Top Post Ad

भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक व तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान

 

   ब्रिटिशांच्या शिक्षणविषयक धोरणाचा लाभ हिंदूंनी करून घेतला. याउलट हे शिक्षण आम्हाला नको, असे ठामपणे सांगणारा, आठ हजार मौलवींनी सह्या केलेला एक अर्ज मुसलमानांनी ब्रिटिश सरकारला सादर केला. मुसलमानांचे धर्मांतर घडवून त्यांना ख्रिस्ती करणे, हा सरकारच्या इंग्रजी शिक्षणामागचा हेतू आहे, अशी त्यांची खात्री झाली होती. सय्यद साहेबांना मात्र शिक्षणसंस्था या आधुनिक इंग्रजी शिक्षणसंस्थांच्या धर्तीवर उभ्या केल्या जाव्यात, असे वाटत होते. इंग्रजी शिक्षणाला विरोध करून मुसलमान आपले नुकसान करून घेत आहेत, अशी त्यांची ठाम धारणा होती. आपले विचार मांडण्यासाठी त्यांनी फार्सी आणि इंग्रजी अशी दोन पत्रे काढली ती तहसीब-अल्-अखलाक आणि मोहमेडन सोशल रिफॉर्मर ही होत. तथापि कट्टरपंथीय मुस्लिम बांधवांनी काफिर व क्रिस्ताळलेला अशी विशेषणे देऊन त्यांच्यावर टीकचेच झोड उठवली होती.

     सर सय्यद अहमद खान हे विख्यात मुस्लिम विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ व राजनीतिज्ञ होते. त्यांचा जन्म दि.१७ ऑक्टोबर १८१७ रोजी दिल्ली येथे झाला. त्यांचे पूर्वज हेरातचे होते. सम्राट अकबराच्या कारकीर्द- सन १५५६-१६०५मध्ये ते भारतात स्थलांतरित झाले आणि मोगलांच्या दरबारात निष्ठेने सेवा करू लागले. त्यांच्या पूर्वजांना मोगल दरबारातून मानाचे किताब मिळाले होते. सरांच्या वडिलांचे नाव सय्यद मुतक्की होते. मोगल दरबारात त्यांचे वजन होते. सय्यद अहमदांचे मातुल आजोबा ख्वाजा फरिदुर्शन अहमद हेही कर्तृत्ववान होते. मोगल दरबारात त्यांनाही सन्मान दिला जात होता. सर सय्यद यांना औपचारिक शिक्षण मिळालेले नव्हते. त्यांची आई हीच त्यांची पहिली गुरू होती. परोपकारी वृत्तीच्या या स्त्रीचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला होता. पवित्र कुराण, गुलिस्ताँ, बोस्ताँ यांसारखे फार्सी ग्रंथ, काही अरबी ग्रंथ ते निरनिराळ्या व्यक्तींकडून शिकले. गणित आणि भूमिती यांचाही त्यांनी अभ्यास केला. मिर्झा गालिब यांच्यासारख्या थोर उर्दू कवीचा निकट सहवास त्यांना लाभला व त्यांच्या काव्याने ते प्रभावित झाले. स्वत:ची लेखनशैली सुंदर असली पाहिजे, याची जाणीव त्यांना झाली. 

सन १८३८ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी मोगल दरबाराची सेवा करण्याऐवजी ईस्ट इंडिया कंपनीत काम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला त्यांच्या आप्तांनी विरोध केला तथापि हा विरोध भावनिक वृत्तीने केला जात होता, वास्तव वेगळेच होते. त्यांना त्याची स्पष्ट जाणीव होती. मोगल सम्राटाची आर्थिक परिस्थिती अत्यंत ओढगस्तीची झालेली होती. दरबाराचे नोकर-चाकर सांभाळणेही कठीण झाले होते. वडिलांच्या निधनानंतर आपल्या आईला निवृत्तिवेतनही दिले जात नाही, हे त्यांना दिसत होते. अशा परिस्थितीत मोगल दरबाराशी आपले भविष्य जोडणे, त्यांना योग्य वाटत नव्हते. ईस्ट इंडिया कंपनीत त्यांना नोकरी मिळाली आणि आग्रा येथे नायब मुन्शी या पदावर त्यांची नेमणूक झाली. सन १८४१मध्ये ते मैनपुरी येथे मुन्सफ झाले. ते मोगल दरबारची नोकरी करीत नसले, तरी मोगल दरबारकडून त्यांना सन १८४२मध्ये जवाद्-उद्-दौला अरिफ जंग हा किताब देण्यात आला. चार वर्षांत त्यांनी आपली बदली दिल्लीला करून घेतली. त्यांच्या वडीलबंधूंचे निधन झाल्यामुळे त्यांना दिल्लीत आपल्या आईच्या जवळ राहणे योग्य वाटत होते. त्या काळात त्यांची आर्थिक स्थिती बरी नसल्यामुळे त्यांनी पत्रकारिता आणि लेखन यांच्या आधारे आपल्या उत्पन्नात भर घालण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वडीलबंधू एक पत्र चालवीत असत, ते त्यांनी हाती घेतले. पण त्यात त्यांना यश आले नाही.

      बिजनोर येथे सद्र अमीन या पदावर सर सय्यद यांची सन १८५५मध्ये नेमणूक झाली. १८५७चा उठाव झाला, तेव्हा कंपनी सरकारशी एकनिष्ठ राहून त्यांनी अनेक इंग्रजांचे प्राण वाचवले. तथापि या उठावामुळे इंग्रज सरकार मुसलमानांकडे संशयाने पाहू लागले होते. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना, त्यांच्या आईलाही याची तीव झळ लागली. त्यामुळे देश सोडण्याचा विचारही त्यांच्या मनात येऊन गेला. परंतु अखेरीस या परिस्थितीचा विचार त्यांनी मुसलमानांच्या संदर्भात केला आणि इंग्रजी सत्तेशी जुळवून घेण्यातच मुसलमानांचे हित आहे, या निष्कर्षाप्रत ते आले. या उठावावर अस्बब-इ-बगावत-इ-हिंद हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यात त्यांनी बंडाची कारणमीमांसा केली. ती करताना त्यांनी इंग्रजांवरही टीका केली. बंडवाल्यांना शिक्षा देताना त्यांनी दाखविलेल्या सूडबुद्धीचा निषेध केला व या बंडात हिंदूंपेक्षा मुसलमान जास्त पोळले गेले, असेही मत व्यक्त केले. 

ब्रिटिश काउन्सिलमध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व नसल्यामुळे भारतीय जनमताचे प्रतिबिंब त्यात पडत नाही आणि ब्रिटिशांचेच नुकसान होते, असेही प्रतिपादन त्यांनी केले. त्यानंतर लॉयल मोहमेडन्स ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिले. १८५७च्या बंडाला सर्व मुसलमानांचा पाठिंबा नव्हता, असे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी या ग्रंथात केला. ख्रिस्ती जमातीने जिच्याशी मैत्री करावी, अशी एकमेव जमात मुसलमानांची होय, असेही विचार त्यांनी या ग्रंथात मांडले. सन १८६७मध्ये त्यांची बदली बनारसला झाली. दोन वर्षांनी ते इंग्लंडला गेले. तेथे यूरोपीय संस्कृतीचे त्यांना दर्शन झाले. त्या संस्कृतीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांना विख्यात स्कॉटिश साहित्यिक टॉमस कार्लाइल याचा स्नेहपूर्ण सहवास लाभला. प्रेषित मुहंमद पैगंबर यांच्या जीवनावर आणि त्यांनी लिहिलेल्या एसेज ऑफ दी लाइफ ऑफ मुहंमद या पुस्तकावरही त्यांची चर्चा झाली. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांना त्यांनी भेट दिली. लंडनमध्ये दीड वर्षाहून अधिक काळ राहून सर सय्यद अहमद भारतात आले, ते अनेक शैक्षणिक योजना घेऊनच.

     सर सय्यद यांना ब्रिटिश सत्ता ही भारताला उपयुक्त आणि आवश्यक वाटत होती. ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहण्यात भारतीयांचे कल्याण आहे, अशी त्यांची धारणा होती. इंडियन नॅशनल कॉंग्रेसला त्यांचा कडवा विरोध होता. कॉंग्रेसला शह देण्यासाठी त्यांनी इंडियन पॅट्रिऑटिक असो-सिएशन हा पक्ष काढला. मुस्लिमांमध्ये इंगजी शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे आणि पाश्चात्त्य शिक्षण त्यांनी घेतले पाहिजे, या आपल्या मतावर ते अखेरपर्यंत ठाम होते. हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत, अशी त्यांची कल्पना नव्हती, असे म्हणण्यास जागा आहे. त्यांच्या शैक्षणिक संस्थांत हिंदूंनाही प्रवेश होता. १८६१मध्ये व्हाइसरॉयच्या काउन्सिलमध्ये तीन हिंदूंचा समावेश केला होता. तथापि यांत मुसलमान का नाही? असा प्रश्न न करता त्यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र या एकतेबद्दल पुढे त्यांच्या मनात शंका निर्माण झाली होती, असे दिसते. त्यांनी उत्तर प्रदेशांतील अलीगढ येथे मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल महाविद्यालय स्थापन केले. मुसलमान तरूणांना उदार, आधुनिक शिक्षण मिळावे, हा हेतू त्यामागे होता. या महाविद्यालयाचेच पुढे अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. 

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पवित्र कुराणावर भाष्य लिहिण्यास आरंभ केला. सन १८७८मध्ये व्हाइसरॉयच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. सन १८८३मध्ये अलीगढमध्ये त्यांनी मोहमेडन असोसिएशनची स्थापना केली. त्याचप्रमाणे त्यांनी मोहमेडन एज्यूकेशनल कॉन्फरन्सची स्थापना केली. मुसलमानांची सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टी बदलावी, हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. सन १८८७मध्ये लॉर्ड डफरिन यांनी त्यांना सिव्हिल सर्व्हिस कमिशनचे स्वीकृत सदस्य केले. एडिंबरो विद्यापीठाने त्यांना एल्.एल्.डी. ही सन्माननीय पदवी प्रदान केली. रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटनचे ते सन्माननीय सदस्य होते. अखेर ते दि.२८ मार्च १८९८ रोजी त्यांचे निधन झाले. आजच्या जयंतीदिनानिमित्त  सय्यद अहमद खान  विनम्र अभिवादन !!


 निकोडे कृष्णकुमार गोविंदा, 
  रामनगर, गडचिरोली. मोबा- ७७७५०४१०८६. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com