Top Post Ad

इंदिरा गांधी स्मृती


राजकारण हा मराठीत तरी एक असा विषय आहे, की ज्यात सगळेच तज्ज्ञ असतात. तशात ते राजकीय बातमीदार असतील, तर विषयच संपला! राजकीय नेत्यांशी जवळीक आणि त्यांच्याकडून मिळणारे गॉसिपचे तुकडे एवढय़ा आधारावर त्यांची तज्ज्ञता फळते, फुलते. लिहिण्याची झोकदार शैली असली, की ही तज्ज्ञता पाजळताही येते. वाईट असे की, पुढे त्यांना स्वत:लाही वाटू लागते, की आपल्याला राजकारणाच्या गूढगर्भातलेही सारे काही कळते. ‘द कावबॉईज ऑफ रॉ’सारखी पुस्तके वाचली, की मग लक्षात येते, की राजकारण इतके सोपे नसते. एकपदरी नसते. त्याला अनेक पापुद्रे असतात.

 पंजाबमधील दहशतवादाचेही तसेच. त्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय कंगोरे होते. त्याचे इंदिरा गांधी आणि झैलसिंग यांनी भिंद्रनवालेंचा भस्मासुर उभा केला, असे सुलभीकरण करणे विरोधी पक्षांच्या राजकारणास उपयुक्त ठरते. त्यात तथ्य आहेच. पण ते सर्वागीण विश्लेषण नसते. तो जागतिक सत्तास्पध्रेतला भीषण हिंसक खेळ होता. केवळ पाकिस्तानच नव्हे, तर पाश्चात्त्य राष्ट्रांचेही त्यात हितसंबंध होते. पंजाब प्रश्नाचा संबंध काश्मीरइतकाच बांगलादेशाशीही होता. एकंदरच अमेरिकेचे डावपेच, भारताला सतत गुडघ्यावरच ठेवण्यासाठी सुरू असलेले पाश्चात्त्य देशांचे प्रयत्न याचा भारतातील दहशतवादाशी निकटचा संबंध होता आणि आहे. रमण यांनी हे सगळे येथे व्यवस्थित उलगडून दाखविले आहे.

 अमृतसरमधील सुवर्णमंदिरात करण्यात आलेल्या लष्करी कारवाईच्या वेळी ब्रिटनने भारताला मदत केली होती. दोन ब्रिटिश गुप्तचरांनी सुवर्णमंदिरात जाऊन पाहणी केली होती, असा ‘गौप्यस्फोट’ नुकताच ब्रिटनमधील एका खासदाराने केला. वस्तुत: त्यात नवे काहीही नाही. काव यांच्या विनंतीवरून ब्रिटिश एमआय-फाइव्हने तशी मदत केल्याची आपलीही माहिती असल्याचे रमण यांनी या पुस्तकात आधीच नमूद केले आहे. आता अशा गोष्टींना काही नेहमीच ठोस पुरावे देता येत नसतात. तेव्हा रमण यांच्यासारखी जबाबदार व्यक्ती जेव्हा ती नोंदविते तेव्हा त्यात किमान तथ्यांश असलाच पाहिजे असे मानून चालावे लागते. याच प्रकरणी रमण यांनी दिलेली माहिती अधिक उद्बोधक आहे. इंदिरा गांधी यांनी या कारवाईस उशीर केला. फेब्रुवारी १९८४ मध्ये ब्रिटिश गुप्तचरांची मदत घेण्यात आली होती. यावरून ही समस्या सुरुवातीलाच खुडून काढावी वा सुवर्णमंदिरातून अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी अन्य पर्याय शोधावेत असे भारत सरकारला वाटत नव्हते, ही बाब अधोरेखित होते, असा आरोप अलीकडेच भाजप नेते अरुण जेटली यांनी केला आहे. तो किती भंपक आहे हे या पुस्तकातून कळते. इंदिरा गांधी आणि रॉने ही कारवाई टाळता यावी यासाठी मनापासून प्रयत्न केले होते, याचे काही दाखलेच रमण यांनी दिले आहेत.

 प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाच वेळी विविध समान आणि विरोधी बले कार्यरत असतात. भिन्न प्रतलांवरून ते चालत असते. ‘द कावबॉईज ऑफ रॉ’सारखी इंग्रजी पुस्तके हे भान देतात. 

 १९६२ आणि ६५च्या युद्धात शत्रूंची पुरेशी गोपनीय माहिती मिळविण्यात इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)ला आलेल्या अपयशामुळे, परराष्ट्रांत हेरगिरी करणारी वेगळी संस्था स्थापन करण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांनी घेतला. 

बांगलादेश मुक्तिसंग्रामात रॉने मोठे काम केले होते, हे तसे अनेकांना माहीत असते. ही कामगिरी होती पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची. पण रॉने देश जोडण्याचेही महत्त्वाचे कार्य केले आहे. सिक्कीमच्या विलीनीकरणाचे बरेचसे श्रेय द्यावे लागेल ते रॉला. सिक्कीमचे तत्कालीन राजे पाल्देन थोंडून नामग्याल, त्यांची अमेरिकन पत्नी होप कूक यांच्या सिक्कीमला स्वतंत्र ठेवण्याच्या सर्व कारवाया हाणून पाडत इंदिरा गांधी यांनी हे राज्य भारतात सामील करून घेतले. ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही.

एकीकडे चीन आणि दुसरीकडे अमेरिका यांचा प्रचंड दबाव होता. सिक्कीमची राणी होप कूक ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि धोरणी बाई. तिच्या आडून सीआयए काम करीत होती. पुढे १९७२ मध्ये जेव्हा सिक्कीममध्ये निवडणुका लागल्या, तेव्हा तेथे भारतविरोधी भावना भडकाविण्यासाठी तिने सीआयएला थेट मैदानात उतरविले होते. राजा आणि त्याच्या पक्षाला मदत करण्यासाठी ‘युसिस’चे तत्कालीन संचालक होल्डब्रूक ब्रॅडली हे गंगटोकमध्ये तळ ठोकून होते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेच कलकत्त्यातील अमेरिकी वकिलातीतील सीआयएचे एक अधिकारी पीटर बुले हे राजाला भेटून आले होते. तेव्हा तेथे सामना जसा राजेशाही विरुद्ध लोकशाही असा होता; तसाच तो सीआयए विरुद्ध रॉ असाही होता. रॉने तेथील लोकशाहीवादी नेत्यांना एकत्र आणले. त्यांना सर्व प्रकारची मदत केली. तेथील लेप्चा-भुतिया जमातीचे काझी ल्हेन्डूप दोर्जी हे प्रतिष्ठित नेते. ते राजाच्या विरोधात होते. त्याला रॉने खतपाणी घातले. त्यांची पत्नी एलिसा मारिया. ही मूळची बेल्जियमची. तिचा आणि होप कूक हिचा छत्तीसचा आकडा. होप कूकचा वापर सीआयए करीत होती. रॉच्या अधिकाऱ्यांनी मग एलिसा मारिया हिला हाताशी धरले. तिला सिक्कीममधून तडीपार करण्यात आले. तेव्हा कालिपाँगमध्ये ती राहू लागली. तेथे रॉने तिला सर्व प्रकारची मदत केली. हेरगिरीचा मोठा आखाडाच सिक्कीममध्ये त्या काळात रंगला होता. एकीकडे राजाचे दमनयंत्र आणि दुसरीकडे रॉने भडकाविलेले आंदोलन यांत अखेर विजय भारताचाच झाला.

जितेंद्र आव्हाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com