Top Post Ad

आम्ही धर्म नसलेली माणसं... मुक्ता साळवे

महात्मा जोतीराव फुले यांच्या शाळेतील मुक्ता नावाच्या ११ वर्षाच्या 
मातंग मुलीचा १ मार्च १८५५ च्या ज्ञानोदयमध्ये प्रकाशित झालेला निबंध


  ईश्वराचे मज दीनदुबळीच्या अंतःकरणांत आम्हा दुर्दैवी पशूंपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांगमहारांच्या दुःखाविषयी भरविले, त्याच जगत्कर्त्यांचे मनांत चिंतन करून ह्या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचे काम हाती सरसावून घेतले आहे. परंतु बुध्दिदाता व निबंधास फळ देता, मांगमहारांस व ब्राम्हणांस उत्पन्नकर्ता जगन्नाथ आहे. महाराज, आता जर वेदाधारेकरून आमचा द्वेश करणारे लोक ह्यांच्या मताचे खंडण करावे तर हे आम्हापेक्षां उंच म्हणविणारे, विशेषकरून लाडूखाऊ ब्राम्हण लोक असे म्हणतात की, वेद तर आमचीच मत्ता आहे. आम्हीच ह्यांचे अवलोकन करावे. तर ह्यावरून उघड दिसते की, आम्हास धर्मपुस्तक नाही. जर वेद ब्राम्हणांसाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे ब्राम्हणांचा धर्म होय. जर आम्हास धर्मसंबंधी पुस्तक पहाण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहो असे साफ दिसते की नाही बरे ? हर हर ! असे वेद की ज्यांचे (ब्राह्मणांच्या मताप्रमाणे) अवलोकन केल्याने महापातक घडते, तर मग त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकडेस किती मूर्खत्व (दोष) येईल बरे ? मुसलमान लोक कुराणाच्या आधारेकरून, व इंग्रज लोक बैबलाच्या आधारेकरून, आणि ब्राह्मण लोक वेदाधारेकरून चालतात. म्हणूनच ते आपापल्या खऱ्या खोट्या धर्माप्रमाणे ज्यास्त कमी आम्हापेक्षा सुखी आहेत असे वाटते तर हे भगवान, तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव, म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ. पंरतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मुनष्याच्या तोंडाकडेस पहावे. तो ब त्यासारिखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवोत; व अशा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनांत देखील न येवो.

आम्हा गरीब मांगमहारांस हाकलून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले, व त्या इमारतीच्या पायांत आम्हास तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा उपक्रम चालविला होता. आम्हा मनुष्यांस ब्राह्मण लोकांनी गाई म्हशीपेक्षा नीच मानिले आहे. सांगते ऐका, ज्या वेळी बाजीरावाचे राज्य होते त्या वेळी आम्हास गाढवाप्रमाणे तरी मानीत होते की काय ? पहा बरे तुम्ही लंगड्या गाढवास मारा बरे; त्याचा धनी तुमची फटफजिती करून तरी राहील की काय? परंतु मांगमहारांस मारू नका असे म्हणणारा कोण बरे ? त्यासमयी मांग अथवा महार ह्यातून कोणी तालीमखान्यापुढून गेला असतां गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तरवारीचा दांडू करून खेळत होते. अशी जर मोठ्या सोवळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी तर मग विद्या शिकण्याची मोकळीक कोठून मिळणार ? कदाचित कोणास वाचता आले व ते बाजीरावास कळले तर तो म्हणे की हे महारमांग असून वाचतात, तर ब्राह्मणानी का त्यांस दप्तराचे काम देऊन त्यांच्याऐवजी धोंकट्या मारून विधवांच्या हजामती करीत फिरावे की काय? असे बोलून तो त्यांस शिक्षा करी.

दुसरे असे की, लिहीण्याचीच बंदी करून हे लोक थांबले की काय ? नाही. बाजीरावसाहेब तर काशीस जाऊन धुळीत रहिवासी होऊन तद्रूप झाले पण त्यांच्या सहवासाच्या गुणाने येथील महार तो काय? पण तोहि मांगाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे. सोवळे नेसून नाचत फिरणाऱ्या लोकांचा एवढाच हेतू की, कांही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहो सोवळे नेसून नाचत फिरणाऱ्या लोकांचा एवढाच हेतु की, कांही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहो असे मानणे व त्यापासून त्यांस सुख वाटते. पण एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दुःखे पडतात ह्यांच्या ह्या निर्दयांच्या अंतःकरणास द्रव येतो की काय ? हयाच कारणामुळे आम्हास कोणी चाकरीस ठेवीत नाहीत. जर चाकरी मिळण्याची एवढी बंदी तर आम्हास पैसा कोठून मिळणार ? बरे, हे उघडाच सिध्द होते की आमचे हाल फार होतात. पंडितहो, तुमचे स्वार्थी आपलपोटे पांडित्य पूजेसहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते हयाकडे लक्षपूर्वक कान द्या. ज्या वेळेस आमच्यातल्या स्त्रिया बाळंत होतात त्या वेळेस त्यांच्या घरावर छपर सुध्दा नसते म्हणून हींव पाऊस व वारा ह्यांच्या उपद्रवामुळे त्यांस किती दुःख होत असेल बरे! हयाचा विचार स्वतांच्या अनुभवावारून करा. जर एखाद्या वेळेस त्यास बाळंतरोग झाला तर त्यांस औषधास व वैद्यास पैसा कोठून मिळणार? असा कोणता तुम्हामध्ये संभावित वैद्य होता की त्याने फुकट औषधे दिली ?

मांगमहाराच्या मुलांस ब्राह्मणादिकांच्या मुलांनी दगड मारून रक्त निघाले तर ते सरकारात जात नाहीत. ते म्हणतात की, आपणास उच्छिष्ट आणावयास अनुक्रमाने पुढे जावे लागते. असे म्हणून उगीच राहतात, हाय हाय, कायरे भगवान, हे दुःख ? हा जुलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येते. हया कारणास्तव भगवंताने आम्हांवर कृपा करून दयाळू इंग्रज सरकारास येथे पाठविले. आणि आतां हया राज्यातून आमची जी दुःखे निवारण झाली ती अनुक्रमाने लिहिते : शूरपणा दाखविणारे व गृहांत उंदीर मारणारे असे जे गोखले, आपटे, त्रिमकजी आंधळा पानसरा, काळे, बेहरे इत्यादि हे निरर्थक मांगमहारांवर स्वाया घालून विहिरी भरीत होते, व गरोदर बायकांसहि देहान्त शासने करीत होत ती बंद झाली; आणि पुणे प्रांती मांगमहारांचे कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराजाच्या राज्यात  अशी अंधाधुंदी होती की, ज्याच्या मनात वाटेल त्याने मांगमहारांवर नाना प्रकारची तुफाने घेऊन शेंदाड शिपायासारखा जुलूम करीत होते. ती बंद झाली. (किल्याच्या) पायांत घालण्याची बंदी झाली. आमचा वंशहि वाढत चालला. मांगमहार ह्यातून कोणी बारीक पांघरूण पांघरले असता ते म्हणत की, ह्यानी चोरी करून आणले, हे पांघरूण तर ब्राह्मणानीच पांघरावे. जर मांगमहार पांघरतील तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून त्यास बांधून मारीत, पण आता इंग्रजाच्या राज्यात ज्यास पैसा मिळेल त्याने घ्यावे. उंच वर्णातील लोकांनी (चा) अपराध केला असता मांगांचे किंवा महाराचे डोके मारीत होते ती बंद झाली. जुलमी बिगार बंद केली. आंगाचा स्पर्श होऊ देण्याची मोकळीक कोठे कोठे झाली. गुलटेकडीच्या मैदानात चेंडू दांडू खेळण्याची बंदी झाली. बाजारांत फिरण्याची मोकळीक झाली.

आता निःपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचे राज्य झाल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली आहे ती लिहितांना मला मोठे आश्चर्य वाटते. ती अशी की, जे ब्राह्मण पूर्वी आम्हास वर सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते, तेच आता माझे स्वदेशीय प्रिय मित्र बंधु आम्हांस ह्या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेतात. परंतु सर्वच ब्राह्मण घेतात असे नाही. त्यातून ज्यांचा विचार सैतानाने नेला आहे ते पूर्वीसारखाच आमचा द्वेष करितात, आणि जे माझे प्रिय बंधु आम्हास बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करितात त्यांस म्हणतात की, तुम्हास जातीबाहेर टाकू.

आमच्या प्रिय बंधूंनी मांगमहारांच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत. व ह्या शाळांना दयाळू इंग्रज सरकारही मदत करितात. म्हणून मांडलेल्या शाळांला फारच सहाय आहे. अहो दरिद्रानी व दुःखानी पिडलेले मांगमहार लोक हो, तुम्ही रोगी आहांत, तर तुमच्या बुध्दीला ज्ञानरूप औषधे घ्या म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनांतील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल; तर तुमच्या रात्रंदिवस ज्या जनावराप्रमाणे हाजऱ्या घेतात त्या बंद होतील, तर आतां झटून अभ्यास करा. म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाही; परंतु हेही माझ्याने सिध्द करवत नाही. ह्यास उदाहरण, जे शुध्द शाळेत शिकलेले पटाईत सुधारलेले म्हणवितात तेहि एखाद्या वेळेस रोमांच उभे रहण्याजोगे वाईट कर्म करितात, मग तुम्ही तर मांगमहारच आहात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com