डेबुजी झिंगराजी जानोरकर ते गाडगेबाबा हा प्रवास खरंं तर राजपुत्र सिद्धार्थ ते गौतम बुद्ध या मार्गाने झालेला दिसतो. जगात दु:खं आहे, त्याला कारण आहे आणि त्यावर उपायही आहे. असा practical बुद्धिवादी विचार बाबांनी आपल्याला दिला. व्यसनी वडील आणि नवसादी अंधश्रद्धा यात अडकलेला समाज त्यांनी बालपणीच बघितला. गाव आणि घर सोडून मामांकडे आश्रित म्हणून गुरे राखणारा आणि शेती करणारा डेबु लहानपणापासून आजुबाजूचं निरीक्षण करीत होता. सावकारी कर्जविळख्यात अडकलेल्या आणि खोट्या प्रतिष्ठेचा बळी ठरलेल्या आपल्या मामाचे शेत आणि संसार लहानग्या डेबुजीने सावरले. तिडके सावकाराला कायमचा धडा शिकवला.
तेथुन पुढे डेबुजी सधन आणि समृद्ध जीवन जगू शकला असता. पण गावगाड्यातल्या आपल्या या समाजाच्या दु:खाचे मूळ शोधण्यासाठी डेबुजी अस्वस्थ होत होता. जातीच्या उतरंडीतील गावकुसाबाहेर असलेल्या समाजाप्रती डेबुजीच्या मनात प्रचंड कणव होती. पाटलाच्या वाड्यावर जाऊन, "मले म्हाराले पाणी द्या" असे म्हणत अनेकदा त्यांनी सपाटून मार खाल्ला. भूमिहीन कष्टकरी खालच्या जातीतील माणसंं जनावरासारखं जीवन जगत आहेत. त्यांच्यातलं माणूसपण जागविण्यासाठी बाबांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं. त्यांना उमगलं होतं की आपला हा समाज शिक्षणाअभावी गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा, दु:खं, दारिद्र्य ह्या दुष्टचक्राचा बळी ठरला होता. त्यातच देव आणि अध्यात्माच्या चुकीच्या शिकवणुकीमुळे दगडधोंड्यात देव शोधणारी, नवसायास करणारी ही माणसं माणुसपणापासून आणि खऱ्याखुऱ्या देवत्वापासून दूर गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ठरवलं की लोकांना खराखुरा देव दाखवायचा. तो कुठल्या दगड्धोंड्यात नसून पिचलेल्या हाडामांसाच्या, पोट खपाटीला गेलेल्या त्या उपेक्षित आणि वंचित जनताजनार्दनामध्ये दडलेला आहे. त्यांच्याविषयी बाबांच्या मनात अपार प्रेम आणि करुणा होती. आई जसं आपल्या लेकरांसाठी झिजते, त्याप्रमाणे त्या दुबळ्या आणि गांजलेल्या समाजाचे खरे तर गाडगेबाबा आई बनूनच जगले.
विचार मांडणे आणि विचार जगणे यातील शून्य तफावत म्हणजे गाडगेबाबा. तथाकथित शिकलेल्या लोकांना गाडगेबाबा कळणं ही काळाची गरज आहे. दांभिकतेचा पर्दाफाश करणाऱ्या गाडगेबाबांचे विचार पचवणं वा आचरणात आणणं येऱ्यागबाळ्याचं काम नाही. अंगठेबहाद्दूर गाडगेबाबांनी चिंध्या पांघरून साध्या सुलभ विचारांचं पेरलेलं सोनं पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात म्हणावं तसं उगवलं नाही. शासन दरबारीही स्वच्छता अभियानापलीकडचे अंधश्रद्धेचे कर्दनकाळ व सामाजिक समतेचे पुरस्कर्ते गाडगेबाबा रुजले नाहीत.
गाडगेबाबांनी महाराष्ट्रभर भटकंती केली. समाजातील तळागाळातल्या त्या दिनदुबळ्यांची व्यथा ते कीर्तनातून मांडत राहिले. बाबांचे कीर्तन म्हणजे परंपरेचे पाईक न बनता प्रस्थापितांसारखे नामसंकीर्तन नव्हे, तर प्रबोधनपर अमृतवाणी होती. त्यांच्या अध्यात्माला शब्दबंबाळाचे जडत्व नव्हते तर गरिबांच्या करूण कहाणीचे मर्म ते मांडत असत. बाबा श्रोत्यांशी थेट संवाद साधत असत. सर्वांना समजेल उमजेल अशा सहज सुलभ शैलीत थेट प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात ते ऐकणारांच्या मनात कालवाकालव निर्माण करत असत. निरक्षर बाय बापड्यांना त्यांनी चांगलेच फटकारले. सामाजिक विषमतेचे विश्लेषण करून त्यावर बाबा ‘शिक्षणा’सारखा जालीम उपाय सुचवत असत. रंजल्या गांजल्या दरिद्रीनारायनात त्यांनी तो ‘देव’ शोधला. समाजाच्या दुरावस्थेची नेमकी नाडी त्यांना गवसली होती. अज्ञान अंधश्रद्धा हे सर्व दु:खांचे मूळ असून दैववाद व अनिष्ट कर्मकांडानी उच्छाद मांडलेला त्यांनी पाहिला होता. ‘तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी’ ही तुकोक्ती ते या गरीब जनताजनार्दनाच्या मनात सोदाहरण ठसवीत असत. मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमधील समोरचा काही हजारांचा जनसमुदाय पाहून अतिशय थकलेल्या बाबांनी आपल्या शेवटच्याच ठरलेल्या कीर्तनातून उपस्थितांमध्ये प्राण फुंकला होता.
गाडगेबाबा म्हणजे आपुलकीचा ओलावा, माणुसकीचा निर्मळ झरा होते. माणसाने माणसावर प्रेम करावे, तसेच इतर प्राणीमात्रांवरही प्रेम करावे ही भूतदया त्यांनी मनामनात जागवली. रोजच्या जगण्यातील चपखल उदाहरणे देत श्रोत्यांकडूनच ते उत्तर मिळवीत असत. अनेक संतांनी आणि महापुरुषांनी या मराठी मनांची यथाशक्ती मशागत केली. पण गाडगेबाबांनी आपल्या काळजाचा ठाव घेतला. अज्ञान आणि दैववादाच्या संभ्रमात अडकलेल्यांना आणि मन:शांतीसाठी अनेक मांडवांखालून जाणाऱ्यांना गाडगेबाबा आजही सूर्यप्रकाशाइतका लख्ख जीवनमार्ग दाखवतात. उगीच नाही त्या काळात उच्चविद्याविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गाडगेबाबांना गुरु मानून धर्मासाहित अनेक बाबतीत त्यांचे विचार जाणून घेतले. गाडगेबाबांनी श्वास असेपर्यंत महाराष्ट्रभर असंख्य कीर्तने केली. कीर्तन ज्या ठिकाणी करायचे आहे ती जागा स्वतःच्या हाताने खराटा घेऊन साफसूफ करायचे. स्वच्छता-आरोग्य हे मूलमंत्र तर त्यात होतेच पण त्यातून श्रमसंस्कार त्यांना द्यायचे होते. कीर्तन करणारी, भाषणं करणारी, लेखन करणारी मंडळी हातात झाडू घ्यायला लाजत असत. अशावेळी कीर्तनाची नवी संहिता मांडणारे आणि कीर्तनकाराची सामान्यांशी नाळ जोडणारे जरासे बावळे रूप हे उपस्थितांना आपलेसे करीत असत.
समतेचा, ममतेचा आणि सहिष्णुतेचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायातील ज्ञाना, नामा, तुका, एका यांचे प्रखर विचार जर समस्त कीर्तनकारांनी लोकांसमोर मांडले असते तर कदाचित डॉ. बाबासाहेबांना आपल्या अनुयायांसह धम्माकडे वाटचाल करावी लागली नसती. तिकडे पंढरपुरी खालच्या जातीतील विठ्ठल भक्तांना नैसर्गिक प्रात:विधीसाठीही जागा नव्हती. बाबांनी कधी विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही. पण महाराष्ट्रातील खेडोपाड्यातून येणाऱ्या तथाकथित खालच्या जातीतील लोकांसाठी संत चोखामेळा यांच्या नावाने मोठी धर्मशाळा बांधली. बाबांनी स्वतः अनेक धर्मशाळा बांधल्या. ते स्वतः उत्तम Engineer होते. अंगठेबहादूर असूनही पै न पैचा हिशोब ठेवणारे उत्तम Auditor होते. पंढरपूरची ही धर्मशाळा डॉ. बाबासाहेबांच्या हवाली करताना गाडगेबाबा म्हटले होते, आपली लेक भरल्या घरी पडली की बापाले कसा आनंद होतो, तसा मी आज सुखी झालो. दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणानंतर पंधरा दिवसांतच दि. २० डिसेंबर १९५६ रोजी गाडगेबाबांनीही देह ठेवला.
मराठी रयतेला साक्षर करणाऱ्या कर्मवीर अण्णांनीसुद्धा गाडगेबाबांना प्रेरणास्त्रोत मानले. बाबा एकदा अण्णांना म्हणाले सुद्धा की तुम्ही आधी भेटला असता तर मी धर्मशाळांएवजी शाळा बांधल्या असत्या. रयत शिक्षण संस्थेची अनुदानबंदी उठविण्यासाठी बाबांनी तत्कालीन मुख्यमंत्री मा. बाळासाहेब खेर यांना सुनावले होते की, दऱ्याखोऱ्यातल्या गोरगरिबांच्या पोरासोरांच्या टकुऱ्यातला उजेड का विझवत आहात? कोणासाठी आणि कशासाठी शिफारस करावी याबाबतचे हे एक आदर्श उदाहरण आहे.
केवळ अध्यात्मिकच नव्हे तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी गाडगेबाबा अभ्यासणं आवश्यक आहे. फक्त प्रश्न आहे व्यक्तिगत हित पहायचं की या विरक्त बाबांसारखं त्यागमय अशा सामाजिक आणि राष्ट्रहिताला प्राधान्य द्यायचं? कीर्तन चालू असताना आपला एकुलता एक मुलगा गोविंदाच्या निधनाची बातमी बाबांनी ऐकली. पोटचा पोरगा गेल्याचे कळल्यावर हा ही बाप क्षणभर सुन्न झाला होता पण पुढच्याच क्षणी या प्रतिभाशाली संताने लोकांशी संवाद साधला. ते म्हटले, "राम गेले, कृष्ण गेले, असे गेले कोट्यानुकोटी, रडू काय एकासाठी?" तर असे हे लोकोत्तर गाडगेबाबा.
अलीकडे अनेक संस्थाधिपतींनी आणि मठाधिपतींनी शिक्षण आणि अध्यात्म या उदात्त नावांखाली स्वतःची दुकानं थाटलेली आहेत. गाडगेबाबांनी अनेक घाट, सदावर्ते, गोशाळा, धर्मशाळा बांधल्या. मात्र बाबा म्हणत मला कोणी शिष्य नाही, मी कुणाला गुरु नाही. म्हणजेच ना मठ, ना पीठ, ना मंदिर. उपरोक्त इमारतींचे ट्रस्ट-डीड करून त्या जबाबदार विश्वस्तांच्या हवाली करताना त्यांनी म्हटले की, या संस्थामध्ये खुद्द गाडगेबाबा, त्यांचे वारसवंशीय, नातेगोतेवाले यांचा सुतळीच्या तोड्यावरही कसला काहीएक हक्क नाही, कोणी तसा सांगू लागल्यास त्यास हाकलून द्यावे. सदावर्तातही त्यांना अन्न घेण्याचा हक्क नाही. या कठोर निरीच्छेला नि कमालीच्या नि:स्पृहतेला भारतातच काय पण जगाच्या इतिहासातही जोड सापडणार नाही. गाडगेबाबा अंगीकारणं तसं अवघड आहे. पण ऐहिक आणि सुखलोलुप समाजाला गाडगेबाबांच्या विचारांची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झालेली आहे. माणुसकीकडे, समतेकडे, निर्भयतेकडे वाटचाल करताना गाडगेबाबा आपल्याला दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करतील पण प्रश्न आहे मार्गक्रमण करणाऱ्यांच्या इच्छाशक्तीचा आणि सदहेतूचा..
0 टिप्पण्या