Top Post Ad

छत्रपती शिवराय पुराने जमाने के…..



   महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जात असताना त्याची मजा घेत मराठी माणसांना कमी लेखल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. याही आधी अशाच अनेक विधानांनी त्यानी महाराष्ट्राचा अपमानच केला आहे. त्यात अधिक एकाची भर आता पडली आहे. राज्यपालांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. तुलना करुनही ते थांबले नाहीत तर छत्रपती शिवराय हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं सांगत, “शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं वक्तव्य करून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला डिवचण्याचे काम केले आहे. भगतसिंग कोश्यारी हे राज्याचे राज्यपाल म्हणून आल्यापासून नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद निर्माण करतात. कधी सावित्रीबाई फुले यांच्यावरून, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुवरून तर कधी मुंबईतील परप्रांतीय नागरीक बाहेर काढले तर काय राहील असली वक्तव्य करत नेहमीच वाद निर्माण करत आले आहेत. इतकेच नव्हे तर राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भरविलेला पेढा सर्वाच्याच चर्चेचा विषय झाला होता. 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.  त्यावेळी गडकरी आणि पवारांचं मोठेपणा सांगताना राज्यपालांनी बोलण्याच्या नादात छत्रपती शिवरायांची तुलना थेट गडकरींशी केली. राज्यपाल कोश्यारी म्हणाले, आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. गडकरी आणि पवार यांना पदवी देण्याचं मला भाग्य लाभलं. या नेत्यांचं कार्य राष्ट्राला उपयोगी असल्याने त्यांना ही पदवी दिली गेली. मात्र त्यांचे कार्य त्यापेक्षा अधिक आहे. शरद पवार यांनी शेती क्षेत्रात प्रचंड काम केलंय. त्यामुळे ते साखरेपेक्षा अधिक गोड वाटतात. नितीन गडकरी तर ध्येय असणारे नेते आहेत, त्यांना रोडकरी या नावानेही ओळखलं जातं. दोन्ही नेत्यांचं मोठं काम आहे असे म्हणाले

यापार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजी राजे यांनी खोचक टीका करत म्हणाले, राज्यपाल असं का बडबडतात?  मला समजत नाही. याआधीही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन हटवावं अशी मागणी मी पंतप्रधान मोदींकडे केली होती. आताही मी तीच मागणी करतोय. खरंच अशी व्यक्तीच आम्हाला महाराष्ट्रात नको. या महाराष्ट्राचे वैभव छत्रपती शिवाजी महाराज असंख्य जणांचे प्रेरणास्त्रोत आहेत. महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे. घाणेरडे शब्द आणि इतके घाणेरडे विचार राज्यपालांच्या मनामध्ये येऊच कसे शकतात? यांना राज्यपाल म्हणून ठेवलंत तरी कसं? अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अशी व्यक्ती आम्हाला महाराष्ट्रात नको. या महाराष्ट्राचे वैभव छत्रपती शिवाजी महाराज असतील, महापुरुष असतील, संत असतील. त्यांच्याविषयी इतके घाणेरडे विचार राज्यपालांच्या मनामध्ये येऊच कसे शकतात? मोदीजी तुम्ही यांना राज्यपाल म्हणून ठेवता तरी कसं? या व्यक्तीला महाराष्ट्रातून बाहेर काढावं. त्यांना कुठे ठेवायचे तिथे ठेवा, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र अशा गोष्टी सहन करणार नाही. किती दिवस आम्ही गप्प बसायचं. शिवाजी महाराजांबद्दल ते पूर्वीही बोलले होते. महात्मा फुलेंबद्दल बोलले होते. इथे येऊन फक्त आमच्या महापुरुषांबद्दल गरळ ओकायची एवढा एकच अजेंडा राबवायचं ठरवलंय का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

 संभाजी ब्रिगेडकडून देखील कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. शिवाजी महाराज हे जागतिक स्तरावरचे आदर्श नेते होते. शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही आणि कशाशीही होऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे शिवानंद भानुसे यांनी दिली आहे. मात्र आता राज्यातील शिंदे सरकार आणि मनसेचे राज ठाकरे मूग गिळून गप्प बसणार की, राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्राच्या इतिहासाची आठवण करून देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वीर सावरकरांबाबतच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाली होती. आता कोश्यारींच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यावर ते आक्रमक होणार का? असा सवाल निर्माण झालाय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com