Top Post Ad

साहित्य पुरस्कारप्राप्त मोईन काबरा : अ रिअल ह्यूमॅनिस्ट!


मोईन काबरा हा बुलढाणा जिल्ह्यातील 24 वर्षाचा एक हुशार मुलगा. त्याच्या अफाट वाचनाबद्दल त्याला एक लाख रुपयाचा
'स्वप्निल कोलते साहित्य पुरस्कार' मिळतो ही संपूर्ण मराठी परगण्याला अभिमान वाटावी अशी बाब! पाचशेहून अधिक पुस्तकांचे वाचन आणि त्यावर तौलनिक अभ्यास ही साधीसुधी बाब नाही. वाचनाचा छंद नसता तर मोईन टीन टपरं, भंगार जमा करत बसला असता. त्याचा हा प्रवास थक्क करणारा आहे. माध्यमासाठी नुसती स्टोरी नाही तर कव्हर स्टोरी आहे.

जाणून घेऊया पुस्तकांचे जगाशी घट्ट जुळलेल्या मोईनविषयी..
मोईनला इयत्ता सातवी पासूनच वाचण्याचा छंद जडला. त्यास डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा सिनेमा कारण ठरला. तो सांगतो की हा सिनेमा त्याला खूप आवडला होता त्याने त्याची सीडी आणून घरी तीन वेळा बघितला होता. त्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही व्यक्तिरेखा त्याला सिनेमातून उमगली. बाबासाहेब आंबेडकर यांचा बाल भीवा ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हा प्रेरणादायी प्रवास केवळ वाचन, लेखन आणि शिक्षणातून झाला.
मोईनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली.
एकदा त्याने मेहकर बस स्टँड वरील बुक स्टॉल वरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छोटे चरित्र विकत घेतले आणि ते ही वाचून काढले. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडमध्ये काम करणारे काही मित्र त्याला मिळाले त्यामुळेसुद्धा त्याला वाचनाची सवय जडली. दरवर्षी 12 जानेवारीला सिंदखेड राजाला पुस्तकं खरेदीसाठी येत गेलो असं तो सांगतो. विविध विषयावरील वाचनातून त्याला त्याचा जीवन मार्ग सापडला.

जगातील तिसर्या क्रमांकाचे खार्या पाण्याचे सरोवर असलेले लोणार शहर आपणा सर्वांना ठाऊक आहे. या सरोवराकडे जाताना मेहकर वरून आठ किलोमीटर अंतरावर लोणारच्या आधी सुलतानपूर गाव लागते. या गावच्या बुद्ध वस्तीस लागून मोईनचं घर आहे. घरासमोर त्याच्या भावाने एक किराणा दुकान थाटले आहे. मोईनचे आई-वडील अशिक्षित आहेत. निश्चित असा उत्पन्नाचा स्रोत नाही. शिक्षणाचा वारसा नाही. शिक्षणातून बदल होतो हे सांगणारं आसपास कोणी नाही. चोहीकडे दारिद्र्य. आणि बहकत जावी अशी प्रतिकूल परिस्थिती. या भयंकर परिस्थितीत त्याचं बालपण गेलं. सारा वांडपणा त्यानं केला. मात्र जसं त्याचं पुस्तकांशी नातं जुळलं तसं त्याला जगण्याचं इंगीत कळलं. तो अंतरबाह्य बदलत गेला.

मुलाच्या या अकाली शहाणपनाची चुणूक आई वडिलांना लागली. त्यांनी त्याचा छंद जपला.
मोईनला हवं ते पुस्तक घेण्यासाठी त्यांनी कधीच हात आखडला नाही. उलट आपल्या मुलाच्या वाचनास अनुकूलता मिळावी म्हणून वडिलांनी घराशेजारी टिन शेड उभारून त्याची अभ्यासिका उभी करुन दिली. या अभ्यासिकेलाच मोईन 'स्टडी बंकर' म्हणतो. या स्टडी बंकरमध्ये त्याने वाचलेली आणि खरेदलेली पुस्तके ठेवली आहेत. या सोबतच महामानवाची काही छायाचित्रे लावली आहेत. सोबतच काही प्रेरणादायी सुविचार देखील कपाटावर चिकटवले आहेत. याच स्टडी बंकरमध्ये अभ्यास करून मोईन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी. ए. पास झाला आहे. सध्या तो स्पर्धा परीक्षा तयारी करतो आहे. अर्थात त्यातूनही रोज 3 तास त्याचं अवांतर वाचन सुरूच आहे.

त्याचा बहुतांश वेळ याच खोलीत जातो. या खालीतच त्याचे चिंतन आणि लेखन सुरू असते. मुलगा काय करतो याची त्याच्या आई-वडिलांना माहिती नाही मात्र आपला मुलगा काहीतरी चांगले करतो एवढी त्यांना पक्की खात्री आहे. आपलं वर्तमान बदलण्यात तो यशस्वी ठरेल असा त्यांना विश्वास आहे.
मोईनची धर्मविषयक मते धर्माच्या तथाकथित ठेकेदाराविरुद्ध जाणारी आहेत. त्यामुळे त्यातल्या काहींनी मोईनच्या आईवडिलांना गाठून त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. वाद चर्चा सुद्धा केल्या.
या आणि अशा कैक अनुभवांमुळे मोईनने स्वतःच्या नावापुढे 'ह्युमॅनिष्ट' हा शब्द लावला आहे.
अर्थात हे माणूसपणाच्या अधिक जवळ जाणारे आहे.
मोईन म्हणतो, 'बरं झालं मी गावा बाहेरच्या या वस्तीतच वाढलोय..अन्यथा माझ्या आदर्शाची आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची एन्ट्री माझ्या आयुष्यात झालीच नसती आणि मी सुद्धा धार्मिक, देवभोळा असलो असतो..
मुळात बाबासाहेबांची आणि माझी नाळ या आमच्या बौद्ध, महार वस्तीनेच जुडलेली आहे याचा मला नेहमी आनंद होतो'

मोईनने आजवर जवळपास 110 पुस्तकांवर लिहिले आहे.
वाचलेल्या पुस्तकात काय आहे? ते तो सांगत असतो. त्याची मांडणी साधी सरळ असते. कठीण शब्द तो टाळतो. पुरस्कारानंतर त्याच्या आयुष्यात बराच बदल झाला आहे. तो म्हणतो, 'लोक माझ्याकडे प्रचंड आशेने बघत आहेत. या पुरस्काराने मला ओळख दिली आहे' खरंतर मोईनमुळं सुलतानपूर आणि बुलडाणा जिल्ह्याला अभिमान वाटावी अशी ओळख मिळाली आहे. परंतु आडनाव बघून पान्हा चोरणारा इथला साहित्य व्यवहार अजूनही मूक पाहतो आहे.
कोणत्याही पुढाऱ्याला मोईनची भेट घ्यावीशी वाटली नाही. कौतुक करावं वाटलं नाही हे एक आश्चर्य आहे. मोईनला याचं दु:ख नाही. 'अजून खूप दूर जायचं आहे' असं तो पोक्त माणसासारखं म्हणतो.

विनयशीलता हे मोईनच्या स्वभावाचे वैशिष्ट आहे. या वयात त्याने कैक मित्र जोडले आहेत. गंभीर वाचन तद्वतच गंभीर चर्चा तो त्याच्या दोस्तात करीत असतो. 'वुई रीड' नावाने सोशल मीडियावर त्याने काही ग्रुप तयार केले आहेत. त्यावर अनेकांना पुस्तकांशी जोडले आहे. वाचलेल्या पुस्तकांवर तो तिथे लिहितो. यासोबतच लोकांमध्ये वाचनाची अभिरुची वाढावी यासाठी प्रयत्न करतो. प्रकाशकांकडून चांगली पुस्तके मिळवून ती वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील तो काम करीत आहे. आजवर विविध लेखकांची जवळपास पाच लक्ष रुपयांची पुस्तके त्याने विशेष सूट देत वाचकांपर्यंत पोहोचवली आहेत. आपल्या मित्रांना मोबाईल पासून दूर राहण्यासाठी आणि निराशा व मरगळ घालविण्यासाठी 'टॉक टू फ्रेंड' हा देखील एक अभिनव उपक्रम त्याने सुरू केला आहे. एखाद्याला निराशा आल्यास त्याने माझ्याशी बोलावं असं त्याने आवाहन केलेय.
यातून अनेकांचे त्यास कॉल आले आहेत. आजही येताहेत. 'हे जग सुंदर आहे. काही लोकांनी ते कुरूप करण्याचा प्रयत्न सुरु केला असला तरी ते त्यात यशस्वी होणार नाहीत' असं मोईन म्हणतो तेंव्हा तो खरोखर ह्यूमॅनिष्ट वाटतो.
(जिज्ञासूंसाठी मोईनचा मो. क्र. +91 70664 95828)
- पत्रकार रविंद्र साळवे, बुलढाणा
M-9822262003

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com