गेले काही दिवस बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री चर्चेत आहेत. आता त्यांचा तुकोबारायांविषयी अवमानकारक बोललेला व्हिडीओ व्हायरल होतोय. मुळात बुवाबाजी करणाऱ्या या भोंदू प्रवृत्तीच्या लोकांना तुकोबारायांविषयी बोलण्याचा अधिकारच नाही. कर्मकांडी पूजापाठ करुन जगणाऱ्या घरात या धीरेंद्र शास्त्रींचा जन्म झाला होता. पुढे हा बागेश्वर धामचा धीरेंद्र शास्त्री चमत्कार दाखवून बुवाबाजी करू लागला. त्यानं तुकोबांविषयी त्या व्हिडीओत जे काही सांगितलं आहे ते संताप आणणारं आहे. तुकोबारायांची बायको त्यांना मारहाण करायची म्हणून ते बायकोच्या त्रासाला कंटाळून देवाकडे वळले अशी भयंकर विकृत माहिती त्यानं दिली.
तुकोबारायांच्या काळात दुष्काळ पडला होता. त्यांनी त्या दुष्काळात लोकांची अन्नान दशा झालेली पहिली होती. त्यानिमित्ताने त्यांच्यातली करुणा जागी झाली. ते जीवनाचा नव्याने फेरविचार करू लागले. घरातच वारकरी परंपरा असल्यानं ते पूर्वसूरी वारकरी संतांचे अभंग वाचू लागले. पाठ करू लागले. त्यातून त्यांना जीवनाचं उत्तर गवसलं. विठ्ठलाच्या प्रेमाच्या अनुभूतीतच जीवनाचा खरा आनंद आहे हे त्यांना अनुभवाअंती पटलं. कर्मकांड आणि ब्रह्मज्ञानी पांडित्य या वाटेनं न जाता त्यांनी वारकरी वाट धरली. या धर्माच्या क्षेत्रात आल्यानंतर त्यांना या क्षेत्रातला भ्रष्टाचार दिसला. बुवाबाजी दिसली. तुकोबांनी त्यावर कठोर प्रहार करणं सुरू केलं. लोकांना शहाणं बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यावेळी तुकोबांनी धीरेंद्र शास्त्रीसारख्या प्रवृत्तीच्या महाराजांचा जहाल भाषेत समाचार घेतला. त्यांचा खोटारडेपणा उघडा पाडला.
तुकोबाराय विठ्ठलाच्या प्रेमात पडले ते घरातल्या त्रासाला कंटाळून नव्हे. ते वारकरी बनण्याच्या अगोदर त्यांच्या घरात सगळी भौतिक सुखं त्यांच्या पायाशी लोळण घेत होती. व्यापार, सावकारकी आणि शेती हे तीनही व्यवसाय जोमात चालू होते. व्यवहारदक्ष असलेले तुकोबाराय स्वतःच्या कौशल्याने भरपूर पैसा कमवत असणारच. त्यामुळं त्यांचा लौकिकही होत असणार. अशा पतीविषयी आवलींना आदर आणि प्रेम असणं स्वाभाविक आहे. तोच प्रेम आणि आदर तुकोबाराय परमार्थाच्या मार्गाला लागल्यावरही कायम राहिला. त्यामुळं तुकोबारायांनी आवलींना अभंगातून उच्च स्तरावरचा परमार्थिक उपदेश केला. त्यातून त्यांचा परमार्थिक अधिकार आणि पात्रता स्पष्ट होते.
तुकोबाराय अत्यंत निरपेक्ष वृत्तीचे होते. परोपकारासाठी देह झिजवत होते. लोकांना सन्मार्ग दाखवत होते. त्यासाठी भल्याभल्यांना अंगावर घेत होते. त्यामुळं त्याचा त्रास घरातल्या लोकांना होणं स्वाभाविक आहे. आजही सामाजिक चळवळीत आयुष्य झोकून दिलेल्या कार्यकर्त्यांच्या घरातल्या लोकांना हाच अनुभव येतो. त्यातून अनेकदा चीडचीडही होते. ती तात्पुरती आणि माणसाच्या स्वभावाला धरुन असते. तुकोबांच्या बाबतीतही असं घडलं. पण हरदासी कथेकरी आणि पुढे कीर्तनकारांनीही त्याला अतिरंजित स्वरुप देत काही कथा रचल्या. त्या कथा सर्वथैव चुकीच्या असल्या तरी त्या कथांमधे देखील बागेश्वर बाबा म्हणतो तसा उल्लेख कोठेच नाही.
बागेश्वर बाबाने त्या व्हिडीओत जे काही सांगितलं त्यात सरळ सरळ खोटारडेपणा आहे. त्यात तुकोबांची आणि आवलींची भयंकर बदनामी आहे. त्यातून तुकोबांच्या समग्र कार्याचा अत्यंत चुकीचा, विकृत आणि विपर्यस्त अर्थ निघतो. तुकोबांचे काही अभंग जरी या बाबाने नजरेखालून घातले असते आणि त्यानुसार वागायचं ठरवलं असतं तरी त्याचा उद्धार झाला असता. तुकोबांच्या अशा बदनामीकारक कथा अत्यंत नियोजनपूर्वक पसरवल्या गेल्या आहेत. प्रभातसारख्या सिनेमापासून कथेकऱ्यांपर्यंत सर्वांनी यात योगदान दिलंय. त्यांचा खरा मोठेपणा ज्यात होता त्या कथा मात्र दडपल्या गेल्या.
बागेश्वर बाबानं खरे तुकोबाराय समजून घ्यावेत. त्यानं बुवाबाजीचा धंदा सोडून वारकरी बनावं आणि आपलं आयुष्य आनंदाने जगावं हीच अपेक्षा. बाकी सुषमाताईंच्या वक्तव्यांवर तुटून पडणारे सनातनी वारकरी मुखंड बिळात लपून बसलेत त्यांनी जरा बाहेर यावं आणि अंत्ययात्रा वगैरे राहूद्या पण निषेधाच्या चार ओळी तरी लिहाव्यात.
ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर
------------------------------------------------------
माफ कर तुकोबा...
तुकोबा तुला संप्रदायात यांनी राहूच दिले नाही
खरे तुकोबा वारकऱ्यांना पाहूच दिले नाही
कीर्तनात सांगून ज्यांनी तुला वैकुंठाला नेले
त्यांनी किर्तन सोडून कीर्तनाचे धंदे चालू केले
तुझे नाव चालते यांना पण विचार चालत नाही
तुझ्या बदनामीवर कुठला कीर्तनकार बोलत नाही
वारकरी संप्रदाय यांनी आता धर्माला बांधला आहे
भोळ्या भाविकांचा असाच यांनी खेळ मांडला आहे
तू असता तर हातून यांच्या वीणा खेचला असता
तुझ्या विद्रोहाने बिचारा वारकरी तर वाचला असता
तू असता तर वारकऱ्यांची कमाल झाली असती
तुला बोलण्याची बागेश्र्वराची मजाल झाली नसती
माफ कर तुकोबा भाविक आता लाचार झाले आहे
कारण हजारो मनुवादी कीर्तनकार झाले आहे
- बेधुंदकार गोविंद पोलाड
0 टिप्पण्या