Top Post Ad

... हा तर संस्कृतीच्या नावाखाली आपला अजेंडा घुसवण्याचा प्रयत्न


भारतामध्ये अलीकडे लहान मुलांसाठी “ग्रेट लिडर्स ” नावाचं एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. त्यामध्ये महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांच्या जोडीला थेट अॅडाॅल्फ हिटलरला दाखवून जगातल्या महान नेत्यांमध्ये त्याची गणना केली गेली आहे. या पुस्तकाबद्दल भारतात काही प्रतिक्रिया उमटण्याआधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेण्यात आली. मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या सिमॉन विसेंथल सेंटर या ज्यू संस्थेने एक पत्रक काढून त्याचा निषेध केला. लाखो निरपराध ज्यूंची कत्तल करणारा नेता महान कसा असू शकतो, असा सवाल त्यांनी केला. भारतात कदाचित त्याविषयी फारसं काही वाटणार नाही कारण सध्या केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजप सरकारमधील आणि आरएसएससाठी हिटलर हा आदर्श आहेच. खरेतर हिटलरच्या नाझीवादातून प्रेरणा घेउनच आरएसएसची स्थापना झाली होती. त्यामुळे हिटलरला कोणी ग्रेट लिडर म्हणत असेल आणि तसं मुलांना शिकवत असेल तर त्यामध्ये भाजप सरकार आणि त्यांच्या समर्थकांना काहीच चुकीचं वाटण्याची शक्यता नाही.

जगाच्या पाठीवर कुठेही अगदी जर्मनीमध्येही हिटलरचं उदात्तीकरण होताना दिसत नाही. भारतात मात्र बहुतेक उजव्या बाजूच्याच पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना हिटलरच्या हुकुमशाहीविषयी खास कौतुक वाटतं आणि ती आपलीशीही वाटते. हिटलरने आर्य वंशाचा, शुद्ध रक्ताचा वगैरे सिद्धांत मांडत ज्यूंची कत्तल केली. त्याचप्रमाणे आर्य वंशाचा सिद्धांत संघाच्या नेत्यांनीही मांडला आहे. इथे त्यांचे लक्ष्य हे मुस्लिम, दलित आणि ख्रिश्चन, कम्युनिस्ट आहेत. कधी गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून त्यांना मारलं जातं तर अनेकदा मुस्लिमांना "राष्ट्रवादा"च्या यांनीच घेतेलेल्या परिक्षांमध्ये नापास झाल्याचं दर्शवून शक्य आहे तिथे खच्चीकरण केलं जातं.

मुळात शाळेत जाणाऱ्या मुलांना हिटलर महान नेता असल्याचं सांगून आपण नक्की कोणते विचार देऊ पाहात आहोत, त्यांना कशाप्रकारचे सुसंस्कृत नागरिक म्हणून आपल्याला त्यांना घडवायचे आहे, याचा साधा विचारही सध्याच्या भक्ताळलेल्या महाभागांना शिवतही नाही. भाजपप्रणित सरकार जेव्हा जेव्हा सत्तेवर येतं तेव्हा प्रत्येकवेळी त्यांचा प्रमुख भर हा प्रचलित अभ्यासक्रम बदलून त्यामध्ये भारतीय संस्कृतीच्या नावाखाली आपला मूळ अजेंडा घुसवण्याचा असतो. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांचे शिक्षण मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी ज्योतिषशास्त्र असा विषयच अभ्यासक्रमाला लावला. तेव्हा ज्योतिष शिकलेली ती मुलं सध्या नक्की काय करतात हे माहीत नाही. खरं त्यांचं भविष्य कसं उज्वलं झालय याबाबत आरएसएसने एखादी जाहिरात करायलाही हरकत नाही. 

शालेय पाठ्यपुस्तकं ही कायम स्वरुपी गोष्टी मनावर बिंबवण्याचं काम करतात. शाळा हे सांस्कृतिक वर्चस्ववाद निर्मितीचं एक महत्त्वाचं केंद्र असल्याचे इटालियन तत्त्ववेत्ता ग्रामश्ची याचं म्हणणं होतं हे या निमित्ताने लक्षात घ्यायला हवं. राजकारण, समाजकारण यांचे विविध पैलू समजून दिले तर ते त्यांना समजू शकतात. मात्र लहान वयात विशेषतः गुरुब्रह्मा वगैरे घोकवून तयार केलेल्या कोऱ्या पाट्यांवर मास्तरांनी सांगितलेलंच ब्रह्मवाक्य असल्याचे मानले जाते. त्यामुळे या कोऱ्या पाट्यांवर वाट्टेल ते लिहिणं सोप्पं असतं. हे ओळखूनच गेल्या ७० वर्षांमध्ये संघाने सरस्वती शिशू मंदिर, विद्या भारती, एकलव्य शाळा सुरू केल्या आहेत. अशा सुमारे १८,००० शाळांच्या माध्यमातून १.८ दशलक्षाहून अधिक मुलं शिकतात. त्यांच्यावर भारतीय संस्कृतीच्या नावाखाली काय संस्कार केले जात असावेत याची कल्पना सध्याचे आरएसएस प्रणित भाजपचे मोदी सरकार आल्यापासून आलीच आहे. पण हे भयानकही आहे कारण केवळ सोयीस्कर तेवढंच शिक्षण देऊन हिंदुत्वाच्या प्रयोगासाठी अशा मुलांचा वापर करून घेणं म्हणजे एका मोठ्या कारस्थानाचा हा भाग आहे.

अशा शैक्षणिक बदलांचे प्रेरणास्थान म्हणजे भाजप आणि आरएसएसकडे असलेले दीनानाथ बत्रांसारखे शिक्षण तज्ज्ञ. त्यांच्या स्वत:च्या शिक्षणाबद्दलची पार्श्वभूमी फारशी ज्ञात नाही. मात्र त्यांचं भारतीय तत्त्वं हे रामायण महाभारताततल्या पुराण कथांनी सुरू होतं. बत्रांसारखे लोक स्वत:ला एवढे मोठे शिक्षण तज्ज्ञ समजतात की, २०१४ मध्ये त्यांनी विंडी डोनिजर या हिंदू धर्माच्या विद्वान प्राध्यापिकेच्या “द हिंदूज, अॅन अाॅल्टरनेट हिस्टरी” या उत्कृष्ट ग्रंथाविरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचा निकाल लागायच्या आधीच प्रकाशकाने घाबरून पुस्तकाच्या सर्व प्रती मागे घेतल्या. खरंतर या पुस्तकामध्ये हिंदू धर्माचं उत्तम विश्लेषण आहे. पण हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या बत्रांसारख्याला मात्र हिंदू धर्माचं खरं स्वरूप कसं मान्यं होईल? या बत्रांनी शिक्षणावर आठ पुस्तकं लिहिली आहेत आणि त्या सगळ्यांना प्रस्तावना ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची (?) आहे. त्या पुस्तकांची सुरुवात सरस्वती वंदनेने होते, हे विशेष!


आता बत्रांनी हिंदू धर्माबद्दल काय काय शोध लावले हे मजेशीर आहेत. त्यांच्या “तेजोमय भारत” या पुस्तकात ते म्हणतात की, स्टेम सेलबद्दल झालेल्या संशोधनावर अमेरिका दावा करू पाहत आहे. पण मूळात हा शोधाचं पेटंट हे कोण्या डाॅ. बाळकृष्ण मातापूरकर यांच्याकडे आहे. त्यांनी महाभारतातून प्रेरणा घेऊन त्यांनी हे संशोधन केलं. गांधारीचा गर्भपात झाला तेव्हा ऋषींनी तो मांसाचा गोळा औषधांमध्ये जपून ठेवला. मग त्याचे १०० भाग करून ते तुपाने भरलेल्या १०० टाक्यांमध्ये दोन वर्षांसाठी ठेवले. त्यातून कौरवांचे जन्म झाला.

ही गोष्ट हसण्यावारी नेण्याची नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण नक्की काय ज्ञान देतोय याबद्दल चिंता करण्याची आहे. एकीकडे विज्ञानामध्ये लागत असलेले शोध नाकारून सगळं आमच्या पुराणात आहे हे सांगून नव्या पिढीला निर्बुद्ध बनवल्याचं काम ही बत्रांसारखी माणसं करत आहेत हा धोका लक्षात घ्यायलाच हवा. असा निर्बुद्ध समाज भविष्यात किती भयानक असेल याची कल्पनाच करवत नाही. लहान मुलं जाऊ देत पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनाही असल्या कथांवर विश्वास आहे, म्हणूनच त्यांनी गणपती हे प्लॅस्टीक सर्जरीचं उदाहरण असल्याचं जाहीर करून टाकलं. विमानांचा शोध हा रामायणामध्येच लागला असून राइट बंधूंनी ती कल्पना अलीकडे राबवली, ताजमहाल हा तेजोमहाल आहे, आर्य हे मूळचे भारतीयच आहेत, कुतुबमिनार हा विष्णूस्तंभ होता, असे हिंदुत्वाला साजेसे अनेक शोध हिंदुत्ववादी लावत असताता. त्यांना हसून टाळण्याएेवजी या गोष्टींचा भंपकपणा व या मागील राजकारण सामान्यांना समजावून सांगायला हवं, वारंवार त्यावर झोड उठवायला हवी आणि सत्य लोकांपर्यंत पोहोचवायला हवं. कारण अशा शिक्षणपद्धतीत मुलं केवळ आज्ञेवर चालतील आणि रोबोंप्रमाणे वागतील.

देशामध्ये जिथे जिथे भाजपचं सरकार आहे त्या प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीने अभ्यासक्रमाचं भारतीयीकरण करण्याच्या नावाखाली चुकीचा इतिहास, चुकीची संस्कृती घुसडण्याचं काम पद्धतशीर सुरू आहे. राजस्थानमधल्या पाठ्यपुस्तकांमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली आणि लहान मुलींचं लैंगिक शोषण केल्यावरून तुरुंगाची हवा खाणारा आसाराम बापू याला “प्रसिद्ध संत” म्हणून म्हटलं आहे. त्याचा उल्लेख मदर तेरेसा, गुरू नानक आणि स्वामी विवेकानंद यांच्या जोडीला करण्यात आला आहे. केरळमध्ये कम्युनिस्ट सत्तेत असले तरी भाजपने लोकांची मनं बदलवण्याचं काम थांबवलेलं नाही. तिथे ओणमच्या दिवशी वामन जयंती असते असं एका शालेय पुस्तकातून भाजपने जाहीर करून टाकलं. त्यावर मोठ्ठा वाद झाला कारण ओणम हा केरळमधला सर्वांत मोठा सण बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा करतात. तेव्हा शेतीचं पिक आलेलं असतं आणि शेतकरी खूष असतात त्यामुळे शेतीला त्यावेळी चालना देणाऱ्या, ब्राह्मणी सत्तेला आव्हान करणाऱ्या बळी राजाच्या स्मरणार्थ हा सण असतो. याला वामन जयंती साजरी करण्यास सांगून भाजपने तिथल्या संस्कृतीलाच आव्हान दिलं. वामनाने बळी राजाला मारल्याचं विष्णु पुराण सांगतं. महाराष्ट्रामध्येही अलीकडेच महात्मा गांधी, नेहरू, ज्योतिबा फुले यांच्यापेक्षा पुस्तकांची संख्या कमी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महानता कथन करणारी पुस्तकं जास्त संख्येने विकत घेऊन शाळांना वाटण्यात आल्याबद्दल वाद निर्माण झाला होता. गुजरातमध्ये तर मोदींना सुपर मॅन बनवून “बाल नरेंद्र” या नावाखाली अनेक चुरस कथा अगदी कॉमिकच्या रुपातही बनवण्यात आल्या आहेत.

ब्रिटिशांनी भारतामध्ये शिक्षणपद्धती आणली ती अर्थात त्यांच्या राज्याकारभारासाठी उपयुक्त असे कारकून बनवण्यासाठी. त्या शिक्षणपद्धतीमध्ये विज्ञानाचं आधुनिक ज्ञान लोकांना अर्थातच मिळालं. त्यांनी इतिहास काहीसा त्यांच्या समजूतीतून लिहिला. पण भारताची माहिती जमवून त्याचं संकलन मात्र अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांनी उत्तम केलं. त्यामध्ये कोणतीही कमी त्यांनी ठेवली नाही. पण आज भाजप आणि संघ परिवार करत असलेलं इतिहास लेखन इतकं सदोष आहे की त्यामुळे दोन पिढ्यांनंतर भारताची संस्कृती ही बहुदा परशुरामापासून सुरू होईल आणि इतिहास हा वि. दा. सावरकर, हेडगेवार यांच्यापासून सुरू होऊन पुढे योगी वगैरे सगळ्यांच्या जाज्वल्य देशप्रेमाच्या कथा धडे म्हणून पाठ कराव्या लागतील.

हिंदू धर्म हा किती महान आहे हे सांगण्यासाठी भारतात त्याची तुलना कायम इस्लामबरोबर केली जाते. इस्लामध्ये एकसाचीपणा आहे, आधुनिक शिक्षणाला वाव नाही वगैरे टीका नेहमी होते. पण बत्रांसारखे लोक हिंदू धर्मालाही सेमिटिक बनविण्याचा प्रयत्न करून त्याच्या मूळ गाभ्यालाच हानी पोहोचविण्याचे काम  करत आहेत. आधुनिक शिक्षणावर फुल्ली मारून भाकडकथा मुलांच्या गळी उतरवू पाहत आहेत. एकदा अशापद्धतीने निर्बुद्ध समाज तयार झाला की, राज्यकर्त्यांचं काम सोपं होतं. त्यामुळे आपल्या भावी पिढीच्या शिक्षणावर सुरू असलेले हे प्रयोग थांबवण्याची गरज आहे. भाजप आणि आरएसएसने आज्ञा पाळणारे रोबो बनवण्याचे कारखाने उघडले आहेत. रोबोंमध्ये मानवता जागवण्याचं काम विवेकवाद्यांना करावं लागणार आहे.

- श्रुति गणपत्ये

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com