Top Post Ad

शिवसेनेच्या घोषणा द्याच, पण .....


छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित केलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली, हा खरेतर भारतीय संविधानाचा विजय आहे. या निकालानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला, आणि तो योग्यच होता. शिवसैनिक रस्त्यावर उतरले. नाक्यानाक्यावर शिवसेना झिंदाबादच्या घोषणा दिल्या. प्रत्यक्षात हा विजय किंवा दिलासा संविधानामुळे मिळाला याची जाणीव ठेवूनच वाटचाल केली पाहिजे. भाजप समर्थक शिंदे गटाने सारी शक्ती पणाला लावली. जेव्हा एखादे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट होते, त्यावेळी निकाल येईपर्यंत प्रतीक्षा करावीच लागते. शिवसेना नेतृत्व व अन्य नेतेही याला अपवाद नाहीत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसाहेब, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह सर्वच, " आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. संविधानावर आमचा विश्वास आहे!"  याचा अर्थ काय होतो? संविधान हेच सर्वश्रेष्ठ असा अर्थ होत नाही काय? न्यायदेवता जो निकाल देते, तो संविधानानुसार असतो. मागील घटनांची पार्श्वभूमी, ऐतिहासिक संदर्भ तपासून त्यावर भाष्य करत असते. या कसोट्यांवर याचिकाकर्ते जरी उतरत असले किंवा भूमिका कितीही पूरक असली तरीसुद्धा न्यायालयीन प्रक्रिया जोवर पूर्ण होत नाही, तोपर्यंत शांत बसण्याशिवाय पर्याय नसतो. 

अर्थातच मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळाव्यासाठी शिक्कामोर्तब केले हा संविधानाचादेखील विजय असल्याचे शिवसैनिक मानत नसतील तर यापेक्षा दुसरा कृतघ्नपणा नाही असे म्हणावे लागेल! म्हणूनच शिवसेना झिंदाबाद, अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा, व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विजयाच्या घोषणांबरोबरच संविधान झिंदाबादच्या घोषणा का दिल्या गेल्या  नाहीत? फायद्यासाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा उदोउदो करायचा, पण प्रत्यक्षात मात्र विसरणे हाच जर स्थायीभाव असेल, तर यासारखी दुसरी प्रतारणा नाही असे आम्ही ठणकावून सांगत आहोत.

शिवसेनेची मूळ संकल्पनाच प्रबोधनकार ठाकरेंची आहे, बाळासाहेब ठाकरे यांची नाही! मात्र संघटनेला बाळासाहेब ठाकरे यांचे कुशल नेतृत्व लाभले. त्यासाठी अनेकदा मुखवटे धारण करावे लागले. मराठी माणसामध्ये उर्जा निर्माण करण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले हे वास्तव आहे. तथापि संघटना मजबूत करण्यासाठी त्यांना धर्माचा आधार घ्यावा लागला. धर्मावर आधारित राष्ट्रवादाची जोड देऊन मराठी मनावर गारूड करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रकार हाताळले. साम,दाम, दंड, भेद नीतीचा वापर केला हे वास्तव आपल्या समोर आहे. त्यातूनच शिवसेनेची फॅसिस्ट संघटना अशी प्रतिमा तयार झाली. त्याला हिंदू राष्ट्रवादाची जोड देऊन, संविधानमूल्यांना यथेच्छ तुडविण्याचा वारंवार प्रयत्न झाला. याचा फायदा उठवित भाजपाने २९ वर्षांपूर्वी मैत्रीच्या आणाभाका घेत गठबंधन केले. 

भाजपच्या कुटनीतीचे दुष्परिणामांचा इतिहास शिवसेनेसमोर आहे, त्या खोलात जाऊ इच्छित नाही. एक गोष्ट मात्र नमूद कराविशी वाटते ती म्हणजे मराठी माणसासाठी शिवसेना या एकाचमुद्यावर १९६६ साली शिवसेनेचा जन्म झाला त्यावेळी तमाम परिवर्तनवादी, पुरोगामी संघटनांच्या मनात दिलासा निर्माण झाला होता. पण नेतृत्वाने भूमिका बदलली आणि तमाम तळागाळातील घटकांचा भ्रमनिरास झाला. शिवसेनेने प्रारंभीच जर संविधानावर आधारित भूमिकेला स्पर्श केला असता तर कदाचित दलित पँथरची स्थापनाच झाली नसती हे मी फार गांभिर्याने व जबाबदारीने बोलत आहे, लिहित आहे. महाराष्ट्रात या संघटनेनेची पाळेमुळे रूजण्याआधीच मागासवर्गीय घटकांवर दिवसाढवळ्या हल्ले होत होते, ते कुणामुळे? मिंग, चांभार, बौद्धांच्या वस्त्यांची राखरांगोळी होत होती त्या मस्तवालपणाचा माज कोणाच्या डोक्यात होता? एकटी शिवसेना जबाबदार होती? 

बाळासाहेबांनी केलेल्या चूका,उद्धव ठाकरे यांनी सुधारल्या!

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व आल्यानंतरच शिवसेनेत खऱ्या अर्थानं सहजोगता आणि सामाजिक व सांस्कृतिक ऐक्याची भाषा प्रसवली. भाजपने दिलेल्या दणक्यामुळेच शिवसेनेचे नेते, उपनेते या सगळ्यांना संविधान आठवू लागले. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या चूका होणार नाहीत याची काळजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली.  स्वतंत्र्याच्या ७५ वर्षात राज्यातील कॉँग्रेसला जे जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी केले. खरेतर राष्ट्रवादी व सोनिया काँग्रेसमध्ये विस्तव जात नव्हता, पण संजय राऊत यांच्या पुढाकाराने मविआची स्थापना झाली आणि राजकारण ढवळून निघाले. कालपरवापर्यंत शिवसेना हिंदू राष्ट्रवादावर ठाम होती आज तीच संघटना व कार्यकर्ते राष्ट्रवादावर फारशी चर्चा करताना दिसत नाहीत. मात्र हिंदुत्ववावर ठाम आहेत, असो त्या संघटनेचा विचार आहे. शिवसेनेला येथून पुढे  'एकला चलो रे ' भूमिका घेऊन वाटचाल करता येणार नाही. कारण धर्मप्रामाण्यवादी भूमिका अळवावरच्या पानावरील थेंबासारखीअसते, याचा विसर पडता कामा नये. संविधानावर आधारीत विचारधाराच समग्र राष्ट्रवाद निर्माण करू शकते.  म्हणूनच शिवसेनेने शिवसेना झिंदाबादच्या घोषणेबरोबरच संविधान झिंदाबादच्या घोषणा द्यायला विसरू नये.


गुणाजी काजिर्डेकर, चेंबूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com