Top Post Ad

भारतीय सांस्कृतिक प्रतीकांची निर्मिती


 भारताच्या राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक जीवनातील मुख्य संघर्ष हा ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी आहे हे ऐतिहासिक सत्य आहे. ब्राहणी इतिहासाचे खंदे समर्थक वि.का.राजवाडे यांनीही हे सत्य मान्य केले आहे. या संघर्षात एकोणिसाव्या शतकात क्रांतीबा फुले यांनी व विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अब्राह्मणी छावणीचे यशस्वी नेतृत्व केले. डॉ. आंबेडकरांनी  इतिहासाच्या उदरात गडप झालेल्या महारांच्या पराक्रमी पूर्वजांचा इतिहास नव्याने पुढे आणला. महार जातींच्या प्रेरणादायी पराक्रमाची प्रतीके पुनरुज्जीवित केली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील महत्वाच्या घटना ज्या ठिकाणी घडल्या त्या ठिकाणी संपूर्ण देशभरातून आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने जमू लागले. यातून महाराष्ट्राच्या कोकण,उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्व विभागात नवीन सांस्कृतिक प्रतीके व श्रद्धास्थाने उदयास आली. यात पाणी पिण्याच्या हक्कासाठी जेथे सत्याग्रह करण्यात आला ते महाडचे चवदार तळे, काळाराम मंदिर सत्याग्रहाचे ठिकाण नाशिक, बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा जेथे केली ते नाशिक जिल्ह्यातील येवला शहर,बाबासाहेबांनी मुक्काम केलेले धुळे जिल्ह्यातील लळिंग येथील वनखात्याचे विश्रामगृह,औरंगाबाद येथील नागसेन वन व विद्यापीठ परिसर, नागपूर येथील दीक्षाभूमी, चंद्रपूर येथील दीक्षाभूमी, मुंबईतील चैत्यभूमी अशी नवी सांस्कृतिक तिर्थस्थळे व सांस्कृतिक प्रतीके म्हणून मान्यता पावायला लागली. 

दरवर्षी येथे देश-विदेशातील लाखो आंबेडकरी अनुयायी एकत्र येऊ लागले. या सांस्कृतिक प्रतिकांनी शुद्रातीशुद्रावरील ब्राह्मणी वर्चस्ववादाची, ब्राह्मणी अत्याचारांची पुन्हा-पुन्हा चर्चा घडू लागली. ब्राह्मणी वर्चस्ववादाविरुद्ध लढण्याची प्रेरणा नवीन पिढीकडे हस्तांतरित होऊ लागली. ब्राह्मणी धर्माविरुद्ध बुद्धाने केलेल्या प्रभावी सांस्कृतिक क्रांतीनंतरची ही आंबेडकरवादी सांस्कृतिक क्रांती ब्राह्मणवाद्यांच्या पुढे नव्याने निर्माण झालेले सांस्कृतिक आव्हान आहे. ब्राह्मणवादाच्या सांस्कृतिक वर्चस्वाला आव्हान देणारी, ब्राह्मणवादाच्या विरोधातील एक नवी पर्यायी सांस्कृतिक प्रतीकांची व तीर्थस्थळांची निर्मिती होणे व त्यास भक्कम सामाजिक आश्रय लाभणे ही ब्राह्मणवाद्यांची सर्वात मोठी पोटदुखी आहे.     

  भीमा-कोरेगावचा विजयस्तंभ : ब्राह्मणवादाच्या कपाळावरील भळभळती जखम    -  ब्राह्मणवादाच्या विरोधातील सामाजिक-सांस्कृतिक क्रांतीच्या लढ्यातून नवी आंबेडकरी सांस्कृतिक प्रतीके उदयास आली आहेत. या प्रतीकांपैकी एक प्रेरणादायी प्रतिक म्हणजे कोरेगाव-भीमा येथील पेशवे विरुद्ध इंग्रज यांच्यात १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ इंग्रजांनी उभारलेला विजयस्तंभ होय. डॉ. आंबेडकरांनी १ जानेवारी १९२७ रोजी या विजयस्तंभास स्वतः भेट दिली होती. यानंतर दरवर्षी महार रेजिमेंट मधील कार्यरत तसेच रिटायर्ड सैनिकांनी या विजयस्तंभास मानवंदना देण्याची परंपरा अनेक वर्षे सुरु होती. १९८० नंतर मान्यवर कांशीराम यांच्या नेतृत्वाखालील बामसेफच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी दरवर्षी १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे सायकल मार्चने मोठ्या संख्येने येण्यास सुरुवात केली. 

एवढेच नव्हेतर बामसेफ संचालित The Opressed Indian, बहुजन संघटक तसेच बहुजन नायक या नियतकालिकातून भीमा कोरेगावचे युद्ध, त्यातील महार सैनिकांचा पराक्रम, विजयस्तंभाला बाबासाहेबांनी दिलेली भेट याबाबत मोठ्या प्रमाणात लेखन सुरु केले. यामुळे भीमा कोरेगाव युद्धाचा इतिहास, त्यात महार सैनिकांनी ब्राह्मण पेशव्यांच्या सैन्याच्या विरोधात गाजविलेला चित्तथरारक पराक्रम, महार सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ इंग्रजांनी उभारलेला विजयस्तंभ याविषयी प्रचंड जनजागृती झाली. याचा परिणाम म्हणून बामसेफचे कार्यकर्ते येथे दरवर्षी भेट देण्यास सुरुवात झाली. १९८५ च्या आसपास प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून येथे जाहीर कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली.यामुळे येथे रिपब्लिकन पक्षाच्या अन्य गटांचे, प्रामुख्याने रामदास आठवले गटांचे लोक  कार्यक्रम घेऊ लागले. मात्र तरीही येथे संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने लोक येण्यास सुरुवात झालेली नव्हती. 

बहुजन समाज पार्टीने १ जानेवारी २००१ रोजी भीमा कोरेगाव येथून मान्यवर कांशीराम यांच्या नेतृत्वात ‘ कहीं हम भूल ना जाये ‘ या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात केली. या कार्यक्रमास संपूर्ण देशातून बामसेफ/बसपाचे जवळपास २५ हजार लोक हजर होते. २००१ नंतरया ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड संख्येत आंबेडकरी अनुयायी येऊ लागले. रिपब्लिकन पक्षांच्या व लहान-मोठ्या आंबेडकरी संघटनाच्या सभा व कार्यक्रम येथे मोठ्या प्रमाणात सुरु झाले. येथे येणाऱ्या लाखो लोकांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविता याव्यात यासाठी गावातील बौद्ध-आंबेडकरी रहिवाश्यांनी पुढाकार घेऊन सन २००५ मध्ये ‘ भीमा कोरेगाव रणस्तंभ सेवा संघ’ स्थापन केला. यामार्फत जमणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यात येऊ लागले. भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाच्या जागेवरील बेकायदा अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी भीमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीच्या माध्यमातून कायदेशीर प्रयत्न सुरु झाले. 

महार सैनिकांनी पराक्रम गाजवून ब्राह्मण पेशव्यांच्या सैन्याला पराभूत केल्याच्या दैदिप्यमान इतिहासाची दरवर्षी उजळणी सुरु झाली. यावर ग्रंथ लिहिले जाऊ लागले.डॉक्यूमेंटरी, फिल्म तयार होऊ लागल्या. या सर्व बाबींमुळे भीमा-कोरेगाव विजयस्तंभ म्हणजे सैतानी पेशवाई विरुद्ध स्वातंत्र्यवादी आंग्लाई, शोषक ब्राह्मण विरुद्ध पराक्रमी महार यांचे प्रतिक बनला. हा विजयस्तंभ म्हणजे अश्वत्थाम्याच्या कपाळावरील चिरंतन वेदनादायी भळभळत्या जखमेप्रमाणे ब्राह्मणांच्या कपाळावरील वेदनादायी जखम बनला.यातुनच भीमा-कोरेगावच्या लढाईचा इतिहास खोटा आहे, ही लढाई मराठे विरुद्ध इंग्रज अशी होती, या लढाईत पेशव्यांचा पराभव झालाच नाही, या लढाईत ५०० महार सैनिकांनी पेशव्यांच्या २८ हजार सैनिकांचा पराभव केला ही बाब खोटी आहे, इंग्रजांनी मराठ्यांना अपमानित करण्यासाठी हा स्तंभ उभारला आहे अशा प्रकारची दिशाभूल करणारी मांडणी ब्राह्मण अभ्यासकांकडून व ब्राह्मणवादी कार्यकर्त्यांकडून होऊ लागली. 

सामाजिक माध्यमातून, ब्लॉगवरून, टिव्ही वाहिन्यातून,वर्तमानपत्रात लेख लिहून ब्राह्मण जातीय तथाकथित इतिहास संशोधक व ब्राह्मणवादी इतिहास अभ्यासक भीमा-कोरेगाव लढाईचा व महारांच्या शौर्याचा खोटा, विकृत इतिहास सांगू लागले. भीमा कोरेगाव लढाईचा, त्यातील महार सैनिकांच्या पराक्रमाचा, ब्राह्मणांच्या  महारकृत पराभवाचा इतिहास विकृत करण्याचे ब्राह्मणांचे प्रयत्न असफल झाल्यामुळे ब्राह्मणांनी या प्रकरणाला हिंदू विरुद्ध आंबेडकरवादी, मराठा विरुद्ध बौद्ध असा जातीय रंग देण्याचे प्रयत्न शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तसेच समस्त हिंदू आघाडी व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती या संघटनांच्या माध्यमातून सुरु केले असा संशय घेण्यास बराच वाव आहे. ब्राम्हणवाद्यांच्या या प्रयत्नांना बळ मिळेल अशा प्रकारचे वर्तन काही पुरोगामी म्हणविणाऱ्या संघटना व व्यक्तींकडुन जाणते-अजाणतेपणे करण्यात येत आहेत ही खेदाची बाब आहे 

सुनील खोबरागडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com