गावाचे सारे काही तो गावालाच देवून गेला


  •  गावाचे सारे काही तो गावालाच देवून गेला
  • बसवाहक महादू वेंगुर्लेकर यांचा उदार स्वभाव

मुंबई बसस्थानकावर रात्री बराच वेळ झाला होता. देवगडला जाणारी शेवटची बस वेळ होऊनही सुटत नव्हती. बस स्थानक तसे संपूर्ण रिकामे झाले होते. दोन चार प्रवाशी इकडे तिकडे रेंगाळत होते. या बसचे दहा बारा प्रवाशी मात्र तळमळ करीत होते की, बस अजून का सुटत नाही? तेवढ्यात एकाने निरोप आणला की, बसचे एक चाक पंक्चर आहे. तो काढला की गाडी सुटेल. बरोबर दहा वाजता बस निघाली. जवळ जवळ सर्वच प्रवाशी देवगडला जाणारे होते.

एका हातात बोचके धरून बसलेल्या म्हातारी जवळ मात्र जेव्हा वाहक तिकीट फाडण्यास आला, तेव्हा रस्त्यावर कातवन फाटा असलेल्या आणि तेथून तीन-चार किलोमीटर दूर असलेल्या गावाचे तिकिट मागू लागली. बस वाहक विचारात पडला. या म्हातारीचे वय झालेले, एकटीच उतरणारी, पावसाळ्याची गर्द अंधारी रात्र ही म्हातारी घरी कशी पोहचेल? तो थोडासा म्हातारीवर रागावलाच की, ‘तु एकटी, तुला नीट दिसत नाही, चालता येत नाही, एवढा उशीर का केला ? लवकर उजेडात निघून जायचे होते ना?’

म्हातारीला नीट ऐकू पण येत नव्हते. काही तरी उत्तर तिने दिले. वाहकाने तिला त्या गावाचे तिकिट दिले व आपल्या स्थानावर येवून बसला. इतर प्रवाशी पेंगुळले होते. चालकाने दिवे बंद केले. वाहक मात्र म्हातारीचा विचार करीत होता. त्या फाट्यावर तर आपण तिला उतरवून देवू, पण धड चालता न येणारी, व्यवस्थित रस्ता न दिसणारी ही म्हातारी तीन-चार किलोमीटर या पाणी-पावसाच्या दिवसात घरी कशी पोहचेल ?

रस्ता खाचखळग्यांनी व खड्ड्यांनी भरलेला. मध्ये एखादा नाला वाहत असेल तर? कुत्रे किंवा एखाद्या प्राण्याने या म्हातारीवर एकटे पाहून हल्ला केला तर? तेवढ्यात म्हातारी उतरणार होती, त्या गावचा फाटा आला. वाहकाने घंटी वाजविली. चालकाने बस थांबविली. वाहक उठला, आजीबाईचे बोचके एका हातात व दुस-या हातात तिचे बखोटे धरून तिला गाडीखाली उतरण्यास मदत केली. थोडा त्रागाही केला.

बाहेर डोळ्यांना काहीही दिसत नव्हते. त्याने ते बोचके डोक्यावर घेतले आणि म्हातारीचे परत बखोटे धरून चालायला लागला. तो एकाच विचाराने की, म्हातारीला एकटे न सोडता तिला घरापर्यंत सुरक्षित पोहचविणे. म्हातारीलाही नवल वाटले. शक्य तेवढे ती ही त्याच्या पाऊलांबरोबर पाऊल टाकू लागली.

इकडे बस चालक व प्रवाशांची कुचबुच सुरू झाली होती. ‘दहा पंधरा मिनिटे झाली हा वाहक गेला कुठे?’ चालकाने बसखाली उतरून बसला फेरी मारली की,  चक्कर वगैरे येवून पडला की काय? नंतर त्याच्या लक्षात आले की तो त्या म्हातारीला सोडायला गेला असेल. त्याचा संताप झाला होता. प्रवाशीही संताप करू लागले. अशा निर्जनस्थळी बस सोडून हा निघून गेला. काही म्हणाले ‘चला हो! त्याला राहुू द्या’ वगैरे वगैरे.

इकडे म्हातारीने त्या वाहकाला विचारले, ‘बा तुझे नाव काय रे?’ ‘तुला काय करायचे आजी माझ्या नावाशी..? मी महादू वेंगुर्लेकर.’ ‘कोणत्या डेपोमध्ये आहे?’ वाहकाने ‘मालवण असे सांगितले.’ आजीचा पुन्हा प्रतिप्रश्न ‘मुलेबाळे?’ वाहकाने म्हटले, ‘आहेत दोन.’ तेवढ्यात आजीचे पडक्या अवस्थेतील जीर्ण घर आले. दोन चार कुत्रे भुंकत पळाले. वाहकाला म्हातारीने कुलूपाची चावी दिली. त्याने कुलूप उघडून दिले व तसाच धावत पळत बसच्या दिशेने माघारी पळाला.

ती म्हातारी त्या घरात व गावात एकटी राहत होती. तिला जवळचे म्हणून कोणीच नातेवाईक नव्हते. तिच्यावर प्रेम करणारे, चौकशी करणारे, काळजी करणारे असे कोणीही तिच्या आजूबाजूला फिरकत नसे. ती ही फारशी मग कोणाच्या जवळ जात नसे. कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला की तीला वाटायचे, हा स्वार्थी आहे. याचा माझ्या इस्टेटीवर डोळा आहे. ते वयोमानानुसार तिला वाटणे स्वाभाविक आणि सहजही होते.

गावालगतच तसे चार बिघा शेताचे तुकडे तिच्या मालकीचे होते. ज्याला ग्रामीण भाषेत पांढरी म्हणतात. ते दरवर्षी कोणास तरी पेरण्यास देऊन त्या मोबदल्यात पैसे घेवून आपला उदरनिर्वाह करायची. असेच एक दिवस म्हातारी थोडी जास्तच आजारी पडली. तिने गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना बोलाविणे पाठविले. त्यांनाही म्हातारीने असे अचानक का बोलाविले? म्हणून नवल वाटले व ते घरी आले.

म्हातारी उठून बसली व त्यांना म्हणाली, “दादा कागद काढा. हे दोन अडीच तोळे सोने, माझी पांढरी व हे घर महादू वेंगुर्लेकर कंडक्टर याच्या नावावर लिहून द्या व हे वीस हजार रुपये जमविले आहेत, त्यातून मी मेल्यावर क्रियाकर्म करा. मी जास्त दिवस काही जगणार नाही.” सरपंच व ग्रामसेवक अबोल झाले. काय भानगड आहे? कोण हा महादू वेंगुर्लेकर कंडक्टर? त्याला सर्व म्हातारी का देतेय? असेल काही नाते, असा विचार करून त्यांनी म्हातारीचा निरोप घेतला.

दोन-तीन दिवसातच म्हातारी वारली. सरपंच व ग्रामसेवकाने तिच्या सांगितल्याप्रमाणे सर्व क्रियाकर्म पार पाडले. सर्व आटोपल्यानंतर मग त्यांनी महादू वेंगुर्लेकर कंडक्टरचा मालवण बस स्थानकावर शोध घेतला. त्याला भेटून सर्व वृत्तांत सांगितला. साधारण वर्षभरापूर्वीचाच बसमध्ये घडलेला प्रकार असल्यामुळे त्यालाही ते सारे आठविले. म्हातारीने त्याच्यासाठी केलेले ऐकून तर त्याला रडूच कोसळले. त्याने ती सर्व घटना सरपंच व ग्रामसेवकाला सांगितली. त्यांना नवलही व आनंदही वाटला. त्यांनी वाहकाला ठरल्या तारखेला त्या गावी येण्याचे आमंत्रण दिले.

वाहक महादू वेंगुर्लेकर गावात आले, तर शेकडो ग्रामस्थ जमलेले. सरपंचाने त्यांच्या गळ्यात फुलाचा हार घातला. वाजतगाजत त्याला गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात नेले. तेथे सर्वजन विराजमान झाल्यावर तो शेताचा व घराचा नावावर करण्याचा कागद व म्हातारीने दिलेले अडीच तोळे सोने त्याच्या समोर ठेवले. महादू वेंगुर्लेकरच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. मी केलेल्या एका छोट्याशा मदतीची म्हातारी एवढी किंमत देवून गेली. त्याला काहीच सुचत नव्हते.

बाजूलाच मुलांचा गलका त्याला ऐकू येत होता. त्याने विचारले, ‘येथे शेजारी हायस्कूल भरते का?’ सरपंचाने, ‘हो! शाळेला स्वतःची जागा व इमारत नाही. त्यामुळे कातवन ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तोडक्या मोडक्या खोल्यांमध्ये वर्ग भरतात.’ असे सांगितले. वाहक म्हणाला, ’का? गावठाणची जागा किंवा जवळपासच्या एखाद्या शेताचा तुकडा कोणी देत नाही का शाळेसाठी?’ सरपंच म्हणाले, ‘गावठाणची जागा नाहीच व शेत देण्यास कोणीच तयार होत नाही.’

वाहक महादू वेंगुर्लेकर ताडकन खुर्चीवरून उठले व टेबलावरील शेताचा कागद सरपंचाला देत म्हणाले, “हे घ्या शाळा बांधण्यासाठी शेत. हे घर पण विक्री करा. त्यातून येणारे पैसे बांधकामाला वापरा आणि हे सोने विकून शाळेला छान दरवाजा लावा व त्यावर म्हातारीचे सुंदर नाव टाका” टाळ्यांचा कडकडाट झाला. सरपंच व ग्रामस्थ भारावून गेले. “दरवाज्यालाच काय हायस्कूलला म्हातारीचे नाव देवू.”

वाहक महादू वेंगुर्लेकर यांनी त्यांचे आभार माणून निरोप घेतला. त्याच्या जाणा-या पाठमो-या आकृतीकडे सारा गाव बघतच राहिला. झोळी फाटकी असून सुद्धा गावाचे सारे काही तो गावालाच देवून गेला होता व एक प्रकारे त्या म्हातारीच्या नावाला अमर करून गेला. एखाद्याला केलेली छोटीमोठी मदत कधीही वाया जात नाही. त्याच्या काळजात ती घर करून जाते. समोरचा कृतघ्न झाला तरी चालेल, पण आपण मदत करण्याचा स्वभाव कधीच सोडू नका. माणसाने माणसांशी माणुसकीने वागावे हे विस्मृतीत जाऊ नये. 


  • सुनील शिरपुरे
  • कमळवेल्ली,यवतमाळ
  • भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1