
महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि महाराष्ट्र म्हणजे आपली जाहगिरी असल्याचे समजून काही राजकीय पक्षांना वाटत असेल तर ते संविधान विरोधी आहे का? याचा विचार केला जावा.विचार पक्षाचा आणि गृहीत धरायचं ते तमाम मराठी बांधवांना.सध्या महाराष्ट्रातील जनता मिडियावर पाहत आहे आणि त्याचा टीझर गाव-पारावर पहायला मिळतो आहे.राज्यात दुसर्यांच्या मुहूर्तावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे मेळावे होत असतात.शिवसेनेचा शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील भगवान गडावर होणारा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा मेळावा, नागपुरात होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा आणि आता नवीन मी तर म्हणेन होऊ घातलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा. प्रत्येक मेळावा विचार ऐकण्यासाठी घेतला जातो. असा व्होरा पुढं करून ही परंपरा कायम आहे.असो, परंतू हे सर्व मेळावे पक्षीय मेळावे आहेत.यात सर्वसामान्य जनतेला गृहीत धरण्याचे कारण नसावे व तसे नसेल अशी शक्यता आहे किंवा असावी. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि सरकार स्थापन करणार म्हणतं म्हणत अनेक दिवस राज्यात सरकार नव्हते.कसे- बसे राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या शिताफीने महाविकास आघाडी स्थापन झाली आणि एकदाचे सरकार स्थापन झाले.स्थापन होते की नाही तोवर पाडण्याची चर्चा सुरू झाली आणि तसं घडलं ही पुन्हा एकदा राज्याला अनेक दिवस सरकार नसल्याशिवाय रहावं लागलं.कारण, शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडला आणि पुन्हा राज्याच्या विकासाला घरघर लागली.परत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने सत्ता स्थापन केली. राज्याला काही दिवस मंत्रीमंडळ नव्हते.अजूनही संविधानातील तरतुदीनुसार मंत्रीमंडळ पुर्ण नाही.ही जनतेच्या विकासासाठी निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी पुरती वाट लावून टाकली.एकमेकांची भांडणं न्यायालयात गेली.यात जनतेची फिकीर ना न्यायालयाने केली, ना राजकीय पक्षांनी आणि अजूनही राज्यकर्ते त्याच गर्तेत आहेत. मेळावे हे राजकीय पक्षांचे अस्तित्व टिकविण्यासाठी की जनतेच्या प्रश्नांसाठी हा मुद्दा उपस्थित झाला नाही तर नवल वाटेल. शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोंबर १९६६ झाला. तेव्हापासून कुठेही खंड न पडता हा मेळावा होत असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूर येथील दसरा मेळाव्याची सुरुवात २७ सप्टेंबर १९२५ पासून सुरू झाली. तर भगवान गडावर भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी १९९३ पासून हा दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. आता नव्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे दसरा मेळावा होणार आहे. ही दसरा मेळाव्याची परंपरा कायम असून मध्यंतरी कोरोनामुळे मिळावे घेता आले नाहीत.
असो, या मेळाव्यातून आपापल्या नेतृत्वाचे विचार रुजविले जातात. पण, शस्त्रांची पूजा करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेमके विचार काय आहेत. हे सर्वश्रुत आहे, कोणालाही नव्याने सांगण्याची गरज नाही. तर, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून सतत मराठी माणूस यावर भर असतो.इथ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम आणि अंतिमतः भारतीय या विचाराशी कुठेही एकमत दिसून येत नाही.तसेच, अनेकदा अनेकांनी अमराठी माणसांवर छळ होतो.हा वादही झाला आहे. यात दुमत नाही.मराठी माणूस जगला पाहिजे असे कोणाला वाटणार नाही? नव्याने होऊ घातलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकायला मिळतील. ज्या शिवसेनेने रस्त्यावरचा माणूस सभागृहात पाठवला त्या शिवसेनेशी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून फारकत घेणाऱ्यांनी कोणते विचार द्यावेत.हेच विचार का बाळासाहेबांचे?
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील भगवान गडावर होणारा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातून, ऊसतोड कामगारांच्या व्यथा व अनेक विषयांवर थोडे थोडके विचार पेरले जातात.मात्र, सत्तेवर असणारी ही सगळीच राजकारणी मंडळी किती काम करतात, हे वेगळं सांगायला नको! खरं तर या सगळ्याच मेळाव्यातून शिव -शाहू- फुले- आंबेडकर यांचे विचार ऐकायला मिळतात का? नुसताच फुले -शाहू- आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणायचा आणि कृती मात्र त्यांच्या विचारांच्या विरूद्ध! त्यामुळे नेमके विचार तरी या मेळाव्यातून कोणते ऐकायला मिळतात? त्यामुळे हा कार्यकर्ता मेळावा नाही का?असा प्रश्न विचारला तर वावगं वाटू नये. महाराष्ट्राला आणि सर्वसामान्य जनतेला मेळ्याशी गृहीत धरू नये.शिव -शाहू- फुले- आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जगाला तारणारा विचार दिला आहे. शिवाजी पार्कचे शिवतीर्थ कशासाठी? विकासाची काम करायला कोणत्या मेळावा कामी आला? त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्यांनी दसर्याच्या निमित्ताने संधीच सोनं करावं, एवढंच.
पदमाकर उखळीकर , ९९७५१८८९१२.
0 टिप्पण्या