तर माणसालाही इतर प्राणिमात्रांप्रमाणे बळी पडावे लागेल....


  'वंदे भारत' या वेगवान गाडीने यावेळी बैलाला धडक दिली. पहिल्याच प्रवासात म्हशीच्या कळपाला चिरडले होते. त्यानंतर गायीचा बळी गेला.  प्राणी जिवानिशी जात आहेत, मात्र गाडीचे कसे नुकसान झाले याची छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत .
काझिरंगाच्या अभयारण्यात ट्रकने गेंड्याला मारले. पृथ्वी हे प्राणिमात्रांचे घर आहे. फक्त आधुनिक माणसाच्या घराची कल्पना फ्लॅट आणि बंगल्यापुरती मर्यादित आहे. प्राणिमात्रांना त्यांच्या घरात  चिरडले, छिन्नविछिन्न केले जात आहे. सजीवांच्या मुक्त संचार स्वातंत्र्यावर बंदी घातली. त्यांचे नैसर्गिक पाणवठे, अन्न तोडले. त्यांनी, नेमलेल्या पुलावरून वा भूयारी मार्गातुन पलिकडे जावे अशी हास्यास्पद कल्पना राबवली गेली. गेल्या अडिचशे वर्षांतील यंत्रयुगात वाहतुकीमुळे भूमी, पाणी आणि आकाशात अनंत सजीवांची हत्या झाली. 

महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला आहे. वेधशाळा आॅक्टोबर महिन्यात पडलेल्या पावसाला लांबलेला परतीचा पाऊस म्हणते. तापमानवाढीचा परिणाम म्हणून ऋतुचक्र मोडले आहे, त्यामुळे अवेळी पाऊस पडत आहे, ही गोष्ट लपवली जात आहे. ऋतुचक्र मोडण्याला कार्बनचे सर्वाधिक उत्सर्जन करणारे वाहतुक हे प्रमुख कारण आहे.  महाविस्फोटक तापमानवाढीमुळे सन २०१६ पासुन पृथ्वीवरील पर्यावरणीय विभाग दर वर्षी ३५ मैल या गतीने विषुववृत्तापासुन ध्रुवांकडे सरकू लागले आहेत. ध्रुव प्रदेशांची पर्यावरणीय व्यवस्था कोसळली आहे. बर्फातील लाखो वर्षे गोठलेल्या मिथेन वायूचे उत्सर्जन सुरू झाले आहे. पृथ्वीवर उष्णतेचे वितरण करणारे महासागरातील प्रवाह अनियमित झाले आहेत. लवकरच ते ठप्प होतील. सध्याच  दिवसाला शेकडो व कधी हजारो जीवजाती  कायमच्या लुप्त होत आहेत. लक्षात घ्या, उष्णता वितरण करणारे प्रवाह बंद पडत गेल्यावर, प्रथम उत्तर ध्रुव प्रदेशात व नंतर पृथ्वीवर सर्वत्र जे घडेल ते एखादी कादंबरी वा सिनेमा देखील दाखवू शकणार नाही. आपण, मानवजातीचे उच्चाटन होत असताना, विषुववृत्तावरून चित्ते आणि ध्रुवांवरून पेंग्विन आणून आपले मनोरंजन करत आहोत.

 शंभर कोटी रूपये मोजुन नामिबिया देशातून ८ चित्ते आणले. गेल्या शतकात सन १९४७ पर्यंत देशात सुमारे ४० ००० वाघ होते. सहाव्या दशकात चित्ता नामशेष झाला. मानवी निवासांची वाढ, शिकार,  अधिवासाचा नाश व नगदी पिके ही तेव्हा मुख्य कारणे होती. नंतर देशात औद्योगिकरण व शहरीकरणाची लाट आली. कारखाने, बंदरे, विमानतळ, तेल शुद्धीकरण केंद्रे, वीजनिर्मिती प्रकल्प, खाणी, धरणे इ. मुळे वाघांची संख्या व जैविक विविधता घटत गेली. आता काही शेकडा वाघ उरले आहेत.  औद्योगिकरण व जीडीपीच्या वाढीवर आधारित अर्थव्यवस्था हे घडवत आहे. याला आपण प्रगती व विकास म्हणत आहोत. 

 देशातील जंगल, डोंगर, नद्यांची खोरी व  सागरातील  पाणथळ जमिनींचा घास घेऊन मुंबई, चेन्नई व बंगलोरसारखी शहरे फुगत आहेत. हा विकास, ही प्रगती, सरकार आणि शिक्षित जनता या दोघांना हवी आहे. हा विकास चालू ठेवून आणि त्याची स्फोटक वाढ करून   चित्ताच काय कोणताही प्राणिमात्र शिल्लक राहणार नाही. यापेक्षा महत्वाचे म्हणजे, वन्य प्राणी नामशेष होत आहेत आणि मानवजात मात्र कायम राहणार आहे, अशा भ्रमात हे केले जात आहे. मानव ही देखील धोक्यात आलेलीच नव्हे तर उच्चाटन होत असलेली जीवजात आहे ही गोष्ट जनता आणि राजकारणी या दोघांच्याही गावी नाही. या वास्तवाचे भान, पंतप्रधान मोदींना आणि  आमच्या पक्षाच्या काळात चित्ते आणण्याचा कार्यक्रम ठरला होता, असे म्हणणाऱ्या जयराम रमेशांनाही नाही. 

 मानवी कृत्रिम जगात व व्यवस्थेत अडकल्यामुळे राजकारणी व समाजाकडून  दुर्लक्ष करणे  चालू आहे. कदाचित असे भयंकर काही घडणार नाही, अशी ते स्वतःची समजुत घालत असावे. रस्ते व द्रुतगती महामार्गांमुळे इतके अंतर कमी झाले, इतके तास वाचले म्हणून पाठ थोपटून घेतली जाते. परंतु हे अंतर आणि तास कमी करणे, मानवजात व जीवसृष्टीची किंमत मोजुन केले जात आहे. निसर्गाची लय मोडल्याने आयुष्याचे आकुंचन होत आहे. 

सध्या पृथ्वीच्या सरासरी तापमानात ५ वर्षांत १°से अशी अभूतपूर्व वाढ होत आहे. तीन वर्षांनी म्हणजे सन २०२५ मधे उद्योगपूर्व काळाच्या तुलनेत ३°से ची वाढ होईल. प्रत्येक १°से सरासरी वाढीने उच्चतम उष्णतेच्या लाटेत, तापमानात ५ ते १५°से ची भर पडणार आहे. या चालू वर्षी पाकिस्तान, राजस्थान व युरोपात तापमान ५० ते ६०°से होते, कुवेतमधे ते ६३°से नोंदले गेले. तीन वर्षांनंतर, ३°से सरासरी वाढीमुळे, सर्वाधिक उष्णतेच्या लाटेत ते ६० ते ७०°से असेल. त्यावेळी मात्र, विकासाच्या गुंगीत असलेल्या माणसांना कृत्रिम जगात जगणे शक्य नाही. वातानुकूलन यंत्र वापरणारांनाही इतर प्राणिमात्रांप्रमाणे बळी पडावे लागेल.

 यापुढे, असे घडत राहून दर वर्षी उष्णतेच्या लाटा सर्वत्र सर्वव्यापी होत जातील आणि अवर्षण, अतिवृष्टी, महापूर, वादळे, वणवे, अन्न उत्पादनातील घट, भूस्खलन, सागरपातळीतील वाढीने भूभाग बुडणे,  बर्फाचे वाढते  आच्छादन इ. मुळे मानवजात व इतर जीवसृष्टी फक्त २५ ते ३० वर्षांत पूर्ण नामशेष होईल. जीवन की जीवनशैली, यात निवड करण्याची संधी आपण गेल्या दशकात गमावली आहे. तरीही आपण मायेच्या पगड्यातुन बाहेर पडण्यास तयार नाही. म्हैस, गाय, बैल व गेंडा चिरडले जात असताना, आपण सजीव म्हणून त्यांच्या बाजूने उभे राहायला हवे. परंतु आपण आपल्या नाशाला कारण ठरणाऱ्या स्वयंचलित यंत्राच्या बाजुने उभे आहोत आणि मूक जीवसृष्टीला समस्या मानत आहोत. मात्र निसर्गाच्या न्यायाची चक्की वेगाने फिरत आहे. ते जात्यात आहेत आणि आपण सुपात आहोत असेही आता म्हणता येणार नाही. आपणही जात्यात गेलो आहोत, फक्त आपली वेळ यायची आहे. 


अॅड. गिरीश राऊत.... ९८६९ ०२३ १२७
निमंत्रक- भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1