Top Post Ad

दरारा, तुझं नाव इंदिरा ! - संजय आवटे

कमला हॅरिस यांच्या विजयी सभेत एका बच्चूनं आपल्या तेवढ्याच गोड आईला विचारलं होतं- "आई, ही कोणय गं?"
"अरे, ही आपल्या देशाची नवी 'व्हाइस प्रेसिडेंट' आहे."
बच्चू म्हणाला, "अगं पण आई, ही तर बाई आहे!"
अमेरिकेतल्या कुठल्या तरी चॅनलवर हा प्रसंग पाहिला. बाई आहे आणि तरी 'व्हाइस प्रेसिडेंट' आहे, याचं ज्या अमेरिकेला २०२० मध्ये कौतुक आहे, त्यांना इंदिरा गांधी १९६६ मध्ये भारताच्या पंतप्रधान झाल्यावर कसला धक्का बसला असेल!
भारतात हा धक्का सामान्य लोकांना फार कमी बसला होता. कारण, त्यांनी तिला मनोमन स्वीकारलं होतं. कॉंग्रेसमधल्या बड्या दिग्गजांना आणि विरोधी राजकीय नेत्यांना मात्र 'ती' असल्याचा धक्काच अधिक होता. महिलेला विरोध करताना, अनेकदा हा पितृसत्ताक दृष्टिकोन त्यात अनुस्यूत असतो, हे आजही लक्षात घेतले पाहिजे. निक्सन आणि किसिंजर यांना इंदिरा गांधी आवडत नसत, हे तर स्वाभाविक आहेच. पण, नेहरूंचे मित्र असलेल्या केनेडींच्या बायकोलाही इंदिरा खटकणे, यात सत्तास्थानी 'ती' आल्याचा त्रास अधिक दिसतो.
सामान्य माणसाला मात्र इंदिरा अत्यंत प्रिय होती. अगदी युरोप आणि अमेरिकेतही तेव्हा इंदिरेमुळे भारावलेली लाट होती. तेव्हा अशी माध्यमं नव्हती, जग जवळही आलेलं नव्हतं आणि त्या जगात 'भारत' असा दखलपात्र देशही नव्हता. तरीही, इंदिरेचं कौतुक विलक्षण होतं. म्हणजे, बेनझीर भुट्टोंनी स्वतःच लिहिलं आहे, 'सिमला करारा'च्या वेळी झुल्फिकार अली भुत्तो छोट्या बेनझीरला सोबत घेऊन आले. कारण, तिनं इंदिरा गांधींना पाहावं, अशी त्यांची इच्छा होती. पाकिस्तानची ती गंमतच आहे. म्हणजे, जिनांना 'नेहरू' व्हायचं होतं, तर बेनझीरला 'इंदिरा'. असो, तर इंदिरा ही तेव्हा अशी सर्वांची 'आयकॉन' होती.
नयनतारा सहगल यांनी एक प्रसंग नोंदवलाय. बेटी फ्रायडन नावाच्या अमेरिकन स्त्रीवादी लेखिकेला इंदिरा गांधींची मुलाखत घ्यायची होती. इंदिरा तेव्हा नुकत्याच पंतप्रधान झालेल्या. या फ्रायडन बाईंनी नयनतारांना फोन करून विचारलंः अगं, महिला पंतप्रधानांना मी आयुष्यात पहिल्यांदाच प्रश्न विचारणार आहे. मी उत्सुक आहे. पण, गोंधळलीही आहे. काय विचारू, तेच कळत नाही.
त्यावर नयनतारा म्हणाल्याः पंतप्रधानांना जे विचारायचं ते विचार. तसंही इंदिरा महिला आहे की पुरूष, हा मुद्दाच नाही. ती पंतप्रधान आहे!
इंदिरा गांधी. ...........वयाच्या अठराव्या वर्षी आई गेली. बाप स्वातंत्र्यलढ्यात आणि निम्मा वेळ तुरूंगात. त्याची भेट अपघातानेच. अलाहाबाद, स्वित्झर्लंड, पुणे, शांतिनिकेतन, इंग्लंड असं ठिकठिकाणी शिक्षणासाठी धावावं लागलेलं. पुढं पंचविशीत लग्न झालं. नवराही अगदी अकाली गेला, तेव्हा ती चाळीशीत होती. अशी एकाकी, अबोल, भावविभोर मुलगी कणखर राजकीय नेता म्हणून कशी वाढत गेली, हा प्रवास चित्तथरारक आहे. एकतर, नेहरू दूर खरेच, पण पत्रांतून- निवडक भेटींतूनही तिला उद्यासाठी तयार करत होते. शिवाय, इंदिरा स्वतः कमालीची बुद्धिमान. एकाचवेळी अनेक भाषा अवगत असणारी, आत्यंतिक एकाग्र आणि आकलनाची तीव्र क्षमता असणारी.
त्यातून, इंदिरा नावाचं रसायन घडत गेलं.
शीतयुद्ध सुरू असतानाचा काळ आठवा. सत्तरच्या दशकात शेजारच्या अफगाणिस्तानात सोव्हिएत फौजा दाखल झालेल्या. अमेरिकेने पाकिस्तान आणि अल-कैदाला बळ देत त्यांच्या पाडावाची पूर्ण तयारी केलेली. अमेरिकेचा पुढचा शत्रू भारत असल्याचे स्पष्ट झालेले आणि सोव्हिएत युनियन भारताबद्दल साशंकच असलेले. तरीही, अमेरिकापुरस्कृत पाकिस्तानचा इंदिरा गांधींनी पूर्ण पराभव केला. त्यातून बांग्लादेश जन्माला आला. अमेरिकेने आपले सातवे आरमार धाडले, एवढा हा प्रश्न भयंकर होता. पण, हा पुढचा मुद्दाही इंदिरा गांधींनी असा लिलया हाताळला की, जगात त्याला तोड नाही. लेबनान, कोसोवो; नंतर इराक, अफगाणिस्तान वगैरे प्रकरणी पाश्चात्यांनी केलेले हस्तक्षेप जगाने पाहिले आहेत. मात्र, ज्या पद्धतीने इंदिरा गांधींनी हा हस्तक्षेप सर्वार्थाने हाताळला, तो जगाच्या इतिहासात एकमेव आहे.
कॉंग्रेस पक्षही इंदिरा गांधींनी आपल्या शैलीने विकसित केला.
पक्ष अनेकवेळा फुटला, पण बाई तुटल्या नाहीत. कारण, दरबारी राजकारणातून त्यांनी पक्ष बाहेर नेला आणि थेट लोकांना कौल मागितला. कॉंग्रेस पुन्हा लोकचळवळ झाली. चौदा बॅंकांचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतर १९६९ मध्ये लोकांमध्ये जी आनंदाची लहर होती, ती अशी होती की, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत अशा प्रकारचे वातावरण होते. पंतप्रधानांवर भारतीय लोक किती प्रेम करतात, याचा तो पुरावा होता, असे निरीक्षण एका श्रीलंकन पत्रकाराने तेव्हा नोंदवलेले आहे.
पक्ष फुटत असताना, इंदिरा गांधी मात्र लोकांच्या अधिक जवळ चालल्या होत्या.
विरोधकांसाठी महिषासुरमर्दिनी (किंवा 'दुर्गा'!) असलेल्या इंदिरा सामान्य माणसासाठी अम्मा होत्या, आई होत्या, घरातल्या कोणी होत्या. अखेरच्या काळात नेहरूंच्या सहकारी असलेल्या इंदिरांनी (बाह्य आणि देशांतर्गत) विरोधकांचे विखारी रूप पाहिलेले होते. त्यामुळे असेल कदाचित, पण विरोधकांचा पाडाव करताना, त्या अत्यंत पोलादी होत्या. त्याचवेळी, समाजवादाचे नेहरूंचे स्वप्नही उराशी बाळगून होत्या. ही दोन्ही रुपे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ठायी ठायी दिसतात.
इंदिरा गांधींना विरोध होणे स्वाभाविक होते. तशी कारणे होतीच. (त्यावर मी यापूर्वी विस्ताराने लिहिले आहे.) लोकशाहीत विरोधाची स्पेस असायला हवीही. पण, त्या नादात विरोधकांनी एवढे ताळतंत्र सोडले की विचारधारा वगैरे गळून पडल्या. गांधींजींच्या मारेक-यांना त्यातून पहिल्यांदा भारतीय राजकारणाचे दरवाजे उघडले गेले. त्यातून पुढे काय झाले, ते आपण पाहात आहोत. बिहारमध्ये नितीश, सुशील मोदी अथवा भाजप आणि पासवान ही सगळी समीकरणे जी आज दिसताहेत, ती त्या काळाची 'देण' आहे. 'जनता पार्टी' हा वारसाही पुढे कोणी चालवला, त्याला भारतीय इतिहास साक्ष आहे. इंदिरा गांधींना विरोध करताना कोणतीही साधनशूचिता बाळगली गेली नाही. त्याचे पुढे व्हायचे तेच झाले. असो.
अर्थात, सगळ्या विरोधाला इंदिरा पुरून उरल्या. 'इंदिरा' हा शब्दच भारतीय शब्दकोशांमध्ये त्या खास व्यक्तिमत्त्वासह नोंदला गेला.
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इंदिरेने जातानाही जगाला धक्का दिला.
गांधीजींच्या खुनानंतर, सरोजिनी नायडू म्हणाल्या होत्या, "बस करा आता हे रडणं! गांधीजी काय म्हातारपणी, अंथरूणाला खिळून मरण्यासाठी असतात काय? ते असेच जाणार होते. असेच जायला होते. कारण, ते गांधीजी होते!"
इंदिरा गांधींबद्दल वेगळं काय म्हणणार?
***
(संदर्भः ...........बेनझीर भुत्तोंच्या 'डॉटर ऑफ डेस्टिनी'सह बरेच. पण, प्रामुख्याने नयनतारा सहगल यांचे 'इंदिरा गांधी- ट्रिस्ट विथ पावर' हे पुस्तक. पुपुल जयकर यांच्याप्रमाणे नयनतारा या इंदिरा गांधींच्या फॅन नव्हेत. उलट विरोधकच जास्त. नयनतारा ही इंदिरा गांधींची आत्तेबहीण. नेहरूंची बहीण असलेल्या विजयालक्ष्मी पंडीत यांची मुलगी. इंदिरेची विरोधक असूनही, नयनतारा जे नोंदवतात, ते जास्त महत्त्वाचे.
खाली या पुस्तकाचे कव्हर आहे. नयनतारांनी त्यांच्या स्वाक्षरीसह हे पुस्तक मला दिलंय, ही फक्त 'मी'पणाची एक नोंद!)

---------------------------------------- टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com