढला. कवी आपल्या हृदयातील शब्दसुमनांन सोबत लेखणीवर एवढे प्रेम करू लागला की याच प्रेमातून कवीने 14 एप्रिल , 2022 मध्ये  'प्रेम उठाव'  हा  दुसरा काव्यसंग्रह वाचकांसमोर सादर केला आहे. 

             प्रेम हे पावसातल्या थेंबाप्रमाणे असतं. जमिनीवर पडलेला पावसाचा थेंब जसा जमिनीत खोल दूरवर कूठे तरी जाऊन रुजत असतो. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यातलं प्रेम हे देखिल मानवाच्या काळजातल्या खोलीत जाऊन रुजत असतं. मग ते आई-वडिलांचे प्रेम असो, बंधुप्रेम असो,  मैत्री प्रेम असो,  प्रेयसी प्रियकराचे प्रेम असो,  आपल्या आयुष्यभराची जोडीदार पती पत्नीच प्रेम असो,  साहित्य प्रेम असो, काव्य प्रेम असो, खेळ मौज मजा प्रेम  करणे असो आदी. प्रत्येकाच्या तारुण्यात कुणीतरी खास असतं. कुठल्या न कुठल्या प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम होत असतं.  हे आंधळ प्रेम कुणाला ही दिसत नसतं ते फक्त अनुभवायच असत. कवीला हेच चारोळीतून सुचवायचं आहे . म्हणून कवी जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे  'प्रेम उठाव'  या काव्यसंग्रहातील पहिल्याच चार ओळीत लिहीतात की,--- 

प्रत्येकाच्या आयुष्यात      प्रेम होत असतं
प्रत्येकाच्या तारुण्यात       कोणीतरी खास असतं

मित्र हो!  जीवनात आपल्या सोबत जेव्हा आपलेच दुःखात आपली साथ सोडतात तेव्हा दुःखाच्या यातना सहन करतांना आसवेच आपली साथ देत असतात. हेच सत्य आहे.  जे आपली साथ सोडतात, जे आपले मन तोडतात, तेच नेमके आपल्या हृदयात राहतात. म्हणूनच कवी आपल्या गजलेत लिहितात, -----

 'गझल राहिली हृदयात'
" यातनांनी घेरलेली बात होती 
रोज आता आसवांची रात होती "

प्रेमाची परिभाषा शिकवून माणुसकीची भाषा बोलणार हा कवी आहे.  मराठी साहित्य विश्वातील हा नव्या पिढीचा दमदार आणि आश्वासक कवी असून मानवता आणि समानतेवर प्रेम करणाऱ्या  या कवीच्या मनात खूप आक्रोष आहे. असमानते विषयी मनात राग द्वेष आहे .  कवीला खूप काही लिहायचं होतं. पण सर्वच हृदयातील अंतरंगी शब्दांचा खेळ कवींना कवितेत मांडण शक्य नसावे. स्वतःचे आत्मपरीक्षण करून कवीने आपल्या मनातील भावना अनेक दर्जेदार चारोळ्यानी आणि कवितेने  साकारण्याचा  प्रयत्न केला आहे याची जाणीव होते. कवी नवनाथ रणखांबे आपल्या लेखनीतून लिहितात......

हृदयाने माझ्या      खूपच साठवले  
लेखणीला मात्र     थोडेच आठवले

हळुवार पणे भावना  आपल्या आशयघन शैलीत    प्रगल्भ , प्रतिभावंत आणि  प्रज्ञावंत   असणारे कवी    नवनाथ रणखांबे आपल्या कवितेत मांडत असतात . वाचकात समदु:खी होऊन  हृदयाचा ठाव हा कवी घेतो. ताकतीने आणि खुबीने  कमीत कमी शब्दांत खूप काही नजाकतेने  'प्रेम उठाव ' मध्ये लिहून जातो.

 कवी मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील दोन ओळी मला आठवल्या, ----
            प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं 
           तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं 

 आणि हे जरी खर असल तरी प्रेम हे क्षणभंगुर असत. कारण प्रेमाचं पारड नेहमी हेलकावेच घेत असतं. जीवन संघर्षकार कवी नवनाथ रणखांबे हे आपल्या दुसऱ्या काव्यसंग्रहाला 'प्रेम उठाव'   हे नाव देतांना अस्वस्थ होऊन 'अस्वस्थ'  या कवीतेत कवी  लिहितात, -----

असेन मी नसेल मी, कवितेने मी, 
हृदयात तुमच्या वसेन मी ! 

जे शब्दांनी नाही  डोळ्यांनी वाचता येत  ते प्रेम असत!  

जो दूर राहूनही मनातून दूर जात नाही ते प्रेम असत! ज्याला पुन्हा पुन्हा पहावस वाटत ते प्रेम असत!  ज्याचा प्रत्येक शब्द ह्रदयाला स्पर्शून जातो ते प्रेम असत! जो स्वप्नात येत नाही पण नेहमी विचारात असतो ते प्रेम असत... त्याच प्रमाणे जीवनसंघर्षकार कवी नवनाथ रणखांबे 

यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रेम केलं. "फुले  शाहू आंबेडकर ",  डोक्यावर नाही तर डोक्यात उतरवले आहेत .शिक्षणावीना पोरका होता समाज सारा लेखणीने जणू आमच्याकडे पाठ फिरवली होती अशा पोरक्या समाजाला शिक्षणाचा अधिकार ज्ञानसूर्य प्रज्ञासूर्य  डॉ.  बाबासाहेब आंबेकरांनी दिला होता. अशा या पोरक्या समाजावर मायेचं छत्र बाबासाहेबानीच धरलं होतं. त्यांच्यामुळेच आज आपल्या जगण्यास शान आहे हे कवींनी अभ्यासले  आणि अनुभवले देखील आहे. याची आंबेडकरी जनतेला आणि बहुजन समाजाला जाणीव करून देतांना आपल्या 'निळे निशान ' या गजलेतून कवी जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे लिहितात-

पहिला शेर , ---

भीमराव थोर आम्हा सूर्यासमान आहे
त्यांच्यामुळेच आली जगण्यास शान आहे

शेवटचा शेर , ----

ठोकून आज छाती नवनाथ हेच सांगे 
कायम निळेच त्याने धरले निशाण आहे

ज्याप्रमाणे शेतामध्ये बी पेरले नाही तर निर्सग ती सुपीक जमीन गवताने भरून काढतो. हे जेवढे सत्य आहे तेवढेच हे देखील आहे की आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात. जीवनसंघर्षकार कवी नवनाथ रणखांबे यांनी आपल्या डोक्यात फुले शाहू आंबेडकरांच्या सकारात्मक विचारांची पेरणी केली आहे . कवीने फुले शाहू आंबेडकर डोक्यावर घेऊन नाचण्याऐवजी डोक्यात घेतले आहे. कवी महामानवांच्या विचार मार्गावर चालताना  त्यांचे बळ घेऊन आपल्या साहित्यातून , काव्यातून प्रज्ञावंत मळा फुलवून समाज प्रबोधन करत  "भिम बाबा"  या कवितेतून लिहितात, ----

बाबांच बळ  आहे जवळ
विचारांची शाळा,  प्रगतीचा डोळा,  मार्ग सोहळा, फुलला प्रज्ञावंत मळा !

               सामान्य लोकांना आज आपला प्रपंच   कसा चालेल याची चिंता लागलेली आहे. आज कमवावे आणि आजचे आज खावे. उद्याचे उद्या पहावे अशी परिस्थिती आहे. वाढता शिक्षण खर्च आणि वाढती महागाई या मुळे कुटुंबात निर्माण होणाऱ्या अन्न वस्त्र निवाऱ्याची टंचाई सर्वत्र जाणवत आहे.  महागाईच्या आगीत सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे.  राजकारणी मात्र एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करून आपली पोळी भाजून घेत आहेत. तरी देखील अशा परिस्थितीत कवीच्या आईने कवींना शिकविले ;  वकील बनवले ; एवढेच नाही तर कष्ट करून प्रत्येक दुःखाला सामोरं जाऊन खंबीरपणे लढत राहिली. सावकाराकडे गहाण पडलेला आपल्या जमीनीचा तुकडा सोडवला. एक माय दुसऱ्या मायला सावकाराकडून सोडवते. हा भावनिक प्रसंग  जीवनसंघर्षकार कवी नवनाथ रणखांबे आपल्या "आभाळ होताना माय"  या कवितेत लिहितात,-----

तुला मी पाहिलय माय .....आभाळ फाटताना माय
आभाळ फाटताना माय......तुला मी पाहिलय माय 

कवितेच्या मध्यभागी कवी म्हणतात,----
जमीन गहाणीची ....हिंमत  लांडग्यांची 
दांडगाई गेहीच्या परक्यांची .....माती सोडवली मायेची..

कविता ही कवीची सहजा सहजी निर्माण झाली नसून अनुभूतीची गर्भधारणा होऊन कवीच्या  कवितेची निर्मिती झाली आहे. माणसाच्या जीवनात अनेक चड उतार येत असतात. माणसाला जीवनात जगताना  सुख दुःखाला सामोरे जावे लागत. माणूस सुख आनंदाने स्विकारतो आणि दुःखला मात्र समोरे जावयाला घाबरतो. दुःख समोर यावयाच्या आदीच हार मानतो आणि डोळ्यातून अश्वांचे पाट व्हावू लागतो. असेच काही कवी बरोबर घडले असावे म्हणून कवी आपल्या "थेंब" या कवितेत लिहितात, -----

दुःखाचा समुद्र डोळ्यात दाटल्यावर 
टपटपतात टपोरे थेंब कविता होऊन कागदावर......

प्रेम घेण्या पेक्षा प्रेम देण्यात परम आनंद आहे. प्रेम द्यावे आणि जगाला सुखी आनंदी करावे . हाच हेतू कवीच्या मनात असावा. म्हणून कवी तिच्या वाटेवर येरजाऱ्या घालताना "मन" या कवितेत कवी लिहितो, ------

मन तुझ्यासाठी       माझं दररोज झुरायचं
प्रेमात भेटीसाठी       तुझ्या वाटेवर फिरायचं

मित्र हो ! आज काल देशातील राजकारणी   महामानवांचा अपमान करतात माहामांनवाबद्दल अपशब्द वापरतात. तरी ते प्रत्येक ठिकाणी उपस्थिती लावतात आणि त्यांचा सत्कार केला जातो. अशा लोकांना विरोध करणाऱ्या संविधान रक्षकांना मात्र पोलीस कोठडी.असेच काही चित्र कवीच्या डोळ्यासमोर उभे राहिले असावे म्हणून कवी आपल्या सुजलाम सुफलाम या कविते लिहितात, ---

संविधान तत्त्वे कर्तव्य पाळूया l
भारताचे आदर्श नागरिक बनू चला ll 
संविधानाचे संरक्षण संवर्धन करूया l
देशाला जागतिक महासत्ता बनवू चला ll 

 जगाला महासत्ता बनवण्यासाठी आपण संविधान तत्वे कर्तव्य  पाळायला कवी सांगतो. संविधानाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा सल्ला देऊन भारताचे आदर्श नागरिक बनण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन कवी देतो आहे. देशाला जागतिक महासत्ता बनवायचा विचार  देशात हा प्रेम उठावकार कवी  पेरत आहे.

               कधी कधी जीवनात असा चढ - उतारांचा  क्षण येतो आणि असे काही घडते की आपल्या हृदयाच्या ठोका चुकून जातो व पुढचं आयुष्य जगण्यासाठी एक नवीन धडा देऊन जातो. हे व्यक्त होताना कवी शेवटच्या चार ओळीत 'झोका'  या कवितेत लिहितात, ----- 

जगण्याचा झोका   खाली वर येतो 
जीवनाला माझ्या    धडा देऊन जातो......


 'प्रेम उठाव' जीवन संघर्षकार कवी नवनाथ आनंदा रणखांबे लिखित वाचनीय काव्यसंग्रह आहे. शारदा प्रकाशन ठाणे यांनी तो प्रकाशित केला आहे. या काव्यसंग्रहातील कविता प्रेमाने जग जिंकणाऱ्या प्रेम चळवळीतील कविता आहेत. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ सतीश खोत यांनी रेखाटले असून दोन्ही हात साखळीने जखडून मुठीत लेखणी आहे. हेच वाचकांचे मन आकर्षित करून वाचकाला वाचण्याची आवड निर्माण करते. 'प्रेम उठाव'  हा कविता संग्रह  स्वातंत्र्यता,  समता आणि बंधुता शिकवणारा काव्यसंग्रह आहे.

  • काव्यसंग्रह : - प्रेम उठाव
  • कवी: -  नवनाथ आनंदा रणखांबे
  • प्रकाशन: - शारदा प्रकाशन ठाणे
  • पुष्ट:- ६२
  • मुल्य:- ९०
  • पुस्तक परीक्षण : - शाम परशुराम बैसाणे.पवई, मुंबई .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com