डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मबदलानंतर जेवढे सकारात्मक लिहिले गेले तेवढे त्यांच्या हयातीत लिहिले गेले असते तर कदाचित हिंदुच्याच पथ्यावर पडले असते. पण लक्षात कोण घेतो? डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. अनेकांनी तशी जाहीर कबुलीच दिली आहे. उदा. द्यायचे तर आरएसएसचे माजी सरचिटणीस प्रा.स.ह.देशपांडे यांचे देता येईल. भारतातील शंभर विचारवंतांमध्ये ज्यांची गणना होते त्यापैकी प्रा. स.ह.देशपांडे एक होत. १९९० साली त्यांचे, ' सावरकर ते भाजप : हिंदुत्वाच्या विचारांचा आलेख ' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या प्रारंभीच प्रा.देशपांडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय योगदानावर भाष्य करतात. बाबासाहेबांच्या राष्ट्रनिष्ठा निर्विवाद होती. भारताची फाळणी या ग्रंथाचे उदाहरण देत बाबासाहेबांनी वेळोवेळी दिलेल्या इशाऱ्याकडे लक्ष वेधतात. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना देशपांडे सर लिहितात,
" या पुस्तकाची सुरवातच मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी केली. मध्यंतरी त्यांच्या विचारांना स्पर्श केल्याशिवाय मला पुढे जाताच आले नाही, आणि शेवटही त्यांच्या विचारांनीच केला! अशात तऱ्हेने माझ्या पुस्तकावर त्यांच्या विचारांचे अच्छादन राहिले.त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे पुस्तक प्रकाशित होत असल्याने डॉ. बाबासाहेबांनाच मी अर्पण करीत आहे! "
एवढ्यावरच न थांबता, प्रा.देशपांडे सर एका महत्त्वाच्या मुद्याकडे वळतात, ज्यामुद्यावर दि. ५ आॅक्टोबर २०२२ रोजी रिपाइं नेते रामदास आठवले यांनी मत व्यक्त केले आहे. प्रा. सह लिहितात, त्याचा संक्षिप्त गोषवारा पाहुया.
१) डॉ.भारताच्या फळणीच्यावेळी दिलेल्या इशाऱ्याकडे आम्ही दुर्लक्ष केले.
२) त्यांना अत्यंत वाईट वागणूक मिळाली, पण त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही. त्यांनी धर्मांतर केले, पण या संस्कृतीशी फारकत न घेता. याच मातीतील बुद्धाचा धर्म स्वीकारला.
अशाप्रकारे डॉ.बाबासाहेबांचे आपल्या देशावर फार मोठे उपकार आहेत! १९२७ व १९३५ सालापासून त्यांनी इशारे दिले. आम्हाला सुधारण्याची संधी दिली. पण बाबासाहेबांच्या समकालीन विचारवंतांनी व नेत्यांनी बाबासाहेबांचे ऐकले असते तर कदाचित त्यांचे धर्मांतर टळले असते!
प्रा.स.ह.देशपांडे यांनी व्यक्त केलेले मत आणि रामदास आठवले यांनी व्यक्त केलेल्या मताचा विचार केला तर काय फरक जाणवतो? आठवलेंना मांडणी करता आली नाही हे जसे वास्तव आहे तद्वतच पत्रकारांनी विचारलेल्या गुगलीमागील हेतू लक्षात न आल्याने ते बोलत सुटले. हिंदू कोड बीलास झालेला विरोध हे एकच उदाहरण पुरेसे नाही का? आठवलेंना हे सांगण्याची वेळ यावी? हा जनतेच्या मनातील प्रश्नच आम्ही विचारत आहोत. वास्तव आणि वस्तुस्थिती यात फरक असतो हे लक्षात न घेता भूमिका दामटण्याकडे कल राहिला की, हेतू,उद्दिष्टांकडे लोक पाठ फिरवतात. आठवले आणि वलय हे जवळचे नाते. आजचे चित्र काय सांगते? कालपरवापर्यंत आठवलेंभोवती वलय फिरत होते, आज आठवलेंना वलयाभोवती फिरावे लागत आहे! कार्यकारणभावाचा संबध असेल का? याचा शोध व बोध माझ्या चळवळीतील तमाम वाचक मित्रांनी घ्यायचा आहे.
देशभरात धर्मांतराची लाट उसळली असून, अनेक मार्गांनी लोक त्यांना योग्य वाटेल त्या धर्माच्या वळचणीखाली उभे राहू पाहतात. प्रामुख्याने हिंदूंमधील सामान्य घटक धर्मांतराच्या वाटेवर आढळून येतात. अशीच स्थिती राहिल्यास या धर्मात राहणार कोण? हा प्रश्न धर्मसंघटनांच्या प्रमुखांना पडलेला दिसतो! याची नैत्तिक जबाबदारी घेत सोमवार दि.१० आॅक्टोबर २०२२ रोजी आरएसएसचे मोहन भागवत यांनी ब्राह्मणांनी पापक्षालन करण्याची सूचना केली. पण हे पापक्षालन कशासाठी करावे याचा खुलासा न झाल्याने भागवतांची भूमिका अधांतरी राहिली. असे असले तरी, पुण्यातील ब्राम्हण महासंघाचे प्रमुख आनंद थवे यांनी आरएसएसची भूमिका आम्हाला मान्य नसल्याचे ठणकावून सांगितले.
ब्राह्मण महासंघ असो अथवा आरएसएस असो, या दोन्ही संघटनांच्या कंबरेला धर्मप्रामाण्याशी संबंधित असलेल्या किल्ल्या असल्याने उंदीर मांजराचा लुटूपुटूचा खेळ थोडे दिवस चालेल, व निर्णायक क्षणी एकमत होऊन समस्त जनतेच्या बोकांडी बसतील हा आजवरचा इतिहास आहे. खरेच ब्राह्मणांनी पापक्षालन केल्याने भारताचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक प्रश्न सुटतील? आम्ही मोहन भागवत साहेबांना थेट प्रश्न विचारतो, पापक्षालन करण्याची मागणी केलीय, म्हणून... म्हणजे नेमके काय करणार आहात? याचा खुलासा दसरा मेळाव्यात करणे गरजेचे होते. पापक्षालन या संकल्पनेमागे त्यागाची भावना दडलेली असते. आजवर केलेल्या पापाचे परिमार्जन व्हावे ही संकल्पनाच वर्णाश्रम धर्माची असून, पापापासून मुक्ती मिळविण्यासाठी वानप्रस्थाश्रम व्यवस्था जन्माला आली हे खरे आहे ना? इतका उदात्त विचार व भावना असेल तर सर्व ब्राह्मणांनी वेळ न दवडता वानप्रस्थाश्रमाची वाट धरावी जेणेकरून पापमुक्ती होऊन तुम्हाला अपेक्षित असलेल्या स्वर्गाची दारे न मागता उघडतील!
भागवत साहेब कशासाठी ही उठाठेव करता? पापक्षालन करायचेच असेल तर ब्राह्मणांच्या सर्व संघटनांचे विसर्जन करा. देवळातील पुजारी, बडवे यांना बाहेर काढून त्याजागी बहूजन वर्गातील सदस्यांची नेमणूक करण्यात यावी. राजर्षि शाहू महाराजांना अपेक्षित असलेला सामाजिक न्याय प्रस्थापित करावयाचा असेल तर धर्माशी संबंधित जेवढ्या आस्थापना आहेत तेथील जागा खाली करा. आरक्षणाची खरी मेख दडली आहे ती येथेच हे आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. आणि हो आणखीन एका गोष्टीकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. पापक्षालनाची आलेली नामी संधी आपल्या काही नादान कार्यकर्ते व आरएसएसशी संबंधित असलेल्या संघटनांनी गमावली याची आठवण करून देत आहोत. २००७ साली परभणी येथील
दुसऱ्या बहुभाषिक ब्राह्मणअधिवेशनात पहिल्यांदा पापक्षालन करण्याची मागणी झाली. अधिवेशनास काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या सुमारे दीड लाख ब्राह्मणांनी हजेरी लावली. अधिवेशनात पत्रकार कुमार केतकर यांचे बीजभाषण होते. पापक्षालनासाठी केतकरानी काही मुद्दे ब्राह्मणांसमोर ठेवले. त्याची आठवण करून देतो.
१) ब्राह्मणांनी काळानुरूप बदलले पाहिजे.
२) मागासवर्गीयांतील उच्चशिक्षित मुलांना जात न पाहता आपल्या मुली द्यायला हरकत नसावी!
३) जाती नष्ट करण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढाकार घ्यावा.
यामुळे ब्राह्मण खवळले, व केतकरांविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. त्यावर केतकरांनी बजावले मी माझ्या भाषणाची लिखित प्रत एक महिना आधीच आयोजकांना दिली आहे. संविधानाने मला दिलेले भाषण स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. असे म्हणताच जमाव विचारपीठाच्या दिशेने सरकला, व केतकरांचा पाराही चढला. ते म्हणाले,
४) ब्राह्मण जातीवादाला निर्माता आहे.
५) त्यांनीच जाती निर्माण केल्या.
६) स्वातंत्र्यानंतर ६० % सवलती ब्राम्हणांनीच लाटल्या. याचे फायदे ब्राह्मण स्त्रीयांनाच मिळाले. त्या उच्चशिक्षित झाल्या.,शिक्षिका, प्राध्यापिका, प्राचार्या, बँक मॅनेजर, डॉक्टर, पोलीस अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, जेवढी क्षेत्रे आहेत तेथे ब्राह्मण स्त्रीयांनी कब्जा केला. कधीकाळी ज्यांना उंबरठ्याबाहेरचे जग माहित नव्हते.
७)ब्राह्मणांनी पोथीवादाच्या नावाखाली लोकांना अक्षरशः लुटले.
८) ब्राह्मण म्हणजे नीतीवादाचा कडेलोट!
असे म्हणताच, काही तरुण स्टेजवर चढले आणि माईक खेचला. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. आयोजकांनी मध्यस्थी केली. केतकर म्हणाले
९) आज जो जातीवाद धुमाकूळ घालत आहे तो तुमच्या या अशा धोरणामुळे व वागण्याने कानात तापलेल्या व उकळत्या तेलाप्रमाणे ब्राह्मणांच्या कानात शब्द घुसत होते. भाषण बंद करण्याच्या घोषणा करण्यात आल्या. त्यावर शेवटी केतकर म्हणाले की,
१०) तुमच्या या अशा वृत्तीमुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करावे लागले.
पुढचा अतिशय बाका प्रसंग होता. केतकरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. व दुसर्याच दिवशी दै. लोकसत्तेच्या संपादक पदावरून पायउतार व्हावे लागले!
सांगा भागवत साहेब कशाकशाचे पापक्षालन करणार आहात? हजारो वर्षांपासूनची चिकटलेली विषमतेची व जीर्णमतवादाची जळमटे कशी काढणार आहात? आठवलेंच्या प्रतिक्रियेपेक्षाही भयानक सत्य असताना, त्यावर मनन, चिंतन व्हायला हवे, जे बहुजनांच्या मागासवर्गीय घटकांपर्यंत हे कुटील डाव पोहचलेच नाहीत. या सर्वहारा समाजाच्या प्रबोधनाची गरज आहे. २०२४ नंतर आठवले सत्तेच्या कितव्या पायरीवर असतील हे येणारा काळच ठरवेल. नाहक आठवलेविरोधात आपली शक्ती वाया घालवून, बुद्ध-बाबासाहेबाच्या तत्वप्रणालीला गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली तरी पुरेसे आहे.
जयभिम, जयभारत, जयसंविधान
गुणाजी काजिर्डेकर
93236 32320
चेंबूर,
0 टिप्पण्या