हर सवाल का जवाब...बाबासाहब ! - रवि भिलाणे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं मोठेपण सांगण्याचा हा प्रयत्न नाही.किंवा बाबासाहेब कसे सर्वव्यापी आहेत हे सांगून त्यांनीच नाकारलेली व्यक्तिपूजा करण्याचाही हेतू नाही.मुद्दा सरळसोट एव्हढाच आहे की आज आपल्या देशासमोर जे प्रश्न उभे आहेत,त्यांची उत्तरं बाबासाहेब देतात हे पुन्हा एकदा नव्हे तर वारंवार ठासून मांडायचं आहे.हे एव्हढ्यासाठी मांडायचं की ज्यांना कुणाला बाबासाहेब कळतात,पण वळत नाहीत त्यांचं वळण सरळ व्हावं.बऱ्याच जणांना मनोमन हे मान्यही असतं पण जाहीरपणे कबूल करायचं नसतं. आणि जे तोंडदेखलं बोलतात मात्र कृती भलतीच करतात अशांना भविष्यातील धोका वेळीच लक्षात आणून द्यावा म्हणून हे वारंवार सांगावं लागेल.जे लोकशाही आणि संविधानासाठी लढताहेत पण त्याच्या शिल्पकाराला नाकारण्याचा करंटेपणा करतायत त्यांना वेळीच सावध करण्यासाठी हे ठामपणे सांगावच लागेल...प्रत्येक प्रश्नाचं उत्तर,बाबासाहेब आंबेडकर !
भारतातील गेल्या काही वर्षातील परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की देशभरातून उपेक्षित वंचित समूहातील किंवा प्रस्थापित समूहातून सुद्धा जो काही विद्रोहाचा आवाज उभा राहतोय त्याचा नायक बाबासाहेब हेच आहेत.आंध्रमधील रोहित वेमुलाची शहादत असो,गुजरातेतील उना मधल्या दलितांचा संघर्ष असो,जमिया मिलिया किंवा दिल्लीतल्या जेएनयू मधला विद्यार्थ्यांचा संघर्ष असो,उत्तरप्रदेशातील बलात्कारीत मुलीला जाळण्याचं प्रकरण,राजस्थानातील उच्च वर्णीयांच्या माठातील पाणी पिला म्हणून चौथीच्या विद्यार्थ्याचं खून प्रकरण,एनआरसी- सीएए विरोधात देशभर उसळलेला आक्रोश,या आणि अशा असंख्य घटनांमध्ये संघर्षरत जनतेच्या लाखो करोडो मुखातून एकच हुंकार बाहेर पडत होता आणि आहे तो म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर !
वरील प्रश्न सामाजिक न्यायाचे म्हणून कोणी त्यांना तेव्हढ्यापुरते बंदिस्त करून नामानिराळे होऊ पाहतील कदाचित.पण कामगार शेतकऱ्यांसाठी असलेले कायदे भिरकावून दिले जात असताना मजूर मंत्री,कायदेमंत्री म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली पायाभरणी कशी नाकाराल ? वेळ येताच स्त्रियांच्या अधिकारांसाठी तेच मंत्रीपद भिरकावून देणारे आंबेडकर विसरणं कसं शक्य आहे ? कोणी न मागताच देशातल्या प्रत्येक नागरिकाला एक मत एक पत असा मतदानाचा अधिकार देणारा हा द्रष्टा महामानव पिढ्यानपिढ्या गरीबातल्या गरिबाला पण राजसत्तेची किल्ली बहाल करतो.पण आपल्यालाचं त्याचा वापर करता येत नाही अन आपण अवदसा ओढवून घेतो. देशातील भरभराटीचे सार्वजनिक उद्योग कवडीमोल भावाने भांडवलदारांच्या घशात घातले जात असताना,सरकारी बँका बुडवून चोर लुटारू देशाबाहेर फरार होत असताना,बेरोजगारी- महागाई सामान्यांच्या जगण्याला फास लावत असताना अर्थतज्ञ बाबासाहेब नाकारण्याचा कर्मदरिद्रीपणा देशाच्या विकासाला आणि अर्थव्यवस्थेला नख लावणार नाही तर आणखी काय करणार ? खाजगिकरणाने नोकरीधंद्याचे मार्ग बंद झाल्यावर आरक्षणाची दारे ठोठावतानाही, ती हक्काची सनद देऊन गेलेल्या बाबासाहेबांनाच तिरस्कृत ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न अंगाशी आल्याशिवाय कसा राहील ? ज्यांचं राजकीय आरक्षण नाकारलं गेलं तेही बापाला नाकारून भलत्यालाच गॉड फादर समजून त्यांच्या पायावर डोकं ठेवताना पाहून त्यांच्या धडावर त्यांचं स्वतःच डोकं नसल्याची खात्रीच पटते. देशात धर्मांधता, द्वेष आणि हिंसा वाढत असताना,ज्याने प्रत्येकाला आपापला धर्म जपण्याची संवैधानिक ग्वाही दिली त्यालाच धर्मशत्रू ठरवू पाहणाऱ्या गाफीलांना धर्मनिरपेक्षतेचा उतारा कसा पचनी पडणार ? अजूनही वेळ गेलेली नाही.सुधरा रे...!
वर उल्लेख केलेले सर्व प्रश्न वरवर स्वतंत्र वाटत असले तरी त्यांचं मूळ एकच आहे.काही मूठभरांना वर्णश्रेष्ठत्व जपायचं आहे.इतरांना गुलाम करायचं आहे.सनातन संस्कृतीच्या नावावर इतरांची दाणादाण करायची आहे.सत्ता,संपत्ती,प्रतिष्ठा आपल्याच हातात ठेवायची आहे.त्यासाठी राजकारण,अर्थकारण त्यांच्या मनासारखं राबवायचं आहे.वापर करून फेकून द्यायचं आहे.त्यांना हुकूमशाही आणायची आहे.त्यासाठी देशातील जनतेची गरिबी,अज्ञान,बेकारी, विषमता,द्वेष,हिंसा ही त्यांची गरज आहे.ती कशी वाढेल याचा ते प्रयत्न करताहेत.तर बाबासाहेब न्याय,स्वातंत्र्य,समता या तत्वांचा पुकारा करतात.देशाला विकसित आणि आधुनिक बनवण्याचा मार्ग सांगतात.त्यासाठी लोकशाही आणि संविधान देतात.म्हणून त्यांना बाबासाहेब हेच त्यांचे सर्वात मोठे शत्रू वाटतात.आणि म्हणूनच बाबासाहेब हेच आपले सेनापतीही ठरतात.वैदिक विरुद्ध बौद्धिक असा हा सांस्कृतिक संघर्ष आहे.बुद्ध,चार्वाक,कबीर,संत परंपरा,शिव- शाहू-फुले तसेच जिजाऊ,सावित्रीमाई अशा महामातांचा वारसा जोपासत, रमाईच्या साथीने वाटचाल करणारे बाबासाहेब आपल्याला आधुनिक राष्ट्र निर्मितीकडे,प्रबुद्ध भारताकडे घेऊन जातात.मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय, हा मंत्र देतात आणि या दीर्घ पल्याच्या लढाईत आपल्या विजयाची शाश्वती देतात!म्हणूनच म्हणावसं वाटतं...
0 टिप्पण्या