Top Post Ad

हिंदुत्ववादी भूमिका अळवावरच्या पाण्याच्या थेंबासारखी!


 परिवर्तनवादाशिवाय शिवसेनेला पर्याय नाही

१९६६ साली स्थापन झालेल्या व ५६  वर्षांची लढाऊ परंपरा असलेल्या शिवसेना या राजकीय पक्षाला आयोगाने पक्षपाती निकाल देऊन गोठवला.  शिंदे गटाचे पाप,समर्थकाच्या माथी? आतातरी समर्थक म्हणविणाऱ्यांचे डोळे उघडतील अशी आशा आहे. तुमच्या या अश्लाघ्य म्हणजेच घाणेरड्या निष्ठेनेच पक्ष संपुष्टात आला. आयोगाचा निर्णय काहीजरी असला, तरी फुटीरांनी आणि समर्थकांना काळ कधीच क्षमा करणार नाही. पक्ष मोडीत काढून भाजपनिष्ठेचे प्रमाणपत्र गळ्यात बांधून लेकाचे फिरणार याची आम्ही केव्हाच अटकळ बांधली होती. आयोगाचा हा  निकाल म्हणजे भाजपसाठी सुंठीवाचून खोकला गेला या पठडीतलाआहे.  परिवर्तनवाद्यांनी उद्धवजींना केव्हाच पाठिंबा जाहीर केला आहे! परिवर्तनाच्या राजकीय लढ्याचा बिगुल वाजला असून, येथून पुढे उद्धव ठाकरे आणि समर्थकांना एकला चलो रे भूमिका घेऊन वाटचाल करता येणार नाही हेही या निकालाने सिद्ध केले.

 बापहो, सांगा ना,  हिंदुत्व कामी आले?

आम्ही या आधीही लिहिले आणि आताही आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. न्यायालयाने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केल्याचे आठवत असेलच. त्यावेळी शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, शिवसेना झिंदाबाद अशा घोषणा दिल्या. परंतु हा विजय संविधानामुळे प्राप्त झाला याचा शिवसैनिकांना विसर पडला. त्यावेळी संविधानाचा विजय असो अशा घोषणा का दिल्या नाहीत? हा मतलबीपणा येथून पुढे चालणार नाही! यात सामान्य कार्यकर्त्याचा दोष नाही. कारण ज्या पक्षाचा अजेंडाच धर्मावर आधारित आहे, आणि धर्मप्रामाण्याशिवाय एक इंच पुढे सरकण्यास  जेथे वाव नाही, तेथे संस्कारक्षमतेचा विचार फलद्रूप होईल ही अपेक्षा बाळगणे म्हणजे खोल समुद्रात गहाळ झालेल्या अंगठीचा शोध घेण्यासारखे होते व आहे. मात्र मविआ सरकारमध्ये येण्याआधीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या चूका उद्धवजींनी सुधारल्या. २०१४ पासून उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली.

१) आम्हाला भाजपचे हिंदुत्व मान्य नाही.
२) जानव्यातले व शेंडीधारी हिंदुत्व मला   मान्य नाही.
३) आमचे हिंदुत्व मनात राम आणि हाताला  काम या पठडीतले आहे.
४) मी आंबेडकर भक्त, अंधभक्त नाही!
५) भाजपने हिंदुत्वाचे पेटंट घेतले आहे का?
     ( लोकमत, सोमवार, दि.११.४.२०२२)

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेने भाजपला चटके बसत होते,  तर दुसरीकडे पुरोगामी व परिवर्तनवादी ठाकरेंच्यावर फिदा होत होते. सत्ता आजची उद्या मिळेल, पण प्रामाणिक कार्यकर्ता मिळणार नाही असे वेळोवेळी सांगत राहिल्याने, प्रथमच शिवसेना नेतृत्वाकडे राज्यभरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते  व जनता आकृष्ट झाली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन तात्काळ पायउतार झाले. त्यावेळी केलेल्या भाषणाने जनता एवढी भावूक झाली, की सुमारे पंधरा दिवस रेल्वे, बस, बँका, व इतर सार्वजनिक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचीच चर्चा ऐकू येत असे. मात्र बंडखोर, धाकदपटशा दाखवून शिवसैनिकांना आपल्याकडे वळवविण्यात यशस्वी झाल्याची खंत व टीका करून  वरिष्ठ सेनानेत्यांनी वास्तव मांडण्याचा प्रयत्न करूनही बंडखोरांकडील समर्थकांचा ओघ थांबला नाहीच, 

उलट " आम्ही उद्धव ठाकरेंनी  सोडलेल्या हिंदुत्वासाठी बाहेर पडलो.  भाजपशी आमची २५ वर्षांपासूनची मैत्री असून या मैत्रीच्या प्रेमाखातर व प्रधानमंत्री आद. नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही  बाहेर पडलो!" असे जाहीर विधान केले. एकनाथ शिंदे याचे काय चुकले? वास्तव जनतेला माहित असले तरी, शिवसेनेचे बंडखोर नेते एकच जपमाळ ओढत होते, आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेलो! मात्र वास्तव आणि वस्तुस्थिती यांत फरक असतो याचा शिंदे आणि कंपनीला विसर पडला. हिंदुत्वाचे एकच एक पालुपद नाचवून ५० आमदार व १२ खासदार आमच्याकडे असल्याने शिवसेना आमचीच असा सत्ताराग आळवित भाजपच्या व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात घातली. 

पेराल तेच उगवणार हा निसर्गाचा नियम!

यात एकट्या एकनाथ शिंदे यांचा दोष नाही. कारण जे पेराल तेच उगवणार हा निसर्गाचा नियमच आहे. प्रारंभी मराठी माणसाच्या विकासासाठी ही एकमात्र घोषणा देत मुंबईत पाय रोवलेल्या शिवसेनेची कालांतराने भूमिका बदलत गेली. काँग्रेसच्या  मुस्लिमधार्जिण्या धोरणाने शिवसेनाप्रमुख कट्टर हिंदुत्ववादाकडे वळले. इस्लाम खतरेमे या घोषणा हिंदुंच्या मनात तिरस्कार निर्माण करण्यास पुरेशा ठरल्या. पण, इस्लामविरोधी वातावरण निर्माण करणाऱ्या नेमक्या छुप्या प्रवृत्ती कोणत्या? धार्मिकवादाला खतपाणी कोण घालतो? याचा बाळासाहेब ठाकरे यांनी विचार केला असता, तर कदाचित सामाजिक स्तर अधिक समृद्ध झाला असता. परंतु अकारण तळ ढवळल्याने, गढूळ पाणीच वर आले, त्याचा निचरा करण्याचे काम खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांनी केले. 

परिवर्तनाच्या सुत्राचे टोक पकडून सामाजिक समन्वय साधण्याचा प्रयत्न झाला. त्याचवेळी ' आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही' ' असे सांगत राहिले. अर्थात यामागील कारण आपण समजू शकतो. इतकी वर्षे हिंदुत्ववादी विचार आणि धर्माच्या वळचणीत वाढलेली मने, व त्या धर्माचा अंगरखा सहजासहजी बाजूला कसे करतील?  परिवर्तन हा क्रांतीचा भाग आहे. क्रांतीचा अर्थचमुळी हळुहळू होणारा बदल असा होतो, तर झटपट क्रांतीला अपयशाची किनार लाभते! झटपट क्रांतीकारी विचार विनाशाकडे नेतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दिक्षाभूमीवर केलेली धम्मक्रांती हे उदाहरण देता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २१ वर्षे अभ्यास करून धर्मबदलाचा निर्णय घेतला! विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर सार्वजनिक जीवनातून गायब झालेल्या प्रबोधनकारांचे दर्शन झाले तेच उद्धव ठाकरे यांच्यामुळे हे नाकारून चालणार नाही. 

उद्धव ठाकरे नेहमीच संविधानाप्रती आदर व्यक्त करत. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप करताना त्यांनी एकही संधी सोडली नाही. शिवसेनेच्या विचारपीठावर प्रबोधनकारांच्या  प्रतिमा दिसू लागल्या. बाळासाहेब ठाकरेंबरोबरच प्रबोधनकारांनाही अभिवादन होऊ लागले हा लाक्षणिक बदल जरी सुखावह वाटत असला तरीही, प्रबोधनकार ठाकरे ज्यांचा सल्ला घेण्यासाठी राजगृहावर जात असत, त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यास (विरोध नसला तरीही ) विसर का पडला? हा तमाम आंबेडकरवाद्यांच्या मनातला प्रश्न आम्ही  उपस्थित करत आहोत. मराठी माणसाच्या विकास व न्याय-हक्कासाठी उभी राहिलेली शिवसेना, हिंदुत्वाच्या म्हणजेच धर्मप्रामाण्यावर येऊन स्थिरावली. 

बाळासाहेब ठाकरेंना हिंदुहदय सम्राट ही उपाधी देऊन हिंदुत्वाचा नारा बुलंद केला. परिणामतः मुस्लिमांच्या अनेक संघटना कोसो दूर गेल्या. हिंदुत्वाची नशा डोक्यात भिनली नसती तर मागासवर्गीयांवर राज्यभरात अत्याचार झाले नसते. (शिवसेनेचा मुंबई, ठाणे, पुण्याच्या पलिकडे विस्तार होण्याआधीच्या घटना सोडून)  मागासवर्गीय संघटनांच्या मनात या संघटनेविषयी कायम अढी निर्माण झाली. परंतु उद्धव ठाकरेंनी अनेक गोष्टींवर भाष्य करताना, सामाजिक समन्वय कसा महत्वाचा आहे, यावर भर देत धार्मिक तेढ वाढवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मूठमाती देण्याचे काम करू नये अशी वारंवार अपेक्षा व्यक्त केली. अवघ्या अडीच वर्षाच्या कालावधीत जनतेची मने जिंकणारा मुख्यमंत्री अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या या नेत्याला अखेर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी पाठ दाखविली. 

उद्धव ठाकरेंचा स्वतःचा पराभव झाला नसला तरी संघटनेच्या माध्यमातून तो, तत्वतः स्विकारणे भाग पडला याचे कारण हिंदुत्वच आहे!  धार्मिकवादावर उभ्या राहिलेल्या संघटनेचे तत्वज्ञान अळवावरील पाण्याच्या थेंबासारखे असते, जे वाऱ्याच्या हलक्याशा झुळकीनेही घरंगळत खाली येते. सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची अवस्था, स्थिती याहून वेगळी नाही. दि.८  आॅक्टोबर २०२२ रोजी निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हासह पक्षच गोठवला. पक्षाचे  लेबल नसल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा अधिकार पोहचत नाही. पण तेवढी नैतिकता दाखविण्याची धमक सेनेच्या बंडखोराकडे नाही, जी उद्धव ठाकरे यांच्याकडे होती!

गुणाजी काजिर्डेकर, चेंबूर
93236 32320


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com