Top Post Ad

केजरीवालना मिरची का झोंबली ?

केजरीवालांच्या दिल्ली मंत्रीमंडळातील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.  दिल्ली मध्ये अशोक विजयादशमीला म्हणजे 5 ऑक्टोबर रोजी हजारो लोकांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. या प्रसंगी त्रिसरण पंचशील ग्रहण केले गेले.  आंबेडकरी बौद्ध धम्माचा अपरिहार्य भाग असलेल्या 22 प्रतिज्ञा सुद्धा यावेळी ग्रहण केल्या गेल्या.  22 प्रतिज्ञांचे ग्रहण केल्यामुळे केजरीवालने गौतम यांना राजीनामा देण्यास भाग पाडले.  

          डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली अशोक विजयादशमी म्हणजे दिनांक 14 ऑक्टोबर रोजी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि त्यानंतर स्वतः बाबासाहेबांनी उपस्थित लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या सोबतच बाबासाहेबांनी उपस्थित अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या. ही एक ऐतिहासिक क्रांतिकारी घटना होती.
          22 प्रतिज्ञांमधील पहिल्या आठ प्रतिज्ञा पुढीलप्रमाणे आहेत.
1. मी ब्रम्हा, विष्णु आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
2. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
3. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
4. देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.
5. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा व खोडसाळ प्रचार होय, असे मी मानतो.
6. मी श्राद्ध पक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
7. बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचार कर्म मी करणार नाही.
8. कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांचे हातून करवून घेणार नाही.

           वरील पैकी पहिल्या पाच प्रतिज्ञा हिंदू धर्मातील ब्रम्हा, विष्णु, महेश, राम, कृष्ण, गौरी, गणपती आणि इतर कोट्यावधी देवदेवतांना स्पष्टपणे नाकारतात.             परंतु वरील प्रतिज्ञांमध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान कुठेच केलेला नाही. तसा विचारही बाबासाहेबांनी केला नाही किंवा आजही त्यांचे अनुयायी करीत नाहीत.            ब्राम्हणांनी कल्पनाविलासाने निर्माण केलेल्या कोट्यावधी देवदेवता या देशातील शुद्र अतीशुद्रांचे काहीही कल्याण करु शकल्या नाहीत. मात्र या देवदेवतांच्या नावाने ब्राह्मण जात स्वतःचे पोट भरुन प्रचंड संपत्ती गोळा करीत आहे. आजही देशातील मंदिरे व हिंदू धर्म स्थळे ब्राम्हणांच्या हाती आहेत. धर्माच्या व देवदेवतांच्या नावाने चाललेले हे प्रचंड शोषण आहे. या पैसा, सोनं व जमिनी यावर कोणताही टॅक्स नाही. देशाचे हे आर्थिक नुकसान आहे.

           या सर्व प्रकारच्या बौद्धिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक शोषणातून शुद्र अतीशुद्रांना मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी या प्रतिज्ञा दिल्या आहेत. हि अब्राम्हणीकरणाची (debrahmanisation) प्रक्रिया आहे. जुने पुसून टाकल्याशिवाय नवे लिहिता येत नाही. हजारो वर्षे ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक मनामनात पेरलेल्या आणि त्यांतूना या देशातल्या कोट्यवधी लोकांना गुलाम करणा-या विचारधारेतून व त्यातून निर्माण झालेल्या असंख्य सामाजिक व सांस्कृतिक समस्यांतून मुक्त करण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक अशीच होती. यात कुठेही हिंदू देवदेवतांचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही किंवा तसा या प्रतिज्ञांमध्ये कुठे उल्लेखही केलेला नाही.  
           वरील प्रतिज्ञांपैकी 6, 7 व 8 क्रमांकाच्या प्रतिज्ञा सुद्धा अब्राह्मणीकरणाचाच भाग आहेत.
            प्रतिज्ञा क्रमांक 19 पुढीलप्रमाणे आहे.
19. माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला  हानीकारक असणा-या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणा-या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुध्दाच्या धम्माचा स्वीकार करतो.  
            ही प्रतिज्ञा हिंदू धर्म त्याग करण्याची कारणे स्पष्ट करते. 1956 सालच्या अशोक विजयादशमीला म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांनी ही प्रतिज्ञा दिली. काय हिंदूनी आपले वर्तन गेल्या 66 वर्षांत बदलले आहे? काय हिंदूनी जातीयता, जात्यंधता, जातगर्व सोडला आहे? काय हिंदूंनी अस्पृश्यता सोडली आहे? काय हिंदूंच्या डोक्यातले ब्राह्मण्य संपले आहे?

            वरील सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. हिंदूना अधिक कट्टर बनविले जात आहे. त्यांच्या डोक्यात ब्राम्हण्य ठासून भरले जात आहे. परिणामी देशभर अनुसुचित जातींवरील अन्याय अत्याचार वाढीस लागले आहेत.
            दिल्ली येथे गौतम यांच्या उपस्थितीत झालेले धर्मांतर व त्याचाच एक भाग म्हणून घेतल्या गेलेल्या 22 प्रतिज्ञा ही एका सडक्या संस्कृतीतून दुसऱ्या अतिशय उन्नत, विवेकशील, शीलवान, करुणामय, मनुष्यकेंद्री, समताधिष्ठित, स्वातंत्र्यप्रेमी,  बंधुत्वमय, मनुष्याला मनुष्य मानणा-या अशा बौद्ध धम्म संस्कृतीकडे जाण्याची जाहीर घोषणा आहे. ही बौद्ध धम्म संस्कृती भारतीय संविधानाला व आधुनिक लोकशाहीला पोषक अशीच आहे!

           भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीच्या धर्माचा स्वीकार करण्याचा व त्याप्रमाणे आचरण करण्याचा हक्क दिला आहे. असे असताना केजरीवाल यांना नक्की काय म्हणून मिरची लागली? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा तोंडाने सतत गजर करायचा पण बाबासाहेबांच्या विचारांना मात्र नाकारायचे ही तर ब्राह्मणी धर्माच्या गुलामांची खासियत आहे. हा तर ब्राह्मणी दुटप्पीपणा आहे !!

           केजरीवाल आणि त्यांच्या सारख्या लोकांना आम्ही ठणकावून सांगतो की जसा तुम्हाला तुमचा धर्म प्रिय आहे तसा आमचा बौद्ध धम्म आम्हाला प्रिय आहे. बौद्ध धम्म हा प्रज्ञा, शील, करुणा यांवर अधिष्ठीत आहे. 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हा बौद्ध धम्माचा उद्देश आहे!  'अल्पजन हिताय, अल्पजन सुखाय' असा संकुचित स्वार्थी विचार बौद्ध धम्म करीत नाही!   गौतम यांच्या राजीनाम्यामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की मोदी उघड ब्राम्हण्यवादी आहे तर केजरीवाल छुपा ब्राम्हण्यवादी आहे!   मंडल विरोधी ब्राम्हणी आंदोलनामध्ये केजरीवाल आघाडीवर होते हेही या निमित्ताने लक्षात ठेवणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते !

- प्रेमरत्न चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com