Top Post Ad

अहिंसेचा हिंसक प्रचारक

 


सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा -
"सरदार पटेल : कुरूंदकरांच्या नजरेतून...."

नरहर कुरुंदकर यांनी “सोबत”च्या १९७५ च्या दिवाळी अंकात “सरदार पटेल: काही समाज व गैरसमज” या नावाने हा लेख लिहिला होता. तो “आकलन” या पुस्तकात पुनर्मुद्रित करण्यात आला आहे (प्रकाशक: देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स प्रा.लि.). आज सर्वत्र मतांचा गलबला दिसत आहे. हिंदुत्ववादी सरदारांना हिदुत्ववादी ठरवण्यासाठी पेटून उठलेले आहेत... या सर्व पार्श्वभूमीवर कुरुंदकरांसारख्या विचारवंताचे मत तरुणांसमोर येणे अत्त्यावश्यक असल्याने पुढील ब्लॉग लिहीला आहे. 

नेहरूंनी सरदार पटेल यांना पाण्यात पाहिले आणि पंतप्रधान होऊ दिले नाही असा एक अतिशय प्रसिद्ध सिद्धांत काही लोक नेहमी हिरीरीने सांगत असतात. सरदार पटेल स्वत: कोणी कच्च्या गुरुचे चेले नसून नेहरू यांच्यासारखेच उच्च विद्याविभूषित बॅरिस्टर आहेत ! नेहरू आणि सरदार यांच्यातील सत्ता समतोल बघितला तरी नेहरू यांनी पटेलांना डावलले हा सिद्धांत खोटा ठरतो. त्या बद्दल कुरुंदकर या लेखात लिहितात:
...... “नेहरू वाटतात तितके डावे नव्हते, ते मध्यकेंद्राच्या डावीकडे होते. सरदार वाटतात तितके उजवे नव्हते. ते मध्य केंद्राच्या उजवीकडे होते”

“महाराष्ट्रात सरदारांची खास माणसे म्हणून जी ओळखली जात त्यात मुंबईचे स.का. पाटील होते. सरदारांच्या मृत्युनंतर ते खासदारही झाले, मंत्रीही झाले. त्यांची शक्ती वाढलीच. मोरारजी देसाई सरदार गटाचे होते. त्यांचीही प्रतिष्ठा वाढतच गेली. सरदारांच्या मृत्युनंतर सरदार गटाचे राजगोपालाचारी गृहमंत्री झाले. सरदार गटाचेच राजेंद्रप्रसाद दीर्घकाळ राष्ट्रपती होते. गोविंद वल्लभ पंत हे स्वातंत्र्यपूर्व काळात कधीच नेहरू गटाचे प्रवक्ते नव्हते. रविशंकर शुक्ला यांचाही नेहरू गट नव्हता. ही यादी वाटेल तितकी वाढविता येण्याजोगी आहे. नेहरूंच्या कारर्कीर्दीत नेहरूवादी मानल्या गेलेल्या काही लोकांचाही अस्त झाला. स्वामी रामानंद तीर्थ हे याचे उदाहरण आहे. तसा काही सरदार पटेल गटातील लोकांचाही अस्त झाला. राजकारणात असे चढ-उतार होतच असतात. त्यांचा गटाशी संबंध नसतो. त्याची कारणे इतर असतात. पुढे चालून भारताचे पंतप्रधान झालेले लाल बहादूर शास्त्री सरदारांच्या मृत्यूपर्यंत नेहरू गटात नव्हते.”

गांधीजींनी नेहरूंना पंतप्रधान करण्यासाठी सरदारांना डावलले का? डावलले असेल तर त्यामागे काय विचार होता? याची समीक्षा करतांना कुरुंदकर म्हणतात की स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान हिंदी भाषिक त्यातही सगळ्यात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचाच असावा हा कॉंग्रेस रणनीतीचा एक भाग समजला पाहिजे. सुभाष बाबू किंवा सरदार पटेल हे भाषिक-दृष्ट्या अल्पसंख्य राज्याचे प्रतिनिधी आणि नेहरू उत्तर प्रदेशचे म्हणून नेहरूंना प्राधान्य दिले गेले असा हा तर्क आहे. या विषयी गांधी-सरदार-नेहरू यांच्यात मतभेद होते का यावर मत देतांना कुरुंदकर म्हणतात-

.....”सरदारांना या वास्तुवादाचे भान होते. जवाहरलाल नेहरू जनतेचे लोकप्रिय नेते होते, तरुणांचे नेते होते, अल्पसंख्यांक समाजाचे विश्वासपात्र होते आणि उत्तर भारतीय होते. तेच पंतप्रधान होणार ही गोष्ट स्वाभाविकही आहे व भारतीय अखंडतेसाठी नवजात स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आवश्यकही याची सरदारांना नेहमीच जाणीव होती. “I am there where Bapu put me and I shall remain there as long as Bapu wants so” असे सरदारांनी आपल्या स्थानाचे जाहीर सभेत स्पष्टीकरण केले आहे. या वाक्याचा गर्भित अर्थ असा की नेतेपदी यायचे नाही , संघटनेची सूत्रेच फक्त हाती ठेवायची असा आमचा उभयतांचा एकमताने निर्णय आहे. म्हणून मी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करणार नाही आणि संघटनेची सूत्रेही सोडणार नाही. सरदारांनी श्रेय मात्र नेहमीप्रमाणे बापूंना दिले आहे. गांधीजींचे प्रेम सरदारांवर कमी नव्हते, नेहरूंवर जास्त नव्हते, पण सर्वांच्यापेक्षा भारताच्या भवितव्यावर गांधींचे प्रेम अधिक होते असा याचा अर्थ आहे.”

नेहरू की सरदार असा पेच गांधीजींच्या समोर होता का? तसा तो होता असे दिसत नाही कारण १९४५ मध्ये तुरुंगातून सुटल्यावर सरदार मरणोन्मुख अवस्थेत होते. त्यावेळी सरदारांचे वय ७० वर्षे होते (जन्म १८७५) आणि त्या वयात ६० नंतर लोकांनी निवृत्त झाले पाहिजे असा सरदारांचा स्वत:च असलेला आग्रह, अनेक वर्षांपूर्वीच पत्नीच्या मृत्यूने उध्वस्त झालेली कौटुंबिक आस्था, बिघडलेली शारीरिक अवस्था यामुळे स्वत: सरदार पटेल या पदासाठी आग्रही नव्हते. कुरुंदकर लिहितात     “ अशाही अवस्थेत अत्यंत कणखरपणे ते वागत गेले हा धैर्याचा भाग आहे. सत्तेचा मोह असण्यासाठी आता जीवनाची शाश्वतीच नव्हती. 

४ मार्च १९४८ ला(म्हणजे स्वातंत्र्यानंतर केवळ ७ महिन्यात) त्यांना इतका जोराचा हृदयविकाराचा झटका आला की ते जवळजवळ गेलेच होते. डॉक्टरांनी सर्व आशा सोडून दिली होती तरी त्यातून ते वाचले. त्यानंतर तर त्यांनी सर्वांना सांगितले की ‘आता आजारी असल्याची बातमी येईल अशी आशा करू नका, आता कोणत्याही क्षणी बातमी मृत्यूचीच येईल. मी सुद्धा सकाळी काम करताना संध्याकाळी आपण ते पूर्ण करू ही आशाच सोडलेली आहे. कारण दरक्षणी आम्ही मृत्यूच्या दारात उभे आहोत. जाणत्या वाचकांना हे कळावे की हा झटका गांधी हत्येनंतर सव्वा महिन्याच्या आत आला आहे तेव्हा क्षोभाचा उगम कुठे असला पाहिजे. हे ही लक्षात घ्यावे की यानंतर सरदार सुमारे २१ महिने जिवंत होते. हा तो काळ नव्हे ज्यावेळी माणूस असलेला नेता बदलून सूत्रे स्वत:च्या हातात घेण्याचा प्रयत्न करील”  सरदारांचेच एक वाक्य कुरुंदकर उधृत करतात ते म्हणजे ‘इच्छा बाळगण्यासाठी माणूस तरुण आणि निकोप असावा लागतो, आम्ही तसे नाही’.... म्हणजेच गांधीजींना नेहरू की सरदार अशी द्विधा निर्माण होण्याची स्थितीच नव्हती ही गोष्ट लोक लक्षातच घेत नसावेत !

सरदार पटेल हिंदुत्ववादी होते का? या मुद्द्यावर कुरुंदकर लिहितात:
“हिंदू मुस्लीम प्रश्नाबाबत सरदारांचे नाव घेऊन लोक फार गोष्टी बोलतात. सरदार कधी हिंदुत्ववादी नव्हते. अखंड भारत टिकवण्यासाठी मुसलमानांना विभक्त मतदारसंघ, विशेष आश्वासन, विशेष अधिकार, राखीव जागा इत्यादी सर्व देण्यास ते तयार होते. वायव्य सरहद प्रांतात सरहद गांधी (खान अब्दुल गफ्फार खान) यांनी नेते असावे, काश्मिरात शेख अब्दुल्लानी पंतप्रधान व्हावे याला त्यांचा विरोध नव्हता. सर्व मुसलमानांना पाकिस्तान मिळाल्यानंतर सुद्धा बरोबरीचे अधिकार असावेत यावर त्यांनी कधी खळखळ केली नाही, पण इतके सगळे झाल्यानंतर मुसलमानांनी या राष्ट्रावर प्रेम करावे हा त्यांचा आग्रह होता. ते सावरकरांचे अनुयायी किंवा गोळवलकर गुरुजींचे अनुयायी जाहीरपणे तर नव्हतेच पण मनातूनही कधी नव्हते. गांधी नेहरूंची भूमिका मुस्लीमधार्जिणी आहे असा त्यांचा आरोप नव्हता.”

सरदार पटेल यांचे चालले असते तर फाळणी झाली नसती असा एक बावळट युक्तिवाद सरदारांना हिंदुत्ववादी ठरवू पाहणारे हौशी लोक करतात त्यावर कुरुंदकरांनी मांडलेली वस्तुस्थिती अशी आहे “सरदारांनी फाळणीची कल्पना प्रथम मान्य केली असा मौलाना आझादांचा आरोप आहे. फाळणीची कल्पना मूळ माउंटबॅटन यांची. ती प्रथम पटली सरदारांना, नंतर नेहरूंना. शेवटी गांधींना. आपण मात्र शेवट पर्यंत अखंड भारतवादी राहिलो असा दावा मौलानांनी केला केला. दावा खरा आहे. मौलाना अखंड भारतवादी होते, त्यासाठी कोणतीही किंमत देण्यास तयार होते. ३५ कोटी हिंदूंचे जीवन उद्ध्वस्त करून अखंड भारत टिकविण्या इतके स्वप्नांचे प्रेम गांधी-नेहरू-पटेलांना नव्हते. किंमत मर्यादेच्या पलीकडे जाऊ लागताच हे तिघेही तुकडे पडण्यास तयार झाले, ही गोष्ट खरी आहे.”

जे हिंदुत्ववादी (?) भावविवश होऊन फाळणीचा विचार करतात आणि आजच्या काळात देखील अखंड भारत वगैरे अशक्य स्वप्ने पाहतात त्यांनी ही समीक्षा आवर्जून वाचलीच पाहिजे.

गांधी आणि सरदार यांचे वैयक्तिक संबंध कसे होते? यावर कुरुंदकर लिहितात- “कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांपैकी ज्यांनी गांधींची व्यक्तिगत सेवा केली, अगदी त्यांचे कपडे धुणे, अंथरून टाकणे असे परीचर्येचे काम केले, असे सरदार एकटेच आहेत आणि ज्यांची व्यक्तिगत सेवा गांधीना करावी लागली असेही कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सरदारच आहेत.”.... गांधींनी म्हटले आहे : "मला सरदारांना काही विचारावेच लागत नाही. माझ्या मनात सरदारांची प्रतिमा आहे, तिला मी विचारतो आणि बहुधा माझ्या मनातील प्रतिमेचे जे उत्तर दिले असते ते शरीरधारी माणूसही देतो’ इतके सरदारांचे मत गांधींना परिचित होते. सरदारांची भाषा कधीच हिंसक कधीच नव्हती, गांधी त्यांना ‘अहिंसेचा हिंसक प्रचारक’ असे म्हणत ”.

सुनिल पाटील


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com