Top Post Ad

मन्या तुला शौक आहे ना..... मग तू अंगभर टिकल्या लावून फिर

माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने अनेकांना मुलं झाली,  निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिन्दुस्थान, कोरोना हा रोगच नाही,  कोरोनानं जी माणसं मरतात ती जगण्याला लायक नाहीत, अशा एकापेक्षा एक सर्रस विधाने करून तमाम हिन्दुस्थानी सोशल मिडीयाला खाद्य पुरवणारे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. टिकली लाव मग तुझ्याशी बोलतो म्हणून समस्त महिला वर्गाचा अपमान करणारे भिडे अद्यापही मोकाटच कसे असा प्रश्न आता तमाम महाराष्ट्रातील महिलांना पडला आहे.  निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिन्दुस्थान हे त्याचं आधीचं वाक्य प्रमाण मानलं तर  याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. ज्यांना त्यांच्या बागेतील आंबे खाल्ल्याने मुलं झालीत ती पिढी म्हणजे खरोखरच निर्लज्ज लोकांचा देश हिन्दुस्थान म्हणून मान्य करत आहेत. मात्र आता तर थेट माय-माऊलीवरही आक्षेपार्ह विधान करून मी किती ग्रेट आहे. माझ्या प्रत्येक वाक्याला किती प्रसिद्धी मिळते. किती चर्चा होतात. असंच भिडे यांना वाटत असावं म्हणूनच दरवेळी ते अशी बिनधास्त विधाने करतात आणि थेट मंत्रालयात जाऊन मंत्र्यांसोबत फोटो सेशनही करतात.  2 नोव्हेंबरलाही असंच मंत्रालयात गेल्यानंतर आता काही प्रसिद्ध होण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी भिडे यांनी थेट पत्रकार महिलेलाच आधी कुंकू लावून ये असं फर्मान सोडलं आणि प्रसिद्धी माध्यमांना पुन्हा एकदा नवीन विषय मिळाला. मागील विधानांना मिळालेल्या खमंग प्रसिद्धीमुळेच आता पुन्हा एकदा भिडे असं बोलले हे आता नेटकऱ्यांनाही माहिती झालंय.

भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसात राज्यभर उमटले आहेत. याची दखल राज्याच्या महिला आयोगानंही घेतली आहे आणि भिडे यांना नोटीस पाठवून या विधानाबद्ल स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे.  पु्ण्यात  भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून महिलांनी त्यांच्या कपाळावरच्या टिकल्या काढल्या. त्या भिडे यांच्या बॅनरवर लावल्या.  त्याचं वादग्रस्त विधान हे समस्य महिला जातीचा अपमान आहे. विधवा महिलांचा अपमान आहे. आमच्या आई, सासुबाई या सर्व महिलांचा अपमान आहे.. 
मन्या तुला शौक आहे ना. मग तू अंगभर टिकल्या लावून फिर, असा संदेशही या महिलांनी भिडे यांच्या बॅनरवर टिकल्या लावून दिला.   काही वृद्ध महिला या विधवा आहेत. त्यांचा अपमान हा भिडे यांनी केला आहे. फक्त पत्रकार महिलेला हुसकावून लावलं असं नव्हे तर त्यांनी सर्व महिलांना हुसकावलं. तुम्ही टिकली किंवा कुंकू नाही लावली तर माझ्यासमोर यायचं नाही.  महिला पदाधिकारी म्हणाल्या, याचा अर्थ तुम्ही पुढच्या पिढीला काय संस्कार देऊ पाहताय. वादग्रस्त विधान करायचं फेमस व्हायचं. पहिल्यांदा तु्म्ही तुमच्या घरातून संस्कार सुरू करा. अमृता वहिनी कधी लावतात का टिकली नाही लावतं. असं परखड मत यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केले.

 महिलांनी काय करावं, कसं जगावं, हे कोणी सांगू नये,"असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संभाजी भिडे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. पंढरपुरात विठुमाऊलीच्या दर्शनासाठी आल्या असताना प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी आपली भूमिका मांडली. .

महिलांनी कसे वागावे ,कसे रहावे ,काय खावे हे सांगणारे भिडे कोण आहेत ? महिलांवर प्रतिबंध आणणारे भिडे कोण ? भिडेंनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये अश्या शब्दांत आम.प्रणिती शिंदे यांनी भिडेंचा समाचार घेतला.
देशात स्त्रीला शक्तीचे स्वरूप म्हणून पुजले जाते. तर, त्यातीलच काही लोक पेहरावावरून तिचे चारित्र्य ठरवतात. त्यामुळे, महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नेहमी प्रश्नचिन्ह उभा राहतो.  वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहण्याची सवय असलेल्या भिडे यांचा संपूर्ण महाराष्ट्रात  निषेध करण्यात येत आहे.   सोशल मीडियावर पोस्ट करीत विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली.

भिडे आपल्या घराण्यात विधवा नातेवाईक महिलांशी बोलत नाही काय? कुंकू लावणे याचा सौभाग्याशी काही संबंध नाही. लहान-लहान मुली टिकल्या लावतात. त्यांचे काय लग्न झालेले असते? या काळात यजमान वारल्यावर ही टिकल्या लावणाऱ्या आणि ते हयात असताना न लावणाऱ्या ही अनेक मुली आहेत. ‘कुंकू म्हणजे सधवा’ हे समीकरण आता खूप मागे पडले.-  -अरुणा सबाने, साहित्यिक.

भारतीय संविधानातील अनुच्छेद १९ ते २२ नुसार व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकार सर्वोच्च आहे. संविधान आहे तोपर्यंत भारतीय स्त्रियांचे स्वातंत्र्य अबाधित आहे व राहणार. कोण काय बरळत याने काही फरक पडत नाही. ज्या महिला पत्रकाराचा संभाजी भिडे यांनी अपमान केला त्यांची जाहीर माफी मागावी, माझे म्हणणे फक्त एवढेच आहे. पत्रकारांनी हा त्यांचा वैयक्तिक अपमान समजून संभाजी भिडे यांना कुठल्याही प्रसार माध्यमावर पुन्हा प्रसिद्धी मिळणार नाही, याची काळजी घ्यावी.-  -ॲड. समीक्षा गणेशे.


आमच्या माथी टिकली आहे, कुंकूही आहे, भरीस आम्हाला नवराही आहे
त्यानेच आम्हाला बाजारात उभं केलंय ही गोष्ट अलाहिदा!
आम्ही कष्टाने कमावतो आणि ताठ मानेने जगतो!
आता तर तुमच्या अटीशर्तीतही आम्ही बसतो,
सांगा आम्हाला भारतमाता म्हणाल की नाही?
आमचा देह कोरलाय सर्व धर्मांच्या स्पर्शसुक्तांनी
गोंदवून घेतलेत आम्ही आमचे स्तनही वेदनांनी!
भारतमातेच्या नि आमच्या संवेदना सारख्याच आहेत
तिरस्कारग्रस्तांनो तुम्हाला त्या कळायच्याच नाहीत! - - समीर गायकवाड





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com