डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना भारताला दिली. देश स्वतंत्र झाल्यापासून या राज्यघटनेच्या अधिन राहून लोकशाही व्यवस्थेचा कारभार सूरु आहे. राज्यघटनेने सर्व जाती धर्मांच्या लोकांचे हक्क अबाधित ठेवले आहेत. विविधतेत एकता ही आपल्या देशाची ओळख कालपर्यंत अबाधित होती, पण आरएसएस प्रणित भाजप सरकार केंद्रात आल्यापासून राज्यघटना व लोकशाही मोडीत काढण्याचे षडयंत्र सुरू आहे. या सरकारने सातत्याने संविधानाची मोडतोड करीत कायदे गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच घटनेतील कायद्यांचा विपर्यास करून ते मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील ८ वर्षात लोकशाही व राज्यघटना धोक्यात आली आहे. याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी. तसेच लोकशाही व राज्यघटनेचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यघटनेच्या एक लाख प्रती वाटण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या या अभियानाची सुरुवात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोटीया, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश, प्रभारी. एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ पक्षनेते तथा भारत जोडो यात्रेचे राज्य समन्वयक बाळासाहेब थोरात, जेष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या