बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्य चांगले रहावे यासाठी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुले ठाणे जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी या पौष्टिक तृणधान्याचे लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी कृषि विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. तसेच ही पौष्टिक तृणधान्ये व त्याचे प्रक्रिया केलेले पदार्थ जनतेला सहजरित्या मिळावेत, यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.
संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. या वर्षात तृणधान्याचे उत्पादन वाढविणे व त्याचा वापर वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी पुढील वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दीपक कुटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, माविमच्या जिल्हा सहायक आयुक्त अस्मिता मोहिते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, उपशिक्षणाधिकारी सी. बी. पराडके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी आदी यावेळी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त सन 2023 मध्ये जिल्ह्यात प्रत्येक महिन्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये तृणधान्य लागवड व त्यावरील प्रक्रियेसंदर्भात कार्यशाळा, वरी व नाचणी पदार्थांची पाककृतीस्पर्धा व प्रशिक्षण, तृणधान्याचा आहारातील वापर, त्याचे महत्त्व यासंबंधी पथनाट्य, रॅली, निबंध/वक्तृत्वस्पर्धा, मिलेट जत्रा, प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास इच्छुकांसाठी प्रशिक्षण, तृणधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपक्रम, शेतकरी मेळावे, पीक प्रात्यक्षिके, शेतीशाळा, खरेदीदार व विक्रेता यांचे संमेलन, खरेदी विक्री केंद्र स्थापन करणे असे विविध उपक्रम या वर्षभरात राबवण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले की, बदलत्या जीवनशैलीत तृणधान्याचा आहारात समावेशासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. विशेषतः मुलांच्या आहारात त्याच्या समावेशासाठी नैसर्गिकरित्या आवाढ निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी पौष्टिक तृणधान्यावर प्रक्रिया करून बनविलेले पदार्थ तसेच तृणधान्य विक्रीसाठी कायमस्वरुपी केंद्र उभारावेत. आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी व वरी या पदार्थांच्या वापरासाठी जनजागृती करावी. यासंबंधीचा आराखडा तयार करावा.
तृणधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषि विभागाने विशेष मोहिम हाती घ्यावी. उन्हाळी हंगामात 15 टक्के व खरीप हंगामात किमान 30 टक्के तरी तृणधान्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजन करावे. यासाठी उत्पादकांना प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढविणे, खत,बी बियाणे पुरविणे आदीचे सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी दिले. जिल्हास्तरीय समितीतील सदस्यांनीही पुढील वर्षी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमासंदर्भात चर्चा करून हे उपक्रम लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले.
0 टिप्पण्या