Top Post Ad

हेच खरे सावित्रीमाईंना अभिवादन


 ज्या दिवसापासून शाळेत खरा शिक्षकदिन जोतिबांच्या नावाने तर शिक्षणाची देवता म्हणून सावित्रीमाईंच्या विचारांचे पुजन करून त्याचा प्रचार प्रसार होईल त्यादिवशी सावित्रीमाईंना त्यांच्या जयंतीनिमित्त हेच खरे अभिवादन ठरेल ...!

 ज्ञान नाही विद्या नाही ते घेणेची गोडी नाही, 
बुद्धी असुनि चालत नाही,  तयास मानव म्हणावे का ?’

बहुजन समाजाला शिक्षण घेण्यासाठी शाळेचे दरवाचे बंदच होते. त्यामुळे बहुजन समाज अज्ञानाच्या चिखलात रूतून बसला होता पण त्यावेळी राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीमाई फुले यांनी कर्मठ ब्राम्हणवादी विकृतींना शह देत बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी शाळांची स्थापना केली पण आज त्याच शाळांमधून शिक्षण घेतलेल्यांना विद्येची देवता कोण? असा प्रश्‍न विचारल्यास ते कोणताही सारासार विचार न करता सरस्वती हे उत्तर सांगून मोकळे होतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव येते. कारण जर विद्येची देवता सरस्वतीच असेल तर आजही समाजात एवढे अज्ञानी लोक का? प्रतिमेतील सरस्वतीच्या हातात वीणा दिसतोय तर मग वीणाच्या लहरीतून बाराखडी शिकता येते का? हा साधा प्रश्न तरुणांना पडत का नसेल? त्यामुळे बहुजन समाजातील तरुणांना सांगावे वाटते की, विद्येची खरी देवता सरस्वती नव्हे ती आहे सावित्रीमाई.

‘पशु-पक्षी माकड माणूसही, जन्ममृत्यू सर्वा नाही
याचे ज्ञान जराही नाही,  तयास मानव म्हणावे का?’

सावित्रीमाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील पाटील घराण्यात झाला होता. त्यांच्या आईचे नाव सत्यवती तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. इ.स. १८४० साली सावित्रीमाईंचे लग्न केवळ वयाच्या नवव्या वर्षी झाले तेव्हा जोतिरावांचे वय अवघे तेरा वर्षांचे होते. सावित्रीमाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु फुलांच्या व्यवसायावरून त्यांना ‘फुले’ हे आडनाव पडले.

सावित्रीमाई आणि जोतिराव यांना अपत्य नव्हते. त्यांनी विधवा काशीबाई या महिलेचा यशवंत नावाचा मुलगा आपल्या घरी सांभाळून पुढे सावित्रीमाईंनी जोतिबांशी चर्चा करून यशवंतलाच दत्तकच घेतले. जोतिबांनी दत्तक घेतलेल्या मुलांचे नाव यशवंत होते तर बाबासाहेबांच्या मुलाचेही नाव यशवंत होते हे विचारांचे नाते होते हे समजून घेतले पाहिजे.

महात्मा जोतिबा फुलेंनी मुलींसाठी शाळा काढण्याचा विचार निश्चित केला. त्यामुळे त्यांनी आपली पत्नी सावित्रीमाई यांच्यापासूनच त्याची सुरूवात केली. शेतात झाडाखाली बसून काळ्या मातीत अक्षरे गिरवत सावित्रीमाई शिकू लागल्या. नंतर त्यांनी एका सरकारी शाळेत प्रवेश घेवून पुढचे शिक्षण चालू ठेवले.

१८४८ साली जोतीबांनी पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. पण तेव्हा मुलींना शिकवण्याचे धाडस करायला कोणी शिक्षक पुढे येत नव्हता त्यावेळी सावित्रीमाई शाळेत जावून मुलींना शिकवू लागल्या. महीलांनी शिकणे हे महापाप, आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वजण समजत असल्याने, सावित्रीमाई शाळेत मुलींना शिकवण्यासाठी जाऊ लागल्या की, पुण्यातले काही अतिकर्मठ लोकं त्यांच्यावर दगड, शेण, चिखल फेकीत. तसेच एकदा तर सावित्रीमाई शाळेत जात असतांना चौकातील काही ब्राम्हणवादी गुंडांनी त्यांचा रस्ता अडवून, ‘मुलींना आणि महार - मांगाना शिकवणे तू बंद कर नाहीतर तुझी अब्रू शाबूत राहणार नाही’ अशी धमकी दिली. पण हे ऐकताच सावित्रीमाईंनी त्याला चपराक लगावली होती. 

अशाप्रकारच्या छळाला तोंड देवून सावित्रीमाईंनी मुलींना शिक्षण देण्याचे महान कार्य चालू ठेवले. यातून आजच्या तरुणींनी खुप काही शिकण्यासारखं आहे. सावित्रीमाई व जोतिबांनी नंतर दोन शाळा काढल्या. खरे तर राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुलेंनी ज्या शाळा सुरू केल्या होत्या, त्या शाळेत अस्पृश्यांची मुले लहुजी वस्ताद साळवे हे स्वत: घेऊन येत असत. 

जोतिबा सावित्रीमाईंचे पुणे येथील शैक्षणिक कार्य पाहून १९५२ मध्ये इंग्रज सरकारने फुले पती-पत्नीचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केलं. तसेच फुलेंच्या शाळेत मुक्ता साळवे नावाची मुलगी तिसरीच्या वर्गात शिकत होती. तिने दि. १५ फेब्रुवारी १८५५ रोजी एक निबंध लिहिला तिच्या उत्कृष्ट निबंधाबद्दल मेजर कॅन्डीकडून तिला बक्षिस देण्यात आले होते. 

त्या निबंधात तिने अनेक तर्क लावून प्रश्न निर्माण केले होते पण आज आमचे तरुण एम.ए., एम.कॉम., एम.फिल., पीएचडी, डॉक्टर, वकील होत आहेत पण त्यांना तर्क तर सोडाच पण साधे प्रश्न सुद्धा पडत नाहीत. कारण आज तरुणांना मिळाणारे शिक्षण हे भिडेवाड्यातील नसून सदाशिव पेठेतील आहे. तसेच सावित्रीमाईंच्या विचारातून घडलेल्या फातीमाबी, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, तानुबाई बिरजे यांनी त्याकाळी धार्मिक दहशतवाद, स्त्री शिक्षण बंदी, ब्राम्हणी अत्याचार अशा अनेक संकटातून स्त्रियांच्या गुलामाविरूद्ध लढल्या.

सावित्रीमाई या शिक्षिका, लेखिका, कवियित्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात त्यांनी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं. ‘समाजातलं स्त्रीदास्यत्व मिटविण्यासाठी स्त्रियांनी शिकून सवरुन स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या खर्‍या शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही’, असं ठाम मत त्यांनी स्त्रियांपुढे मांडलं होतं.

१८५४ साली सावित्रीमाईंचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. ‘काव्यफुले’ हे नाव अतिशय समर्पक आहे. या नावात गुंफलेला ‘फुले’ हा शब्द एकाचवेळी दोन गोष्टी स्पष्ट करतो. फुले हे त्याच्या घराण्याचे नाव वडिलोपार्जित फुलांचा व्यवसाय. सावित्रीमाईंचे भावविश्व फुलांनी बहरून गेले. ‘पिवळा चाफा, जाईचे फुल, जाईची कळी, गुलाब फुल’ आदी त्यांच्या कवितांच्या शीर्षकावरून लक्षात येते. त्यांच्या काही कविता या शिक्षकी पेशातून निर्माण झालेल्या आहेत. त्यात ‘स्वागतपार पद्य, बोलकी बाहुली, सादाकि पद्य, श्रेष्ठ धन, शिकणेसाठी जागे व्हा’ या कविता शिक्षणाशी संबंधित आहेत. जोतिबांना नमस्कार, जोतिबांचा बोध व सावित्री- जोतिबा संवाद या कवितेतून त्यांची पार्श्वभूमी व नाट्य अतिशय प्रभावी आहे.                              

‘काळरात्र गेली | अज्ञान पळाले |  सर्वा जागे केले | या सूर्याने |                                                                  
शूद्र या क्षितीजी | जोतिबा हा सूर्य | तेजस्वी अपूर्व उगवला |’

जोतिरावांना ‘ज्ञानसूर्य’मानणारी महान कवयित्री म्हणून सावित्रीमाई अठराव्या शतकातील प्रेरक व प्रेरणादायी कवयित्री होत्या. १८११ साली जोतिरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी जोतिरावांचे एक पद्यमय चरित्र लिहिले आहे. त्याचे नाव ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ हा काव्य चरित्रग्रंथ दस्तुरखुद्द सावित्रीमाईंनीच लिहिला आहे. फुले चरित्राबाबत तो अत्यंत विश्वसनीय दस्तऐवज मानला पाहिजे.

बहुजन समाजातील तरुणांनी महात्मा जोतिबा फुले सावित्रीमाई फुले यांचे खरे साहित्य आणि विचार घरोघर पोहोचवले पाहिजे त्यासाठी शाळेतील शिक्षकांनीही प्रमाणिकपणे प्रयत्न केले पाहीजेत पण आजचे आमचे शिक्षकच मंदिराच्या पायर्‍या झिजवण्यात धन्यता मानतात तर त्यांचे विद्यार्थी नवस फेडण्यासाठी चकरा मारताहेत. कारण शिक्षकांनी कधी जोतिबा-सावित्रीमाईने सोसलेल्या झळा कधी वाचल्यात नाहीत आणि त्या कधी विद्यार्थ्यांना समजून सांगितल्याच नाहीत.

‘दे रे हरी पलंगी काही, पशूही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार नाही, तयास मानव म्हणावे का?’

ज्या दिवसापासून शाळेत खरा शिक्षकदिन जोतिबांच्या नावाने तर शिक्षणाची देवता म्हणून सावित्रीमाईंच्या विचारांचे पुजन करून त्याचा प्रचार प्रसार होईल त्यादिवशी सावित्रीमाईंना त्यांच्या जयंतीनिमित्त हेच खरे अभिवादन ठरेल ...!



  • नवनाथ दत्तात्रय रेपे .... लिखित
  • १. भट बोकड मोठा
  • २. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !  .....ही पुस्तके घरपोच मिळतील
  • संपर्क - रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
  • मो. 9762636662

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com