Top Post Ad

श्यामच्या आईचं आज काय करायचं...?


यशोदा सदाशिव साने... अर्थात साने गुरुजींची आई...म्हणजे अर्थातच ‘श्‍याम’चीही आई!  कोकणातल्या एका गरीब, सर्वसामान्य आणि कर्जबाजारी कुटुंबातल्या महिलेची 2017 या वर्षी स्मृतिशताब्दी राज्यात अनेक ठिकाणी साजरी झाली. त्यांच्याभोवती लौकिकार्थानं कोणतंही वलय नव्हतं; तरीही या साध्यासुध्या महिलेला महाराष्ट्रानं १०० वर्षं लक्षात ठेवावं, तिचं साधं छायाचित्रही उपलब्ध नसताना तिला स्मरणकोशात जपावं, हे विलक्षण आहे. सानेगुरुजींची ही आई कोकणातल्या खेड्यात जन्मली आणि तिथंच तिच्या आयुष्याची सांगताही झाली. इतर असंख्य भारतीय स्त्रियांसारखीच माजघरातल्या चुलीच्या धुरात विझून गेलेली ही आई! नवरा, सासू-सासरे, मुलं, आजारपण हेच होतं तिचं विश्व. मात्र, तरीही महाराष्ट्राच्या भावविश्वात तिचं स्थान काय म्हणून कायम आहे? 

कविवर्य वसंत बापट यांनी एकदा सानेगुरुजींच्या नातेवाइकाला मोठ्या उत्सुकतेनं विचारलं होतं : ‘कशी होती हो *गुरुजींची आई?’ तेव्हा *तटस्थपणे आणि  तुसडेपणानं ते नातेवाईक म्हणाले होते : ‘अहो, काही विशेष नव्हती. चारचौघींसारखी दिसायची. !काही वेगळी नव्हती.’ यावर वसंत बापट लिहितात  ‘‘सामान्य असणं’ हेच तिचं असामान्यत्व आहे!’ ‘शिक्षण’ विषयावरच्या या लेखमालेतून मलाही सानगुरुजींच्या आईवर का लिहावंसं वाटतं? महात्मा गांधी म्हणत:  ‘आई हे मुलाचं पहिलं विद्यापीठ आहे.’ या वाक्‍याच्या प्रकाशात पाहायचं झालं, तर सानेगुरुजींची आई हीच एक शाळा आहे. शाळेत मूल असतं सहा तास आणि उरलेले १८ तास ते घरातच असतं. त्याच्या आयुष्यात शाळा खूप उशिरा येते. सुरवातीची महत्त्वाची वर्षं या आईच्या विद्यापीठातच तर जातात. तेव्हा शाळा जीवनात काय करते, याचं मूल्यमापन करताना ‘आई नावाच्या शाळे’त मूल काय शिकतं आणि त्यापेक्षा काय शिकायला पाहिजे,  त्यासाठी अगोदर ‘श्‍यामच्या आई’ची वैशिष्ट्यं कोणती? ती महाराष्ट्राला एवढी का भावली, हे लक्षात घ्यायला हवं.

 ‘श्‍यामची आई’ कोणतंच तत्त्वज्ञान सांगत नाही. ती एक सोशिक भारतीय महिला आहे. तिचं आयुष्य अविरत कष्टांत गेलं. पुरुषप्रधान व्यवस्था ज्या प्रकारे कुटुंबात स्त्रीला दुय्यम स्थान देते, तेच तिचं स्थान आहे. त्यामुळं ती स्वातंत्र्यवादी म्हणून आजच्या नव्या पिढीच्या महिलांना आदर्श वाटणार नाही; पण तिच्या त्या समर्पणाकडं केवळ गुलामी म्हणूनही पाहता येणार नाही! ती हलाखीच्या परिस्थितीत, अत्यंत दारिद्य्रात कमालीची स्वाभिमानी आहे. स्वत:च्या वडिलांनाही ती ‘दारिद्य्रात आम्ही आमचं बघून घेऊ’ असं सुनावते. सावकाराचा माणूस घरावर जप्ती आणू शकतो, हे माहीत असूनही त्यानं स्त्री म्हणून तिच्यावर शेरेबाजी करताच, परिणामाची पर्वा न करता त्याच्या अंगावर ती नागिणीसारखी धावून जाते. हा तिचा दारिद्य्रातला स्वाभिमान कुणाला थक्क करणार नाही? श्‍याम कुठं तरी जेवायला गेला असता तिथं त्याला दक्षिणा मिळते. त्यानं ती दक्षिणा घरी आणलेली पाहताच ‘ते पैसे मंदिरात नेऊन दे’, असं ती त्याला त्या गरिबीतही सांगते. गरिबीतही तिला असलेलं हे ‘मूल्यसंस्काराचं भान’ महत्त्वाचं आहे. ती स्वत: मुलांना तिच्या समर्पणातून आदर्श घालून देते. 

स्वत:ला गुरुजींची आई ‘एक शिक्षिका’ म्हणून खूप भावते. ठरवलंच तर कुटुंब व्यवस्थेत किती प्रकारचे अनुभव दिले जाऊ शकतात? छोट्या छोट्या प्रसंगांमधून ती जाणिवा विकसित करते, यासाठी मला ती भावते. पर्यावरण, जातीयताविरोध, गरिबांविषयी कणव, समर्पण हे सगळं सगळं ती शिकवते. श्‍यामनं मुक्‍या कळ्या खुडल्यावर किंवा झाडाची जास्त पानं तोडली तरी ती आई त्याला पर्यावरणाची, झाडाच्या भावनांची जाणीव करून देते. आपला मुलगा भित्रा बनू नये म्हणून ती त्याला सक्तीनं पोहायला पाठवते.दलित वृद्धेला मोळी उचलता येऊ शकत नसल्याचं पाहून तिला मदत करण्याविषयी ती श्‍यामला सांगते. या सगळ्या गोष्टींमधून ती जे संस्कार श्‍यामवर करते, ते त्या काळाच्या कितीतरी पुढचे आहेत. सोप्या सोप्या प्रसंगांमधून ती जे तत्त्वज्ञान सांगते ते खूप विलक्षण होय. 

श्‍याम डोक्‍यावरचे केस वाढवतो. वडील रागावतात. तेव्हा श्‍याम वैतागून म्हणतो : ‘आई, केसात कसला गं आलाय धर्म? तेव्हा ती त्याला म्हणते : ‘तुला केस राखायचा मोह झाला ना? मग मोह टाळणे म्हणजे धर्म.’ धर्माची इतकी सोपी व्याख्या क्वचितच कधी सांगितली गेली असेल. लाडघरच्या समुद्रात ती समुद्राला पैसे वाहते, तेव्हा श्‍याम म्हणतो : ‘ज्याच्या पोटात रत्नं आहेत त्याला पैसे कशाला?’ तेव्हा ती म्हणते : ‘सूर्यालाही आपण काडवातींनी ओवाळतोच ना? प्रश्न त्या कृतज्ञतेचा आहे!’ श्‍यामला केवळ उपदेश न करता तिचं हे संवादी राहणं मला फार मोलाचं वाटत आलं आहे. जे विचारील, त्याला ती प्रतिसाद देते आणि तिच्या समजुतीनुसार समजून सांगत राहते. आजच्या नव्या पिढीच्या मातांसाठी ‘श्‍यामची आई’ मला म्हणूनच महत्त्वाची वाटते. 

आज एकतर मुलांशी बोललंच जात नाही व जे बोललं जातं, ते मुलाच्या करिअरच्या भाषेत आणि मुलाला त्याचे दोष सतत सांगत! मात्र, श्‍यामनं इतक्‍या गंभीर चुका करूनही ती करुणेनं सतत ओथंबलेलीत राहते. आज अशा प्रकारचा संवाद आणि मुलांशी त्यांच्या पातळीवर जाऊन व्यक्त होणंच कमी झालं आहे. असलाच तर ‘श्‍यामच्या आई’चा हा धागा महत्त्वाचा आहे. अभावातला आनंद आणि समर्पणातला आनंद ती मुलांना शिकवते. सणाच्या दिवशी नेसण्यासाठी तिला स्वत:ला नवी साडी नसते. पतीचं धोतरही फाटलेलं असतं. तेव्हा आलेल्या भाऊबिजेतून ती पतीसाठी नवं धोतर आणते. एकमेकांसाठी काय करायचं असतं, याचं भान मुलांना अशा प्रसंगांमधून येतं. आजच्या पिढीच्या मातांसाठी श्‍यामच्या आईचं आज काय औचित्य आहे? 

अनेक जण म्हणतील ः ‘आज काळ बदलला आहे. आजचे प्रश्न वेगळे आहेत. मुलं आता काही श्‍यामइतकी भाबडी राहिलेली नाहीत. मोबाईल आणि संगणक वापरत ही पिढी खूप पुढं गेली आहे. हे जरी खरं असलं तरी मुलांमधलं बालपण जागवायला, मुलांना संवेदनशील आणि सामाजिक बनवायला श्‍यामच्या आईचीच पद्धती वापरावी लागेल. आज मध्यमवर्ग/उच्च मध्यमवर्गात मुलांवर सुखांचा मारा होतो. त्यातून त्याच्या संवेदना तरल राहत नाहीत. अभाव वाट्याला न आल्यानं गरिबी, वंचितपणा यांची वेदना त्यांना कळत नाही किंवा आजूबाजूचं जगही सुखवस्तू असल्यानं गरिबांच्या जगण्याचा परीघच त्यांच्या परिचयाचा होत नाही. त्यातही पुन्हा वाचन-संगीत-निसर्ग आदींबाबतचे अनुभव अनेक घरांत न दिले गेल्यानं मुलं टीव्ही-मोबाइल-कार्टून-दंगामस्ती असले ‘आनंदाचे स्वस्त मार्ग’ शोधतात व त्यातून त्यांची विचारशक्ती व संवेदनाच विकसित होत नाही. 

आपली मुलं एकमेकांशी ज्या विषयांवर गप्पा मारत असतात ते पाहता आणि ज्या वेगानं ती आत्मकेंद्रिततेकडं चाललेली आहेत, ते पाहता समाजातल्या वंचितांविषयीची वेदना त्यांना हलवत नाही. ‘मुलांचं कोलमडणारं भावविश्व’ ही एक अतिशय चिंतेची बाब सध्या बनू पाहत आहे. हीच मुलं उद्या अधिकाराच्या वेगवेगळ्या पदांवर काम करणार...निर्णयप्रक्रियेत सहभागी होणार...पण मग त्यांना गरिबांचे, पर्यावरणाचे, भोवतालाचे प्रश्न तरी कळतील का? त्यांचा अहंकारही चुकीच्या पद्धतीनं विकसित होत आहे व हीसुद्धा काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. थोडं काही बोललं तरी मुलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणं आहेत. 

पालकांची स्वयंव्यग्रता हीही एक समस्या बनलेली आहे. पालक बाहेर दिवसभर कामात व्यग्र आणि घरी आल्यावर टीव्ही-मोबाईल-सोशल मीडिया यांतच रमून गेलेले! ‘मुलांची आई’सुद्धा याला अपवाद नसते. यातून मुलांशी संवादच बंद झालेला आहे. घरात पाहिजे त्या वस्तू मिळत आहेत; पण प्रेम आणि संवाद मिळत नाही! यातून मुलं प्रेम दुसरीकडून मिळवतात आणि संवादही चुकीचा करू लागतात.इथंच नेमकी ‘श्‍यामची आई’ मला महत्त्वाची वाटते. ती मुलाशी *सतत बोलत राहते. न चिडता ती त्याला समजून घेते. छोट्या छोट्या प्रसंगांतून त्याला मूल्यांचा परिचय करून देते. केवळ शब्दांनी संस्कार करण्यापेक्षा आपल्या अपरिमित कष्टांनी आणि मायेनं ती संस्कार करते. मुलांशी बोलावं कसं एवढं शिकण्यासाठी  ‘श्‍यामची आई’ प्रत्येक पालकानं वाचायला हवी. आपलं ‘पालक असणं’ हे आपल्याला त्या आरशात तपासून बघता येईल!

२ नोव्हेंबर... साने गुरुजी यांच्या आईचा म्हणजेच  श्यामच्या आईचा स्मृतिदिन.
त्यानिमित्ताने प्रसिद्ध लेख 

 हेरंब कुलकर्णी
मुपोता अकोले जि अहमदनगर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com