Top Post Ad

शक्तीप्रदर्शन..... मिडियाने प्रचंड गाजवले


 
शिवसेना आणि शिंदे गटाने दसरा मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तसे दोन्ही दसरा मेळावे मिडियाने प्रचंड गाजवले.  गर्दीचा विक्रम करणारे दोन्ही मेळावे असल्याचे बोलले जात असले तरी सत्ता संघर्षात शिवसेनेची होत असलेली पडझड शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात शिवसेना पुन्हा उभारी घेत असल्याचे दिसून आले. शिंदे गटाच्या आमदारांनी आपापल्या मतदार संघातील अधिकाधिक लोकांना दसरा मेळाव्यासाठी मुंबईत आणून आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.  उध्दव ठाकरे यांचा मेळावा फ्लॉप करण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्या होत्या मात्र सहा वाजल्यानंतर मैदान भरू लागले. शिवाजी पार्कवरील गर्दी अभूतपूर्व अशीच होती. या गर्दीने शिवसेनेच्याच दसरा मेळाव्याचे आधीचे रेकॉर्ड मोडल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेतील आमदार, खासदार आणि नगरसेवक दसरा मेळाव्यात शिंदे गटात दाखल होतील असा दावा शिंदे गटाकडून केला जात होता. तसे काही झाले नाही. शिवसेनेची पडझड झाली नाही. उलट मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व ठरला. राज्यभरातून आमदारांच्या कार्यकर्त्यांना मुंबईत आणून शिंदे गट देखील शक्ती प्रदर्शन करण्यात यशस्वी झाला. मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेचा दसरा मेळावा महत्वाचा ठरला. मुंबईत शिवसेनेला पुन्हा उभारी मिळत असल्याचे या मेळाव्याच्या निमित्ताने दिसून आले. अशीच साथ द्या, पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा बनवून दाखवितो, असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केल्याने शिवसैनिकांमध्ये नवे बळ निर्माण झाले.
दोन्ही मेळाव्यांमध्ये ठाकरे – शिंदे गटांनी एकमेकांवर जोरदार तोंडसुख घेतले. तसे ते पारंपारिकच आहे. या दसरा मेळाव्यांचा राजकीय प्रवास बाळासाहेबांचे काँग्रेस – राष्ट्रवादीवरचे कठोर असूडच होते. आणि आता उद्धव एकनाथांचा एकमेकांवर सूड.असाच झाल्याचे स्पष्ट दिसले., वास्तविक दसरा मेळावा ही बाळासाहेबांच्या शिवसेनेची खासियत. निवडणुका असोत किंवा नसोत, कुठलेही राजकीय प्रयोजन असो अथवा नसो, लाखो शिवसैनिक फक्त आणि फक्त बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठीच दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर जमत असत. लाखोंच्या संख्येने होणाऱ्या बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यासाठी हजारो गाड्यांच्या “व्यवस्था” शिवसेनेला कधी कराव्या लागल्या नाहीत. बाळासाहेबांच्या आवाहनाप्रमाणे नाचत, गुलाल उधळत लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर लोटायचे आणि बाळासाहेब देखील त्यांच्या नेहमीच्या ठाकरे शैलीत काँग्रेस – राष्ट्रवादीसह इतर पक्षांच्या नेत्यांवर अक्षरशः असूड ओढायचे… शिवसैनिक टाळ्या शिट्ट्यांच्या गजरात त्यांना जोरदार प्रतिसाद द्यायचे. बाळासाहेब खरंच टीकेचे आसूड ओढताना “मैद्याचं पोतं”, “बारामतीचा म्हमद्या”, “दाऊदचा हस्तक”, असे बेधडक बोलायचे. सोनिया गांधीचे इटालियन एक्सेंट मधले हिंदी भाषणाची नकल करून वाचायचे. बाळासाहेबांच्या या ओघवत्या शैलीमुळे तर ते सगळे दसरा मेळावे गाजले. बाळासाहेबांनी ओढलेले टीकेचे असूड त्यांच्या विरोधकांना प्रचंड घायाळ करून गेले. विरोधकांच्या पदरात बाळासाहेबांनी सतत राजकीय अपयश घातले आणि बाळासाहेब स्वतः “अजेय” ठरले!!… बाळासाहेब खऱ्या अर्थाने राजकीय ब्रँड बनले!!
पण 2022 च्या दसरा मेळाव्यात ते असूड बाळासाहेबांचा पुत्र आणि बाळासाहेबांच्याच पठ्ठ्यांनी एकमेकांवरच ओढले. शिंदे गटातील नेत्यांनी अधून मधून काँग्रेस – राष्ट्रवादीवर टीकेचे असूड जरूर ओढले, पण मुख्य असूड बाळासाहेबांच्या पुत्राच्या नेतृत्वाखाली शिवसेनेवर ओढले. बाळासाहेबांच्या पुत्राचा असूड तर बाळासाहेबांच्या पठ्ठ्यांच्या शिवसेनेवर चालणार हे उघड होते आणि तो फक्त त्यांच्यावरच चालला हेही दिसले. नाही म्हणायला अधून मधून मोहन भागवत, दत्तात्रय होसबळे वगैरे नावे उद्धव ठाकरेंनी घेतली. “खोकासूर”, “धोकासूर” हे नवे शब्द मराठीला दिले. याच अर्थ असा की, दसरा मेळाव्याचा हा राजकीय प्रवास बाळासाहेबांचे काँग्रेसवर आणि राष्ट्रवादीवर टीकेचे आसूड ते उद्धव – एकनाथांचे एकमेकांवर सूड... असाच दिसला… पण या सर्वांत हे दोन्ही दसरा मेळावे राजकीय दृष्ट्या “एन्जॉय” कुणी केले?  तशी “एन्जॉयमेंटची” संधी त्यांना कोणी उपलब्ध करून दिली? हे समजायला फार मोठा राजकीय अभ्यास करण्याची अथवा राजकीय तत्वज्ञान पाजळण्याची गरज नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com