ज्याची जेवढी 'आकलनशक्ति', तेवढंच त्याला कळणार...

 "सत्य आणि वास्तव, याकडे जाणिवपूर्वक डोळेझाक करुन, विशिष्ट विचारसरणीकडे (बहुधा, जातधर्म विद्वेषी व शोषक) पार्किंग-स्लाॅटमधील गाड्यांसारखे आपले 'सुपीक' मेंदू, 'पार्क' करुन ठेवणाऱ्या तथाकथित बुद्धिमंतांचं करायचं काय...???"

अलिकडेच प्रचंड व्हायरल झालेल्या, 'महुआ मोईत्रा', या प. बंगालच्या बाणेदार व धाडसी खासदार महिलेने आपल्या रोखठोक भाषणाने सगळ्या भाजपाई लोकांची बोलतीच बंद करुन, देशातला 'खरा पप्पू' कोण... हे निर्विवाद दाखवून दिलं, तरी "गिरे तो भी, टांग उपर" म्हणणारे तथाकथित 'बुद्धि(की, बुद्धू)जिवी' असतात आणि ते आपल्या पूर्वीच्याच मग्रूर भूमिकेवर ठाम असतातच!

कितीही योग्य-जाज्वल्य प्रमाणं, साक्षीपुरावे, दस्तावेज दिले किंवा दाखवले... अथवा सप्रमाण बिनतोड युक्तिवाद केला; तरी जे, 'शहामृगी' वृत्तीने आपली ठरीव-ठाशीव आणि म्हणूनच ठार चुकीची-अन्यायकारक भूमिका जराही बदलत नाहीत... अशांनाच, आपल्या देशात 'बुद्धीनिष्ठ अथवा बुद्धिवंत' म्हणायचं हो!

"हा आपला भारत देश, 'बुद्धिमान मेंदू' मोठ्याप्रमाणावर 'निर्यात' करणारा, एक मोठा निर्यातदार देश आहे. अलिकडे, आपण गेल्या सातआठ वर्षात 'अब्जाधीश' अतिश्रीमंत लोकं निर्यात करणाराही देश बनलोय, ते वेगळंच. तेव्हा, या देशात बुद्धिमान माणसांची बिलकूल कमतरता नाही. कमतरता मोठी आहे, ती 'चांगली बुद्धी' असणाऱ्यांची!" 

शिवाय, वरील संदर्भात रामायणाचा दाखला देऊन बोलायचं तर, या देशात "वाल्याचा वाल्मिकी होण्याची प्रक्रिया केव्हाचीच खुंटलीय... वाल्मिकीचा 'वाल्या' होण्याची प्रक्रिया मात्र, जोमात सुरु आहे."

माझ्या 'मोदीभक्त' (खरं म्हणजे, 'अंधभक्त') असलेल्या अमेरिकेतल्या पूर्वाश्रमींच्या भारतीय मित्राने (जो, 'आयआयटी इंजिनिअर' असून तिथे अमेरिकेत खोर्‍याने पैसा ओढतोय, म्हणून स्वयंघोषित 'सर्वज्ञ' बनलाय) जेव्हा, मी महुआ मोईत्रा, या बंगालच्या वाघिणीच्या संसदेतल्या भाषणाचा (सध्या महाराष्ट्रात "या काळ्या टोपीखाली दडलंय काय", असा प्रश्न विचारत, 'सुषमा अंधारे' नावाची वाघिण, असाच धुमाकूळ घालतेय... त्यामुळेच, महाराष्ट्रातील 'भक्तगणां'ची आणि 'काळ्या टोपी'खाली दडलेल्या 'मिंधेगटा'ची सळो की पळो झालीय) व्हिडीओ पाठवला; तेव्हा, त्याने "Perfect for Rahul Gandhi...." अशी अत्यंत तिरसट, एकसुरी व हिणकस ठरीव प्रतिक्रिया पाठवताच... एरव्ही, डेल कार्नेजीच्या "To win a debate, is to never enter it", या तत्त्वाचाच वापर करणारा मी. पण, यावेळी रहावलं नाही; म्हणून, मी ही तेवढीच, स्वतःला अतिबुद्धिमान म्हणून 'अतिशहाणे' समजणार्‍या मित्राच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी, अगदी मोजक्या शब्दांचीच कडवट प्रतिक्रिया पाठवली, ती खालीलप्रमाणे......

"मित्रा, ज्याची जेवढी 'आकलनशक्ति', तेवढंच त्याला कळणार... पर'तंत्र' बुद्धीला फार काही कळणं, आकळणं, तसं शक्य नसतंच! 
तंत्रज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान, अजिबात नव्हे... एखाद्याच विषयाची उत्तम जाणकारी असणाऱ्यांच्या डोक्यात, असे बरेच 'कांदेबटाटे' भरलेले असतात... तंत्रज्ञान किंवा कुठल्याही एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान आणि ब्रह्मज्ञान, या दोन्हीचा काडीमात्र संबंध नाही!
असलाच, तर बर्‍याचदा तो उलटा, विक्षिप्त असतो!"

उपजत शहाणपण, ही जन्मानं येणारी बाब असली (जसं, ते अशिक्षित बहिणाबाईंना, आमच्या शिवबा-संतांना होतं); तरी 'शहाण्या' सहवासातून, अनुभवातून व अथक प्रयत्नानंतर आपल्यात 'शहाणपणा'ची पैदास निश्चित करता येते... त्याकामी, त्या 'शहाणपणा'ची शेती करण्याचे कष्ट घेतले किंवा तशी अहंकारमुक्त सकारात्मक-सकस मानसिकता दाखवली तरच!

पण, कुठल्यातरी शैक्षणिक वा अन्य 'मेरिट-सर्टिफिकीट', 'गोल्ड मेडल'च्या आधारे अथवा उदंड व्यावसायिक-यशाच्या बळावर राजकारणात देखील 'अगदी पद्धतशीररित्या ठरवून', स्वतःला 'सर्वज्ञ' घोषित करुन बसलेल्यांचं किंवा तसं भासवणाऱ्यांचं सांगा, नेमकं काय करायचं...???

...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1