कर्मयोगी संत गाडगे महाराज


महाराष्ट्रातील थोर संत, किर्तनकार, समाजसुधारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक, स्वच्छतेचे पुढारक संत गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी. संत गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. त्यांचा जन्म  २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची मोठी शेती होती. त्यांनाही शेतीची आवड होती विशेषतः गुरांची निगराणी करण्यास त्यांना खूप आवडे. १८९२ साली गाडगे महाराजांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारशाला त्यांनी  गावकऱ्यांना गोडधोडाचे जेवण दिले त्याकाळच्या परंपरेल हा छेद होता कारण त्याकाळी कोणत्याही कार्यक्रमात गावकऱ्यांना दारू आणि मटण दिले जात, ही परंपरा त्यांनी मोडून काढली. 

लहानपणापासून अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा, कर्मठ रूढी परंपरा, कर्मकांड यावर त्यांनी कठोर प्रहार केले. १ फेब्रुवारी १९०५ रोजी त्यांनी घरदाराचा त्याग करुन संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन स्वीकारले. अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडला असल्यास  त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता ठेवता ते आपल्या वाटेने निघून जायचे. ते सतत एक खराटे जवळ बाळगत. अंगावर गोधडीवजा फाटके तुटके कपडे आणि एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असत त्यामुळेच लोक त्यांना गाडगेबाबा म्हणत. ते ज्या गावात जात ते गाव खरट्याने स्वछ करीत.

 सार्वजनिक स्वछता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अरिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य वेचले. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरुन त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली त्यासाठी ते गोवोगावी जाऊन कीर्तने केली. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करुन देत. आपल्या कीर्तनातून ते लोकांना चोरी करू नका, ऋण काढून सण साजरे करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका,  व्यसनांच्या आहारी जाऊ नका, नवस करू नका, प्राण्यांची हत्या करू नका, मुक्या पप्राण्यांवर दया करा, जातीभेद, अस्पृश्यता पाळू नका, मुलांना शाळेत पाठवा, आजारी माणसांना भगत, देवरूषी यांच्याकडे न नेता डॉक्टरांकडे न्या, आपले घर- गाव स्वच्छ ठेवा असे उपदेश ते करत. देव दगडात नसून माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवले. 

आपले विचार भोळ्या भाबड्या लोकांना समजण्यासाठी ते वैदर्भीय ग्रामीण बोली भाषेचा उपयोग करीत. लक्षावधी रुपये खर्च करुन त्यांनी नाशिक, आळंदी, देहू, पंढरपूर या धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी धर्मशाळा, गोशाळा, पाठशाळा, घाट, पाणपोया बांधल्या. गोरगरीब जनतेसाठी छोटीमोठी रुग्णालये बांधली, अतिशय गरीब, अनाथ व अपंग मुलांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांचीही त्यांनी सेवा केली. संत गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले संत होते. अंधश्रद्धा आणि कर्मकांडाची त्यांनी सतत टिंगल केली. धर्म आणि विज्ञानाची सांगड घालणारे संत हेच खरे समाजसुधारक होत. अध्यात्माला विज्ञानाच्या परिसावर घासण्याचा हितोपदेश गाडगे महाराजांनी केला. असे हे साधे सरळ व संत परंपरेतील एक महान संत कर्मयोगी संत गाडगे  महाराजांनी २० डिसेंबर १९५६ रोजी विदर्भाच्या भूमीत अखेरचा श्वास घेतला. आज त्यांची ६६  वि  पुण्यतिथी, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 

श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५ 

-----------------


गाडगे महाराज : लोकहो देव तुम्ही पायला का ?
लोक : गप्प .......
गाडगे म. तुम्ही देवाची पूजा करता का ?
लोक : व्हय जी. 
गाडगे महाराज. : देवाला आंघोळ कोण घालते ?
लोक :आम्हीच घालतो जी 
गाडगे महाराज. : त्याले कपडे कोण नेसवते ?
लोक :आम्हीच नेसवतो जी 
गाडगे महाराज : त्याले निवद कोण बनवते, समोर ठेवते ?
लोक :आम्हीच ठेवतो जी 
गाडगे महाराज: निवद ठेवल्यावर काय करता ? 
लोक : कुत्र्याने खाऊ नये म्हणून काडी घेऊन राखतो जी 
गाडगे महाराज. : तुमच्या देवासमोर दिवा कोण लावते ? 
लोक : आम्हीच लावतो जी 
गाडगे महाराज. : बयताडांनो नो जो देव आपली आंघोळ करू शकत नाही, स्वतः कपडे घालू शकत नाही, पुढं ठेवलेला निवद कुत्र खाऊ नये म्हणून राखू शकत नाही, आपल्या देवघरातील दिवा लाऊन उजेड पाडू शकत नाही,.... 
मंग सांगा तो देव तुमच्या जीवनात उजेड कसा पाडेल ?

"बाप हो,देव तिर्थात किंवा मूर्तीत नाही, तो तुमच्या समोर दरिद्री नारायणाच्या रुपाने उभा आहे. त्याची प्रेमाने सेवा करा."

-------------------

संत कोणाला म्हणाव हा प्रश्न आला की लगेच गाडगेबाबांची आठवण होते..!अंगावर चिंध्या पांघरुन विचाराच सोन समाजाला वाटणारे खरे कर्मयोगी संत म्हणजे गाडगेबाबा.बापहो विद्या मोठ धन आहे.जेवनाच ताट मोडा,हातावर भाकर खा,बायकोले लुगड कमी भावाच घ्या मोडक्या घरात राहा पण आपल्या पोराले शाळेत घातल्या बिना राहु नका...!अस चालत बोलत विद्यापिठ पुन्हा होण नाही."जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा..!" या संकल्पनेतील गाडगेबाबा कदाचीत शेवटचे संत आहेत.आता तर नुसते पांखडाचे स्तोम माजले आहे.गाडगेबाबानी अंधश्रद्धा नाकारली आजचे महाराज समाजाला प्रंचड अंधविश्वासु बणवित आहेत,गाडगेबाबानी आयुष्यात कोणाला पाया पडु दिल नाही
आज महाराजा समोरील भक्तांची रांग संपत नाही,गाडगेबाबानी झाडु घेऊन गावच्या गाव स्वच्छ केली आज महाराजाना स्वतःचे पाय धुवायलाही चाकर लागतात,गाडगेबाबानी गावात जाऊन गरीब लोकांची सेवा केली आजचे महाराज व्हीआयपी सोडुन कोणाला भेटत नाही,गाडगेबाबानी उभारलेल्या एकाही वास्तुला स्वतःचे नाव दिले नाही आज महाराजांचे स्वीस बँकेत खाते आहे."रोज मरती कोट्यानुकोटी काय रडु एकासाठी" म्हणत स्वतःच्या मुलाच्या मयतीला न जाता समाजसेवेचे व्रत जगणारे विरक्त गाडगेबाबा अव्दितिय होते.समाजाने माणसात देव शोधणा-या या ख-या संताला आदर्श मानणे अत्यंत गरजेचे आहे.हीच त्याना खरी आदराजंली ठरेल.गाडगेबाबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन....!

अविनाश शेंडे 


संत गाडगे बाबांचा एकुलता एक मुलगा जेंव्हा वारला तरी गाडगे बाबांच्या डोळ्यातुन अश्रुंचा एक थेंब सुद्धा आला नाही यावर ते म्हणतात, "ऐसे किती गेले कोट्याने, का रडु एकासाठी....
पण ६ डिसेंबर १९५६ रोजी जेंव्हा बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले
तेंव्हा गाडगे बाबा सतत १४ दिवस रडत राहीले, आणि १५व्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबर १९५६ रोजी त्यांचेही महापरिनिर्वाण झाले.
आदर्श गुरु शिष्यांची जोडी म्हणजे "गाडगेबाबा आणि बाबासाहेब" या दोन्हीही महापुरुषांना त्रिवार वंदन कोटी कोटी प्रणाम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1