Top Post Ad

सन १९७१ भारत-पाकिस्तान युद्ध.... ५०वे वर्धापन वर्ष


 सन १९७१ भारत-पाकिस्तान युद्ध.... ५०वे वर्धापन वर्ष सन_२०२२

स्थळ-  वाशिंग्टन डीसी, अमेरिका.... वर्ष होते १९७१ आणि नोव्हेंबर महिना...तारीख होती ४ आणि ५ “जर भारताने पाकिस्तानमध्ये नाक खुपसले तर अमेरिका आपला सापळा बंद ठेवणार नाही. भारताला धडा शिकवला जाईल”
इति..... अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष - रिचर्ड निक्सन.

“भारत अमेरिकेला मित्र मानतो. बॉस नाही. भारत स्वतःचे नशीब स्वतः लिहिण्यास सक्षम आहे. परिस्थितीनुसार प्रत्येकाला कसे सामोरे जायचे हे आम्हाला माहीत आहे आणि त्याची जाणीवही  आहे”
इति... भारताच्या तत्कालीन पंतप्रधान - इंदिरा गांधी

भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे शब्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्याशी व्हाईट हाऊसमध्ये बसून नजरेला नजर भिडवत थेट सुनावले. ही घटना अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेनरी किसिंजर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात कथन केली आहे .

तो हा दिवस होता की जेव्हा इंदिरा गांधी यांनी आपल्या त्या चिरपरिचित अनोख्या शैलीत व्हाईट हाऊसमधून तडक बाहेर पडत निघून जाताना भारत - अमेरिका यांची पूर्व नियोजित संयुक्त पत्रकार परिषद सुध्दा  एकतर्फी रद्द केली. हेनरी किसिंजरने इंदिरा गांधींना त्यांच्या कारमध्ये बसवताना टिप्पणी केली होती की, "मॅडम पंतप्रधान, तुम्हाला वाटत नाही का तुम्ही राष्ट्रपतींसोबत बोलताना थोडासा अधिक संयम धरू शकला असता ?". इंदिरा गांधींनी उत्तर दिले, "सचिव महोदय, तुमच्या मौल्यवान सूचनेबद्दल धन्यवाद. एक विकसनशील देश असला तरी, आमचा पाठीचा कणा सरळ आहे - आणि सर्व अत्याचारांशी लढण्यासाठी पुरेशी इच्छाशक्ती आणि संसाधने आमच्याकडे आहेत. आम्ही हे सिद्ध करू की एखादी शक्ती  हजारो मैल दूर असलेल्या कोणत्याही राष्ट्रावर नियंत्रण ठेवून राज्य करू शकते, असे दिवस  आता संपले आहेत”.

स्थळ - नवी दिल्ली.... वर्ष होते १९७१ आणि महिना नोव्हेंबर.... तारीख होती ६

एअर इंडियाचे बोईंग दिल्लीत उतरताच इंदिरा गांधींनी  विरोधी पक्ष असलेल्या जनसंघाचे तत्कालीन अध्यक्ष  अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या निवासस्थानी  तातडीने बोलावून घेतले. बंद दाराआड तासभर चर्चेनंतर अटलबिहारी वाजपेयी घाईघाईने परतताना दिसले. थोड्याच वेळात जनसंघाचे अध्यक्ष व प्रमुख नेते असलेले अटल बिहारी वाजपेयी, पाक युध्दाबाबत भारताची भूमिका संयुक्त राष्ट्रसंघात मांडण्यासाठी, भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले.

बीबीसीचे वार्ताहर डोनाल्ड पॉल यांनी वाजपेयींना खोडसाळपणे मार्मिक प्रश्न विचारला की , "इंदिरा गांधी तुम्हाला कट्टर टीकाकार मानतात. अशा परिस्थितीत तुम्ही आता संयुक्त राष्ट्रसंघात विद्यमान सरकारच्या ( इंदिरा गांधींच्या ) विरोधात टिकात्मक बोलु शकाल, याची तुम्हाला खात्री आहे का ? "

क्षणार्धात अटल बिहारी वाजपेयी उत्तरले.. .. "गुलाब बागेची शोभा वाढवतो, तशी लिलीही शोभा वाढवते ... (लिलीची फुले )..... प्रत्येकजण ( गुलाब आणि लिलीची फुले ...अर्थात इंदिरा गांधी आणि वाजपेयी यांची प्रतिके ) वैयक्तिकरीत्या सर्वात सुंदर आहोत, या कल्पनेने वेढलेला असतो. परंतु ज्या बागेची शोभा हे वाढवत असतात, ती बागच जेंव्हा संकटात सापडते, तेंव्हा बागेचे रक्षण करणे , हे प्रथम कर्तव्य असते, हे काही गुपित नाही.....ते उघड सत्य आहे..... आज मी बाग वाचवण्यासाठी आलो आहे.... आणि यालाच भारतीय लोकशाही म्हणतात."..... अटलबिहारी वाजपेयींच्या या सुस्पष्ट , मर्मभेदी  आणि थेट उत्तराने समोरच्याची बोलतीच बंद झाली !!

अमेरिकेचे पाकिस्तान प्रेम माहीत असल्याने इंदिरा गांधीनी रशियाबरोबर  अर्थात तत्कालीन सोविएत युनियन बरोबर ( सर्वोच्च अधिकार असलेल्या असलेल्या पाॅलीट ब्युरोचे जनरल सेक्रेटरी लिओनिद ब्रेझनेव्ह यांचेबरोबर ) या पूर्वीच म्हणजे 9 ऑगस्ट 1971 रोजी 20 वर्षाचा मैत्री करार करुन चीन आणि अमेरिकेला एकाचवेळी दोघांनाही धोबीपछाड दिली होती . या करारानुसार दोन्ही राष्ट्रांनी युद्धप्रसंगी एकमेकाच्या मदतीला धावून जायचे मान्य करण्यात आले होते. अमेरिकेने या युध्दात चीनला भारताविरुद्ध उचकावण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु भारत-रशिया मैत्री करारामुळे चीनने शांत राहण्याचेच धोरण ठेवले. या करारामुळेच  भारताच्या मदतीसाठी आलेल्या रशियाच्या पाणबुड्यांच्या आक्रमक व वेगवान हालचालीमुळे अमेरिकेच्या सातव्या आरमाराला बंगालच्या उपसागरातून माघार घ्यावी लागली आणि शेवटच्या क्षणी अवघ्या 13 व्या दिवशी पाक सैन्याचे लेफ्टनंट जनरल नियाझी यांना शरण येणे भाग पडले...हे भारत - पाक युद्ध 3 ते 16 डिसेंबर 1971 या काळात भारतीय सेनादलाचे सरसेनापती फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या नेतृत्वाखाली लढले गेले... या  समरकाळात समस्त विरोधी पक्ष इंदीरा गांधी यांच्या पाठिशी ठामपणे ऊभे होते..

अमेरिकेने 270 प्रसिद्ध पॅटन रणगाडे पाकिस्तानला पाठविले. अमेरिकेने जागतिक प्रसार माध्यमांना हे दाखवून दिले की, हे टँक अद्ययावत तंत्रज्ञानाच्या अंतर्गत तयार केले आहेत आणि त्यामुळे ते अभेद्य आहेत.....हेतू अगदी स्पष्ट होता. भारताला कोणीही मदत करू नये, हा उर्वरित जगासाठी इशारा होता. अमेरिका इथेच थांबली नाही..... भारताला तेल पुरवठा करणार्‍या बर्मा-शेल या एकमेव अमेरिकन कंपनीला तेल पुरवठा थांबविण्यास सांगण्यात आले. यापुढे भारताशी व्यवहार पूर्णतः थांबविण्यास सांगितले. त्यानंतरचा भारताचा इतिहास केवळ लढाईचा होता. इंदिरा गांधींच्या कट्टर मुत्सद्देगिरीमुळे युक्रेनमधून तेल आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अमेरिकेच्या कोणत्याही नाकेबंदी समोर इंदीरा गांधीनी हार मानली नाही. फक्त एका दिवसाच्या  लढाईतच थरच्या वाळवंटातील अमेरिकेच्या 270 पॅटन टँक पैकी बहुतांशी टँक नष्ट केले गेले . क्षतिग्रस्त झालेले टँक भारतात ट्रॅफिक क्रॉसिंगवर प्रदर्शनासाठी ठेवले गेले . राजस्थानचे उष्ण वाळवंट अजूनही या पराक्रमाचे साक्षीदार म्हणून आजही उभे आहे....जिथे अमेरिकेच्या अभिमानाचा नाश झाला होता.

मोजुन 13 दिवस  युद्ध चालले.... कारण युद्ध लांबले असते तर अमेरिकेला तसेच युनोला या युध्दात आंतरराष्ट्रीय दबाव आणून युध्दबंदी करार (ceasefire) करण्यास भाग पाडण्यास अवधी मिळाला असता. लष्करी कारवाई थांबवून शांततेसाठी चर्चेचे गुऱ्हाळ वर्षानुवर्ष चालु ठेवून हा प्रदेश कायम अशांत आणि धुमसता ठेवायचा, ही अमेरिकेची यामागील कुटील निती होती. या अशा  युध्दबंदी कराराचे ( ceasefire ) फलीत काय असते हे, भारत - पाकचे 1965 चे युद्ध तसेच काश्मीरचा  ज्वलंत इतिहास साक्ष देतो. इंदिरा गांधीना एक घाव दोन तुकडे करुन युध्दबंदी कराराच्या सापळ्यात अडकायचे नव्हते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत युध्द लांबणार नाही, याचे नियोजन इंदीरा गांधी आणि युध्दभुमीवर नेतृत्व करणारे सरसेनापती सॅम माणेकशा यांनी केले होते. अन्यथा युध्दाचा उद्देश सफल झाला नसता ! बांगला देश स्वतंत्र करुन पाकिस्तानला धडा शिकवणे हा उद्देश पुर्णत्वास गेला नसता !! भारताकडून जवळपास ९३,००० पाकिस्तानी युद्धकैद्यांना पकडण्यात आले. सोनार बांगलाचे सर्वेसर्वा शेख मुजीबुर रहमान हे लाहोर तुरुंगातून मुक्त झाले आणि नवनिर्मित स्वतंत्र बांगला देशचे  अध्यक्ष झाले. 

सन 1972... महिना मार्च - इंदिरा गांधींनी भारतीय संसदेत बांगलादेशला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली.... सत्तारूढ तसेच जनसंघाचे अध्यक्ष अटलबिहारी यांच्यासह अन्य सर्वच विरोधी पक्षांनी इंदिरा गांधींचे या देदीप्यमान आणि धाडसी यशाबद्दल कौतुक केले... सशक्त व निरोगी लोकशाही कशी असावी, याचा आदर्श वस्तुपाठ इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी तसेच अन्य सर्व  विरोधी पक्षांच्या  नेत्यांनी यांनी फक्त भारतीयांसमोरच नव्हे तर जगासमोर ठेवला...

या घटनांमध्ये दीर्घकाळ टिकणारे परिणाम दिसून आले.

१......भारताची स्वतःची तेल कंपनी, उदा. इंडियन ऑइल अस्तित्वात आले.
२.....जगाच्या नजरेत भारताने स्वत:ला सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून व्यक्त केले.
३....भारताने अलिप्त चळवळीचे (Non Alliance Movement) आघाडीचे नेतृत्व केले.

 असा हा सामर्थ्याचा काळ आणि घटना आज मात्र काहीशा विस्मृतीत जाऊ पाहताहेत. आजपर्यंतचा हा देदीप्यमान इतिहास पिढ्यानपिढ्या पुढे जाण्याची गरज आहे.

चालू असलेले वर्ष 2022 हे भारत-पाक-बांगलादेश युद्धाचे 50 वे वर्धापन वर्ष आहे. आजच्या पिढीने हे वाचले पाहिजे.... अभ्यासले पाहिजे......ऐकले पाहिजे आणि भारतीय लोकशाहीचा अभिमानास्पद इतिहासाचा अभिमान बाळगला पाहिजे !!!

जय हिंद... जय भारत..... भारतीय लोकशाही चिरायु होवो...
सर्व, देशभक्तांचे अवलोकनार्थ सविनय सादर......

सुनिल पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com