बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म इच्छा नसताना स्वीकारला, हे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेले विधान चुकीचेच आहे. त्याच्याशी कोणीही सहमत होऊ शकत नाही. बोलण्याच्या ओघात त्यांच्या मुखातून 'ते' वादग्रस्त विधान बाहेर पडले असेल तर आपली चूक मान्य करण्यात त्यांनी संकोच करता कामा नये.अस्पृश्य समाजाच्या प्रति आपला तुच्छतेचा, भेदभावाचा दृष्टीकोन आणि वर्तन बदलण्यासाठी हिंदू धर्माला इशारा देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल २१ वर्षे संधी दिली होती. दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी परिवर्तनाची केलेली प्रतीक्षा हा त्यांचा संयम आणि चांगुलपणा होता. पण त्यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे केलेली धर्म परिवर्तनाची घोषणा केवळ घोषणा नव्हती. ती आत्यंतिक निग्रही अशी 'भीम प्रतिज्ञा' होती... मृत्यूपूर्वी धर्म बलण्याची! त्यानंतर १९३६ सालात 'जाती निर्मूलन' या विषयावर लाहोरच्या जात पात तोडक मंडळाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. त्यांनी त्यासाठी तयार केलेले लिखित भाषण पाहून त्या मंडळाने कच खाल्ली. अखेर न झालेले बाबासाहेबांचे ते लिखित भाषण म्हणजेच त्यांचा ' जाती निर्मूलन' हा ग्रंथ होय!
त्या ग्रँथातून बाबासाहेब हिंदू धर्मियांना काय सांगतात ?
ते म्हणतात : तुम्हाला जातींचा अंत करायचा असेल तर जात पात पाळण्याची शिकवण देणारे धर्मग्रंथ बुद्ध आणि गुरू नानक यांच्याप्रमाणे नाकारावे लागतील.जाती निर्मूलनाचे काम तुमचे तुम्हालाच करावे लागेल. पण मला मात्र माफ करा.मी तुमच्यासोबतीला नसेन. कारण माझा परिवर्तनाचा निश्चय झाला आहे.
बाबासाहेबांनी हिंदूंना हे बजावण्याआधी येवल्यात धर्म परिवर्तनाची भीम गर्जना करून टाकली होती.
अन १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात तथागताचा बुद्ध धम्म स्वीकारताना तर त्यांनी आपला पुनर्जन्म झाल्याची भावना व्यक्त केली होती.
मग बाबासाहेबांचे धर्म परिवर्तन.... बुद्धाच्या धम्माचा स्वीकार अनिच्छेने केला, असे कोण म्हणेल? तसेच त्यांनी धर्म परिवर्तन हे १९५६ मध्ये केले असले तरी ते व्यक्तिशः खूप आधीच काया वाचा मनाने बौद्ध झालेले होते.
१९३१-३३ च्या दरम्यान त्यांनी मुंबईतील दादर येथे ' राजगृह ' या निवासस्थानाची केलेली उभारणी, १९५१ सालात सिद्धार्थ कॉलेजच्या 'बुद्ध भवन' आणि 'आनंद भवन' या इमारती, त्यानंतर औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना या गोष्टी काय सांगतात?
- दिवाकर शेजवळ - ज्येष्ठ पत्रकार
Facebook
सदर पोस्टवर एका कफल्लक पत्रकाराने आपले विचार पाजळले त्यावर स्वत: शेजवळसरांनीच पुन्हा फेसबूकच्या माध्यमातून त्याला उत्तर दिले ते वाचकांसाठी जसेच्या तसे......
धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुरात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्म परिवर्तनावर केलेली विधाने वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. ती विधाने बोलण्याच्या ओघात आठवले यांच्या मुखातून बाहेर पडली,अशीच माझी अजूनही धारणा आहे. शिवाय, आठवले यांची प्रतिमा आणि ओळख हट्टी,अहंकारी, आठमुठे नेते अशी मुळीच नाही. त्यामुळे अनवधानाने झालेली चूक मान्य करून हा वाद विकोपाला जाऊ न देता त्यावर पडदा टाकायला ते संकोच अजिबात करणार नाहीत,अशी माझी अटकळ होती. माझ्या पोस्टमध्ये मी तीच अपेक्षा व्यक्त करून आठवले यांच्या वादग्रस्त ठरलेल्या विधानांशी असहमती व्यक्त केली होती इतकेच. त्या निमित्ताने धर्म परिवर्तनामागील बाबासाहेबांची निग्रही भूमिका आणि त्यांच्या मनात खूप पूर्वीपासून वसलेल्या बुद्धाचा मागोवा घेतला होता.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
रामदास आठवले यांनी 'डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हिंदू धर्मात परिवर्तन घडण्याबाबत अपेक्षाभंग झाला' असे विधान केले असते तर वाद होण्याचा प्रश्नच उदभवला नसता! असो.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
या वादाला बुधवारी सांम टीव्ही, सकाळ मीडियाने तोंड फोडले. सोशल मीडियावर त्या बातमीवरून चर्चा आणि प्रतिक्रियांचा पाऊस दुपारपासून सुरू झाला होता. पण आठवले यांच्या प्रेस कॉन्फरन्सची क्लिप माझ्या पाहण्यात रात्री आली. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याशी असहमती व्यक्त करणारी पोस्ट उशिराच टाकली. मी आंबेडकरी तत्वज्ञानाचा आणि दलित चळवळीचा अभ्यासक असून ज्येष्ठ पत्रकार- राजकीय विश्लेषक आहे. विश्लेषक हे पत्रकार परिषदेला स्वतः उपस्थित असतील तरच त्यावर लिहितात, असे कुणी सांगितले तुम्हाला?पत्रकार परिषदेत विषयाच्या आकलनात गफलत झाल्यामुळे एखाद्या वार्ताहराची बातमी कदाचित अर्धवट अथवा सदोष ठरूही शकते. पण एखादा व्हिडीओ स्वतः पाहिलेले - ऐकलेले सारे पत्रकार आणि वृत्तवाहिन्याचे तमाम प्रेक्षक त्याचा अर्थ समजण्यात कसे चुकतील?
प्रेस कॉन्फरन्सच्या व्हिडिओतील आठवले यांची दोन विधाने स्वयंस्पष्ट आहेत. १) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू धर्म मजबूत करायचा होता.
२) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इच्छा नसताना बुद्ध धम्म स्वीकारला.
या दोन्ही विधानांचा अर्थ समजून घेण्यासाठी कोणालाही त्यांनी केलेल्या निवेदनाचा मागचा पुढचा भाग/ संदर्भ समोर ठेवण्याची गरज उरत नाही. त्यांची ती दोन्ही विधाने ऐतिहासिक सत्याशी विसंगत आहेत,यावर कुणाचेही दुमत नाही, हेच त्यावर व्यक्त होणाऱ्या साऱ्या प्रतिक्रिया सांगत आहेत .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा हा हिंदू धर्म सुधारण्यासाठी कधीही नव्हता. तो अस्पृश्य समाजाची गुलामगिरी संपवण्यासाठी होता. हिंदू धर्मातील लोकांचा अस्पृश्यांबद्दलचा दृष्टिकोन आणि वर्तन बदलण्यासाठी त्यांनी २१ वर्ष प्रतीक्षा केली. तो त्यांचा संयम, आशावाद आणि चांगुलपणा होता.
त्यांनी दिलेल्या प्रत्येक लढ्यातून हिंदू धर्माची सनातनी मानसिकता उघडी पाडतानाच अस्पृश्य हे हिंदू नाहीत, हीच गोष्ट सिद्ध करत अधोरेखित केली. 'अस्पृश्य हे हिंदूंचा उपविभाग वा पोट विभाग नसून स्वतंत्र आणि ठळक असा घटक आहेत हा सिद्धांत माझ्या लढ्याचा आणि राजकारणाचा पाया आहे' असे बाबासाहेब ठणकावून सांगायचे. ( बहिष्कृत भारत मधील अग्रलेख अभ्यासले की, बाबासाहेब पुरते समजतात.)
अहो, त्या सिद्धांताच्या जोरावर तर त्यांनी अनुसूचित जातींची सूची करणे ब्रिटिशांना भाग पाडून दलितांचे संविधानिक अधिकार पुढे मिळवले!
यात कुठे आलेय हिंदू धर्माचे मजबुतीकरण? आणि धर्म परिवर्तनाचा नाईलाज?
अस्पृश्य हे स्वतंत्र घटक आहेत, या भूमिकेतून स्वतंत्र ओळख प्राप्त करण्यासाठी तर होते त्यांचे धर्म परिवर्तन. त्यामुळे बाबासाहेबांच्या जीवित कार्याला कोणी भलती सलती उद्दिष्टे चिकटवू नयेत, हेच मी कालच्या पोस्टमध्येही सांगितले आहे.
आठवले यांच्या बुधवारच्या पत्रकार परिषदेची बातमी स्पष्टीकरण दिल्यानंतर अनेक पत्रकारांनी केली नाही, ही आपली माहिती चुकीची आहे. वादग्रस्त विधानांना ठळक बातम्यांचे स्थान स्वाभाविकपणे मिळालेले आहे. त्यातील एका हिंदी वृत्तपत्रातील बातमी आहे:
डॉ आंबेडकर को हिंदू धर्म करना था मजबूत! .... आठवले का अफलातूनी दावा
व्हिडिओत जे दिसले ,तेच त्यांनी वाचकांना सांगितले.
कारण व्हिडीओ सबळ होता. पण त्यावर सारवासारव करणारा खुलासा दुबळा, लंगडा होता. त्यात उडालेली तारांबळ तर नजरेत भरणारी होती.असो.
मी आंबेडकरी- रिपब्लिकन चळवळीचे अपत्य असलेला पत्रकार आहे. धम्म क्रांतीबाबत सत्याचा अपलाप होऊ नये... बाबासाहेबही समरसतावादी होते, असा गैरसमज फैलावू नये ,यासाठी मी बुधवारी एका तळमळीतून ती पोस्ट केली. मी कुणा एकाच्या बाजूने नाही आणि कुणा एकाच्या विरोधात नाही, हे रामदास आठवले यांच्यासह सारेच आंबेडकरवादी नेते जाणतात.
पण तुम्ही मात्र कमाल केली हो !
पातळी सोडून टीका करणाऱ्या पोस्ट आणि कॉमेंट्सना मी कधीच दुजोरा / प्रोत्साहन देत नाही. तरीही तुम्ही ' शिवीगाळ करणाऱ्या पोस्टला माझ्यासारख्या पत्रकाराने लाईक करणे शोभते काय, 'असा सवाल करून अफवेचे छान पुडी सोडलीत!
सोशल मीडियाचा अफवा आणि झूठ पसरवण्यासाठी वापर करणाऱ्या मित्र पक्षांचा संसर्ग तुम्हालाही झाला म्हणायचा. हा खोटारडेपणा वेळीच बंद करावा. ते तुमच्या हिताचे राहील,असा माझा प्रेमाचा सल्ला आहे.
आणि हो, ' लाईक' चा सोशल मीडियावरील खरा अर्थ तरी ठाऊक आहे काय तुम्हाला?
इथला LIKE म्हणजे LOVE किंवा आवडले असा होत नाही बरे!
इथे त्याचा अर्थ SEEN इतकाच. म्हणजे पाहिले. तुमचे म्हणणे पोहोचले
0 टिप्पण्या