Top Post Ad

फोटोग्राफी ... दृष्टी आणि मेंदूच्या सहाय्याने दृश्य प्रतिमा साकारणारी एक स्वतंत्र कला

 


"द फ्रेम"

‘फोटोग्राफी’ दृष्टी आणि मेंदूच्या सहाय्याने दृश्य प्रतिमा साकारणारी एक स्वतंत्र कला आहे. शास्त्र आहे. ही कला विकसित होण्यासाठी मानवी डोळा आणि मेंदू ‘बेंचमार्क’ ठरू शकतात. कला आणि शास्त्र एकत्र करून एकसंध परिणाम साधता येऊ शकतो. या दोन्हीचं ‘फ्युजन’ म्हणजे प्रकाशचित्रकला (फोटोग्राफी) होय. सौंदर्य, कल्पकता, अभिरुची आणि तांत्रिक ज्ञान यांच्या मिलाफातून ही कला आकारास येते. अशा या कलाविश्वात नवनवोन्मेष लिलया आत्मसात करु पाहणारी, नव्या पिढीतील एक कलानंदी... वैखरी सुनिल यावलीकर. आधुनिक छायाचित्रणशैलीचा उषःकाल, वर्तमान आणि भविष्यही..! छाया आणि प्रकाशाच्या संतुलित वापरातून छायाचित्रांची निर्मिती करणाऱ्या या सर्जनशील छायाचित्रकाराचे ‘द फ्रेम’ लाईफ ईन लाईट अॅन्ड शॅडो हे एकल फोटोग्राफी प्रदर्शन मुंबई येथील जहांगीर कला दालनात दि. १४ ते २० डिसेंबर २०२२ या कालावधीत कला रसिकांना पहावयास मिळणार आहे. 

माणसांचे जीवन संघर्षांनी भरलेले आहे. जीवन जगण्यासाठी प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात संघर्ष करावा लागतो. जगण्याच्या या धडपडीत माणसाने स्वतःभोवती एक सोयीस्कर चौकट तयार करुन ठेवलेली असते. कुणी त्या चौकटीत राहून जगतो तर कुणी चौकट भेदून जगणं सुखकर करण्याचा प्रयत्न करतो. काळानुरूप व्यक्तीपरत्वे जीवन जगण्याची ही कला एक विशिष्ट ‘चौकट’च बनून जाते. माणसाचं हेच जगणं, त्याचं भावविश्व, त्याची जिजीविषा, व्यथा, वेदना, अस्वस्थ करणाऱ्या जीवनजाणिवा हे सारं वैखरीने एका क्लिकवर बंधिस्त करून ‘द फ्रेम’ या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या संवेदना पोहचवल्या आहेत आणि म्हणूनच तिच्या छायाचित्रात निर्भीडपणा आहे. प्रामाणिकपणा आहे. थेटपणा आहे. ती छायाचित्रे स्वच्छ आहे. काटेकोर आहे आणि निर्दोषही आहेत.

  ग्रामीण भागातील जीवनशैली, प्रादेशिक वारसा, परंपरा, संस्कृतीची मूळं, हिरवाईने नटलेला निसर्ग, दैनंदिन जीवनातील प्रसंग, कष्ठकऱ्यांचं जगणं, समाजातील उपेक्षित घटक, तळागळात दडलेलं वास्तव, प्राचीन संस्कृतीचे अवशेष, नॉस्टेल्जिक करणाऱ्या वास्तू, विविध प्रसंग... तिच्या 'रियलिस्टिक' छायाचित्रांचे विषय आहेत. विविध जाणीवांना स्पर्श करणारे आहेत. रोजच्या वापरातील पितळी भांडी, मातीची भांडी, समयी, फुलदाणी, वृंदावन, दिवे, आरसे, आभूषणे, पुस्तके, काष्ठशिल्पे, मुखवटे, देव-देवतांच्या मुर्त्या, लाकडी कपाट आदी वस्तूंची वैविध्यपूर्ण रचना आणि कृत्रिम प्रकाश स्त्रोतद्वारे टिपलेली तिची छायाचित्रे सौंदर्यानुभूती निर्माण करतात. तिच्या छायाचित्रातील विस्तार, एकाग्र आणि स्फूर प्रकश योजना, रंग-अचूकता, रंगछटा, त्रिमितीदर्शन या सगळ्या बाबी सुखावणाऱ्या आहेत. विविध रंग तसेच पांढऱ्या रंगापासून दाट काळ्या रंगापर्यंत असंख्य छटा तिच्या छायाचित्रात दिसतात. निसर्ग जाणीव हा वैखरीसाठी आनंद निर्मितीचा झरा आहे. त्याची विविध रूपं तिला साद घालतात, अंतर्मनाशी संवाद साधतात. नैसर्गिक प्रकाशासह कृत्रिम प्रकाशात टिपलेली व्यक्तिचित्रे तिच्या सूक्ष्म निरीक्षणाचा, आकलनाचा प्रत्यय देतात. छायाप्रकाशातील अर्धच्छटांच्या वर्णांमधील सुक्ष्म भेद, तपशिलांतील बारकावे, अनोखा मूड आणि रंग कैद करण्याचं कसब देखील तिच्याकडे आहे. तिच्या छायाचित्रणात रचनासौष्ठत्व, उत्स्फूर्तता आणि मौलिकता हे गुण प्रामुख्याने दिसतात. तिची दृष्टी छाया-प्रकाशाचा मेळ जुळवून प्रत्येक आकार, रुपात मानवी स्पंदनांचा शोध घेऊन भावनिक बंध निर्माण करू लागतात. संवादू लागतात. तिच्या या अनोख्या सौंदर्यदृष्टीने टिपलेल्या वैविध्यपूर्ण छायाचित्रांनी समकालीन कलाजगतावर विशेष ठसा उमटविला आहे.

  वैखरीच्या प्रकाशचित्रातील कथानक जरी सामाजिक वाटत असले तरी, ते स्वतंत्र आहे. आंतरिक भावविश्वाशी निगडीत आहे. त्यात 'ओरिजिनँलीटी' आहे आणि म्हणूनच तिच्या प्रत्येक छायाचित्रात एक लय आहे. एक नाद आहे. एक नैसर्गिक प्रवाहीपण आहे. छायाचित्रण करतांना ही छायाचित्रकार वास्तविक जीवनाशी इतकी समरस होऊन जाते की; त्या त्या घटनांचे प्रतिबिंब तिच्या अंतर्मनातील भावनांना नकळत भेदून जातात आणि क्लिक होतं एक गहिरं चित्र... अगदी क्षणात..! सतत नाविन्याचा शोध घेणारी ती मनस्वी कलाकार आहे. तो शोध तिच्या कलात्मक जाणिवेची तार छेडतो, त्या तारेतून निघणारे स्वर लहरींचे तरंग म्हणजेच तीचं हे छायाचित्र प्रदर्शन आहे. 

कोणतीही कला फलद्रूप होण्यासाठी गुणवत्ता, योग्य शिक्षण, पोषक वातावरण आणि परिश्रमाची जोड लागते. मात्र वैखरीने छायाचित्रणाचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. वडील सुनिल यावलीकर या 'तत्वस्पर्शी' गुरूच्या लालित्यपूर्ण संस्कारात वैखरीच्या कला व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली. वडील सुनील यावलीकर हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. ते लेखक आहे आणि उत्तम चित्रकार देखील आहे. अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांमधील अंगभूत कला, गुण आणि क्षमतांना ओळखून त्यांच्या विकासाला दिशा देण्याचा यावलीकरांचा प्रयत्न असतो. या कृतिशील पित्याने वैखरीलाही घडवले. केवळ वडीलांचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या अवलोकन शक्तीवर विसंबून राहून, तीने प्रकाशचित्रातील तंत्रविषयक बारकावे अवगत केले. जिद्द, चिकाटी आणि नियमित सरावातून आपल्याच उणिवा शोधण्याची तिची चिकित्सक वृत्ती, चिंतन यातून तिच्या कलेला परिपक्वता लाभत गेली. 

वैखरीने पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातून पुरातत्वशास्त्राचे शिक्षण घेतलेय. तिने मानववंशशास्त्रात पद्व्युत्तर पदवी प्राप्त केली असून, सध्या ती रिसर्च फॉर रिसर्जन्स फाऊंडेशन, नागपूर येथे 'रिसर्च असिस्टंट' म्हणून काम करतेय. नुकतेच सुनिल यावलीकर यांच्याही कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीरमध्ये भरविण्यात आले. वर्षभरातच बाप आणि लेकीच्या कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीर कला दालनात भरण्याचा हा अनोखा योग जुळून आला आहे. वैखरीला फिरस्तीची आवड असून भटकंतीदरम्यान तिने टिपलेले छायाचित्र 'दूर्वांकुर' या लोककला विशेषांकाच्या मुखपृष्ठावर झळकलेय. तसेच 'सर्वधारा' व 'सर्वंकष' या वाड्मयीन नियतकालिकांनीही तिच्या अर्थपूर्ण छायाचित्रांना स्थान दिलेय. चोवीस वर्षीय ही छायाचित्रकार अमरावतीचं भुषण आहे. हौशी छायाचित्रकारांसाठी ती मार्गदर्शक देखील आहे. जहांगीर कला दालनातील तीच्या या सौंदर्यात्मक कला अविष्काराला निश्चितच प्रतिसाद मिळेल; या आशावादासह मनःपूर्वक शुभेच्छा..!


आशिष यावले... नागपूर
९९२२२९००२२


   कोलाज म्हणजे काय...?
कोलाजद्वारे शेकडोहुन अधिक चित्र तयार करणारे हजारे गुरूजींची मुलाखत
एकदा पहाच......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com