Top Post Ad

सावित्रीमाई पहिल्या मुख्याध्यापिका !

सावित्रीमाई फुले यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजेच दि.३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे- पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीमाईंची जयंती महिला मुक्ती दिन म्हणूनही साजरी केली जाते. सावित्रीमाईंना महात्मा जोतिरावजी फुलेंनी शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आज सावित्रींच्या लेकी जगात सर्वत्र सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहेत. याची सुरुवात सावित्रीमाईंमुळे झालेली आहे. कारण त्यांनी शिक्षणमंत्रच आपल्या काव्यसंग्रह- काव्यफुलेमधून दिला-

      "विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून।       तिचा साठा जयापाशी, ज्ञानी तो मानती जन॥"

 


    म.जोतिरावजी फुलेंचे मूळ आडनाव गोरे होते. पण पेशव्यांनी त्यांचे वडील गोविंदराव फुले यांना पुण्यातल्या फुलबागेची जमीन बक्षीस दिली. म्हणून त्यांचे कुटुंब पुण्यात आले. त्यांच्या फुलांच्या व्यवसायावरून त्यांचे आडनाव फुले असे पडले. जोतिरावांचा सावित्रीमाईंशी विवाह झाला, तेव्हा त्या अवघ्या ९ वर्षाच्या होत्या. शिक्षणसम्राट जोतिरावजी फुले स्वत: शिकले आणि त्यांनी सावित्रीमाईंना शिकवले. दि.१ मे १८४७ रोजी म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी १०० वर्षांआधी सावित्रीमाईंनी पुण्याच्या मागास वस्तीत एक शाळा काढली. ही त्यांची पहिली शाळा आणि दि.१ जानेवारी १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. दलितांच्या व्यथा-वेदना मांडणारी पहिली कवयित्री म्हणून त्यांना अग्रमान द्यायलाच हवा!

     "इंग्रजी माऊली देई सत्य ज्ञान। शूद्राला जीवन देई प्रेमे॥
      इंग्रजी माऊली शूद्रांना पान्हा पाजी। संगोपन आजी करतसे॥
     इंग्रजी माऊली तोडते पशुत्त्व। देई मनुष्यत्त्व शूद्रलोका।।"    

     ज्ञानज्योती फातिमाबी शेख याही त्यांच्यासोबत शिक्षिका म्हणून कष्ट उपसत होत्या. ही सर्वार्थाने मुलींची पहिली शाळा ठरली. मागास वस्तीतील शाळा काही दिवसात बंद पडली. या शाळेत सावित्रीमाई मुख्याध्यापिका झाल्या. सावित्रीमाईंना कणाकणातून ज्ञान वेचायला शिकवणाऱ्या जोतीबांचा त्यांच्या जीवनपद्धतीवर सर्वात मोठा प्रभाव होता. ते काव्यसुमनातून सांगताना त्यांनी लिहिले-

    "काळरात्र गेली। अज्ञान पळाले॥    सर्वे जागे केले। सूर्याने या॥
    शूद्र या क्षितिजी। जोतीबा हा सूर्य॥    तेजस्वी अपूर्व। उगवला॥"

    सावित्रीमाईंच्या या शाळेत सुरुवातीला फक्त सहा मुली होत्या. वर्षभरात ही संख्या जेमतेम ४५ पर्यंत पोहोचली. शाळा काढून मुलींना शिकवायला सुरुवात केली म्हणून सनातन्यांनी आणि उच्चवर्णीयांनी "धर्म बुडाला. जग बुडणार" अशी फुले दांपत्यावर टीकेची झोड उठवली. सावित्रीमाईंच्या अंगावर शेण, दगड व विटा फेकले. काही उन्मत्त लोक तर त्यांच्या अंगावर धावून गेले. बहिष्कारही घालण्यात आला. तरीही त्या डगमगडल्या नाहीत. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, हे त्यांनी ओळखले. आता त्या अधिक उत्साहाने कामाला लागल्या. सन १८५४ सालीच अस्पृशोद्धारक जोतीरावांना ज्ञानसूर्याची उपमा देऊन सावित्रीमाईंनी त्यांच्या महानतेची प्रचिती दिली-

     "स्वामी जोतीबांच्या लागे मी चरणी!     त्यांची गोड वाणी मनी घुमे!!
     महार मांगाची करते मी सेवा!     आवडीच्या देवा स्मरूनिया!!"

     केवळ मुलींना शिक्षण देऊन भागणार नाही. अपप्रवृत्तीविरुद्ध लढले पाहिजे. बाल-जरठ विवाह प्रथेमध्ये अनेक मुली वयाच्या १२-१३व्या वर्षी विधवा होऊ लागल्या. अशा मुलींना नवऱ्याच्या चितेवर उडी टाकून सती जावे लागे किंवा त्यांचे केशवपन करून त्यांना कुरूप केले जाई. या सर्व दुष्ट प्रथेला त्यांनी कडाडून विरोध केला आणि शिक्षणसम्राट म.फुलेंनी बालहत्या प्रतिबंधकगृह सुरू केले. सावित्रीमाईंनी ते समर्थपणे चालवले. एवढेच नव्हे तर बलात्काराने गरोदर राहिलेल्या महिलांचे बाळंतपण त्या स्वतः करत होत्या. याच ठिकाणी काशीबाई या ब्राम्हण विधवेचे मूल फुले दांपत्यानी दत्तक घेतले आणि त्याचे नाव यशवंत ठेवले. अशा या महान सावित्रीमाईंची काव्य फुले आणि सावित्रीमाईंची भाषणे ही पुस्तके प्रसिद्ध झाली. बहुजनांना अज्ञानाच्या गाढ झोपेतून गदागदा हलवून जागे करताना त्यांनी लिहिले- 

     "बंदी मनुची विद्या घेण्या होती ती उठली।।
    ज्ञानदाते इंग्रज आले विद्या शिकूनी घ्या रे।।
    ऐसी संधी आली नव्हती हजार वर्षे रे।।
   मुलाबाळांना आपण शिकवू आपणही शिकू।।
   विद्या घेऊनी ज्ञान वाढवून नीतीधर्म शिकू।।
   नसानसातून ईर्षा खेळवू विद्या मी घेईन।।
   शूद्रत्वाचा डाग हा माझा निपटून काढीन।।
   राज्यात बळीच्या आम्हास विद्या घडो।।
   यशाची आमच्या दुंदभी नगारे झडो।।
   ‘इडा पिडा टळो’ या कार्यी भट न पडो।।
   असे गर्जूनी विद्या शिकण्या जागे होऊन झटा।।
   परंपरेच्या बेड्या तोडुनी शिकण्यासाठी उठ।।"

काव्यफुलेच्या माध्यमातून रंजल्या-गांजलेल्या दलित-पीडित समाजाला शिक्षणामृत पाजणाऱ्या राष्ट्रपितामह क्रांतीबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे विचारधन हीच आपली संपत्ती नव्हे का?

     प्लेगने बाधीत रुग्णांची सेवा करताना सावित्रीमाईंनाच प्लेगची लागण झाली. दि.१० मार्च १८९७ रोजी त्या निर्मिकांकी कायमच्या निद्रिस्त झाल्या.

  • !! जयंती निमित्त सावित्रीमाईंस व त्यांच्या जनोद्धारक कार्यास विनम्र अभिवादन !!
  • कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.             
  •   मु. पो. ता. जि. गडचिरोली.... मो. नं. ७७७५०४१०८६. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com