Top Post Ad

हीच नव्या सांस्कृतिक क्रांतीची सुरूवात.....


 आंबेडकरांच्या नावाचा, फोटोचा, जयभीम म्हणण्याचा, निळ्या रंगाचा एक भयंकर टॅबू आपल्या मध्यमवर्गीय बहुजन समाजाच्या मनात आहे. तो का आहे हे उघडय. अंनिस मध्ये काम केलेल्या एका नास्तिक इसमाला मला हे समजून सांगावं लागलं होतं की स्टॅटिस्टिक्सचा विचार करता आंबेडकरी समूहात शिक्षण आणि नोकरी याचा प्रसार जास्त वेगाने झालाय. अभिजन आणि उच्चजातीय आधीपासूनचं शिक्षण आणि संपत्तीच्या सोर्सेसच्या जवळ असल्याने त्यांचा उत्कर्ष वेगाने होणं साहजिक आहे. पण तुलना करता आंबेडकरी जातसमूहाकडे संपत्तीचं वाटप वेगाने वाढतंय. पण ही संपत्ती आंबेडकरी समूह स्वतः निर्माण करतोय. म्हणावं त्या अर्थाने त्याला अभिजन आणि तथाकथित उच्चजातवर्गीय समूहांचं बळ मिळत नाही. 

एकटा रविष कुमार जेंव्हा महिन्याचा पगार जर २५ लाख घेत असेल आणि तेवढ्या पैशात आंबेडकरी विचार मांडणारे तीन-चार प्लॅटफॉर्म वर्षभर काम करत असतील तर रिसोर्सेसचं वाटप कसं होतंय हे आपण बघू शकतो. निखिल वागळे आजही चळवळीत ब्राह्मणांना समान स्थान मिळत नाही असे हेत्वारोप करू शकतो पण त्याने किती आंबेडकरी जातसमूहांच्या व्यक्तींना आणि संस्थांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी टोकनिझमच्या पुढं जाऊन प्रयत्न केलेत हे प्रामाणिकपणे सांगावं. आज आंबेडकरांचं नाव चलनी नाणं होतंय कारण फक्त दलित/नवबौध्द/बौद्ध असे स्वतःला आंबेडकरी मानणाऱ्या गटाच्या पुढे इतर समूह पण स्वतःला आंबेडकरवादी/आंबेडकरी म्हणू लागलेत. 

आज इतर दिवशी हिंदुत्वाचा जयघोष करणाऱ्याला सुद्धा आंबेडकरांना प्रणाम केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ना स्वतःला समाजवादी म्हणवणाऱ्याला. हे का होतंय? फक्त दलित किंवा स्वतःची ओळख निक्षून आंबेडकरी सांगणाऱ्या समूहाबरोबर बिचकत, चुकत थोडं विचार करत आणि थोडं धाडस करत माझ्यासारखे आंबेडकरी न म्हणवलेल्या जातसमूहातले लोक सुद्धा स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेण्यासाठी पुढे येताहेत. आंबेडकरवादी म्हणवून घेणं हे आता टॅबू राह्यलं नाहीय. मागेही एकदा म्हणालो त्यानुसार यात सोशल मीडियाचा खूप मोठा हात आहे. सुरुवातीला आपल्याला लोकांनी गटात घ्यावं किंवा निव्वळ एखाद्या गटाचं वैचारिक आकर्षण म्हणून आंबेडकर वाचू लागलेल्या लोकांना सुद्धा आंबेडकर विचारांची व्याप्ती आणि खोली लक्षात येऊ लागलीय. 

समाजाचा विचार करताना आता मार्क्सवादी, कम्युनिस्ट, काँग्रेसी, भाजपेयी, हिंदुत्ववादी यापैकी कुणीही आंबेडकरांना सोडून जाऊ शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी का होईना त्याला आंबेडकरांच्या पाया पडावं लागतचं आणि ते ही कुणी धमकी न देता. याचं कारण आंबेडकरी विचारांची आजही असलेली वैचारिक आणि सामाजिक प्रस्तुतता आहे. हे निव्वळ तोंडदेखलं अभिवादन आता जास्तीजास्त एका गटाकडूनचं होतंय हे आपल्याला समजतंय. परवा राहुल गांधींनी आंबेडकरांच्या पुतळ्याला नमन करून काँग्रेसजनांच्या आंबेडकरांबद्दल शेवटच्या उरल्या-सुरल्या विरोधाला तिलांजली दिली असेल अशी मी अपेक्षा करू शकतो. पण मोदींनी कितीही वेळा आंबेडकरांच्या पाया पडलं तरी भाजपकडून मी तशी अपेक्षा करू शकत नाही. अर्थात भाजपमध्येही आंबेडकरांना आपल्या विचारांच्या केंद्रात ठेवणारे लोक आहेतचं. 

निव्वळ पॉप कल्चरचा विचार करता आंबेडकरांच्या प्रतिमेने इतर सर्व म्हणजे गांधी, मार्क्स, नेहरू यांच्या प्रतिमेला भारतात मागे टाकले आहे. पॉप कल्चर बुद्धाकडून आंबेडकरांच्या प्रतिमेकडे वाहत आला पण त्यांना ही जाण नाही की स्वातंत्र्योत्तर काळात बुद्धाला हिप बनवणारे हे आंबेडकरच होते. पुढे-मागे कल्चरल कॉग्निशन जागं झाल्यावर त्यांनाही आंबेडकरांचं कल्चरल महत्व कळू लागेल. 

दलित पँथर काळामध्ये कविता, साहित्य आणि कलेचा जो विस्फोट झाला तो आंबेडकरांच्या प्रतिमारंजनाच्या पुढे जाऊन कल्चरल विद्रोह होता हे सगळ्यांना कळतंय पण त्यातूनचं एकसुरी असलेल्या एकंदर भारतीय कलाजगताना एक अधिकचं डायमेंशन मिळालं हे कुणी सांगत नाही. आंबेडकरी विचारांमध्ये पण एक सौंदर्यशास्त्र आहे जे अधिक व्यापक आहे ज्यात पंक, रॉक, अल्टरनेट, रॅप कल्चरबरोबर शास्त्रीय, सुगम आणि फोक कल्चरला पॉप्युलर बनवण्याचा मार्ग लपलाय हे कुणी सांगताना दिसत नाही जे आपलं दुर्दैव आहे. गावगाड्याच्या पुढं जाऊन वेशिबाहेरच्या संस्कृतीचं अप्रिशिएशन करायला फुले-आंबेडकर कळावा लागतो थोडाफार हे स्पष्टपणे आजही कुणी बोलत नाही. 

एका बाजूला लोकसाहित्याला हिप बनवताना त्यात हिंदू/सनातनी धर्माची प्रतीकं मिसळून मचूळपणा आणणाऱ्या लेखकांना नाकारण्याची हिम्मत सुद्धा आंबेडकरचं देतात याबद्दल आपल्या बापजाद्यांनी खरतरं जास्त स्पष्ट लिहिलं बोललं पाह्यजे. या सगळ्यांच्या मागे आंबेडकरांनी रूजवलेला विद्रोह आहे. आणि हा विद्रोहचं त्यांना पॉप्युलर बनवतोय. चे, मार्क्स, लेनिन, फ्रेंच क्रांती, मंडेला, मार्टिन ल्युथर किंग वगैरे परदेशी आयकॉन पूर्वी फक्त आंबेडकरांना रिप्लेसमेंट म्हणून मिरवले जायचे, आता रिप्लेसमेंट शोधायची गरज नाही हा कल्चरल कॉन्शसनेस आपल्यात रूजला आहे आणि हीच नव्या सांस्कृतिक क्रांतीची सुरूवात असते!

 Ashish Shinde यांच्या वॉलवरून.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com